Labels

Showing posts with label मराठी पाककृती. Show all posts
Showing posts with label मराठी पाककृती. Show all posts

Saturday, 17 March 2018

भुजिंग आणि पोपटी



                   
                        चिकनच्या अनेक रेसिपी प्रसिद्ध आहेत . त्यातल्या अगदी गावरान पद्धतीच्या भुजिंग आणि पोपटी यांची लज्जत काही न्यारीच . पोपटीला  तर एक परंपराही लाभलेली आहे . भुजिंग चा जन्म खवैयांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी झाला आहे तर पोपटीला परंपरेचे कोंदण आहे . दोघांच्या प्रक्रिया वेगळ्या आहेत . एकात तेलाचा भरपूर वापर तर दुसरी तेलविहरीत . एक पटकन तयार होणारी, दुसरीला संयमाची जोड हवी .पोपटी करताना संयम नाही पाळला तर आपला पोपट नक्कीच होतो .  दोघांमधील  समान धागा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात दोघांची लज्जत वाढते ,  मैफिल रंगते आणि खुमासदार होते .

भुजिंग 


                    भुजिंगच्या निर्मितीची कथा मजेशीर आहे . दारू पिणाऱ्यांना सोबत चटकदार खायला काय द्यावं द्यावं याच्या संशोधनातून चिकनवर भाजणे , तळणे या प्रक्रियेतून पोह्याच्या संमिश्र सोबतीने आगाशी , विरार येथे हा पदार्थ प्रथम निर्मिला  गेला. चिकनला पोह्याची जोड काही आगळीवेळी आहे . प्रथम चिकन,बटाट्यांच्या फोडींना  जिरा , हळद , धणे, मीठ लावून मॅरिनेट करायचे . लोखंडी सळईत चिकन , बटाटे याप्रमाणे गुंफायचे . कोळश्याच्या भट्टीवर खरपूस   भाजायचे .

                  वरील भाजण्याची प्रक्रिया झाल्यावर  कांदे ,वरील मॅरिनेटेड चिकन, बटाटे   व  खडे गरम मसाले  ,  हिरवी मिरची , लसूण याचे जाडसर मिश्रण  हंडीतील तेलात   परतायचे . हंडीवर थाळी ठेवून १० ते १५ मिनीटानंतर त्यात  पोहे परतायचे . काही जणांना पोहे आवडत नसल्यास नाही वापरले तरी चालतील .

                    भुजिंगला भाजण्यासाठी भट्टीची गरज लागत असली तरी हे काम दोन विटांवर खाली कोळसे जाळूनही करू शकता . घरी हे  शक्य नसते त्यावेळी चिकन थेट गॅसवर भाजता येईल . कोळस्यावर भाजल्या जाणाऱ्या चिकनची नैसर्गिक चव त्याला लाभणार  नसली तरी,  जिभेचे चोचले थोड्या प्रमाणात नक्कीच शमले जातील . चिकनला कोणते मॅरीनेट वापरायचे याचा निर्णय सर्वस्वी तुमचा . अट एकच प्रथम चिकनला भाजणे  मग त्याला तेलात परतणे . एकदा तोंडाला लागलं की , त्याचा फडशा पडला म्हणूनच समजा .
                   

पोपटी  
                    पोपटी हा पदार्थ रायगड परिसरात  साधारण थंडी सरत आली  की म्हणजे साधारणतः फेब्रुवारी महिन्या करण्यात येतो . याचे वैशिष्ट्य  म्हणजे संपूर्ण प्रक्रियेत जराही तेल वापरत नाहीत . म्हणजे डाएट बद्दल जागृत असणाऱ्या  लोकांना पर्वणीच . चिकनचे तुमच्या आवडीचे मॅरिनेशन ,  वालाच्या शेंगा , बटाटे, अंडी  आणि भांबुर्डीचा पाला मातीच्या मडक्यात    बंद करायचा .फक्त जाळावर चिकन शिजवायचे . चिकन जितकं जास्त वेळ मॅरीनेट केलेलं असेल तितकं लवकर शिजत . गप्पा मारत झोंबऱ्या थंडीत निसर्गाच्या सानिध्यात केलेली मेजवानी म्हणजे अवर्णनीय स्वर्गीय सुखाचा आनंद.

