Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Monday, 4 August 2025

गजरा

 गजरा 


                       



अमृता प्रीतम म्हणतात ....

पुर्ण स्त्री कधी कुठल्याही पुरुषाला लाभलीच नाही...

तिच्या सर्व संवेदनासह आणि 

आतल्या संपूर्ण  आवेगासह ...

ती अस काही म्हणायची ...

त्याला कधी काही कळलच नाही.


त्याला वाटल ...

गाडी आहे...मोठ घर आहे ..

आणि घराला घरपण देणारी..

दोन गोड गोड पाखर आहेत..

सगळ तर बर चाललेल आहे...


ती म्हणायची ...

फुलांचा गजरा ...

तू मला कधी माळला नाहिस...

टेरेसवरचा चंद्र ..

हाती कधी धरला नाहीस...

डोळयात खोल बघून ...

माझ्या कधी बोलला नाहीस..

हातात हात...

प्रेमाने कधी घेतला नाहीस...


त्याला वाटल हे कसल तिच खूळ..

गजरा , चंद्र , डोळे त्यात काय आहे ?

कपल टूरला तर आताच जाऊन आलो ..

आणि सुखांची तर नुसती बरसात केली...

त्याला कळेना तरीही का तिची ही चुळ्बूळ 

त्याला कधी काही कळलच नाही ....


ती म्हणायची ...

गजरा प्रतीक आहे रे फक्त ...

कागदावर दोन गोड ओळी लिही फक्त 

नाहीतर गजरा लिही फक्त ..

तरीही मी माळीन केसात..

त्यात तुझ मन ओत फक्त ..

मनाने मनाला माळ फक्त ...


तो गोंधळला ...

ती काय म्हणतेय त्याला कळलच नाही...

आज तो गजरा शोधत होता रस्ताभर 

फुलवाली म्हणाली साहेब उशीर झाला 

या लॉकडाऊन मधे कुठे मिळणार गजरा..

आणि मिळालाच तर तुम्ही spray मारुन देणार...

अहो फक्त प्रेमाने द्या..मनाने माळा घेईल ती ..

मनाने कसा माळायचा गजरा....

त्याला कधी हे कळलच नाही ....


अजय भोसले.

Tuesday, 17 March 2020

"समुद्राचं गाव"




             "समुद्राचं गाव" या कवितासंग्रहाचं  नाव  माझी  ताई सोनालीने सुचवलं  .समुद्र , गाव या संदर्भांशी कुठलीही व्यक्ती लगेच रिलेट होऊ शकते . तसंच झालं माझं . कुठलाही समुद्र त्याच्या लाटांनी ,त्याच्या गाजांनी तुम्हाला गुंतवून टाकतो . गणपतीपुळेचा समुद्र मंदिर, माणसं आजूबाजूला असूनही काहीसा अबोल , अलिप्त ,स्वमग्न ,शांत आहे   . समुद्र म्हटला की , त्या सोबत गाज , लाट,  पाखरं ,  शंख , शिंपले, वाळू , डोंगर  आपसूकच येतात.त्यांची एक अनामिक नाळचं जुळलेली असते म्हणा ना  . 

         
हे आंतरीक नातं हळुवार उलगडतं जातं कवितासंग्रहाच्या वेगवेगळ्या भागातून . समुद्र , पाऊस , जंगल,नदी, पक्षी , प्रेम, विरह या भागातून  समुद्र परतून परतून  तुमच्या भेटीला येतो ." वारा  दमलेला नाही ...माड डोलून डोलून वाकले नाहीत ...लाटांचा सूर ढळलेला नाही ...."  कवयित्रीचं हे गद्य मनोगतही   नादमय होतं . तिचं समुद्राशी जुळलेलं घट्ट नातं तिच्या मनोगतातून तसंच ,  "हातापायांना माखलेला मातीचा लाल रंग उडूच  नये कधी .... समुद्राची गाज ऐकायची सवय मोडूच नये कधी ..." यासारख्या अनेक ओळीतून पदोपदी प्रत्ययास येतं . 

           "
आरतीच्या कविता एकामागून एक भरभर वाचता येणं शक्य नाही . शांतपणे एकावेळी एक वाचली पाहिजे.तिच्या निसर्गामध्ये भेटणाऱ्या विलक्षण स्तब्धतेमध्ये आपणही काही काळ दिला पाहिजे " मृदुभाषी , व्यासंगी अविनाश धर्माधिकारी सर नेमकं विश्लेषण  करतात. याचा प्रत्यय कविता वाचताना येऊ लागतो .  ही  विलक्षण स्तब्धता मनाला थेट भिडत मनावर हळूवार  स्वार होऊ लागते .   

