Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Friday, 9 May 2025

मुखवटे

     

                                       


   मी ज्या सध्या ज्या सोसायटीत राहतो तेथे अनेक वृद्ध जोडपी ,काही एकटे वृद्ध राहतात . बहुतेकांची मुलं परदेशात . अलीकडे सोसाटीच्या नोटिसबोर्ड  वरून कळत होत ,काही वृद्ध जग सोडून गेले . जे गेले आणि जे उरले आहेत त्यांचं इथं कुणीही नाही ,एकटेपणाशिवाय !सकाळी दिसतात . मुलं इथं नाहीत याची त्यांना खंत नसेल असं नाही .परंतू प्रसन्नतेचे मुखवटे लेऊन फिरत असतात . कमालीची maturity .       

भौतिक  संपन्नता आहे त्यांच्याकडे पण ते संपन्न आहेत का ? अर्थात  आपण त्यांच्या मनात डोकावू शकत नाही .प्रसन्नतेच्या मुखवट्याआड दिसणाऱ्या खिन्नतेवरून फार तर अंदाज बांधता येऊ शकतात . तुका म्हणे आता तुझी जवळीक ,तुजविन आता मज कोण आहे पांडूरंगा !

अजयभोसले .

Sunday, 22 September 2019

बोधामृत

          आयुष्यात ज्या पुरुषाने मुलींवर  impression मारण्याचा प्रयत्न केला नाही असा पुरुष कदाचीत हनुमानभक्त असावा किंवा त्याला स्वतःबाद्दल अति आत्मविश्वास असावा.अशा 'महान ' पुरुषांना वगळून इतर सामान्य पुरुषांबद्दल आपण बोलुया. impression मारण्याचे प्रकार वेगळे असले तरी सर्वांच उद्दिष्ट एकच .येनकेन प्रकारे मुलींना प्रभावित करणे.

       प्रकार 1- शर्टाची दोन बटन उघडी ठेवू6न,भाड्याने आणलेली सोन्याची चेन,बाइक वागवत फिरणारी टोळी म्हणजे मानसशास्त्राचे   तज्ञ. एकतर यांचा हात गळ्यातल्या चेनपाशी खेळत असतो नाहितर बाइकच्या ॲकसीलेटरशी . पूरुषांचा आक्रमक स्वभाव मुलींना आवडतो हा कुठूनसा केलेला अभ्यास,भले ते शाळेच्या अभ्यासात मागे असोत.

      प्रकार 2- मुलींना साधी मुले आवडतात अशी धारणा असलेला दुसरा वर्ग.एकदम टापटीप. सद्वर्तनी. आता हा साधेपणा चेहरयावर खेळवायचा म्हणजे अतोनात कष्ट.कारण जे आडात नाही ते पोहरयात कुठून येणार?

       असो असे अनेक प्रकार आहेत आणि ते सर्व नमुने तुम्हाला परिचीत आहेत.आज या विषयावर एक बोधकथा तुम्हाला सांगणार आहे.बोधकथा ?  या विषयवार...असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बोधकथेला कोणताही विषय व्यर्ज्य नसतो आपण फक्त बोध घ्यायचा.

       आता हे पोरग कुठल्या प्रकारातल ते तुम्ही ठरवा.निघाल एक कुत्र घेउन impression मारायला.अर्थातच भाड्याचं. चांगल आडदांड .खरतर ते कुत्रच त्याला फरफटत घेउन चालल होत. या प्रकारातलया  मुलांकडे हे कुत्र आळीपाळीने असे. फक्त अड्डा बदललेला असे. तर हे पोरग हजर एका अड्डयावर. यांना मुलीचा वास बरोबर येतो.म्हणूनच यांना ' वासू ' म्हणत असावे काय? pj होता...तर यांची घाणेंद्रीय शिकारी कुत्र्यापेक्षा तीक्ष्ण. यांचा ऊपयोग सीमेवर शत्रूचा कयास घेण्यास चांगला होऊ शकतो.परंतु हा प्राणी गल्लीतच जास्त सापडतो.