                   भांबुर्डीचा  पाला नदीकिनाऱ्यावर  विपुल मिळतो . मातीच्या मडक्यात प्रथम भांबुर्डीचा पाला , त्यावर मॅरीनेट केलेलं चिकन (१ किलो ),  वालाच्या  शेंगा (२ किलो ), अंडी(१२) , बटाटे (१/२ किलो )  असे थर रचायचे . वरून मीठ , ओवा  भुरभुरायचा  आणि मग वरून भांबुर्डीचा पाल्याने  मडक्याचे तोंड व्यवस्थित बंद करून   विटांवर मडक्याच्या तोंडाच्या दिशेने  रचायचे . भवताली सुक्या गवताचा, सुकलेल्या फांद्यांचा जाळ करायचा . साधारणता   चिकन एक तासात शिजते, अर्थात जाळाची  धग किती आहे यावर ते अवलंबून आहे . मडके काढताना कपड्यात धरून व्यवस्थित काढावे . पाला वेगळा करून सर्व पदार्थ मोठेया परातीत किंवा केळीचे मोठे पान असल्यास त्यावर  काढायचे  आणि मग कधी चिकन तर  कधी शेंगा हुडकून काढत  गप्पांच्या मैफिलीत अन बोचऱ्या थंडीला शह देत त्याचा फडशा पाडायचा.

            चिकन कबाब ,चिकन टिक्का , चिकन ६५ असे चिकनचे अनेक लज्जतदार अवतार असले तरी या मातीतल्या भुजिंग , पोपटीची मजा , सर त्याला नाही . निसर्गाच्या सानिध्यात आस्वाद घेत पोपटीची लज्जत काही आगळी वेगळीच , त्याला रंगणाऱ्या  गप्पाची जोड असते . तर भुजिंगमध्ये स्वत्वात लीन होत जिव्हेला अन देहाला स्वर्गीय आनंद देण्याची अविरत गोडी आहे .

             शाकाहारी  मंडळींनी नाराज होण्याचं कारण नाही . प्रक्रिया वरीलप्रमाणेच आहे . चिकन , अंडी बाजूला काढायची त्याऐवजी सहज मॅरीनेट होणाऱ्या आणि लज्जत वाढवणाऱ्या शेंगा ,बटाटे , कंदमूळ (रताळे ,काटेकनगे इ . ) किंवा आपले आवडीचे पदार्थ वापरून शाकाहारी भुजिंग , पोपटी तयार करायची .   हे दोन्ही पदार्थ गरम असतानाच चाखण्यात मजा आहे . नुकतेच हंडीतून काढलेले हे पदार्थ  भौतिक , आत्मिक सुखाची प्रचिती एकाच वेळी देतात . पोपटी साधारण थंडीमध्ये खाण्याचा मेनू असला तरी हाडाचा खवैय्या थंडीसाठी थोडाच थांबणार आहे. याच देही, याच डोळा  सुख चाखायचे असेल तर मग वाट कसली पाहता . घ्या भुजिंग , पोपटीचे  नाव आणि लागा खवैय्येगिरीला .