          
उधाणाच्या लाटांना चांदण्यांचा वर्ख चढलाय ....  अगदी चपखल उपमा . ज्यांनी गणपतीपुळेचा  समुद्र पाहिलाय त्यांच्या डोळ्यासमोर चंदेरी लाटा  लगेच फेर धरू लागतील. पहिल्याचं कवितेत मी गुंतलो होतो . शहरात असून समुद्रावर विहरू लागलो होतो . याबद्दल "सौमित्र " म्हणजे किशोर कदम अधिक समर्पकपणे व्यक्त होतात . ते म्हणतात .  
      "  एखादी व्यक्ती चुकून शहरातल्या गदारोळात जगावी , एखादी व्यक्ती शहरातल्या कॉर्पोरेट जगात मारूनमुटकून काम करत असताना मनाने सतत रानावनात असावी... गर्दीत राहूनही झुडपातल्या फुलपाखरासारखी रंगून जावी ...तशी आरतीची कविता वाटते ."                   

          
"
गाज " हा शब्द कवयित्रीला खूप भावतो असं वाटतं .कवितेतून अनेकदा तो     भेटीला येतो . ( "गाज " या पुरस्कार विजेत्या डॉक्युमेंटरी फिल्मची निर्माती दिग्दर्शक कवयित्री आहे. ) 
गाज म्हणजे समुद्राच्या अव्यक्त भावनाचं. आपण शब्दांनी व्यक्त होतो....  समुद्र गाजाने. कवयित्री समुद्राच्या गाजात गुंतली असतानाच तिला शुभ्र बगळा, फेसाळ लाटा  , लाल माती, गाव खुणावत आहे. त्यांच्या  पाऊलखुणा शब्दातून व्यक्त होतात. तिची निसर्गाबद्दलची आसक्ती, "किती वेळा इथे येतो समुद्रापक्षी  लाटांवर..  किती धूसर रंग मिसळतात....ओहोटीच्या गडद पाण्यावर ...   "  अशा ओळीतून अधिक गडद होऊ लागते . 

    पावसाच्या सरीबरोबर मनकोन्यातून आठवणी झिरपू लागतात. काही आठवू लागतं . काही दवबिंदू सारखं निसटू लागतं . धुक्यात हरवलेलं हे स्वप्नातलं जग कोसोमैल दूर आहे , याची कवयित्रिला पूर्ण जाणीव आहे. ती समुद्राच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे. परंतु हा निव्वळ रोमॅंटिजम नाही. तिन सामाजिक भानही तितक्याच सहजपणे जपलयं   हे, “क्लायमेट चेंजचा विषय सध्यातरी टाळावा त्याच्यासमोर...त्यापेक्षा सांगून बघावी त्याला मराठवाडयाच्या शेतकऱ्याची व्यथा... " अशा ओळीतून, “आरे” तली झाडं अशा कवितेतून प्रत्ययास येतं .

            “वळून कुणी पाहिलं  नाही म्हणून ...माळरानावरच्या चाफ्याचं अडलं नाही...शेवटी पानांनाही साथ सोडली..   पण पठ्ठयांन बहरण सोडलं  नाही” ही सोशल मिडीया ग्रुपवर व्हायरल झालेली प्रचंड सकारात्मक कविता. त्याचबरोबर  कवयित्री कधी कधी स्वमग्न वाटते.  ती म्हणते “मला पटतं झाडांच...फुलायचं वेड असेल...त्याच्यासोबत फुलण्यात जास्त मजा आहे...तिची स्वमग्नता कवितेतून जाणवत असली तरी तिच्या कविता खोलवर समजून घेण्यासाठी  कवितासंग्रहातून त्या  अनुभवल्या  पाहिजेत .
          ज्या शहारात समुद्र नाही तिथे तिला खंत जाणवते “मानो तो इस शहर मे सबकुछ है...मगर क्या करे, समंदर नही है...अशा ओळीतून तिची खंत व्यक्त होते  कवयित्रीचं  समुद्राबद्दलचं  प्रेम मला राधा -कृष्णाच्या   प्रेमासारखं  वाटतं ... सगळ असूनही कृष्ण जवळ नसल्याची खंत राधाला जशी व्यथित करते,  तशीच कवयित्रीला त्याची उणीव अस्वस्थ करते. ही अस्वस्थता, प्रेम, आसक्ती तुम्हाला स्तब्ध करते. माझ्यापुरत म्हणाल तर मी कविता वाचता वाचता चार भिंतीतून, केव्हाच समुद्राच्या किनाऱ्यावर त्याच्या गाजात एकरूप झालो होतो.  हे अनुभव वाचून सांगता येत नाहीत. शहरातून समुद्रावर पाऊल ठेवाल तेव्हाच तुमच शहरी कवच आपोआप निखळलेलं असेल.  प्रत्यक्ष जाणं  शक्य नसेल तर सौमित्र म्हणतात तश्या अनुभवाचा प्रत्यय येण्यासाठी कवितासंग्रह नक्की  वाचा...