      पुढे काय झाल याची उत्कंठा तुम्हाला आहे ना... डावीकड़ुन उजवीकडे ,उजवीकडून डावीकडे त्याची मान  वेध घेऊ लागली.शक्य असत तर 360 डीग्री कोनात त्याने वेध घेतला असता. इतक्यात हलका हलका मुलीचा गंध येऊ लागला.त्याची चुळबूळ वाढू लागली.गंध थेट नाकात आणि डोळयात घुसू लागला.पोरग बेफ़ाम. कुत्र बेफ़ाम.ते काही आवरत नव्हत.मुलगी खुदूखूदू हसत होती. impression मारायची हीच संधी.आपल कस ऐकतो तो हे त्याला दाखवयच होत त्याला. म्हणून त्याने कुत्र्याच्या डोक्यावर एक चपटी मारली आणि ऐटीत म्हणाला," ए गप्प बस ' . कुत्र्याची सटकली.तो थोडच त्याच ऐकणार.त्याचा मालक वेगळा.कोणतीही भीडभाड न बाळगता तो त्याच्यावर तुटून पडला.पोराची पळता भुई थोडी. कुत्र्याचा अवतार बघून मुलगी केव्हाच भुइला पाय लावून पळाली होती आणि कसाबसा तो मुलगाही.

बोधामृत ...मुलीला impress करण्यासाठी कुत्रा आणाल तर त्याला आधी नीट ट्रेनिंग द्या.
     (  मुली काय कशानेही प्रभावित होत नाहीत हे पुरुषांना कळत नाही तर कुत्र्याला बिचारयाला कसं कळणार.)

              

Tuesday, 3 September 2019

प्रकाशकण



       मनाचा थांग न लागणारी माणसांची मनं आणि खोल दरया, खळखळणारे झरे, निसर्गाची हिरवी पैठणी नेसलेले डोंगर त्यावर मोतीदार वळणावळणाची नक्षी ......नुकतच शिडकाव्याने तयार मातीचं ताजं अत्तर ...अंगाअंगात मुरवत बाप्पाला भेटायला जाणं एखाद्या वारी पेक्षा कोंकणवासीयांसाठी स्वर्गीय अनुभूती...निसर्गाची मुक्त उधळण...साधी माणसं ...निसर्गान जे दिलय त्यात समाधान मानणारी ..जास्त म्हातारा म्हातारीच  असतात गावात..मन टेकलेले...पाठ वाकलेले ..सांजवेळ जवळ येत चाललेली...दूर रस्त्यावर शोधत असतात आपला भुतकाळ....डोळयात अंधुकसा अंधार ...सणासाठी येणा रया मोटारींचे दिवे मोठे मोठे होऊ लागतात..हळुहळु मनावरच मळभ दूर होऊ लागतं  ....डोळे चमकू लागतात...अंधारात प्रकाशकण वेचू लागतात....डोळ्यातून चेहरयावर आशेचे किरण ओघळू लागतात....पुन्हा दिवे दिसेनासे होईपर्यंत....


Thursday, 22 August 2019

विठ्ठल -रखुमाई

         
         


       सकाळची रेल्वेस्टेशनवरची लगबग . बेशिस्तीतल्या शिस्तीनं चालणारी . हजारो माणसं . अगणित विचारचक्र . त्या गर्दीला सवयीने झेलत , माझ्या विचारचक्रांचा  गुंता सोडवत चाललो होतो . विचार कसले ? तर ... या  गर्दीच्या डोक्यात आता नेमके कसले विचार चालले असतील ,  याचे . खरचं ! माणसांना आपल्यापेक्षा इतरांच्या पंचायती फार . मीही त्याला अपवाद कसा  असणार ?

            त्या गर्दीत माझे डोळे ,  नेहमी असणाऱ्या एका म्हातारा- म्हातारीला शोधत होते . नेहमी असायचे . मी यायचो तेव्हा ते दोघे दिसायचे . कपडे नीट नेटके . गौर वर्णाचे , छोट्या चणीचे आजोबा . डोळ्यात हतबलता आणि हातात एक तंबोरा , माथी विठ्ठलाचा टिळा . विटेवर मख्ख उभ्या असलेल्या  विठ्ठलाला साद  घालत  , जगण्यासाठी गाणे आणि त्यांच्या रख्माईने निमूटपणे साद   देणे हा त्यांचा   रेल्वेस्टेशनवरील नित्यक्रम . लोकांना त्यांच्या परिप्रेष्यातून ते जसे दिसत तशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत . कुणी हात जोडे , कुणी दान (भीक ) देई , कुणी उपेक्षेने बोले , कुणी दुर्लक्ष  करे . विठ्ठल -रखुमाईचं ती निमूट  उभी  राहत . 