Thursday, 15 June 2017

कोळंबी-नूडल्स















साहित्य - 
१)  कोळंबी मध्यम आकाराची  (२० )
२)काळामिरी पावडर (१ चमचा )
३)कांदा (१ उभा  )
४) लसूण (३ पाकळ्या क्रश केलेली )
५)मीठ (चवीनुसार)
६) तेल (३ चमचे )
७)सिमला मिरची (१ छोटे तुकडे करून )
९) शेजवान सॉस (१ चमचा )
१०)मिक्स हर्ब्स (अर्धा चमचा )
११) पुदिना (१० पाने)
१२)नूडल्स (शिजवलेल्या )

कृती -

१)  कोळंबीला  मीठ व काळीमिरी पावडर लावून तेलावर ३ मिनिटे  परता .
२) कोळंबी  बाहेर काढून त्याच तेलात कांदा मोठ्या आचेवर परतून त्यात, लसूण , शेजवान सॉस  थोडावेळ परता (३ मिनिटे ) ,
३) सिमला मिर्च ,  तेलात परतलेली कोळंबी ३ मिनिटे  परता .
४) नूडल्स (शिजवलेल्या )  त्यात टाकून त्यावर मिक्स हर्ब्स पेरून  साधारण २ मिनिटे परता   .
४)  पुदिना  टाकून व्यवस्थित परता .


(हा चायनिस प्रकार असल्याने सर्व मोठ्या आचेवर करा तसेच पदार्थ सतत ढवळत रहा.  )


टिप - 
१)   पुदिना शेवटी टाका त्याची चव जिभेवर छान वाटते .
२)मिक्स हर्ब्स  नसल्यास जिरा,ओवा  भाजून त्याची पावडर अर्धा चमचा टाका .
३)  शेजवान सॉस मध्ये मीठ असल्यामुळे आवश्यक असल्यासच मीठ टाका .






,

Wednesday, 31 May 2017

मिसळ पाव



साहित्य -

१) कडधान्य ( १ छोटे बाउल )

फोडणी-साहित्य  


१)   आलं -लसूण पेस्ट (१ चमचा )
२)  कांदा ( अर्धा बारीक चिरलेला)
२)   टोमॅटो (१ बारीक )चिरलेला )
३)  कडीपत्ता (१० पाने )
४) मिरच्या (२ उभे छेद देऊन )
५) तिखट मसाला  (२ चमचे  ) 
६) हळद (अर्धा  चमचा )
७) तेल तीन चमचे 

रस्सा मसाला-साहित्य  

१) १ कांदा ( उभा चिरून )
२)  सुके खोबरे किसलेले  ( १ वाटी )
३)  लाल मिरच्या (२ )
४) धणे (१ चमचा )
५)काळीमिरी (१०)
६) दालचिनी (१ तुकडा )
७) जायफळ ( छोटा तुकडा )
६)जिरा (१ चमचा )

सजावटीसाठी व वरून पेरण्यासाठी 

१)कोथिंबीर (२ वाटी बारीक चिरलेली )
२)फरसाण एक वाटी 
३) लिंबू 


कृती 

१) प्रथम कडधान्य हळद , मीठ , पाणी टाकून ३ शिट्यांवर शिजवून घ्या 
२) रश्श्याचे साहित्य  तव्यावर भाजून त्याची मिक्सर मध्ये पेस्ट तयार करा . 
३) फोडणीच्या साहित्याला तेलात ५ मिनिटे व्यवस्थित परता . 
४) त्यात रस्सा मसाला टाकून थोडावेळ परतून आवश्यकतेनुसार पाणी टाका . एक उकळी आली की , शिजवलेले मूग टाकून ५ मिनिटे शिजवा . (कडधान्यात मीठ असल्यामुळे आवश्यक असेल तरच थोडे मीठ टाका )  
५) कोथींबीर टाकून सर्व्ह करताना थोडे फरसाण , त्यावर रस्सा , त्यावर पुन्हा फरसाण , बारीक कापलेला कांदा पेरा . थोडा लिंबू रस टाका . 

टीप 

१)  कडधान्याऐवजी सफेद वाटाणेही  छान लागतात . 