                
                   
                     
                  

Wednesday, 11 March 2020

अव्यक्त


.


.

.





  कित्येकदा मनात साचलेलं 
कित्येकदा मनात दाटलेलं 
शब्दावाटे बाहेर पडताना 
      अव्यक्त अश्रू  होऊन गोठलेलं 



Sunday, 22 September 2019

वळणावरच्या झाडापाशी




                             काही आठवू पहाता
                             काही निसटून जातं..
                             बेभान पावसाची सर
                             खोल आत झोडून जाते ..
                             नकळत का कसे...
                             वळणावरच्या झाडापाशी
                            मन गुंतून रहातं....

कविता 

नकळत


तुला आठवत का ग ते तळं..ती नौका ...
तूझ्याकडे खुळ्यागत पहात वल्हवणारा मी..
तूझ्या खळीत हरवलेला मी..
हिरव्यात हरवलेलं ते गुढ झाड...
सागराच्या लाटात मग्न तूझी तू ..
हळूच डोळ्याच्या कोन्यातून मला पाहणारी..
 तूझी तू  ...
ते एकले बेट आणि मला बिलगलेली तुझी तू..
तुझ्या ओठात मी...माझ्या ओठात तू...
पावसाच्या सरीसारखी येणारी अन दवबिंदूसारखी निसटून  जाणारी तूझी तू...
अस बरच काही....
मनकोन्यात साचलेलं मळभ तसच दाटून रहात....
तुला बरचं काही सांगायच तसच
राहून जात...
मावळतीचे ते क्षण...चांदण...तांबड..तळ
अस बरच काही ...
अन बरचस काहीही नसलेलं..
खुळ्यागत ..
तूझ्या मौनात विरघळून जात ...
तेव्हा उमजू लागतं राधेचं मौन आणि  मौनातील  विरह ...
तूझ्या डोळ्यातील अव्यक्त पाणी माझ्या डोळयात साठून रहातं ...
कुठूनसे येणारे  बासुरीचे सूर करु लागतात  बेचैन ...
कसं सांगू तुला...सांगायच  बरच काही असत ...तसच राहून जात...
बरचसं काही डोळ्यातून नकळत वाहून जात...



पाऊस

निळा पाऊस,तांबडा पाऊस,पांढरा पाऊस, हिरवा पाऊस..
इन्द्रधनूची शाल ओढून रंगात रंगलेला झिमझिमणारा  पाऊस...
कुणाला नको नकोसा ...
कुणाला हवा हवासा पाऊस ......
राधेला किसनाची याद देऊन...व्याकुळ करणारा पाऊस...
खळखळणारया झर् यांना ...डोंगराआडून साद देणारा पाऊस..
कुणाच्या डोळ्यातून वाहणारा..
कुणाच्या डोळयात नाचणारा पाऊस..
ठुमकत निघालेल्या सरितेला..दर्याची भेट घालून देणारा पाऊस..
धुक्यात लपलेलया मेघांशी ....लपंडाव खेळणारा पाऊस
कुणाची आस पाऊस...
मनाचे भास पाऊस..
असा हा पाऊस....
कधी रंगात रंगवणारा ..
कधी रंगहीन करणारा ...
कधी दवबिंदूंची माळ उसवणारा ...
कधी आपल्याच सरीत श्वास कोंडवणारा पाऊस..
ओला पाऊस...
सुखा पाऊस..
कुणाला हवाहवासा...
कुणाला नकोनकोसा पाऊस....

                                          

सरिता



मृगनयनी सुहास्य वदनी
मंगल हृदयी चंचल ती ..
ती भावनांचा  गुंता ...
दवबिंदुंची अनंत  माळ ,
स्वः विश्वात रममाण ती....

कधी शांत दर्यापरी गुढगम्य ती ...
कधी विशाल डोंगरापरी सौम्य ती ..
कधी शंकराचा रूद्र तांडव ती ..
कधी पार्वतीसम प्रेमळ माता ती...
इंद्रधनूचे सप्तरंगी  भावतरंग ती..

सोडून मागे  हिरवे माहेर ..
डोंगर अढळ , आभाळ सोबती
चंद्र धवल तिच्या साक्षीला..
दर्या अनंत कृष्ण सखा ...
भेटीस त्याच्या अधीर ,व्याकुळ ती

कृष्ण सख्याची अथांग दरयाची
 धुंदावल्या बासुरीची वेडी सरिता ...
श्यामसख्याचा निळा रंग ती...
षडजांच्या सुरांची खुळी खुळी,
तटिनी ती, बावरी राधा ती ..

का कोण जाणे ...
जरी हास्य तिचे मोतेरी..
जरी हास्य तिचे रुपेरी,
खोल खोल मनात ...
मनातल्या डोहात ..
कुठेतरी अस्वस्थ..
कुठेतरी संभ्रमी...
कुठेतरी अतृप्त ती...



