Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Saturday, 10 May 2025

आत्मा

 

  

                                                    


      आत्मा हे  एक विश्वव्यापी  तत्व आहे. ते अविनाशी आहे.पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरात या तत्वामुळेच निर्माण होते चैतन्य, आत्मतत्त्व नित्यनूतन असतं. ते स्वयंभू आहे. ते येत नाही अन् जात नाही, केवळ असतं. ते सतत गतिशील असल्याने ही संज्ञा मिळाली आहे. परमात्मा आणि जीवात्मा हे त्याचे दोन पैलू. तत्वज्ञानात त्यास 'आत्मन'  म्हणतात. हा इंद्रियगम्य नाही. पापरहित, जरामरणापासून मुक्त, तहानभूक नसलेला शाश्वत आहे. विशुद्ध  आत्म्याला  अमृतानुभव येतो. शरीराचा व्यापार चालवणारी शक्ती म्हणजे प्राण. त्याच्या आत असतो मनोमय आत्मा. त्याच्या आत विज्ञानमय कोष आणि त्याच्या  अंतर्भागात असतो आनंदमय आत्मा. तो तटस्थ असतो. साक्षीभावाने पाहतो. अदृश्य, अचिंत्य आणि अलक्षण असतो. हे आत्म‌ज्ञान म्हणजे मुक्ती.

         या आणि अशा उच्च अध्यात्मिक  विषयांचा सखोल अभ्यास करणारे डॉ. रमेश नारायण  हे सनदी अधिकारी. 73 वर्षाचे तरुण, विशेष म्हणजे त्यांचा लेखन प्रवास वाचनांच्या छंदातून खऱ्या अर्थाने वयाच्या 65 वर्षानंतर सुरु झाला. ज्या वयात माणसं निवृत्ती पत्करतात त्या वयात नवचैतन्याने  काम करीत आहेत. वयानुसार एक ठहराव त्यांच्या स्वभावात आला आहे. या ठहरावातून आत्मा या विषयाचे चिंतन झाले आहे. जनसामान्यात मिसळून माणसातली माणुसकी शोधणारी त्यांची गुणवाहक वृत्ती पुस्तका तील बारकाव्यातून सहजपणे प्रतिबिंबीत होते .

       संसारात रमताना परब्रह्माचे ठसे त्यांना कुठं ? कसे गवसले ? हे या कथासंग्रहात वाचक समजू शकतात. मानवी आणि अमानवी वृत्तींच्या सीमेवर भेटणारे 'आत्से कसे विचित्र अन् विलक्षण असतात, हा प्रत्यय येतो. या कथांमधली पात्रं प्रत्यक्षात असू शकतात, तशीच काही कल्पनेत भेटू शकतात. मूळ मुद्दा लेखक विसरत नाही, तो म्हणजे प्रत्येकाचा आत्मा  आदराने जपणे, काही पात्रे आत्मा हरवलेली माणसे असतात, त्यांचं दर्शनही पुस्तकात सहज होते.

      आपपरभाव न बाळगता मोकळेपणाने इतरांचे ऐकून घेणे हा लेखकाचा विशेष मनोभाव. म्हणूनच या कथा जिवंत वाटतात. समोर आलेल्या व्यक्तिरेखेची बारीकसारीक स्वभाववैशिष्ट्ये सापडली, की भूमिकेचा आत्मा गवसतो , असे अभिनेते म्हणतात. लेखकसुद्धा पात्रांच्या अंर्तमनात डोकाऊन सकस लेखन करतो. कथाकार डॉ.रमेश नारायण यांचं हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.समर्थ म्हणतात,


'ऐसा जो अनुभव जाला।

तोही नाशिवंतामध्ये आला 

अनुभवावेगळा राहिला ।

तो तू आत्मा । आत्माराम : 

       मनातील निरतिशय शांतीचा जो अनुभव येतो, तो अर्थातच जाणिवेच्या सूक्ष्मतम अस्तित्वा‌मुळेच! हा रसास्वाद ज्यांना घेता येतो तो कलावंत ,असाच प्रत्यय कथा वाचताना पानोपानी येतो .

    एकंदर पंधरा कथांचा हा पुष्पगुच्छ विविध रंगांचा आणि रूपांचा आहे. प्रत्येक कथेचा रसास्वाद घेताना प्रस्तावना प्रदीर्घ होण्याची संभाव्य शक्यता आहे. एकूण मांडणी सरस आणि सुरस आहे. 'जत्रा ' कथेतील शाळकरी मुले घरी न सांगता दूर जत्रेला जतात. टूरिंग टॉकिजमध्ये फुकट सिनेमा कसा पाहतात.उशीरा घरी आल्यावर ओरडणारे आणि प्रकृती बरी नसूनही नायकाला शाळेत पाठविणारे बाबा. जत्रेतल्या गमती आहेतच. शेवटी मात्र रखावालदाराचा धक्‌कादायक प्रसंग कथेची उंची वाढवतो .तर समांतर मध्ये घरासमोर राहायला आलेली ती आणि तिच्या प्रेमात पडलेला तो म्हणजे नायक शाम.

दोघांतील आंतरिक ओढ, निरोपाची केविलवाणी व्याकुळ अवस्था हे प्रसंग लेखकाने अत्यंत तरलपणे टिपले आहेत. तिचं एक गुपित लेखक शेवटी सांगतो. त्यांने या कथेला पूर्ण कलाटणी मिळते. या कथेतून लेखक वाचकांची उत्सुकता शिगेला नेतात.


'हिरमोड' कथेतील सुरेशची गावस्मृती विलक्षण बोलकी आहे. शेती विकल्पावर, घर ठेवल्यावर फार परकेपण जाणवते. गाव 'आपला आहे, या आप्तभावनेने तो जातो अन् आपलेपण हरवल्याचे दिसते. पडक्या घरात राहायचे कसे? काकूकडे गेल्यावर अंतरीची ओल दिसत नाही. महिनाभर राहण्याचा इरादा असतो, पण एका दिवसात गाव सोडावा लागतो. घरचे लोक परत जाताना निराश होतात. लेखकाने संवाद टाळून कयेतील उदासीनताअबोलपणे परिणामकारक साधली आहे.


"बळी कथेची सुरुवातच अशी आहे, की उत्सकतेपोटी वाचक वाचू लागतो. एका नोकरदाराची ही कथा. कार्यालयातील विविध प्रवृतीच्या लोकांच्या मनोवृतीचा लेखाजोखा त्यांनी या कथेत मांडला आहे.कुठल्याही माणसाच्या आयुष्यात असे घडू शकते . लेखकाची संवेदनक्षमता , प्रसंगाचे अचूक अवलोकन, विविध स्वभाव वैशिष्टये, प्रसंग, धक्‌का तंत्र यांनी पुस्तकाची मांडणी मनोरंजक केली आहे.

सोबत, आत्मा, जगरहाटी, उध्वस्त , झोका आणि आधार या कथासुद्धा लक्षणीय आणि चित्तवेधक आहेत. सर्व कथांत जाणवणारी विशेष म्हणजे यांत गाव आहे, नागरी जीवन आहे, जीवनांचे अनेक पैलू आहेत. लेखकाची अचूक संवेदनशीलता आणि त्याचे अचूक अवलोकन याने ,लेखक समाजात किती खोलवर रुजलाय याचा अंदाज येतो. या कथेतल्या पात्रांशी तो एकरूप झालाय याची साक्ष पटते . दुसरा मुद्दा असा की, मध्यमवर्गीयांच्या पार्श्वभूमीवर वावरणारी काही पात्रे नात्यातील जाणीवा आणि उणिवा स्पष्ट करतात. संबंधातील मर्यादा अधोरेखित करतात. मानवी जीवनाचा अफाट विसंगत आणि विषय रूपगंधांचे संदर्भ त्यातून मिळतात.


डॉ. रमेश नारायण यांची शैली आशयानुसार बदलते. काही कथांत ते तपशील भरतात. कथा खुलतात. काही कथा हळूवार, नाजूक फुंकर घालतात. सतत प्रतिमांचा उपयोग न करता कथा वाचनीय ठरते. आशयाचे अविभाज्‌ घटक कसे आणि कोणते असतात, हे प्रत्यक्ष वाचल्याशिवाय कळणार नाहीत.