Tuesday, 30 May 2017

तळलेले पापलेट


साहित्य - 
१) 2 मध्यम आकाराचे  पापलेट  (प्रत्येकी २ तुकडे केलेले  )
२)तिखट  (२ चमचा )
३)धना -जिरा पावडर   (१  )
४) गरम मसाला (१ चमचा )
५) आलं -लसूण पेस्ट  (१ चमचा  )
६)  हळद (अर्धा चमचा )
७) जायफळ पावडर (१/४ चमचा )
८) लिंबू-रस  (२  १ चमचा  )
९)मीठ (चवीनुसार)
१०) तेल (४ चमचे )
११)  तांदळाचे पीठ ,थोडा तिखट मसाला, मीठ एकत्र केलेले


कृती -

१)  पापलेटचे  तुकडे स्वच्छ धुऊन  आलं -लसूण , जायफळ ,धना -जिरा पावडर ,तिखट , गरम मसाला , हळद ,लिंबू रस ,  मीठ ,  कोथिंबीर लावून १० मिनिटे ठेवा .
२)पापलेटच्या तुकड्यांना दोन्ही बाजूने तांदळाचे पीठ लावून घ्या . तेलात कडीपत्ता टाकून तेल गरम झाले की , माश्याचे तुकडे तळून घ्या . (तुकडे मोठे असल्यामुळे थोडावेळ झाकण ठेवा.  )
३) १० मिनिटापेक्षा जास्त वेळ शिजवू नका .
४) छोटे तुकडे केल्यास झाकण ठेवण्याची आवश्यकता नाही . 




,

कांदा-पोहे

               









साहित्य -

१)  पोहा  (१  बाउल  )
२)  कांदा  (१ बारीक चिरलेला )
३)  आलं -लसूण पेस्ट (१ चमचा )
४)  जिरा (१ चमचा )
५)   जायफळ पावडर ( १/४ चमचा, थोडीच घ्या उग्र आहे  )
६)   कडीपत्ता (१० पाने )
७)  पुदिना (१० पाने)
८)  तेल (२ चमचे )
९)   हळद ( अर्धा चमचा )
१०)   हिरव्या मिरच्या (२ बारीक चिरलेल्या )
११)   मीठ (चवीनुसार )
१२)  लिंबू (अर्धा )
१३) कोथिंबीर (पाव वाटी )
१४) मीठ (चवीनुसार )
१५)फरसाण  २ चमचे


कृती -

१)   तेलाला जिरा , कांदा , आलं -लसूण पेस्ट ,जायफळ  कडीपत्ता ,पुदिना , मिरची   याची फोडणी द्या . (कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत )
२)   भिजवलेले पोहे ,हळद , मीठ, लिबू  घालून मंद आचेवर झाकण ठेवून १० मिनिट शिजवा .
३)    कोथींबीर , फरसाण पेरून सर्व्ह करा .


टीप - 

१)  पोहे हाताला मऊ लागण्याइतपत भिजवा . 
२)  डाळिंबाचे  दाणे किंवा अंजीर, सफरचंदाचे बारीक तुकडे  वरून पेरायचे  असल्यास फक्त कडीपत्ता ,  हळद ,मिठाच्या  फोडणीत पोहे करा . त्यात एक चमचा साखर टाका ) 





भारतीय पास्ता









साहित्य -

१)  पास्ता  (१ बाउल  )
२)  टोमॅटो  (१ मोठा प्युरी  )
३)  कोथिंबीर (पाव वाटी )
४) आला -लसूण पेस्ट  (१ चमचा )
५)  कांदा  (१)
६) एक -एक वाटी  भाज्या ( ढोबळी मिर्ची , गाजर )
७)  मॅगीमसाला -ए -मॅजिक    (१पाऊच )
८)  टोमॅटो केचप
८)   काळीमिरी पावडर  (अर्धा चमचा )
९)   पुदिना (१० पाने)
१०)चिली फ्लेक्स (१ चमचा )(चिली फ्लेक्स नसल्यास लाल मिरची बारीक कापा )
१०)  तेल (२ चमचे )
११)  मीठ (चवीनुसार )