          मला नेहमी प्रश्न पडे की , या आजोबा -आजींना या वयात इथे का यावे लागते ? त्यांना मुलंबाळं , नातेवाईक नसतील का ? आज जरा लवकर आलो होतो .  नेहमीसारखा हाच विचार मनात चालला होता . इतक्यात ते आजोबा - आजी समोरून येताना दिसले . नेहमी दोघेच दिसायचे  . आज त्यांच्या सोबत एक तरुण -तरुणी दिसत होते . त्यांना चालण्यास मदत करत होते . वा !माणुसकी  जिवंत आहे अजून तर ! माझ्या मनात विचार येतो न येतो तर , कुणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज आला  " तो म्हाताऱ्याचा मुलगा आणि ती सून . रोज इथंच भीक मागायला घेऊन येतात त्यांना स्टेशनवर "

कथा

                                                                                                                      




Tuesday, 24 April 2018

सुंदर गाव.



            एक होतं गाव. सुंदर त्याचं नाव. नावाप्रमाणेच नदी वेलींनी लगडलेलं.  दरी खोऱ्यांनी वेढलेलं. गाव तसं छोटं. बांबूची छोटी छोटी घरं.  अंगणाला फुलांची रांगोळी.  धबधबे,  झरे होते  गावची श्रीमंती.  जवळच्या जंगलातील पाखरांचं  संगीत म्हणजे पर्वणी . गावकरी साधे.  स्वप्न त्यांची छोटी, मनं मात्र मोठी.  बैलगाडीतून फिरायचं . घुंगराच्या नादमय स्वरात झिंगायचं.  छोट्या छोट्या आनंदात डुंबायचं असं होतं ते सुखी गाव.  

            कुणाची नजर लागली आणि आजूबाजूला शहरं वसू लागली.  सिमेंटच्या जंगलांनी पैसा खेळु लागला.  गावकऱ्यांना झाडापेक्षा पैसा मोठा झाला.  झालं नको तेच हिरव्या जंगलाच्या छाताडावर सिमेंटच्या गगनचुंबी इमारती आकाशाला भिडू लागल्या.  दूरदूरवरची हिरवळ लुप्त झाली.  मोटारगाडीचे कर्णकर्कश आवाज वाढले त्यांनी बैलगाड्यांच्या कर्णमधूर घुंगरांना गाडले.  आकाशाच्या नितळ पडद्यांना धुराने जाळले . 

            पाणी जिरवा, पाणी वाचवा, झाडं वाचवा चा मंत्र हसण्यावरी गेला .  पाणी आटू लागलं.  आकाश, जमीन भकास झालं .  ढग रुसून बसले.  व्हायचं तेच झालं.  चिंब पाण्यात भिजणाऱ्या लोकांच्या डोळ्यातील पाणीच आटू लागलं.  सगळं शुष्क झालं.  एका हिरव्या गावाचं आता भयाण स्मशान झालं.








Friday, 8 September 2017

LOVE AND ENGLISH

                   
                                                                     


           आमच्या तरुणपणी खेळांत किंवा  नाक्यावर मुलींना पाहण्यात आम्ही जीवन सार्थकी लावायचो . भरपूर खेळ , दंगा , मस्ती याने आयुष्यात कोणत्याही पोकळीला स्थान नव्हते . निराशा वैगरे असा काही प्रकार नव्हता  . प्रेमात विफल झाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या मुलांचा  एखादा किस्सा आम्ही ऐकला होता . हल्ली कुठल्या त्या माशाच्या खेळात मुलं आत्महत्या करताना ऐकू येत तेव्हा खेद होतो . आज पिढीच्या पिढी एका छोट्या idot  बॉक्स मध्ये  बंदिस्त झालीय . तरुण पिढी    एकेमकांकडे डोळे लावून  बसण्याच्या वयात  त्या idot  बॉक्स मध्ये डोळे गुंतवून बसलीय .आजच्या पिढीच्या हृदयातील धडधड रिंगटोनच्या आवाजाने होते . मातीतल्या खेळातली अन तरुणपणीच्या लैला -मजनूच्या निष्पाप किश्श्यांची मजा कोणत्या शब्दात वर्णन करावी हे कळत नाही,  कारण हे अनुभवायचे क्षण आहेत . त्यातली मजा romantism आजची पिढी हरवत चालली आहे असं वाटतं .  माझ्या एका मित्राचा एक किस्सा मुद्दाम सांगतो .