डॉ .रमेश नारायण यांचे कथाविश्व वाचकास माणसांच्या जगण्या-वागण्याचे वेगळेपण दाखवते. ओळखीच्या चौकटीबाहेर जे अगाध जग रंगीबेरंगी लीला करते, ते आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न डॉ. रमेश नारायण मनापासून करताना दिसतात. कोणत्याही समाजाचे सुसंकृत वस्त्र विणताना संस्काराचे उभे -आडवे धागे एकता ,समता आणि समरसता साधण्याचा प्रयत्न लेखक हा विणकाराच्या भूमिकेतून प्रामाणिकपणे करतो .त्यातून तो आपल्या परिवर्तनशील मनाचे दर्शन घडवतो .अर्थात हा बदल संथपणे होत असल्याने वाचक तटस्थपणे 'जुने ते सोने ' अनुभवतो आणि 'नवे ते हवे ' हेही सांगतो . अनेक गोष्टींचा परस्परसंबंध आणि त्याचा अन्वयार्थ लावणे फार कठीण वाटत नाही .प्रस्तुत 'आत्मा' दृश्यरूपाने आपले रंजन करतो,हेच तर हवंय ना वाचकांना.


अजय भोसले

कवी,अमूर्त चित्रकार,सुलेखनकार, blogger







Thursday, 8 May 2025

हिवरे बाजार




पार्श्वभूमी


                हिवरे बाजार हे अहमदनगर जिल्ह्यातील शिवकालीन नाते असलेलं  एक  समृद्ध  गाव . परंतु १९७२ च्या दुष्काळानंतर या गावाची स्थिती बदलली . दारू ,शिक्षणाचा अभाव यामुळे गावाला अवकळा आली . १९८९ नंतर पोपटराव पवार यांच्या नियोजनबद्ध  विकास कार्यक्रमामुळे गावाचा विकास झाला असून आता हे गाव एक आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे . शाळा , ग्रंथालय , विहिरी ,झाडे   यांना महत्व दिल्यामुळे जगभरातून लोक गावाचा अभ्यास करण्यासाठी येतात . 


गावातील उपक्रम

• शिक्षण

• व्यसनमुक्ती 

• सेंद्रिय शेती 

• पाणलोट विकास 

• पशुधन विकास 

• महिला सक्षमीकरण 

• सौर ऊर्जा 

परिणाम

• पाण्याची उपलब्धता वाढली

• सुधारित पीक उत्पादन (300%)

• वाढीव उपजीविका (50% उत्पन्न वाढ)

• चांगले शिक्षण (९० टक्के उपस्थिती)

• सशक्त महिला (30% बचत गट सदस्यत्व)

• ऊर्जा खर्च कमी (80%)

     प्रशासन, धोरण  आणि गाव 

            राज्याचा विकास करताना धोरण आखणी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे . त्यानंतर अंमलबजावणीचा भाग  क्षेत्रीय पातळीवर येतो . शासन  धोरणाची आखणी करत असताना  समन्यायिक तत्वाच्या आधारे आखणी करत असते . परंतु एका गावाचा विकास होतो आणि अन्य गावाचा नाही याचा अर्थ अंमलबजावणीतील उदासीनता हाही एक भाग दिसून येतो . सरपंचाशी झालेल्या चर्चेतून असे दिसून आले की , ग्रामीण पातळीवरील समस्यांचा अभ्यास न करता , स्थानिक लोकांची मते विचारात न घेता धोरणे आखली जातात . आता इथे प्रश्न येतो मंत्रालयीन धोरण आखणी पद्धतीचा . पूर्वी कोणतेही धोरण आखताना संबंधित विषयातील तज्ञाची समिती नेमून त्या आधारे धोरण आराखडा तयार होत असे . कोणतेही धोरण पूर्ण  राज्यावर परिणाम करणारे असल्यामुळे मला धोरण आखणी करताना खालील तीन मुद्दे विचारात घ्यावे असे वाटते . 

१}  क्षेत्रीय तपासणी 

२}  तज्ञांचे  मत 

३} प्रशासनिक पातळीवर सर्व अंगाने चर्चा 

४} धोरण आखणी 

उपाययोजना 

          गाव पातळीवर  शासनाच्या अनेक योजना आहे . अशा सर्व योजनांची एकत्रित माहिती उपलब्ध करून त्याबाबत ग्रामपातळीवर सजगता वाढविणे आवश्यक आहे . शिक्षण , सजगता , अंमलबजावणी या त्रिसूत्रीचा आधारे हे साध्य  करता येईल.  यातील लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.


Ajay Bhosale.

Saturday, 30 May 2020

दृष्टी

        





        "Shallow hal " नावाचा एक चित्रपट पाहिला होता. hal फक्त आकर्षक महिलांना डेट करायचा.त्याच्या दृष्टीने शारिरीक सौंदर्य प्राथम्याच होत.तो रोझमेरी नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडतो. खरतर ती लठ्ठ असते.परंतु ,लिफ्ट मध्ये एक गृहस्थ त्याला तिचे आन्तरीक सौंदर्य बघण्यास संमोहित करतो. रोझमेरी मनाने खूप चांगली असते.तिच्या निष्पाप आन्तरीक सौंदर्यामुळे त्याला ती खूप आवडू लागते. परंतु संमोहन उतरलया नंतर त्याला धक्का बसतो.तो डिप्रेशन मधे जातो. तो तिला टाळू लागतो. त्याला मग शारिरीक सौंदर्यापेक्षा मानसिक सौंदर्याचे महत्व पटते .चित्रपटाचा शेवट गोड होतो.

            परंतु ,प्रत्यक्ष आयुष्यात अस होत असेल का? मनुष्य हा सर्वसाधरणत: मनाच्या सौदर्यापेक्षा भौतिक सौंदर्याने आकर्षित होत असतो .हे भौतिक सौंदर्य काहीकाळ दिसेनास झाल तर तो तितक्याच आसक्तीने प्रेम करेल का? पुरुषाच प्रेम भौतिक असत तर स्त्रीच भावनीक हे मानसशास्त्राने स्वीकारलेल तत्व आहे.मला इथेच मुबईत घडलेली एक कथा आठवली.

             एक राजा राणी मुंबईच्या छोट्या फ्लैट मधे आनंदाने रहात असतात.दोघही नोकरीला घरात सुबत्ता. तो तिला आवडायचा.ती त्याला आवडायची . तिने आपले सर्वस्व त्याला समर्पित केले होते. ती त्याच्या कुठल्याही मागणीला नाही म्हणायची नाही.नोकरीचा झेंडा मिरवायची नाही. तो राणी राणी म्हणताना थकायचा नाही. ती हवेत विहरायची. जे अनेक स्त्रियांच्या वाट्याला आलेल घरकाम चुकत नाही ते ती कुरकुर न करता करायची. तो फक्त पहायचा. त्याला काय हव नको ते सारखी पहायची .आजारी असो नाहीतर नसो. त्याच्या प्रेमळ शब्दांनी विरघळायाची. मूड नसला तरी मागणी पुर्ण करायची. आताशा तिच वजन वाढल होत . तो तिला जोग्गिंग ला घेउन जायचा.व्यायाम करवून घ्यायचा. तिला केवढ कौतुक . तिच्या अपेक्षा थोड्या होत्या . त्या सर्व पुर्ण होत असल्यामूळे आपल्या परिघात ती खरच खूप आनंदी होती.
         पण आता तर ती आजारी पडू लागली होती.ओब्सेसिटी मुळे तिच वजन प्रमाणाबाहेर वाढ़ु लागल तसतस राणी राणी ऐकू येइनास झाल. त्याचे उबदार स्पर्श लुप्त झाले . ती भांबावली बिचारी. तिला वाटलं मी तर तिच आहे मग त्याला अनोळखी का वाटतेय. तिन विचारायच ठरवल . "का अस वागतो आहेस तू. रोज मला वेळ काळ न पहाता हट्टाने जवळ घेणारा तू मला आता टाळतो आहेस?" तो म्हणाला..".तुला व्यायाम करायला सांगितल तुला interst नाही.आळशी आहेस तू ."ती म्हणाली ..."त्याचा काय संबंध...हा आजार आहे वजन वाढणाराच ..." तो म्हणाला...."बघ स्वताकडे जरा" ती म्हणाली ..."मी तर तशीच आहे " तो..."काय तशीच आहे....बघवत नाही ...बेडौल झाली आहेस.." तिला धक्का बसला ..."पण माझ मन तसच आहे ..पुर्वीसारख " तो ...." काय करु तुझ्या मनाच ..त्यान सुख मिळत नाही " ती आता कोसळली होती .." सुख फक्त शारिरीक असतं का " तो..."मग दुसर काय असत" ....ती ...." म्हणजे माझ्याकडून व्यायाम करुन घेण ,तुझी काळजी नव्हती ...गरज होती"
तो ... "तसच समज "
       .  ती निराशेच्या खोल गर्तेत गेली होती.तिने त्याच्या वाटेल त्या मागण्या पुर्ण केल्या होत्या .शारिरीक असो वा अन्य काही .फक्त त्याच्यासाठी . फक्त शरीराचा आकार बदलल्याने आता ती नकोशी झाली होती ,पण आत्मा तर तोच होता ना. तिच्या आसवांनी उशी भिजली होती. तिच्या मनाची कोंड फुटत नव्हती . ती मनाशी एकटीच सारखी बडबडत होती "अरे पण मी तर तीच आहे ना.....अरे पण मी तर तीच आहे ना "