कृती -

१)  पास्ता , मीठ घालून शिजवून घ्या (१ बाउल ) .  .
२)  दोन चमचे तेलावर  तेलावर आला-लसूण , एक कांदा बारीक कापलेला  ,पुदिना ,  चिली फ्लेक्स (१ चमचा ) , कांदा थोडावेळ (कांदा लाइट ब्राऊन होईपर्यंत ) परता . 
३) ढोबळी मिर्ची , गाजर घालून २ मिनिटे परता . 
४)एका टोमॅटोची प्युरी, काळामिरी , मीठ घालून  पाच मिनिटे परतून घ्या 
५)  त्यानंतर  टोमॅटो केचप (१ चमचा )  व  शिजवलेला पास्ता  घालून मंद आचेवर पाच मिनिट शिजवा .
६) मॅगी मॅजिक मसाला सर्वात शेवटी घालून ३ मिनिटे परता .
७) कोथींबीर पेरून सर्व्ह करा .





                                                              मॅगी  मसाला -ए -मॅजिक

टीप - 

१)  पास्ता जास्त वेळ शिजवू नका . पॅकेटवर दिलेल्या कृतीप्रमाणेच शिजवा. नाहीतर कुकर मध्ये २ बाउल पाणी , थोडे मीठ , घालून फक्त एका शिटीवर शिजवून घ्या . 
२)   मूळ रेसिपीत टोमॅटो गरम पाण्यात ठेवून त्याची साल काढून प्युरी केली जाते . या रेसिपीत कच्च्या टोमॅटोची प्युरी केली आहे . 
३) मिक्स हर्ब , ओरेगॅनो  ने ही रंगत येईल 













         

Tuesday, 23 May 2017

फ्राईड चिकन




साहित्य - 
१) बोनलेस शिजवलेले चिकन (१ छोटे  बाउल )
२)काळामिरी पावडर (१ चमचा )
३)कांदा (१ मध्यम तुकडे )
४) लसूण (३ पाकळ्या क्रश केलेली )
५)मीठ (चवीनुसार)
६) तेल (३ चमचे )
७)कांदा (१ मध्यम तुकडे )
८)सिमला मिरची (१ छोटे तुकडे करून )
९) काळामिरी पावडर (१ चमचा )
१०)पेपरीका (१ चमचा) किंवा एका लाल मिरचीचे बारीक तुकडे , १ हिरवी मिर्ची (उभा छेद देऊन )
१०)सोया सॉस (१ चमचा )
११)मिक्स हर्ब्स (अर्धा चमचा )

कृती -

१)  बोनलेस शिजवलेल्या चिकनला मीठ व काळीमिरी पावडर लावून तेलावर परता .
२) चिकनचे तुकडे बाहेर काढून त्याच तेलात कांदा मोठ्या आचेवर परतून त्यात, लसूण , हिरवी मिरची थोडावेळ परता (३ मिनिटे ) ,
३) त्यात सिमला मिर्च थोडावेळ परता .  त्यावर काळामिरी पावडर , पेपरिका, मिक्स हर्ब्स , सोया सॉस  टाकून साधारण ३ मिनिटे परता   .
४)  तेलात परतलेल्या चिकनचे तुकडे टाकून व्यवस्थित मिश्रण करा .

(हा चायनिस प्रकार असल्याने सर्व मोठ्या आचेवर करा तसेच पदार्थ सतत ढवळत रहा.  )


टिप - 
१)  बऱ्याच  घरात चिकनच्या रश्श्यातील तुकडे खाल्ले जात नाहीत . (विशेषतः लहान मुले ) रश्श्यातील शिजलेले काही तुकडे आधीच बाहेर काढून  स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांना मीठ , काळीमिरी लावून तेलात परतावेत . (वरील कृतीत मी अशाच शिजवलेल्या चिकनचा वापर केला आहे )
२)घट्टपणा येण्यासाठी आवडत असल्यास १ चमचा  पीठात थोडे पाणी घालून ते शेवटी मिश्रणात टाकून थोडावेळ परतावे . 
३) चिकनला मीठ लावलेले असल्यामुळे आवश्यक असल्यासच मीठ टाका .
४)मिक्स हर्ब्स  नसल्यास जिरा भाजून त्याची पावडर अर्धा चमचा टाका .