                   आमचा तो मित्र वेळेचा कधीच गुलाम नव्हता . परंतु तिच्या येण्याने तो घड्याळ घालायला शिकला . तिच्या आगमन -निर्गमनाचं वेळापत्रकच त्यानं पाठ केलं होतं . तिच्या येण्याने त्याच्या हृदयातील ठोके असे काय बेताल व्हायचे कि सांगता सोय नाही . आम्ही परममित्र मात्र प्रामाणिकपणे त्याच्या आधाराला असू . जणू काय आमचं परम कर्तव्य असल्यासारखं तिच्या येण्याची वर्दी देण्यासाठी डोळ्यात तेल घालून आम्ही  जागता पहारा द्यायचो . आमचा तो मजनू  रोड साईट मजनू नव्हता हुषार , मेहनती होता . त्यामुळे सर्व मित्र त्याच्यासाठी तत्पर असतं . रोज एकच कार्यक्रम . तिने यावे , मार्गस्थ व्हावे . साधा कटाक्षही नाही . परंतु मित्र फक्त दर्शनानेच हवेत . त्याला जमिनीवर आणण्यासाठी आम्हाला मग काही  जहरी उपाय योजावे लागतं . त्यात आय -मायच्या शिव्यांचं मुक्त आदान -प्रदान व्हायचं. आमचा मित्र इतका निलाजरा की, तिच्या दर्शनाने पावन झालेला तो ,शिव्या  प्रसाद म्हणून गोड मानून प्राशन करायचा .  अध्यात्मिक भाव चेहऱ्यावर वागवत निर्विकारपणे असा काही आमच्याकडे पाहायचा की मग आम्हीच बिचाऱ्या मित्रासाठी मार्ग शोधायचो. तिच्या आगमनानंतर हाळी देण्याचं काम मात्र आम्ही प्रामाणिकपणे निभावत होतो. मित्राचं व्रत न थकता सुरूच होतं .

                 त्याच्या तपश्चर्येला फळ आलं . एके दिवशी तिने त्याच्याकडे पाहिलं असं वाटतं . काय तो गहजब .  पार्टी झाली . पार्टी म्हणजे काय ? बियर एक वाटेकरी अनेक . आमचा ऊर अभिमानानं भरून आला . मग काय स्वारी दुसऱ्या दिवशी  एक तास अगोदरच हजर  . वेळ दुपारची तरी महाशय आंघोळ वैगरे करून, कुणाचातरी अत्तर मारून   गुणगुणत हजर . अस्वस्थपणे येरझाऱ्या घालणं सुरु . तिच्या वाटेवर थोडं तपासून पुन्हा माघारी येणं सुरूच होत . वेळ  सरत होता ,  काटा सरकत होता . धडधडीचं रूपांतर चिडचिडित सुरु झालं. , संध्याकाळचं मळभ  मनावर साचू लागलं .  तरी मजनू  पार सूर्य बुडेपर्यंत तळ ठोकून बसला .  आम्हाला साथ देणं भाग होत . आमच्या मित्राच्या जिंदगीचा सवाल होता . त्याला आम्ही   डिवचायला सुरुवात केली . प्रेमात  माणसं संयमी होतात तसा तो झाला होता . म्हणाला तिला  काहीतरी प्रॉब्लेम असणारं . या प्रेमिकांचं हे मानसशात्र जबरदस्त असतं . भेटण्या अगोदरच माणसं समजून घ्यायला लागतात .

                 दुसऱ्या दिवशीही महाशय वेळेत हजर . भूरभूर पाऊस बरसत होता . वातावरण धुंद होते. वातावरण कसेही असो आमचा मजनू हल्ली बेधुंद असायचा . तुटकी छत्री सावरत वाटेकडे डोळे लावून बसला होता . पावसाच्या थेंबातून एक परिचयाची आकृती आकार घेऊ लागली . याचा जीव टांगणीला . हो तिचं होती . छत्री आणि पुस्तक सांभाळत आपल्याच नादात हळुवार पावलं टाकत निघाली होती . तिच्या चालण्याची लय त्याला बेचैन करत होती . काय करावे उमजत नव्हते . हळूहळू ती जवळ येऊ लागली . त्याच हृदय आता उसळ्या घेऊ लागलं . विचारांचा ताबा डोळ्याने घेतला होता. त्याच्या कोणत्याही हालचालीवर नियंत्रण नव्हतं. ती खुद्कन हसली . छान ,निष्पाप . इथे घात झाला . त्याच आपल्या हालचालींवरच नियंत्रण हरवूं लागलं . कारण नसताना त्यानं आपली छत्री गर्रकन फिरवली . ती तिच्या छत्रीला धडकली . तिच्या छत्रीचा दांडा मोडला आणि वाऱ्याचा झोतानं ती भिजू लागली . ती रडवेली झाली . रागात म्हणाली ,"Idiot , i am going to tell my mom. अन रागात झपाझप पावलं टाकत निघून गेली . तरी आमचा मित्र खुश कारण ती बोलली तर सही . त्याच इंग्लिशचं ज्ञान अगाध.  आमच्यातला एक त्यातल्या त्यात ज्ञानी इंग्लिश माध्यमाच्या  मुलाने त्याचा अर्थ सांगितला तेव्हा तो असा पसार झाला की काही विचारू नका . आम्हाला वाटलं प्रकरण संपलं . पण हे सद्गृहस्थ हार मानायला तयार नव्हते . रॅपिडेक्स इंग्लिश स्पिकिंगचं पुस्तकच घेऊन आले चक्क आणि मग आयुष्यात केला नसेल असा अभ्यास सुरु झाला .