Saturday, 4 April 2020

दृष्टी

          आज एका पुस्तकाबाबत   चेहरापुस्तका  ( एफ बी )वरील एका निर्गुण फ्रेंडशी  मायाजालावर संवाद चालला होता . निर्गुण यासाठी की , अशा माध्यमावर आपण निर्गुण स्वरूपात संवाद साधत असतो.  त्यापैकी अनेकांना सगुण स्वरूपात  कधी  पाहिलेलेही  नसते.  मला वाटते याची आवश्यकताही नसावी.  सगुण  देह  एकमेका समोर आले  की  ,काहीवेळा भ्रमाचा भोपळा फुटायला  वेळ लागत नाही; याचा fb कारांनी मानसशास्त्रीयदृष्ट्या नक्कीच अभ्यास केला असणार .  सगुण देहधारी   दोन माणसं एकमेकासमोर आली की,  अपेक्षा, भावना, इच्छा ,आकांक्षा  यांचं एक असं जाळं निर्माण होतं की, एकवेळ संगणकाच्या मायाजालातून आपण बाहेर पडू शकू परंतु याच्या नाही .  त्यामुळे निर्गुण स्वरूपातचं  संवाद साधणं सोयीचं आहे.  आणि करोनामुळे  सद्यस्थितीत हाच एक  उत्तम उपाय आहे.  ज्या निसर्गाने ही उत्पत्ती केली आहे त्यात सोशल डिस्टसिंग का आवश्यक आहे,  हे भौतिक आणि मानसिक दृष्ट्याही पटायला लागतं. सिल्व्हेस्टर स्टॅलोनचा, सॅन्ड्रा बुलॉक   यांचा एक चित्रपट पाहिला होता. एका  प्रगत संस्कृतीबाबत  . ज्या संस्कृतीत कुठल्याही प्रकारचा स्पर्श करण्यास सक्त मनाई आहे . कारण स्पर्शामुळे विषाणु,किटाणु इत्यादींचा संसर्ग होऊ शकतो . त्यामुळे  प्रेमही तंत्रज्ञान वापरून करायचं . आज हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे सद्यस्थिती . करोनायण .  

      lockdown  मुळे झालंय काय? भरकटायला होतंय. अन्य वेळी आम्ही पती , पत्नी , बहीण ,भाऊ , मित्र , आई , बाबा यांच्याशी किती वरवरचं बोलत असतो . या lockdown मुळे मनाचा अगदी निचरा होईपर्यंत संवाद साधायला लागलो आहोत . हो ... आम्ही आता फक्त बोलत नाही...  . संवाद साधत आहोत . त्यामुळे पर्यावरणाबरोबर मनंही स्वच्छ व्हायला लागली आहेत . 

      थोडा भावुक झालो .  मूळ विषय राहीला बाजूला. विषय होता निर्गुण फ्रेंडचा आणि सुचविलेल्या पुस्तकाचा  . निर्गुण , सगुण असे शब्द वापरले की , जरा वजन येत लिखाणाला . बाकी कोणताही हेतू नाही .  तर ते पुस्तक होतं , मौनराग....  महेश एलकुंचवार यांचं  ते पुस्तक सद्यस्थितीत  मिळणं  शक्य नव्हतं , म्हणून बुकगंगा च्या संकेतस्थळावर  शोध सुरु केला . निदान  काही भाग वाचायला मिळावा म्हणून .  अशा संकेतस्थळावर एक बरं असतं ,पुस्तकाची ओळख व्हावी म्हणून एक दोन पानं फुकट वाचायला देतात.  या काळात बसल्याबसल्या अशी अनेक  पाने  वाचून काढली  आहेत.  याचा  अजून एक फायदा असा होतो की ,पुस्तक घ्यावं की नाही याचा निर्णय तात्काळ  घेता येतो . 

           तर विषय अंत्यविधीबाबत होता . मजकुर काही असा होता .. 
          "कचकच वाजणारी ताटी , क्वचित जोराचा हिसका बसला की हलणारे ते जड मस्तक ,अंगावर पांघरलेले जाडशुभ्र प्रेतवस्त्र , फुलांच्या प्रेतमाळा ह्यात कुठेही सौंदर्य नव्हते . गंभीरताही नव्हतीच . ख्रिश्चनांच्या ,मुसलमानांच्या प्रेतयात्रांना किती , एक वेगळे गंभीर सौंदर्य असते ...... ..इ . "

         मला मोठी गंमत वाटली . आज अवतीभवती ज्या वेदनामय घटना घडत आहेत, कानी पडत आहे ,  त्यामुळे  वाचनाला भरपूर  वेळ असूनही आस्वाद घेता येत नाहीये . वाचन मात्र होतंय . मी या ललित लेखनाकडे आता भाषेचं सौंदर्य म्हणून न पाहता , भौतिक, व्यावहारीक दृष्टीतून चाचपून पाहत  होतो . त्याचं दुसरं कारण मी अलीकडे वाचलेलं एक अन्य पुस्तक . त्यात अशी माहिती होती की जर्मनी येथे अंत्यसंस्काराची पद्धत परंपरेप्रमाणे , धर्माप्रमाणे दफनविधीची आहे . परंतु तेथे दफनविधीला जागा उबलब्ध होत नसल्यामुळे, परवडत नसल्यामुळे  बहुतांश लोक दहन करतात . म्हणजे लेखकाची दृष्टी काही असली तरी सामान्य  जनतेची  दृष्टी व्यावहारीक असते. तिला अलंकारीक सौंदर्य आणि परंपरा नेहमीच परवडतात असं नाही  आणि माझ्यासारख्या वाचकाची सौंदर्यदृष्टीही परीस्थितीनुरुप बदलत असते.

            

       

Monday, 30 March 2020

महाराज आज तुम्ही असते तर ....

       

     मनावर निराशेची जळमटं   जमायला लागली की, शिवचरित्र हाती घ्यावे ......सहयाद्रीच्या कडे -कपाऱ्यातून येणारे प्रतिध्वनी मनात, हृदयात ,नसानसात भिनवून घ्यावे .....  जाणता राजा...ज्याचं संपूर्ण चरित्र म्हणजे एक स्फूर्तीदायक पोवाडा .... जीवनाचे सार .... त्यांचे चरित्रामृत देहात रूजवून घ्यावे. शिवधर्माने पावन व्हावे . 

      प्रबोधनकार ठाकरे म्हणतात."श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला .पण प्रत्यक्ष आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवद्गीतेत आहे, हे सप्रमाण सिद्ध केले शिवाजीने .गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत. ते शिवाजीने फेडले . "     अर्जुन कर्तव्य बजावताना विचलित झाला होता. महाराज नेहमीच कर्तव्यतत्पर असतं . रयतेचं  हित हाच त्यांचा धर्म होता. "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन " हाच त्यांचा एकमेव मंत्र होता. म्हणजे कार्यरत रहा . कर्मयोगी व्हा . मला पुराणातल्या वांग्यात रस नाही.(उगाच नाही का म्हण प्रचलित आहे , पुराणातली वांगी पुराणात ठेवा )जेव्हा आयुष्याची दिशा मला शिवचरित्रात सापडते .  माझ्यासाठी शिवचरीत्र हा पवित्र ग्रंथ आहे. रयतेचं    हित  शिवधर्म आहे .