,

कोंबडी रस्सा








साहित्य  -

१)   चिकन (बोनलेस २००ग्रॅम वजनाने  )
२)  वाटलेला  गोडा मसाला (१ वाटी  )
३)  कांदा (१ बारीक चिरलेला )
४) टोमॅटो (१ बारीक चिरलेला 
५)  कडीपत्ता (१० पाने )
६) जिरा (१ चमचा )
७) दही (१ वाटी  )
८) आलं -लसूण पेस्ट (२ चमचे )
९)मालवणी मसाला (२ चमचे  ) 
१०) हळद (अर्धा  चमचा )
११)कोथिंबीर (२ वाटी बारीक चिरलेली )
१२)मीठ चवीनुसार 
 १३) एका  छोट्या लिंबूचा रस 
 १४) तेल (३ चमचे ) 
 १५) ४ मिरच्या (उभे छेद देऊन )

कृती -

१)  चिकनला  दही (१ वाटी  ), आलं -लसूण पेस्ट (२ चमचे ), मालवणी मसाला (२ चमचे  ) ,  हळद  अर्धा  चमचा ),कोथिंबीर (२ वाटी बारीक चिरलेली ), मीठ चवीनुसार , एका  छोट्या लिंबूचा रस सर्व   बाजूंनी  लावावे . 

 २) तेलावर जिरा , कडीपत्ता, मिरच्या  २ मिनिटे परतल्यावर , त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा. ( साधारण ३   मिनिटे ) टोमॅटो टाकून अजून तीन मिनिटे परतावे . वरील मसाला लावलेले चिकन    त्यात टाकून दहा   मिनिटे झाकण ठेवून मध्यम आचेवर चिकन शिजवावे 

 ३)वाटलेला गोडा मसाला टाकून ४ मिनिटे परतावे . त्यात दिड   ग्लास पाणी टाकावे .  उकळी येईपर्यंत शिजले की ,  झाकण ठेवून २० मिनिटे मंद आचेवर शिजवावे . वरून कोथिंबीर पेरावी . 




टीप - 
१)कोकणातील बऱ्याच घरात तळलेला कांदा गोड्या मसाल्यात टाकून वाटण  तयार करतात . हे वाटण   आमटी ,  उसळी, मिसळ  यात वापरता येते . मुंबईच्या पळापळीच्या आयुष्यात लोकांना आयत्यावेळी असे  आवश्यक   वाटण करणे जिकिरीचे असल्यामुळे असे वाटण खूप उपयोगी पडते . 

गोडा मसाला -धणे (2 वाटी ) , जिरा (१ चमचा ), काळीमिरी (१५ ) दालचिनी (४ छोटे तुकडे ),   दगड    फुल (१ चमचा ) , हिंग ( अर्धा चमचा ) ,तीळ (१ चमचा ) मेथी दाणा (१ चमचा ),६ लवंगा ,    सुके  खोबरे (१ वाटी ) ,  लाल मिरच्या (१०)  तेलावर भाजून त्याची मिक्सरमध्ये पावडर करावी . 

गोडा मसाला वाटण -  या   तयार गोड्या मसाल्यात तेलावर परतलेल्या  ४ हिरवी इलायची , २ मोठी    इलायची , २ चमचे आलं -लसूण पेस्ट , 2 हिरव्या मिरच्या ,  कोथिंबीर , कांदा, मीठ  घालून    वाटण  तयार करून  ठेवावे . 

२) दही , टोमॅटो  आवडत नसल्यास वगळावे. मूळ मालवणी पद्धतीत दही , टोमॅटो वापरले जात नाहीत . 