           साधारण संभाषणाला जेवढी वाक्य जरुरी असतात तेवढी त्यानं पाठ केली . आठवडाभर महाशयांनी वाट पाहण्याचा कार्यक्रम बंद ठेवला होता.  तिची आई काही आली नव्हती . त्याचा आत्मविश्वास थोडासा वाढला .   . दरम्यान तिने त्याच्याबद्दल एका मित्राला विचारलं होतं .   मग नेहमीसारखे आपल्या कर्तव्यावर चिटकू मजनू हजर झाले.  ती नेहमीच्या वेळेवर आली . हा वाचलेली वाक्य घोळवत होता . तिने विचारलं ., "How are you ".  हा म्हणाला , "Good Morning " . वेळ दुपारची.  असो  तिला समजले , तिने हिंदीत विचारले , कैसे है आप ? . तो म्हणाला "Good Good ".  तो काय हार मानायला तयार नव्हता . इंग्लिश येत नाही हे दर्शविणे त्याला अवमानकारक वाटतं होत . मग सिलसिला सुरु झाला , इंग्लिश स्पिकिंगचं पुस्तक व प्रेमाचा . एका एका वाक्यांनी त्याची प्रेमकथा बहरत होती . मग ती त्याच्या आयुष्यात आली  का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ? प्रेम नुसतं इंग्लिश पाठ करून होत नाही . त्याला व्यवहाराची एक दुसरी बाजू असते . हा तर सुशिक्षित बेकार होता . व्यवहारी बाजूत तोकडा पडत होता . तिचं यथावकाश  सुस्थापित मुलाशी लग्न झालं . यानं काय गमवाल ? तसं म्हटलं तर काहीच नाही . व्यवहार शिकला अन बरोबर इंग्लिश .



               

                       

Tuesday, 5 April 2016

संभ्रम

             प्रेम म्हणजे फक्त शारीरीक आसक्ती असते का ? पुरुषांत एक ययाती कायम वसलेला असतो का ? निर्मळ प्रेमाची व्याख्या काय ? तिच्याशिवाय इतक अलिप्त , एकट का वाटत होत? अस्वस्थता नेमकी कसली होती ? या सर्व प्रश्नांनी तो गोंधळाला होता . स्वतःशीच चाललेल्या संवादात गुरफटला होता . ती निघून गेल्यावर , तिच्याशिवाय मात्र एक अपूर्णतेची जाणीव सतत बोचत होती . एक भयाण पोकळी अंतर्मनात साचून राहिली होती . त्याचा नेमका अर्थ उकलत नव्हता .  त्याच्या मनात  विचारांची आवर्तन भिरभिरत होती . समुद्र आणि क्षितीज एकरूप भासतात . ते एक कुठे एक  आहेत . मिलनाचा एक भास आहे . फुलांशी  खेळणारा भ्रमर , आता होता निघाला भ्रमणाला .  फुलं तरीही आपल्याच आनंदात रममाण आहेत . दोघंही आपल्या परिघात रमले  आहेत . एकमेकावर भार  न होता . सोबतीने मिळालेल्या  क्षणाचे दवबिंदू समरसून प्राशन करतायतंं, कोणताही संभ्रम मनात न आणता . जगतायतं आजचा क्षण जो शाश्वत आहे . निसर्गाकडे कधी मायेने पाहिलच  नाही ,त्याला आपुलकीने कधी गोंजारलं नाही .  त्याच्या सादाला प्रतिसाद कधी दिला नाही . हे निसर्गाचं सहज स्वरूप कधी त्याच्यात उतरलं नाही .   न सांगता , डोळ्यांनी अनेकदा तिने मन उघड केलं होतं. निसर्गाच चैतन्य , प्रेम , साद  भरभरून त्यात होतं. शब्दांच्या बुडबुड्यासवे त्याचे मन हवेत तरंगत असे  . जमिनीवर घट्ट उभं राहून या निसर्गाला कधी कवटाळले नाही . ही जाणीव त्याच्यात  खोल रुजली नाही . आता या जाणीवांच्या जगात जगण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता  . 