      महाराजांच्या इतिहासाचे अवलोकन केले की  एक गोष्ट ज्ञात होईल,ती अशी की ,त्यांची दृष्टी विज्ञानवादी होती. एक ना अनेक उदाहरणांतून हे स्पष्ट होईल.  त्यातले एक असे की , महाराज आपल्या बहुतांश मोहिमा अमावस्येच्या रात्री योजीत. तुम्ही आम्ही आजही असा दिवस जमेस घेण्याचा विचार करु शकत नाही . रात्रीच्या काळोखात शत्रूला हालचाली अवगत होत नाहीत हे एक महत्वाचे कारण होते. परंतु त्या काळात मुहूर्त वैगरे अशा संकल्पनांचे स्तोम माजले असताना, यातून महाराजांचा विज्ञानवादी दृष्टिकोन , तर्कशुद्ध निर्णयक्षमता ,    स्वकर्तृत्वावरील दृढ विश्वास  प्रतीत होतो. याऊलट आजच्या विज्ञानयुगात माझे अनेक सहकारी पत्रिका, भविष्य ,पंचांग यात गुरफटलले पाहून ते खरोखरच शिवचरित्राचे पालन करतात का?  त्यांची शिवभक्ती ,शिवाजी महाराज की जय ....अशा आरोळ्या ठोकण्यापुरती मर्यादित असते ? अशी शंका येते.

         सागरावर जाणे म्हणजे महापापम ...हा त्यावेळी लोकांच्या मनात मुठभर लोकांनी रुजविलेला विचार ...महाराजांनी आरमारच उभे केले...तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदाविल्या  नाहीत तर अज्ञानाच्या डबक्यात लोळत रहाल हेच सांगायचे होते त्यांना. 
           अजून एक उदाहरण , राजाराम महाराज जन्माच्या वेळी पालथे जन्माला आले. सगळे गंभीर . त्यावेळी मूल पालथे जन्माला येणे म्हणजे अपशकून मानला जाई .  महाराज दैववादी नव्हते.ते म्हणाले . " पुत्र पालथा जन्मला तो पातशाही पालथी घालील " केवढी ही आयुष्याची सकारात्मकता . हीच सकारात्मकता आज दुर्दवाने लोप पावत आहे . कारण शिवधर्माचे आचरण होताना दिसत नाही . 

            बहुजन समाज दैववादी व्हावा किंवा कुठल्यातरी निरर्थक कल्पनेत गुंतून राहावा अशी समाजातील विद्वान लोकांची योजना असते. किंबहुना कुठलाही देश, राज्य मूठभर तर्कशास्त्र निपुण विद्वान मंडळीच नियोजित करत असतात. सामान्य माणसाची बुद्धी भावनेवर विसंबून असल्यामुळे दैव, कर्मकांड असल्या भावनांना थोपटणाऱ्या  आमिषांना तो लगेच बळी पडतो. बहुजन समाज दैववादी झाला की काय होते तो कर्मकांडात गुंततो ,वारीत गुंततो ,नामस्मरणात गुंततो. त्यावेळी मूठभर विद्वान माणसं फक्त ज्ञानाची कास धरत असतात. शेवटी होतं काय?  सामान्य माणूस या लोकांवर , नशिबावर खापर फोडून मोकळा होतो.याबाबत डॉ. ज. रा. शिंदे म्हणतात," सांस्कृतीक दृष्टया श्रेष्ठ असलेल्या अल्पसंख्यांकाचीच सत्ता स्माजावर चालत असते.किंबूहुना ती चालत राहणे स्वाभाविकच आहे.जगाचा इतिहास तसा आहे."मग एकच पर्याय उरतो नव्या जगात नुसते साक्षीदार  व्हा . नाहीतर  सामील व्हा. ज्ञानाची कास धरा . महाराज हेच तर सांगू पाहत होते. 

         राज्यकारभाराची भाषा ....एक गुंतागुंत मनात निर्माण होते. वैश्विक स्तरावर इंग्रजीच प्राबल्य ...काय करायच? हट्टाने तोडकं मोडकं इंग्रजी झाडता. अनेक अहवाल म्हणतात ....कुठल्याही गोष्टीचं आकलन होण्यासाठी शिक्षण मातृभाषेत झाल पाहिजे. मातृभाषाच अंगात मुरवली नाही, तर अन्य भाषेवर प्रभुत्व कस प्राप्त होणार? इथेही माझ्या राजांची दूरदृष्टी पहा. त्यावेळी राज्यकारभाराची भाषा फारशी  होती. रयतेची मराठी. जर आपला राज्यकारभार आपल्या भाषेत नसेल तर तो रयतेला आपला कसा वाटेल? आजही इंग्रजी झाडणारा वकील आपल्या बाजूने बोलतो की विरुद्ध बाजूने असा प्रश्न सामान्य रयतेला पडत असेल.राजांनी रयतेसाठी प्राकृतात म्हणजे मराठीत राज्यकारभार सुरु केला. याचा अर्थ राजांना अन्य भाषा अमान्य होत्या असे नाही. का वाटणार नाही रयतेस ते आपले राज्य .केवढा सूक्ष्म विचार.आज काळानुसार इंग्रजीचा अभ्यासही कारावयासचं हवा.जमतील तितक्या भाषा....ज्ञान ...यात कोणताही संदेह नाही.महाराजांची  त्या काळातही ज्ञानाची साधने मोजकी असताना अंगिकारलेली दृष्टी विज्ञानवादी , तर्कशुद्ध होती . आज तर सर्व साधने तुम्हास उपलब्ध आहेत .  

        महाराजांनी शेतकऱ्यांसाठी  महसूलाची नवीन पद्धत आणली . दुष्काळ असेल तर सारा नाही उलट मदत मिळेल  ...हे वतनदारी व्यवस्थेने  पिचलेल्या जनतेला नवीन होते. त्यांच्या आयुष्याला ही एक वेगळी सकारात्मक दिशा होती . मग   माणसं  का नाही जीव लावणार .?शिवा न्हावी,बाजीप्रभू,मदारी...मेह्तर...किती नाव घ्यावीत.महाराज धर्मनिष्ठ होते.धर्मद्वेष्टा   नव्हते.ते श्रद्धाळू होते.अंधश्रद्धाळू नव्हते.कुणाजवळही दैवी देणगी ,सामर्थ्य नसते .परिश्रम,कर्तव्य याच्या जोरावर ध्येय गाठता येतं याची त्यांना जाणिव पूर्ण होती.हे त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून सिद्ध केले . ते प्रवचनकार नव्हते, कर्मयोगी होते . असुरक्षितता जाणवायला लागली की समाजगट एखाद्या प्रभावी विचारधारेत सामील होतो. त्या वेळी समाजाला सामाजिक सुरक्षा नव्हती. ज्यावर विश्वास ठेवायचा तो नेता ही तितकाच मातब्बर ,आपला वाटायला हवा. त्यांच कार्य आपल वाटायला हवं.तस रयतेला वाटत होत यातच समर्पणाच्या प्रेरणा प्रतीत होतात. 

        राजे केवळ दैववादी असते. तर उभ राहील  असत का रयतेच राज्य . त्यासाठी धर्म ,जाती ,वंशा पलीकडे जाऊन समानतेच्या धाग्यात सर्वांना गुंफावं  लागतं.दृष्टी व्यापक करावी लागते. रयतेचा विश्वास संपादन करावा लागतो. हे सर्व माझ्या राजांनी कुठली घटना,प्रसंग,उदाहरण समोर नसताना रयते प्रती असलेल्या आंतरीक प्रेमातून केलं. मग तुम्ही का जातिभेदाच्या बेड्यात अडकता. माझा तुम्हाला पुन्हा प्रश्न आहे .तुम्ही शिवचरित्र ह्रदयात रुजवलं  का? वाचणं आणि रूजवणं दोन भिन्न बाबी आहेत.महाराजांची समाधी शोधून शिवजयंती सुरु करणाऱ्या, पोवाड्यातून स्फूर्ती देणाऱ्या  महात्मा जोतीराव फुले यांचा मी ऋणी आहे.  समानतेचे हक्क मिळवून देणाऱ्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा मी ऋणी आहे . 