       

खड्डे आमुचे जीवन ..


खड्ड्यांनी  खड्ड्याला आम्ही भागले
 आवेग अवचित ऊरी  ठेविले
 जीवन आमुचे खड्डे उमजून ...
जीवनात परी खड्डे राहीले...

चिंता आम्हा आमुच्या बाप्पाची
कैलासावरील दूर रस्त्याची..
खूप लांबचा पल्ला त्याचा..
त्यासही चंद्रापरी खळग्यांनी ग्रासले..

बाप्पाही आमुचा झाला बेजार ..
त्यात मूषकरावांचा असहकार
करता निर्मळ निःस्वार्थ आर्जवे
कनवाळू बाप्पा घरी आले ..

मग कितीक लिहिल्या कथा आणिक
कित्येक कविताही खरडल्या ...
भाव साहेबाच्या चेहर्यावरचे परी
नित्यनेमे तसे कोरडेठाक राहिले

धवल वस्त्रातील देवाधी देव  ..
एवढेच आमुचे तुम्हा आर्जव
काळ्या काचेतून पहावे कधी ...
स्वप्न इवले इवले आमूचे ,
नित्य नित्य जे भंगून राहिले ..


हिमालयाची सावली



दोन भावना बळे सारुन...
चार शब्द उधार घेउन ...
तिची व्यथा  कळणार कशी
तुक्याची आवली ती ...
कधी हिमालयाची सावली ती ..

जेव्हा माणसात देवपण शोधाया..
विठठला मागे तुक्या धावत होता..
कर्माचा  साधा विचार  विठठळ
आवलीकडून शिकत होता...

तुक्या संत जाहला आणि
आपली प्रतिभा पदरात बांधत...
कधी तुक्याची  आवली तर..
कधी हिमालयाची  सावली झाली ती  ..

कुठलीही कविता उलगडा  ...
सुप्त पुरुषी  मनं पडताळा..
सोईस्कर अशा परिघी कोषात ..
तिची प्रतिभा गोंजारलेली ..
कधी आवली आवली म्हणून
कधी हिमालयाची सावली म्हणून ..

जिजाऊ , सावित्रीची  प्रतिभा ...
या पुरुषांना झेपलीच नाही...
नाही तर आवली, सावली..
अशी शब्दांची खेळी खेळत..
पुन्हा तुक्याची आवली आणि
हिमालयाची सावली झाली असती ती ..

यांनी बहरुच दिला नाही ..
तिच्या प्रतिभेचा पदर.....
बुद्धीची देवताही गणेश आणि
सरस्वती कायम उपेक्षाच राहिली ..
पुन्हा तुक्याची आवली ती..
हिमालयाची सावली झाली ती ...


Wednesday, 21 August 2019

क्षितिजापलीकडे .

त्या वाटेवर मागे  पाहताना .. .
त्या वाटेवर धुके सरताना ....
डोंगरापल्याड नदी वाहताना ..
वाहून गेले दुःख रुपेरी .....

या रस्त्यावर ... त्या वळणावर ..
त्या  इथे क्षितिजापलीकडे ...
शांत , संयत निषाद वसे ...
शांत , संयत निषाद वसे



Saturday, 17 August 2019

वेडी माणसं

वेडी माणसं

खरखरीत हाताची..मनाने मनाला आधार देणारी
उबदार मायेची चादर..  अंगावर पांघरणारी
अस्वस्थ मनं तळहातावर जपणारी ...
ती म्हातारा म्हातारी आता दिसणार नाहीत ...

प्रत्येक घरा घरात होती ती  ...
उबदार मायेच्या हाता  हातात होती ती ...
ए आजा.... का कावलास तू  ...
मी हाय इथ.... म्हातारा कळवळून  म्हणायचा
 तू खा आधी भाकर मेतकूट ..म्हातारी मायेने म्हणायची
न सांगता डोळ्यातील भाव टिपायची
मनाची भुक लागो नाहितर....
पोटाची भुक लागो....
तडक म्हातारया  म्हातारी  कडे जायचे ..
appointment  ची पध्दत नव्हती तेव्हा ..
हृदयाची कवाड आणि घराची दार  सताड उघडी ....

आता  दारावर टकटक करतानाही भिती वाटते ..
कस बोलायच...काय बोलायच खूप जुळवा जुळव करावी लागते
 खूपच औपचारीक झाली आहेत नाती अलीकडे ..
नात्यातही  appointment ची कल्पना आली आहे..
थरथरणारा म्हातारा..थकलेली म्हातारी ...
त्या   विना आपल्याच घरात अनाथ झाली आहेत..