Thursday, 31 March 2016

मुहूर्त

              स्‍मशानातलं ते भूत निघालं धुक्याला चिरत, बोचऱ्या थंडीला न जुमानता. निघालं आपल्या भूतकाळाचं वर्तमान शोधायला . आज भुतांच्या चालीरितीनुसार अमावसेचा मुहूर्त होता. तो चुकला तर म्हणून निघालं सुसाट. माणसं मेल्यानंतरही आपल्या सवयीचे गुलाम रहतात,हे खरंं. हे भूतही मुहूर्ताच्या जंजाळात रुतलेलं होतं. काल त्याच्या मुलासाठी मुहूर्ताप्रमाणे पुजा झाली होती. तो पोहचला तेव्हा अग्नीकुंड थंड होऊन क्षीण झाले होते. पुजेमुळे निर्माण होणाऱ्या सुमंगल वातावरणाचा मात्र अभाव दिसत होता. वातावरणात एक भकासपणा भरुन राहिला होता. सर्वजण सफेद कपडयात लपेटलेले असुनही काळवंडलेले दिसत होते. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याचा लहान भाऊ आलेल्या मंडळींना दु:खद अंत:करणाने सांगत होता.
               " थोरल्याच्या अखेरच्या इच्छेप्रमाणे त्याच्या मुलासाठी अंगणात मुहूर्तानुसार विधी ठेवला होता. कुठून हवेची झुळुक आली अन अग्नीची चादर होऊन छोट्याला लपेटलं आपल्या काल -बाहुपाशात, मुहूर्ताच्या पवित्र वेळेला न जुमानता. पवित्र भावनाही रक्षण करु शकल्या नाहीत त्याच्या . आज जोराची हवा सुटणार हे हवामान शास्त्र सांगत होते. मी भावाच्या भावनेत आणि मुहूर्ताच्या फासात अडकलो. हा मुहूर्त साधून काय साधलं?
            भूत दु:खाने स्वत:शीच पुटपुटलं ,"मी आपल्याच अंधश्रध्देचा गुलाम राहिलो . भूत झाल्यावरही ! "

Monday, 14 March 2016

बाळाची खंत .

             नवरा -बायको उच्च शिक्षित , पाच आकडी पगारदार .  जगण सर्व आधुनिक सोयींनी युक्त . या सोयींचा उपभोग घेण्यास दोघांकडेही वेळेची वानवा .आधुनिक सुखाची व्याख्या म्हणजे मोठं घर , गाडी , तगडी बँक  बचत . सर्व काही अपेक्षेपेक्षा जास्तच . ज्या सुखासाठी मरमर मरायचं त्याचा सहवास मात्र अल्प . घरात बाळ नाही . याची चिंता त्या दोघांपेक्षा इतरांना जास्त . दोघांना वैद्यकीय सल्ले सुद्धा मिळाले (मागितले नसताना ). दोघे त्रस्त झाले होते ,  समाज आणि कुटुंबियांकडून होणाऱ्या अनाहूत सल्ले आणि प्रेशर मुळे  . मग दोघांनी आपल भविष्याचं नियोजन तपासलं . वेळेची गणित मांडली.  बाळा साठीची  वेळ निश्चित केली . गोंडस बाळ जन्माला आलं . दोघांनी बाळासाठी केअर -टेकर ठेवली . त्यांची जबाबदारी संपली . नियोजनाप्रमाणे ते पुढच्या कामाला लागले . एखाद्या यंत्राप्रमाणे . बाळ  रडत होत  . मायेच्या उबेला आसुसत होत . टपोऱ्या डोळ्यांनी वाट पाहत होत . हिरमुसलं होत . काही सांगण्याचा  प्रयत्न करत होत . सांगत होतं आपली खंत . 
"   माझा जन्म माझ्या हातात नव्हता . याची जाणीवही मला नव्हती . माझी संमत्ती घेण्याची सोयही निसर्गाने केलेली नाही . दोघानीच ठरवलं,  लादल माझ्यावर , जन्माबरोबर एकटेपण. सर्व सुख आहेत एक उबदार स्पर्श नाही . ही सुख त्या स्पर्शासमोर कवडीमोल आहेत . त्यांना काय हवं त्यांनी केलं . मला काय हवय ? यासाठी त्यांच्या वेळापत्रकात स्थान नाही . मग का हा अट्टाहास ? केवळ समाजासाठी, स्वतःसाठी  . मग मला काय हव याचा  विचार झाला कि नाही ? का त्यांच्याच परिप्रेष्यातून आयुष्य पाहावं लागणार आहे ?    