       आज हे का आठवावं . आजच्या आधुनिक युगातही कर्मवादापेक्षा दैववादाचं वाढलेलं स्तोम पाहून महाराजही दुःखी झाले असते . महाराज आज तुम्ही आज असते तर तुमच्या करड्या शिस्तीने , तर्कशुद्ध , विज्ञानवादी भूमिकेतून आजच्या आपत्तीवर उपाय योजिला असता . महाराजांचा इतिहास आम्ही तुम्हासी काय सांगावा.....तो तर तुमच्या नसानसातून वाहतो आहे.महाराजांच्या हाकेला ओ देणारे मावळे तुम्हीच आहात. या भूमीत जन्मला तो या भुमीचा...त्यासी महाराजांनी आपले केले. मग ते मावळे का नाही आपल्या राजांवर जीव ओवाळणार .आज जी आपत्ती कोसळली आहे,अशा आपत्तीत महाराजांनी आपला खजिना रिकामा केला असता. मावळ्यांनी धन,दौलत सहज महाराजांना  अर्पण केली असती. परंतु महाराज म्हटले असते ,तुम्ही तुमच्यातला फक्त काही भाग द्या, कष्टमय जीवन जगणाऱ्या  तुमच्या बांधवांसाठी . तुम्ही हे नक्कीच कराल . याची महाराजांना खात्री आहे कारण, तुम्ही महाराजांचे सच्चे मावळे आहात.  तुम्ही  धर्म ,जाती . भेद याच्या पलीकडे जाऊन कार्य कराल . सतत ज्ञानाची कास धराल . ज्ञानाच्या कक्षा रुंदावाल . आजच्या आपत्तीचे महाराजांनी आखून दिलेल्या शिस्तीत पालन कराल . शिवधर्माचे पालन कराल . याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही . ज्यांनी जमेल त्यांनी दान द्यावं . ज्यांना जमेल त्यांनी सेवा द्यावी  . 

     विवेकानंद म्हणतात, उठा कामाला लागा,हे जीवन आणखी किती दिवस टिकणार आहे.जन्माला आलाच आहात तर काही मह्त्कार्य करुन जा ; नाहीतर तुमच्यात आणि वृक्ष- पाषाणात फरक तो काय? हे सांगण्याच्या कितीतरी शतके आधी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी मह्त्कार्य इतिहासाच्या पानावर कोरून ठेवले आहे.आज तोच इतिहास महाराजांचे मावळे आपल्या औदार्यातून नव्याने उभा करतील . शिवधर्माचा ... माझ्या शिवबाचा .


Sunday, 22 September 2019

पन्नाशीचा भोज्या



       अलीकडेच पन्नास वर्षाचा झालो. आमच्या 50 + clubमध्य्ये मग  पन्नाशीवर गप्पा रंगू लागल्या . सगळ्यांचा सूर एकच होता आता तरी निवांतपणे आवडीच्या क्षेत्रात वेळ गुंतवावा.म्हणजे नेमक काय कराव कळत नव्हत?. याबाबत कधी आत्मचिंतन केलचं नव्हत. या वर्गात जीवनाच्या एकसूरीपणाला सरसावलेला एक वर्ग असतो आणि तो बहूसंख्यांक असतो .तो प्रथम जबाबदारया आहेत रे, नाहितर मी याव केल असत ... म्हणत काढता पाय घेतो.  यासाठी त्याला दोष देता येणार नाही.लहानपणपासून मराठी घरात सुरक्षित कोषाचे संस्कार झालेले असतात .म्हणजे नोकरी ,लग्न,मुल आणि पुढच्या पिढीच पुन्हा तेच.मला वाटत अल्पसंख्याक समाज जास्त प्रगती करतो.कारण प्रश्न अस्तित्वाचा असतो.उदा .ज्यू , पारशी , ब्राम्हण.       
         आजूबाजूच वातवरण, तीव्र इच्छाशक्ती तेवढचं महत्वाचं. पन्नाशीचा हाही एक भोज्या आहे, आपण बोलतोच जास्त.

      तर , सोनालीताईने  गप्पाच्या ओघात "पन्नाशीचा भोज्या ' या पुस्तकाचे नाव सुचवले.तिने सुचविले म्हणजे खासच असणार, हे गृहीत धरुन लगेच जवळच्या आणि आमच्या विभागात एकमेव असलेल्या मराठी पुस्तकाच्या दुकानात चौकशी केली. त्यापूर्वी नेहमीसारखी  आजची पिढी वाचत नाही याची खंत व्यक्त झाली ,माझ्या पुस्तक वाचनाच कौतुक झाल .आठवडाभरात पुस्तक मिळण्याची ग्वाही मिळाली.पण दुसर्याच दिवशी पुस्तक उपलब्ध झाल्याचा फ़ोन आला.

         पुस्तक हातात आल की मी आहे त्या अवस्थेत चाळायला सुरुवात करतो. भुरुभुरु  पाऊस पडत होता. जराही वेळ न दवडता जवळच्या चहाच्या टपरीवरच बस्तान मांडले.'पन्नाशीचा भोज्या ' हा भूतकाळातल्या आठवणी आणि संवेदना जाग्या करणारा एक खजिना आहे, पुस्तकाची थोड्कयात ओळख वाचली. माझ्यासारखा वाचक त्यावरुन पुढे पुस्तक कस वाचयच ते ठरवतो.मनोगत वाचता वाचता पुस्तकात हरवून गेलो.भारतीय खेड्यात दिवसाचे तास खूप असतात, तेथल्या शुध्द हवेने माणूस घाबरायला लागतो अशी साधी, सरळ उपमांची अतिशोयक्ती नसलेली वाक्ये मनाचा ताबा घेऊ लागली. नुकताच गावची शुध्द हवा शरीरात साठवून आल्यामुळे असेल कदाचीत. वाचता वाचता आठवाणीच्या हिंदोळ्यावर डूलायला लागलो.मी , चहा आणि पन्नाशीचा भोज्या .मिलते जब तीन यार.वाचनाची मैफल तेथेच रंगली.

       पन्नाशी म्हणजे तारुण्याच्या थोडी  अलिकडची आणि बरीच  पलीकडची धुसर सीमारेषा.आनंदमय स्वप्ने पाहण्याचा काळ. दिवा विझता, विझता कीटकांची जशी तडफड सुरु होते तशी तडफड सुरु होण्याचा काळ,अंकल हा शब्द शिवीसारखा कानाला झोंबनरा हा काळ.इथेच साला संघर्ष सुरु होतो.तारुण्य आणि कारुण्य याच्या सीमारेषेवरचा.आमच्याच वयाची पोर अंकल म्हणतात तेव्हा हा शब्द रुतून रहातो काट्यासारखा .अगदी पहिल्याच लेखात वर्मावर बोट ठेवल्यामूळे  आठवणी भळाभळा व्हावू लागतात.
     हे पुस्तक वाचताना आत्मचरित्रातमक वाटते.परतू त्या आठवणी आहेत 61 ते 80 या काळातील.मागची पिढी , पुढची पिढी याचे त्या त्या काळातील वर्तन , संस्कार , उद्दीष्ट याचा लेखाजोखा म्हणता येइल अशा. हा काळ थोडासा माझ्या काळाशी जवळचा असल्यामुळे माझे कुतुहल चाळवले. काही आठवणीत साम्य होते उदा. मराठी माध्यम, tv,खेळ ई.  परंतु ज्या वातावरणात लेखक वाढला ती श्रीमन्ती  सर्वानाच लाभत नाही.पैश्याची श्रीमन्ती नव्हे तर intelectual, कलासक्त श्रीमन्ती. घरातील स्त्री सुशिक्षीत असेल तर संपुर्ण कुटुंब सुशिक्षीत होते, फुले म्हणत.पुढच्या पिढीच्या जडणघडणीचा पाया इथेच रचला जातो.लेखकाच्या विश्लेषणात्मक शैलीतून ते जागोजागी अधोरेखीत होते .

      खरतर 50 नंतर होणारया chemical लोच्याबाद्दल हे पुस्तक असेल अस वाटल  होत. फक्त हा उलट प्रवास आहे.आठवणीचा धांडोळा घेण्याचा.50 शी ची वाट न बघता तुम्ही वेळीच नियोजन केल पाहिजे. अच्युत  गोडबोले यांच्यासारखं. त्यांनी एक दिवस नोकरीच्या सर्वोच्च पदाचा राजीनामा दिला आणि सुरु झाल एकापाठोपाठ एक पुस्तक प्रकाशीत करणं.हे एका दिवसात झाल नव्हतं.त्यामागे नियोजन होत कित्येक वर्षाच.  ही नियोजनातमक समज पुस्तक वाचता वाचता यायला लागते.भोज्याचा प्रश्न हळुहळु सुटू लागतो.