देव देव देवाचा श्वास वेठीस धरणारा ...
भाबड़या  म्हातारया म्हातारीला देवाचं भय दाखवत
आपल उखळ पांढर करणारी मग पिढी आली
थोडी व्यवहारी....थोडी शहाणी .
अन आपल्याच व्यवहाराची   शिकार झाली...
कारण त्या पुढची पिढी अजुनच कोरडी निघाली..
त्यांची नाती आभासी...आभासी जगातली..
आभासी प्रेम आणि आभासी अश्रू त्यास उमजले नाही
भाबड़या    म्हातारयाचे  .... हतबल हातारीचे रुपेरी अश्रू   मन जळून  मग  त्याच्या  नयनचा भाग झाले

हे शेवटचे अश्रू  आता....जगावेगळ्या व्यथा
जुन्या वेड्या पिढीच्या ...भावनेच्या वेड्या कथा
आता त्यातल संचित कधी  उरणार नाही....
दोन थेंब ओलाव्याचे अंगावर कधी उडणार नाहीत ..
मिळेल माया कधी आभासी जगातली...लव यू वैगरे
मायेची उब त्यात...कधीही तुम्हाला जाणवणार नाही..
आता मन व्यक्त करायला  शब्दच लागतील...
शब्दावाचून  मन ओळखणारी ...
म्हातारा म्हातारी आता कुठे सापडणार नाही

म्हणून...

जखमा आता भळभळ वाहणार  नाहीत..
अश्रू सहज झरयासारखे  ओघळणार नाहीत ...
शब्द राहतील गोठून ...किंवा भटकतील आभासी जगात
त्यांच्या  कुशीत आपल्या कथा आता उलगडणार  नाहीत
स्वार्थाने असे  जाळे विणले  आहे ...
भाबडे नाते त्यात विरुन  गेले आहे..
काय म्हणतात तुमच्या शब्दात...
  practical  व्यवहारी जगणे आता रीत झाले आहे..

आणि आता तसेही

पुर्वीसार्खी खरखरित हाताची  म्हातारी
आणि वेडा  निष्पाप म्हातारा ...
त्यांचे उबदार हात  आता उरले  नाहीत
त्यासाठी कदाचित तुम्हाला अनाथाश्रमात जाव लागेल..
किंवा सापडल्या  नेटवर तर  कथा वाचाव्या लागतील..
घ्या एकदा भेटून जमलं  तर ...
कारण  अल्लाऊद्दिन ऊद्द चा जादूई दिवा घेऊनही...
मनाने मनाला जपणारी ती वेडी माणस तुम्हाला
पुन्हा शोधूनही  सापडणार नाहीत...

अजय भोसले




Wednesday, 14 August 2019

स्तब्ध आकाश .....

स्तब्ध आकाश .....
कोसळून पडेल कधीही
फक्त तुम्ही छेडण्याचा अवकाश  ....


Tuesday, 13 August 2019

पाऊस आणि मन ...

पाऊस आणि मन ...
वेगळं का आहे ...
कधी तो थेम्ब होऊन ,
मेघांतून बरसतो ...
तर कधी ...
मन होऊन ..
डोळ्यातून   ...


स्वर्गीय

ते मंदिराच्या प्रार्थनेतही ताल  धरत होते ....
ते मंदिराच्या बांगेतही सूर मिसळत होते ...
ते चर्चच्या घंटानादानेही नतमस्तक होत होते ....
त्यांनी पोटासाठी दिलेली हाळी ..
षडजाच्या शुद्ध स्वरांपेक्षा स्वर्गीय  होती ...
कारण ...
ती पोटातून ... पोटासाठी ....
त्यांच्या चिमण्यांच्या किलबिलाटासाठी येत होती   




  

Saturday, 20 July 2019

उंची

 तुम्ही ज्या उंचीवर आहात ..
त्या प्रतलावर नाही सामावू शकत सामान्यजन ...
म्हणून तो पाहत असतो प्रतिबिंब ...
कधी डोळ्यातील काळ्या वर्तुळात ....
तर कधी मोहवणाऱ्या काजळात ...
रंगवत असतो स्वप्न  ....  उधारीच्या अवकाशात ...
तुम्हाला काय वाटलं .... त्याचा नाही   वेगळा परीघ ...
त्याची नाहीत वेगळी स्वप्न ...

केवळ त्या स्वप्नांना नाही मुठीत घेऊ शकत ...
म्हणून  केवळ शब्दच आहेत ओंजळीत ...
कधी अतिरेकी कौतुक वाटणारे ...
तर कधी जास्त आगळीक साधणारे ...
आणि कधी स्वतःला प्रतिबिंबात पाहत काळजी वाहणारे ...

या शब्दांनीच लाभली आहे उंची ..
आणि या शब्दांनीच आहे प्रतिभा आकारली ...
या शब्दांनीच कधी बहरली आहे ती फुलराणी ...
या शब्दांनीच दिलाय आसरा ,
त्या उंचीला नाही कवेत सामावू शकणार हे  उमजून ,
या शूद्र कणांना ....
नका  हो तोडू या शब्दांना ....  
आणि त्यामागील निष्पाप भावनांना ...