Thursday, 3 March 2016

वास्तव

             मुलगा देखणा , उच्च शिक्षित . मुलगी सुंदर ,साधी . अन्य सर्व गोष्टी पत्रिकेनुसार . बाप धन्य झाला . त्याच्या माथ्यावरच परंपरेच ओझं उतरलं . मुलगी परक्याच धन म्हणून उरकून टाकल लग्न अन मोकळा झाला बापडा .

            मुलीला भविष्यात काय वाढून ठेवलय याची कल्पना नव्हती . भविष्याच्या रम्य स्वप्नात गुंतून गेली होती बिचारी .  हळूहळू सत्य उघड  होऊ लागल तसं तिच्या आयुष्याला एक संथपणा , विस्कळीतपणा येऊ लागला . सत्य तिला समजल आहे  हे  सासू -सासऱ्यांना  कळल्यानंतर  त्रास अधिकच वाढू लागला .सहन करण्यापलीकडे .  कस सांगाव घरच्यांना ? सत्य  वास्तवापेक्षा भयानक होते . शेवटी  धीर एकवटून तिने घरच्यांना एक चिठ्ठी लिहिली .

                  " मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कल्पनेपेक्षा भयानक आहे . तुम्हाला त्रास द्यायचा हेतू नाही  .  सहनच होत नाही . हे मृदुभाषी , सुंदर म्हणून सगळ्यांना  कौतुक . वास्तव कल्पनेपेक्षा वेगळ असू शकत . त्यांना स्त्रिया आवडत नाहीत . म्हणजे  . . .  तुम्हाला समजलंच असेल . मुलगा त्यातला आहे हे उघड होऊ नये म्हणून मला कोंडून ठेवण्यात आल आहे . समाजाला त्याच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी इतरांच्या भावनांशी, वास्तवाशी   काही घेणं- देणं नसतं . त्यासाठी माझा छळ चाललाय . तुम्ही म्हणाल मुलीच्या जातीला हे सोसावच लागत . माझी मानसिक , शारीरिक कुचंबणा कशी सांगू ? कस निभवायचं हे तकलादू नात अन किती काळ  ? हे  भयाण वास्तव मी स्वीकारू की स्वतंत्र होऊ तुम्हीच सांगा . "

Monday, 1 February 2016

व्यवहार

            शांताराम कनिष्ठ मध्यमवर्गीय माणूस . चार मुलीच . वंशाला दिवा हवा या पारंपारिक दबावातून प्रयत्न सुरूच . मुलं झाली परंतु   वाढलेल्या पसाऱ्याने संसाराची  घडी विस्कटली होती . आता फार उशीर झाला होता . रेटणं एवढचं हातात होत. 
           चार मुलीतील एक मुलगी संवेदनशील ,  तिला परिस्थितीची आणि व्यवहाराची जाण होती . आई -बाबा यांची होणारी ओढाताण ती जवळून पाहत होती . मार्ग शोधत होती .  एका सकाळी बाप मुलीला उठवत होता . तशी लवकर उठायची . घरातल्या कामाला लागायची . शरीर थंड . निपचित . क्षणभर चरकलाच तो . तिच्या मुठीत कागद दिसत होता . कापऱ्या  हाताने  तो वाचू लागला . 
          "प्रिय , आई-बाबा . तुमची ओढाताण मी पाहतेय . मुलगा हवा म्हणून घराचा पसारा तुम्ही वाढवला . व्यवहार ज्ञानाकडे पूर्ण दुर्लक्ष केलत तुम्ही . कधी विचार केलात . श्रीमंत माणसे कित्येक पिढ्या सहज पोसू शकतात , मग त्यांना नेमकीच मुले का ? तुम्ही   स्वतःहून गरिबी का ओढवून घेतलीत ? एकाच संगोपन तुम्ही व्यवस्थित करू शकला असता . एकाच्या सुखाचे इतके वाटे केलेत की , दुसऱ्याच्या वाट्याला तस काही उरलच नव्हत . का तुम्हाला मुलाचा हव्यास . मुली म्हणून कुठे कमी पडलो असतो आम्ही . आपल्या घरातली परिस्थिती म्हणजे जगण्याची शिक्षा आणि तुम्हाला भार  आहे . माफ करा मला "   