         काही वेडी माणसं झाडं तोडू नये म्हणून आंदोलन करतायेत.वडाचे पार वाचल्यानंतर,  ते का आवश्यक आहेत याचे आणखी एक उत्तर उलगडत जाईल. झाडे  oxygen देतात आणि माणस झाडावर नाही आपल्या पायावर कुर्हाड़ मारुन घेतात.कारण आपण इवल्या डोळ्यांनी पहात असतो.जगाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलात असते आणि सापक्ष असते.

           नाव , शाळा, लग्न , नोकरी हे मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या जीवनातले  चार टप्पे असल्याचे सांगतो .मी याला झोपणे , उठणे, हगणे, जाणे  असे सर्वसाधरण चार टप्पे मानतो. पन्नाशीच्या या टप्प्यावर ध्येयहीन , आदर्शहीन , तत्वहीन जगण्याच्या प्रश्नाने , भोज्या तीव्रतेने जाणवू लागतो. यातील लेखकाने सांगितलेला  लग्न हा भाग रतिसुख मिळवण्याचा एकमेव मार्ग होता हे परखड सत्य आजच्या पिढीला कदाचीत हास्यास्पद वाटेल. याबरोबर पहिला स्पर्श, तारांबळ याची आठवण होऊन मी आतल्या आत हसत होतो.आतल्या आत कारण अजूनही धोतरातले संस्कार पुर्णपणे पुसले गेलेले नाहीत.

         हिन्दी भाषेवरुन सध्या जो गदारोळ सुरु आहे त्यावर  भाष्य करण्यापूर्वी एक मिनिटाचे परिणाम जरुर वाचावा.ज्या भाषेमुळे 'मी' आहे, व्यक्तित्व आहे त्याचा अभिमान बाळगण्याबद्दल,लेखक मातृभाषा आणि तुमची वैचारीक जडणघडण  वैगरे जड शब्द न वापरता ओघवत्या शैलीत सहज सांगतो.

         अमेरिकन नागरीकत्व मिळवताना  आपल्या पुर्वीच्या देशाच्या निष्ठेचा त्याग करावा लागतो.तशी शपथ घ्यावी लागते.आजची पिढी ते करतेही व्यवहार्थ आहे म्हणून.कदाचीत त्याच्या दृष्टीने निष्ठाही लवचिक असू शकते.तत्व , निष्ठा , व्यवहार यावर लेखक दोन काळातील उदाहरणांनी प्रकाश टाकतो. प्लास्टर औफ़ पेरिसचा गणेश आणून पर्यावरणाबद्दल बेफिकीर असणारी  पिढी,  अमेरिकेतील पर्यावरण पुरक मातीचा गणेश तेथील शिस्त याबद्दल बोलताना मात्र थकत नाहीत.

       मुलींचा विषय निघाला की कुठल्याही वयात चित्तवृत्ती प्रसन्न होतात.मित्रांचे फड जमले की मोजदाद सुरु होते.अगणित dating करणारया त्या फ़्रैंच मुलाकडून  तर आम्ही गंडा बांधून घेतला असता.पण त्याच्या देशात हे सर्व नॉर्मल आहे. सगळच सापेक्ष. आईनस्टाईन ची thoery of relativity थोडी थोडी कळू लागते.

         अजून बरच काही आहे धर्म, राजकारण , अर्थशास्त्र, साहित्य...विस्तारभयास्तव सर्वच लिहित नाही.मला वाटत एका पिढीने दुसर्या पिढीला दिलेला हा ठेवा आहे.त्याच चिंतन करायच आणि सुपूर्द करायच पुढच्या पिढीला . पण नेमक काय हवय आता आपल्याला चांद्रयान की...  शाळा, वीज, संडास ,रस्ते, झाडं, पाणी ...हे समजावून सांगण्याची जबाबदारी पालकांची आहे नाहीतर आजची पिढी आम्हाला विचारुन जन्म दिलात का? अस विचारायला कचरणार नाही.योग्य वयात योग्य संस्कार रूजवण्याची आवश्यकता काय ,हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येईलच. सध्यातरी मला एवढच म्हणायच आहे ....(पन्नाशीच्या भोज्याच सार )
                       
मला  जाती ,  धर्म ,वंश  यापलिकडे जगायचे आहे
हे समाजा, मला   मुक्त आभाळी विहारु देशील  का ?
तुझ्या जगण्याचा परीघ तू जग...
मला माझ्या परिघात स्वातंत्र्य उपभोगू देशील का ?

तू म्हणशील याला  स्वैराचार करायचा आहे .
नाही .....  मला संविधानाला जपायचे आहे .
त्यानेच दिलेले मूलभूत स्वातंत्र्य , समता अंगीकारून
खऱ्या अर्थाने  माणूस म्हणून जगायचे आहे ..

हे समाजा मला तुझ्याकडून जास्त काही नको
एक माणूस म्हणून माझी ओळख राहू दे
एक माणूस म्हणून मुक्त वावर करू दे
जगाच्या सु -बदलाचा भागीदार मला होऊ दे .

तू तुला न उकलणाऱ्या नियमांत बांधले आहेस
त्याचे अर्थ उलगडण्याचे हक्कही रांधले  आहेस
मी काय म्हणतो, बदलाची झळ पोहचेपर्यंत
तू तुझ्यात मस्त रहा , मला माझ्यात व्यस्त राहू दे

मला नाही रे बळ छोट्या गोष्टीत वाद घालायचे
देव्हारा कुठे बसवायचा यासाठी तीळ -तीळ भांडायचे
मला एवढंच माहित तू माणूस , मी माणूस..
तू तूझ्यात मस्त रहा, मला माझ्यात व्यस्त राहू दे...

         आजच्या मुलांनी आठवणी लिहिल्या तर ते कशा लिहितील याबद्दल लेखकाला कुतुहल आहे.आजची पिढी लिहिते आहे नाही अस नाही.fb वैगरे वर.ते आपले शब्द जपून ठेवते वस्तू नाही. fb तुम्हाला ठराविक काळानंतर आठवणी दर्शविते.पण संदर्भ लागत नाही.हे संदर्भ आपण आजूबाजूच्या अवकशातून घेत असतो.पण अवकाशच सिमीत झाल्यवर संदर्भ लागणार कसे याचे अप्रुप मलाही आहे.अवघे 21 वर्षाचे आयुष्य जगलेल्या गौरी पाटीलचे 'दोन क्षणसुद्धा' आभाळाएवढे आहेत.पण ती कथा वेगळी आहे.अपवादात्मक.

        लेखकाने साध्या सोप्या शब्दात  आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत.हा खजिना आपल्या पुढच्या पिढीकडे देण्याची जबाबदारी आपली आहे. माझे मित्र आता  हे पुस्तक वाचायला मागतील आणि मी त्यांना देणार नाही हेही त्यांना माहित आहे.कारण लेखक अमाप मेहनत घेत असतो.त्याच्या प्रतिभेला दाद ही मिळालीच पाहिजे.स्वनिर्मितीच मोल व्हायलाच हव .यासाठी पुस्तक  विकत घ्या आणि जे घेऊ शकणार नाहीत त्यांना हे संचित भेट म्हणून द्या.


येवा कोंकण अपलोच असा








      निसर्ग, उच्च /कनिष्ठ मध्यम वर्गीय आणि निम्न स्तर याची भौगोलीक व सामजिक रचना म्हणजे कोंकण . भारतातील सर्वसाधारण रचना अशीच असली तरी निसर्गाची साथ सर्वानाच लाभली आहे अस नाही. निसर्गाचा आदर करत , तो जे देईल त्यात समाधान मानणारा, फणसासारखा खडबडीत वाटणारा परंतु आतून मऊ लुसलूशीत गरयासारखा ...निसर्ग त्याला  देतोही भरभरुन...हिरवी माया ...कधी झाडावरुन आंबे ,फणस, केळी ..शेतितून तांदूळ ...काही नाही तर पाण्यात हात घालावा मासे देईल...दगडाखाली हात घालावा खेकडे देईल...गरजा कमी समाधान मोठ...आत्महत्या वैगरे असा प्रकारच नाही..