३) आजकाल मिळणाऱ्या मालवणी मसाल्यात सर्वच मसाले वापरले जातात असं नाही . त्यामुळे चवीत फरक पडू शकतो . मला माहित असलेल्या एका पद्धतीत जवळजवळ ३० मसाले वापरले आहेत .  त्यातले काही सहजता उपलब्ध सुद्धा होत नाही .

४)  गोडा मसाल्याऐवजी कांदा , खोबरे , जीरे , शहाजिरे , धने ,मिरी , लवंग ,दालचिनी ,वेलची , लाल मिरची  वापरून वाटण तयार करता येईल . ( जे मालवणी पद्धतीत वापरले जाते )
५) रस्सा चिकन मध्ये हाडासकट चिकन वापरले जाते . मी बोनलेस वापरले आहे . 



          

          

Saturday, 20 May 2017

"पाकशैली" (cuisine)

               


                "पाकशैली" (cuisine)  विविध प्रदेशांच्या वैशिष्ट्यांतून निर्माण झालेली पाककृती .  या शब्दांनेच विविध पाकशैली जिभेवर रेंगाळू लागतात.  पंजाबी, उत्तर भारतीय, महाराष्ट्रीयन याशिवाय याच प्रदेशातील मालवणी पध्दत या प्रादेशिक स्तरावर तर जागतिक स्तरावरील  मेक्सीकन, चायनिझ, इटालिअन अशा कितीतरी पाकशैली असल्या तरी सर्वाचा उद्देश त्यातून तुम्हाला आनंद देणे तुमच्या जिव्हेचे लाड पुरविणे, हाच असतो . 

               प्रादेशिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या भाज्या , मसाले , मांस याचा पुरेपूर वापर प्रत्येक शैलीत विशिष्टपणे दिसून येतो .  उदा.मेक्सीकन फूडमध्ये भाज्यांच्या भरपूर वापर होतो जसे की, बटाटे, झुकिनी, मशरुम, सॉस मध्ये वापरून करण्यात येणारे झणझणीत मेक्सीकन पदार्थ .  काही भाज्या, भात,नुडल्स याचा वापर करुन चटकन जिभेचे चोचले पुरविणारे चायनिझ पदार्थ अशा कितीतरी पाकशैली आहेत.  सर्वसाधारणत: त्यात  आढळणारे पदार्थ मांस, मच्छी, भाज्या काही मसाले असले तरी त्यातला भेद जाणकार खवय्यानाच  पटकन उमजू शकतो.

                     मिरची वापरली जात नाही , असा प्रदेश शोधावा लागेल . काश्मीरची नजाकती मिरची असो किंवा कोल्हापूरची झणझणीत मिरची दोघीही पदार्थाला एक वेगळाच जायका देतात . ढब्बू ढोबळी मिरची , आपल्या पिवळ्या , हिरव्या , लाल रंगाने पदार्थ रंगतदार बनवते . यासोबत रस्सा दाट करण्यासाठी त्या त्या प्रदेशात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या पदार्थांचा जास्त वापर होतो . काश्मिरात अक्रोड वापरले जातात . मालवणात खोबरे वापरले जाते . चायनीझ पाककृतीत यासाठी मक्याच्या पिठाचा वापर केला जातो . तिखट मसाले घालून केलेली चमचमीत पंजाबी  तंदुरी ,  पाश्चत्य पद्धतीचे केवळ मीठ व काळीमिरी पावडर वापरून केलेल्या तुलनेने साध्या पदार्थांची आपआपली रंगत   असते . थोडक्यात पद्धत तीच असली तरी नजाकत वेगळी .