Monday, 25 February 2019

देवभूमी

                     
                        माझा विश्वास आहे, ही  देवभूमी आहे
                       पान, फुलं,वेली ,पक्षी ,प्राणी आणि माणसांचाही
                       जरी रंग वेगळा आहे , ढंग वेगळा आहे .
                       फक्त मानवालाच होत नाही याच आकलन ....
                       देवाच्या निर्मितीचे , विविधतेतील एकरूपतेचं ....

                       माझा रंग तुझा रंग .... पडलाय कधी रंगहीन प्रश्न
                       गगनी विहरणाऱ्या  मुक्त विरक्त पाखरांना ...
                       करतात का कधी प्रश्न, प्राणी   आणि वेलीही ....
                       विश्वाच्या निर्मात्याला आणि  त्याच्या उद्दात्त हेतूला ...
                       ते निभावतात कर्म ... निरपेक्षपणे देवाच्या सृष्टीचे ...

                       देवाने दिलंय प्रत्येकाच्या जगण्याला एक उद्दिष्ट
                       जे तुम्हालाच शोधायचं आहे आत्मचिंतनातून ...
                       नाही भरकटयच्या  दिशा कणाहीन द्वेषातून ....
                       विश्वास ठेवा  तुमच्यासाठी त्याची नक्कीच आहे एक योजना

                       तोपर्यंत आहे फुरसत .... आणि बाळगायचा आहे संयम
                       विश्वास ठेवा... ... तोपर्यंत ... बाळगायचा आहे संयम ....    


Friday, 22 February 2019

आत्ममग्न किडे

                                                 आपल्या सुरक्षित डबक्यात संकुचित आत्ममग्न किडे
                                                असे अनेक आहेत आपलीच पाठ थोपटणारे बडवे ...
                                                आणि याच किड्यांसाठी सरहद्दीवर रक्त शिंपण करणारे वेडे

                                                काय हा विरोधाभास आणि जवानांच्या विचाराची उंची
                                                जे नाही चिवडत जात , पंथ , धर्म ....
                                                मातृभूमीसाठी लढायचे आणि मरायचेही फक्त त्यांचे कर्म ..

                                                 डोक्यात राख , डोळ्यावर पट्टी  अशी तरुण माथी ...
                                                 तरीही  सहिष्णतेच्या अतिरेकाने जवानांच्या जीवाशी खेळायचे
                                                 आणि याच बेदरकार तरुणांचे दगड त्यांनी फुलासारखे झेलायचे ...

                                                 तेव्हा त्यांच्या अर्धांगिनीचे आक्रोश डोळ्यातून ओघळतात
                                                 आणि कमकुवत मनाचे स्पंद आतल्या आत आक्रंदतात
                                                 जाणीव होते आपल्या  उणेपणाची आणि  फक्त मुठी आवळतात ...

                                                                                    कारण ....

                                                  पक्की खात्री होते  ते आभाळापेक्षा उंच आहेत ...
                                                 नाही लायक त्या जवानांसारखे आपण  , जे खरेखुरे नायक आहेत
                                               
                                                                                 म्हणून मला वाटत ...                      
                                                 मातृभूमीसाठी रक्त नको  ..निदान शब्दांनी देश जोडूया ....


                                                  

रक्त शिंपण

                                               रक्त शिंपण झालं की ,
                                               बरसतो कवितांचा सडा ...
                                               मग पुन्हा आत्ममग्न जग .... ..
                                              अजून एक रक्ताचा थेंब सांडेपर्यंत ......



माय मराठी

                                                                                       


                                                   माय ज्ञानेशाची , माय  तुकयाची
                                                   झुंज फिजूल , ऱ्हस्व   दीर्घांची   ...
                                                   हा शाप जुनाच   मराठी  मातीचा......
                                                   स्वर स्वरादीतून मार्ग   शोधते ती

                                                 राजा माझा जाणता  ,त्याने जाणियलें
                                                 मोल मराठी बोलीचे  , मातीत रुजविले
                                                 तुम्हास का ओझे , अमुचीच माय गे
                                                 ज्ञानगंगेच्या प्रवाहात का  हरते ती

                                                 राज्य मराठीचे  हे , रक्त-औक्षणे  झाले
                                                 ललाटी भाग्य दीप  ,जिने रेखियले
                                                 तुम्हांस का  हो,  न्यूनगंडे पछाडले  ...
                                                 आपुल्याच  मातीत  का   दुभंगते ती

                                                 वचन माझेच मला , माझ्या  मायबोलीचे
                                                 स्वप्न माझ्या राजाचे ,माझ्या शिवबाचे
                                                 दरवळ माय बोलीचा,  रुजावा रानोमाळ
                                                 स्वप्नातून  उभारी, घेईल भरारी   ती
                                               

                                               ज्ञानदिंडी मराठीची सर्वदूर वावरू दे
                                               एक मात्रा माझीही,  या प्रवासात लागू दे ...
                                               तिच एक आशा , तिचं जाणे गुंफणे...
                                               मराठी   मनाला मनाने जोडील ती ..