      कोंकणातील सण म्हणजे जगण्याचा उत्सवच .त्यासाठी कोकणी माणूस आवर्जून कुठूनही येतोच.तस अद्योगीक प्रगतीमुळे कोंकण शहराच्या  जवळ आलं आहे.अनेक ठिकाणी अजूनही चंद्रावरचे खड्डे तुमचं  कंबरड मोडायला रस्यावर दारुड्या माणसारखे आ वासून चहुकडे लडबडलेले असले तरी त्याला जबाबदार असलेल्यांची आय माय काढत आमचा कोकणी माणूस मार्गस्थ होतो . (आपल चांद्रयान कदाचीत हयच गावतलय)वर कार्य करुचा म्हटल तर विघना येतलीच अस सहजपणे म्हणतो.लाल गाडी म्हणजे त्यांची सखीच. आपल्या प्रियेसारखी तिची प्रतिक्षा करतात.त्यांची ती सखी लाल प्रिया खड्डयातून त्यांना चेंडूसारखी वरखाली फेकत असली, वळणावर घुसळत असली तरी आमका फिकीर ना...जाऊचा म्हणजे जाऊचा..तू आमचे पाय सूजव नाही तर नाही तर अंग सूजव ....बापे फेर धरतलेच आणि बाया फुगड्या खेळतल्याच...

       शहरातल्यांना सणाची गोडी लागलीय. तो कुठलीतरी धार्मिक पुस्तके वाचून, कुठलेसे वीडियो पाहून  देवाला दागीन्यांनी,  हार फुलांनी मढवून  जीव नकोसा करुन टाकतो.म्हणे सर्व विधिवत व्हायला हव....तुमची श्रध्दा असेल तर जरुर कराव .... येथे तात्पुरता शहरातून पुस्तकी शहाणपण घेऊन आलेला श्रीमंत माणूस .. (येथील श्रीमंत म्हणजे शहरातील कनिष्ठ मध्यमवर्गीय  ,तो शहरात सेलीब्रेटीच्या घरातील गणेशाच्या साधेपणाचे गोडवे गात असतो. श्रीमन्ती सापेक्ष असते अस म्हणतात.तुम्ही ज्या परिप्रेष्यातून तुम्ही पहाता तशी ती असते. )..मग तो निम्नस्तरीय वर्गकडून ऊसना भाव घेतो... विधिवत कार्य करण्यासाठी  ...हार  घालणे, दुर्वा आणणे, मोदक बनवणे वैगरे वैगरे..आणि हा भाव देवाला समर्पित करतो. विघ्न नको म्हणून सर्व समजूतीने होत रहात. सर्व घरात थोड्या फार फरकाने हेच. पण येथील जमिनीवरचा माणूस काळाच्या पुढे  आहे.त्याची निसर्गाची  सच्ची मैत्री आहे.अगदी निसर्गा कडून केळीचं पान, दोन चार फुलं घेऊन निसर्गाशी तादाम्य पावत  , आतले भाव ओतून सण साजरा करतो.देव भक्तीचा भुकेला हे संतवचन त्याला पक्क कळलं आहे.असो सण महत्वाचा.

     . निसर्ग नटतो त्याच्या कैक पटीने बाया मुली नटतात. झरे थिरकतात त्यापेक्षा त्या थिरकतात. नद्या आणि बाया ठूमकत निघतात.किशन कन्हय्ये गोल फेर धरतात.शहरातील पोरं मातीचा गंध अनुभवतात. मोकळ्या रानात, काठावरच्य नदीवर, डोंगराच्या कुशीत वार शिरल्यासारख आणि पायाला भिंगरी लागल्यासारखी हूंदडतात. मोकळं वार  अंगात भरुन घेतात.गणेशजी येतात मग सोबतीला गौराबाई. मुखवटा, तेरड्याच्या फांद्या बस.या सामग्रीवर तिची सुंदर  आरास सजविली जाते.तिला सजवणे हा एक सोहळा असतो.

     कोंकणात सामाजिक समानता निसर्गातून आलेली...अगदी उपजत...स्त्री पुरुष सहजपणे वावरतात....संविधान न वाचताही...सामाजिक दरयाही ही लोप पावत चालल्या आहेत.याच कारण निसर्ग  .त्याला तो वचकून असतो .निसर्ग त्याचे पाय जमिनिवर ठेवतो.तोही या मातीत ममतेने पाय रोवून उभा आहे. निसर्ग कोणताही भेदभाव करत नाही.येथला माणूस निसर्ग वाचतो त्याला निसर्गाने सांगितलेल आकलन होत. निसर्गाच्या आणि चांदण्याच्या साक्षीने तो त्याच्या रंगात मिसळून जातो. हा निसर्गाचा उत्सव अनुभवयाचा असेल तर येवा कोंकण आपलोच असा....


Tuesday, 3 September 2019

मी गणेश बोलतोय


         मी गणेश बोलतोय ....तुमचा लाडका बाप्पा....तुम्ही मला आवडीनं पुजता ....बूद्धीची देवता म्हणून ...अनेकदा बुद्धी बाजुला ठेवून....कशी समजूत घालू बाबा  तुमची ...चार पुस्तकं ठेवली असती माझ्या समोर तर रात्रभर वाचत बसलो असतो...जीव घुसमटून गेलाय रे...या अलंकारांनी ...हारांनी ...धूप...अगरबत्त्या .... रसायनयुक्त सुगंध आणि अजून कसले साज माझ्या अंगावर लादलेत त्यांनी...पण तुम्ही काय ऐकणार नाहीत...कर्ज काढून सण साजरे कराल....अरे बघा जरा आजूबाजुला...श्रीमंत लोकांकडे...सेलीब्रेटींकडे ...सहज लाखो रुपये उधळू शकतात....पण  किती साधी मुर्ती स्थापना असते....तिही पर्यावरण युक्त...स्पृहाजी गणेश बीजाची संकलपना कळकळीने रुजवू पहातायेत...काय आहे गणेश बीज? मातीचा गणेश...बीजाचे अलंकार ल्यायलेला...त्याची स्थापना कुंडीत करायची....विसर्जन कुंडीतच....त्यातून उगवणारया रोपाचा सुगंध तुमच्या महागड्या सुगंधालाही नाही ....माझ ऐकायच तर ऐका...निदान तुमच्या श्रद्धा दुसरांयावर लादू नका...त्यातून क्लेश उत्पन्न होतात...पवित्र वातवरण कलुषित होत...निसर्ग/देव फक्त पवित्र, निर्मळ,मंगल वातावरणात वास करतात....तूक्याने केली ती भक्ती...फक्त .वाणीने....तुम्ही आज काय करता आहात...परंपरेच्या नावाखाली घोडे उधळताय....तुक्यान ,ज्ञानानं सांगितलेली ज्ञानार्जनाची परंपरा कुठे गेली....कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन...कर्माची परंपरा आपली...कर्मकांडाची नाही ...कर्मच केले नाहीत तर कसले नवस सफल होणार...मी निर्गुण,निराकार...कर्कश आवाजात भजनं करताना त्याचा अर्थ तरी समजून घ्या...निसर्ग म्हणजे देव...देव म्हणजे...निसर्ग त्याला दुसरा आकार नाही...तुम्ही झाड तोडलीत की तो पूर आणतो ...तुम्ही पाणी वाया घालवलत की वैराण करतो...तुम्ही निसर्गाला वरचढ होऊ पहाता...तो ममतेने सांगू पाहतो काही...झुळझुळणारया वारयातून....नाही ऐकत तुम्ही...मग देतो एक रट्टा...शेतकारयाचा मालाला भाव देताना ....गरीब भाजीवालीची भाजी घेताना...तुम्ही घासाघीस करता...आणि ज्याचा मला काहीच उपयोग नाही अशा महागडया निर्जिव वस्तू माझ्यावर लादून माझा जीव नकोसा करता...संतानी सांगितल देव माणसात...देव निसर्गात ...तुम्हाला ऐकायचं तर ऐका पण बाबांनो निदान  या निर्जिव अलंकारानी माझा जीव घुसमटवू  नका..जमलं तर द्या दोन पुस्तकं गरजूना..जमलं तर द्या भाव शेतकरयाच्या मालाला...जमलं तर लावा दोन रोपटी अंगणात...बुद्धी देवता प्रसन्न व्हावी अस मनापासून वाटत असेल तर बुद्धीची जोपासना करा ...मला अलंकार नको पुस्तक द्या...मला धुप  नको रोपट द्या...