            भारतीय पाकशैलीत आला लसूण  वाटणाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.  भारतीय शैलीतील पाककृतीचे ते वैशिष्टय म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आला-लसणाच्या जोडीला तिखट मसाला, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाले, वेलची, दालचिनी, जायफळ, तेजपत्ता याची साथ असली की भारतीय पदार्थांना वेगळीच चव येते.  मग हे पदार्थ अधिक लज्जतदार करण्यासाठी मालवणात कोकम, खोबरे याचा सढळ वापर केला जातो तर दुध  -दुभत्याने श्रीमंत असलेल्या पंजाबात चिकन- मटण मुरुविण्यासाठी दहयाचा सढळ वापर करतात. गोव्यात खाद्यपदार्थांना जाणवणारा व्हिनेगरचा गंध, दाक्षिणात्य पदार्थात सामावलेला खोबऱ्याचा सुगंध , पंजाबी तंदूर मसाल्याचा उग्र परंतु  जिव्हेला गुलाम करणारा स्वाद याने "अन्न पूर्ण ब्रह्म " होते.   


            जागतिकीकरणामुळे जगातल्या अनेक पाकशैलीचा प्रभाव भारतीय पदार्थावर पडला आहे.  भारतीय शैलीत केले जाणारे चायनिझ, पास्ता ही काही उदाहरणे आहेत.  नेहमीच्या भारतीय मसाल्यांना टाळून केवळ चायनिझ सॉसच्या सह्याने तयार केल्या जाणाऱ्या भाज्या , विशेषत:  चायनिझ भेळ लोकप्रिय होत आहे. विविध पाकशैलीच्या रंगतदार, चवदार, रंगबेरंगी, चटकदार पदार्थांची चविष्ट यात्रेचा प्रवास न संपणारा परंतु जिव्हेला संपूर्ण संतुष्टी देणारा आहे. काही पदार्थांची साम्य स्थळे मजेशीर आहेत . वडा ,पाव -बर्गर , चपाती , भाजी -फ्रॅन्की , शेवया -नूडल्स.   उत्तर भारतीय पाकशैलीचा बडेजाव, दक्षिणी साधेपणा, गोवन पाकशैलीचा romantism , मालवणी पाकशैलीचा चटकदारपणा या सर्व पाकशैलींनी “ किती दिले देवा भरून, तरीही  राहिले काही चाखायाचे राहून”असे होऊन जाते. 
. 
            
           मला आवडलेल्या दोन पाककृती  आवर्जुन देत आहे.  

         १) १ वाटी कोलंबीला हळद, मीठ, लिंबू लावून पाच-दहा मिनीट मुरवा तेलाच्या फोडणीत आल-लसूण, कडिपत्ता, थोडी जायफळ पावडर (जास्त वापरू नका उग्र आहे ), आडवे छेद दिलेल्या हिरव्या  मिरच्या , १ कांदा, जिरा  थोडावेळ परतल्यानंतर , फोडणीत मुरवलेली कोलंबी थोडावेळ परता .  वर एक पेला तांदूळ (कोलम ) टाकून २ मिनीट परता. त्यात  दोन वाटी  पाणी,  चवीनुसार  मीठ टाकून कुकरमध्ये फक्त एका शिटीवर शिजवा.   कुकर काही वेळानंतर उघडा . कोलंबी भात तयार . 

       २)  भारतीय पद्धतीचा पास्ता 
             पास्ता शिजवून घ्या (१ बाउल ) . दोन चमचे तेलावर  तेलावर आला-लसूण , एक कांदा  , एका टोमॅटोची प्युरी पाच मिनिटे परतून घ्या , त्यात  तुमच्या आवडीप्रमाणे एक -एक वाटी भाज्या घाला (ढोबळी मिर्ची , गाजर ,मका इ ), त्यानंतर हळद , तिखट मसाला , गरम मसाला , मीठ , टोमॅटो केचप (१ चमचा )  , मीठ टाकून थोडावेळ परतल्यानंतर शिजवलेला पास्ता  घालून मंद आचेवर पाच मिनिट शिजवा . वरून थोडी कोथिंबीर पेरा . (यात मसाले तुमच्या आवडीनुसार बदला परंतु टोमॅटो केचप , टोमॅटो प्युरी हा बेस बदलू नका. मिक्स हर्ब , चिली फ्लेक्स,ओरेगॅनो  ने ही रंगत येईल  )