                                                                                                                  

Thursday, 14 February 2019

तू फक्त हो म्हण .. (valentine poem)

                                                  हे आता नेहमीचंच ... न बोलता मूकपणे बघणं ..
                                                  अन हळूच डोळ्यांच्या बाहुल्यात साठवून  घेणं ...
                                                 आठवणी विरघळतात याच तुझ्या पाणेरी डोळ्यात ...
                                                  शब्द तुला काही सांगू पाहतात .. पण तू असतेस आत्ममग्न


                                                  गालावरच्या खळीत तर.... कधी पाखरांच्या बोलीत...
                                                  ती  पाखरही वेडी .... घुटमळतात माझ्यासारखीच....
                                                  आसपास ... स्वप्नात ...क्षणाक्षणात ..  फक्त तुझ्यासाठी
                                                   कधी सांगू पाहतात ... नजरेने .... तर कधी शब्दांनी

                                                   नजरेचे इशारे कळूनही .. अलिप्त राहणं... नजरेआड करणं
                                                   छान जमत तुला ..कळुनही सर्व ... न कळल्यासारखं करणं
                                                   आणि माझं मलाच कळत नाही तरीही तुझ्यात  गुंतत जाणं ...
                                                    मग शब्दांचा आसरा घेत मी काही सांगू पाहतो ... तर ...
                                                 
                                                 
                                                 शब्दांनी शब्दांना समजून घेण्याआधीच धुडकावून लावतेस
                                                 तर शब्दांनी व्यक्त व्हायचं  कसं ... न बोलताही... मूकपणे
                                                 व्यक्त ही व्हायचं नाही आणि नुसतंच अस्वस्थ रहायचं..
                                                 मनचं  सर्व बोलते तर ...तर शब्दांचं काही कामचं नव्हतं


                                                 नुसताच शब्दांचा खेळ .... खरं सांगायचं तर
                                                 कधी काही नात्यांचा लागतंच नाही मेळ
                                                 सर्व नाती सहजतः उलगडली असती तर ...
                                                 घेता आला असता का  उलगडणाऱ्या पाकळ्यांचा गंध...

                                                 हळुवार कुरवाळत ...निशःब्द होऊन  कणाकणाने
                                                 घेता आला असता का  मनात भरून अगदी आतपर्यंत ...
                                                 मनकोन्यात .. तळकप्प्यात  .. आसूसून ..तृप्त होईपर्यंत
                                                 कसं सांगावं  तुला ... हे मोहरून जाण .. फक्त मलाच होत का .....

                                                  आत जळणं खोलपर्यंत ... तरीही अतृप्त  राहणं ....
                                                  जसं दवबिंदू हातातून निसटून जाणं ..काय बोलू
                                                   मला नाही सांगता येणार नेमकं .... थोडे शब्द गडबडतात
                                                   थोडे अडखळतात .... काहीवेळा चक्क निसटतात ...
                                                 

                                                 माझे शब्द अपुरे पडतात ..पण  तो तुझा कटाक्ष जीवघेणा  ....
                                                 सर्व काही सांगतोय असं वाटताना .... रुक्ष होतो .. .
                                                 मीच  समजावतो मग मनाला .... असेल तिची काही व्यथा
                                                 जे वाट्याला आलं त्यातच तृप्त हो ...उजळणी कर त्या  क्षणांची
                                               
                                                 मग वाटत सर्व काही असच राहू द्यावं .... आकाशासारखं निरभ्र
                                                 नको उगाच काळ्या मेघांची किनार ....
                                                 एका स्वच्छ नात्याला .... एका गोंधळलेल्या मनाला ....
                                                 कशाला उचकटयाचे अर्थ ... होऊ दे  गुंतागुंत माझी
                                                  निदान आठवण तुझी ...  असण्याचं भान देते जगण्याला ...

                                                    हे सर्व बोलायला ठीक आहे ... तरीही वाटत ग ...
                                                    तुझ्या असण्याने जगण्याचे संदर्भ बदलले असते ...
                                                    मिठीत तुझ्या अवघे विश्व मला कस्पटासमान भासले असते
                                                  तुझं असणं ... रुसणं ... हसणं सर्वच वेड्यासारखे अनुभवले असते ...