Thursday, 10 January 2019

अनघाताई मोडक


“स्वयं टॉकमुळे माझा मलाच नव्याने शोध घेण्याची संधी मिळाली आणि माझाच प्रवास नव्याने उलगडता आला” हे बोल आहेत अनघा मोडक यांचे. या संदेशासोबत भ्रमणध्वनीवर एक दृकश्राव्य फीत फिरत होती. त्यापूर्वी अनघा मोडक हे नाव माहित नव्हते आणि जे काही पाहिले आणि ऐकले त्याने मी सुन्न झालो होतो. अन् मी ठरवले त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचे. तसा योग आला बोरीवलीला झालेल्या एका कार्यक्रमात. भेटलो नाही परंतु, बघितले, ऐकले, शब्द -न- शब्द अंतरंगात भरून घेतले. उठलो याच निश्चयाने, अनघा ताईंच्या कार्यक्रमाचा अनेकांना लाभ व्हावा, म्हणून एक कार्यक्रम आयोजित करायचा. तो योग मराठी  भाषा संवर्धन पंधरवडा तथा पुल, गदीमा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लवकरच आला. या कार्यक्रमात मी अनघा ताईंचा परिचय करून देणार होतो. कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत त्यांना कल्पना यावी म्हणून, त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर बोललो. भ्रमणध्वनीवरही त्यांचे गद्यातले बोलही, पद्यातल्या लयीसारखे कानाला सुखावत होते. काय बोलावे, सूचत नव्हते.

“भाषा” म्हणजे केवळ शब्द नव्हे, भाषा म्हणजे भाव. हा भाव शब्दात ओतला तर समोरच्याच्या हृदयापर्यंत पोहचता येतं, हे त्यांचेच बोल आहेत “बोलु ऐसे बोल” या त्रिमुत्री प्रांगण कार्यक्रमातील.गद्यातही नाद, ताल, लय असते हे या कार्यक्रमात पहिल्यांदा आम्हा सर्वांनीच  अनुभवले. बोलायचं पण कसं, शब्दांना फुलवत. अनघाताई यांच्या  निवेदनात एक वाक्य अनेकदा असतं “दु:खालाही चिमटीमध्ये धरता येतं आणि त्याचं फुलपाखरू करता येतं”. मी निवदेन करताना त्या थोडा बदल केला “भाषेलाही चिमटीमध्ये धरता येतं, अन त्याचे फुलपाखरू करता येते”. मी ठरवलं या दु:खाला बाजूलाच ठेवायचं कारण अनघाताईंच्या म्हणण्याप्रमाणे दु:खाची तमा का बाळगावी, जे काही माझ्या वाट्याला येणार आहे ते श्रीकृष्णाच्या स्पर्शाने पावन होणार आहे.

 त्या दिवशी माझ्यात एवढी सकारात्मक ऊर्जा कोठून आली होती याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही. तो ताईच्या सकारात्मक ऊर्जेचा (Aura) चा परिणाम असावा नाहीतर मंचावर बोलण्याचा मला फारसा सराव नाही. अनघाताईंचा स्वभाव प्रेमळ आणि लाघवी. तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलायला सुरुवात केल्यानंतर चुंबकासारखे ओढले जाता. त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व, नव्याचा अनुभव घेण्याचा उत्साह, पहिल्याच भेटीत छाप पाडणे  हे सर्व मला वाटते त्यांच्या राशीचा प्रभाव असावा.(Taurus) परंतु सर्व श्रेय राशीला दिल्यास त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा, आत्मशोधाचा  अवमान ठरेल.


           “हे कुठले रंग अवकाशी अवतरले
                                                ते तर माझ्या अंतरंगी वसले.....
                                                काळसर्प रोज वाटेवरी........
                                                निळस्पर्शाने पावन सारे........”

वरील काव्यपंक्तीत व्यक्त होणारा सकारात्मक दृष्टीकोन अनघाताईंच्या जगण्यात दिसून येतो.  अनघाताई येणाऱ्या कोणत्याही क्षणाला सहजतेने सामोऱ्या जातात कारण त्यांना पक्की खात्री आहे, सर्व  श्रीकृष्णाच्या स्पर्शाने पावन होणार आहे. डॉ. उदय निडगुडकरांबरोबरची ती मुलाखत मी पाहिली होती. शब्द न शब्द टिपला होता. अशीच सकारात्मक ऊर्जा होती. हळूहळू जीवनाचा प्रवास त्या उलगडत होत्या. निसर्ग/देव जो कोणी असेल तो, त्याने डेंग्यूच्या आजाराचं निमित्त करून या चैतन्यदायी मुलीच्या जीवनातील प्रकाशाची वाट का अडवली? त्यातून सावरते न सावरते तर तिचा भक्कम आधार....पितृछत्र  का हिरावून घेतले? याची उत्तरे कदाचित सापडणार नाहीत.

कृष्णविवराच्या या गर्तेत सामान्यांची जीवननौका दिशाहीन झाली असती, परंतु तिच्या गुरूंनी मंत्र दिला, “बाहेर बरचं पाहिलस, आता आत डोकावून बघ .” ती ध्यानस्थ झाली. या अंधारातून तिला प्रकाशाची वाट सापडली आणि त्या वाटेवर तिचा प्रवास सुरू आहे. हा प्रवास त्यांनी उलगडला आहे, काही दृकश्राव्य फितीत. तो त्यांच्याच शब्दात पहाणे आणि ऐकणे हा एक आनंददायी अनुभव आहे. तुम्ही आयुष्यात निराश झाला असाल आणि दिशा सापडत नसेल तर हे व्हिडीओ जरूर पहा. तुम्हाला एक नवी दिशा नक्की सापडेल. ( त्यांचे कार्यक्षेत्र इतके अचंबित करणारे आहे की त्याची स्वतंत्र माहिती खाली दिली आहे.)


*********************************************




नाव : अनघा प्रदीप मोडक,
जन्म तारीख : 17 मे
ठिकाण : विलेपार्ले
शिक्षण : 1) जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या यात पदव्युत्तर पदवी (पुणे विद्यापीठ)
             2) मराठी साहित्य, कला शाखा पदवी (मुंबई विद्यापीठ)
             3) गायनाच्या तीन परीक्षा उत्तीर्ण (गांधर्व महाविद्यालय)
             4) नाट्यशास्त्र पदविका (अस्मिता चित्र अकॅडमी)
             5) छायाचित्रण पदविका

भाषा ज्ञान : मराठी , हिंदी, इंग्रजी, गुजराती

कार्यक्षेत्रे : 1) “माझा संघर्ष आणि मी”या कार्यक्रमाची मुलाखातकार (एबीपी माझा)
                2) रेडिओ जॉकी (आकाशवाणी मुंबई केंद्राच्या 100.1 एफ.एम. गोल्ड वाहिनी)
                3) निवेदिका, श्राव्य मालिकांसाठी आवाज, अभिवाचन, सूत्रसंचालन
        (आकाशवाणी अस्मिता वाहिनी)
                4) अनेकविध संस्थांसाठी त्यांच्या अपेक्षेनुसार संकल्पानांचे आरेखन, निर्मिती संहिता लेखन
                5) शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक संस्थांसाठी आवाज, कला व आवाजशास्त्र मार्गदर्शक

व्याख्याने : 1) गुणांकित सावरकर (सावरकरांच्या चरित्राचा गुणात्मक आढावा)
                 2) पाऊस गप्पा (पावसाचा विविध पात्रांशी संवाद)
                 3) बोलू ऐसे बोल (संवादाचे महत्व व वैशिष्ट्ये)
                 4) ज्ञानियांचा विज्ञानु (अध्यात्मातील विज्ञान)
                 5) जीना इसीका नाम है (विविध क्षेत्रातील ध्यासांचा उलगडा)

इतर अनुभव : पुरस्कार विजेत्या माहितीपटासाठी संहिता लेखन, पार्श्वनिवेदन, ज्ञानप्रबोधिनी छात्रप्रबोधन मासिकाच्या सहसंपादिका, व्हॉईस ओव्हर इत्यादी

मुलाखतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. सुरेश वाडकर, डॉ. सलील कुलकर्णी, वैशाली सामंत इत्यादी मान्यवरांच्या मुलाखती

निवेदक : सुरेश खरे, कमलेश भडकमकर, प्रथमेश लघाटे, इत्यादी अनेक मान्यवर कलाकरांसोबत निवेदक

पुरस्कार : 1) जनगौरव पुरस्कार-2018 (जनसेवा समिती विलेपार्ले)
                2) राज्यस्तरीय कर्तृत्वान व्यावसायिक, गुणवत्ता, कलाक्षेत्र पुरस्कार-2018 (रोटरी क्लब, पुणे)
                3) चेंजमेकर पुरस्कार - 2016 (महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स)
                4) व्हि. जी. कानिटकर राज्यस्तरीय संहिता लेखन पुरस्कार
                5) यंग अचिव्हर पुरस्कार - 2016 (ऋतुजा फाऊंडेशन)