                                                    तु जवळ असलीस की कसं राजासारखं वाटायचं
                                                    चंद्र , सूर्यालाही   थोडं न्यूनगंडाने पछाडायचं....
                                                    सुख मुठीत नाही मावायचं ...
                                                     इतकं की मग नंतरच रितेपण .... डोळ्यातून वाहायचं

                                                 
                                                     वाहणाऱ्या त्या पाण्यात ....  व्हायचं मन सैरभैर तरीही
                                                    मग  तुझ्या आठवणी अंतरंगात रुजवून  रमायचं
                                                    ते तुझं  कधी संथ तर कधी द्रुतलयीत दर्यासारखं उधळून येणं
                                                     आणि अवचित शुष्क करून लुप्त होणं ...
                                                                                                        

                                                     मला अजूनही आठवतं तुझं लाटांशी खेळणं
                                                    आणि लाटा अंगावर आल्या की हळूच मिठीत शिरणं
                                                     तर कधी क्षितिजापार एकटक पहात रहाणं ...
                                                     आणि पाण्याने भरलेल्या  अश्रूंनी मला भिजवणं ....

                                                   मग  सांग मला  , तुजविन आता काय करू ओठावरील दवबिंदूचं ......
                                                  आणि अवचित येणाऱ्या थंडगार झुळुकेचं ....
                                                  कशा करू तुजसाठी चांदण्यातील कविता
                                                  आणि  माळू  ऐन वसंतात गजरा .....

                                                    आणि काय करू  भिजवणाऱ्या पावसाचं ...
                                                   आणि किलबिलणाऱ्या खोडकर पाखरांच ...
                                                   डोंगराआडून पाहणाऱ्या त्या सूर्याचं ...
                                                   आणि केवळ आपल्यासाठीच डोलणाऱ्या वेलींचं

                                                    तू  गेलीस आणि मी कवी झालो ... थोडा कलावंत झालो
                                                    तुला वाटलं असेल झगमगत्या प्रकाशात मी सर्व विसरून गेलो
                                                    मोहाचे अनेक क्षण आले .... पण चित्र तुझेचं होते हृदयात
                                                    खरंच सांगतो कधीच केली नाही मी प्रतारणा तुझी अन प्रेमाची

                                                     तुला वाटतंय मी आनंदोत्सव साजरा करतोय
                                                     हे आभास आहेत मीच माझ्यासाठी निर्माण केलेले
                                                     खरतर पोरखेळ  तुझं लक्ष वेधण्यासाठी .....
                                                      तू फक्त निर्विकारपणे बघशील हे माहित असूनही

                                                      नको झालंय आता सर्व ..अपेक्षा ... सहानुभूती ...
                                                      वरवरचा जिव्हाळा ..   आणि सर्वच अंगचटीस येणार
                                                      शून्य वाटतं ... एक खोल कृष्णविवरी शून्य ...
                                                      या शून्यातून तुझं असणं हाच एक मंदसा प्रकाश

                                                       
                                                       खरं सांगतो तुझ्याइतकं कशातच रमत नाही मन
                                                       फक्त सरतायेत अविरतपणे क्षणांमागून क्षण  ...
                                                      आणि ओढतायेत मला फक्त तुझ्याकडेच
                                                       हे सर्व मागे सोडून निशःब्दपणे येईन ....  तू  फक्त हो  म्हण ..


                                                     साठवून ठेवलाय आठवणींचा एक एक बिंदू  मनकोन्यात  ...
                                                     अमुल्य  मोत्यासारखा ..... अगदी जपून हळुवार ...
                                                      कधी मनात चित्र आकारतो .... कधी शब्दात
                                                      पण जागवतो तुझ्या आठवणींचा जागर  न चुकता  अंतरंगात


                                                   अन आज प्रेमाच्या दिवसाला तू गुप्त असशील अवचित
                                                   कदाचित मी पुन्हा प्रपोज करेन म्हणून .... हसत असशील मनात
                                                   आणि वाटही पहात असशील ... तशीच मान तिरकी करून
                                                   सगळंच अगम्य तरीही हवंहवंसं वाटणारं...  सगळंच ...

                                                 
                                               
                                                   मला आवडलं असत ग ... तुझं मूकपणे असणंही ...
                                                   मी गुंतून राहिलो असतो तरीही .... सूर्यास्तापर्यंत ...
                                                  चंद्राला साथीला घेईपर्यंत .... आणि चांदण्यात चिंब होईपर्यंत
                                                  अगदी उगवत्या सूर्याची किरणे तुझ्या केसात उगवेपर्यंत

                                                                                                                                     
                                                 

                                                   कारण नसता देऊ शकला तुला कुणीही ..
                                                   माझ्याइतका  फुलाच्या गंधाचा आनंद.. अगदी ओथंबून
                                                   शेवटच्या क्षणापर्यंत .... शेवटच्या श्वासापर्यंत ....
                                                   अन मनाने मनात विरघळून जाईपर्यंत ...