Saturday, 31 October 2015

अपेक्षा

                आज तिने चाळीशी पार केलेली .  वाढत्या वयाच्या खुणा  दिसू लागल्या होत्य. स्थूलपणा वाढला होता . एकटच आयुष्य काढत होती .  एकटेपणाला कंटाळलेली . मनातल व्यक्त करायचं तर कुणाजवळ . तारुण्यात खूप सुंदर दिसायची . उमलत्या वयातही तिने व्यवहार पाहिला होता . लग्नासाठी तिची एक अट होती . मुलगा उच्चपदस्थ अन एकुलता एक हवा .  शिक्षण मात्र दहावी .  परिस्थिती कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातील.  सौंदर्याच्या फाजील आत्मविश्वासावर आभाळाएव्हढ्या अपेक्षा होत्या .

                 मुल येत होती .   लग्न हा व्यवहार आहे . सगळच पाहिलं जात. तुमची परिस्थिती , समाजातील स्थान , शिक्षण सर्वच . तिच्या अपेक्षेप्रमाणे नसलेल्या मुलांना ती नाकारत होती . तिच्या अपेक्षप्रमाणे मात्र काही होत नव्हते. काळ जात होता . वय वाढत होते.  आता तर घरातले सगळेच  वैतागले होते . तिचा पीळ काही सुटत नव्हता . आज एकटेपणाच्या खोल भोवऱ्यात मात्र ती हादरली होती . सगळ्यांच म्हणण तिला आठवत होत . पण आता वेळ निघून गेली होती . "अपेक्षा मर्यादेपेक्षा जास्त ठेऊ नकोस ." 
                                   

चमत्कार

               जीतला चिंता लागली होती . पैसे  संपलेले . आता पुढचे दिवस कसे काढायचे . सगळ मुलांच्या शिकवणीवर चाललेले . घर आणि शिक्षण . मित्रांनी दिले असते पण उधारी मागण उचित वाटत नव्हते. उगाचच एखाद्याच्या उपकाराच्या दबावाखाली बुजायला होत. पुढचा दिवस काय आजचा दिवसही काढण मुश्किल होत . मे महिन्यात नवीन विद्यार्थी  मिळण्याची शक्यता  नव्हतीच .  आणि आलेच तरी शिकवणीचे पैसे महिन्या अखेरीसच मिळणार . भ्रांत आज आणि उद्याची होती . परिस्थिती कोंडी करते तेव्हा आपण चमत्काराची आशा करू लागतो .  

                     जीत अगदी मेटाकुटीला आला होता . असहाय वाटू लागल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी उभे रहिले. त्या पाण्यात दोन अस्पष्ट  आकृत्या त्याच्या घराच्या दिशेने येताना दिसल्या . त्याने डोळे पुसले . एक स्त्री आणि तिच्याबरोबर एक मुलगा होता . तिने नमस्कार केला अन बोलू लगली . " हा माझा छोटा भाऊ आहे . आम्ही कुवेत वरून आलो आहोत . तिथल्या  परिस्थितीमुळे सगळ सोडून याव लागल . शाळाही . आता इथल्या अभ्यासक्रमाप्रमाणे शिकवायचं तर याची तयारी करून घ्यावी लागेल .  आजपासूनच सुरु करा . मी आगाऊ फीस आणली आहे . हि घ्या . प्लीज नाही म्हणू नका"

Thursday, 29 October 2015

स्टार

                संजय उत्तम संगणक तज्ञ . त्यामुळे चांगली मागणी . एक दिवस एका मोठ्या कलावंताकडे संगणक दुरुस्त करावयाचा होता .  हल्ली तो त्याच्या  सहाय्यकांनाच पाठवायचा . त्याला त्या कलावंताला भेटायची संधी सोडायची नव्हती म्हणून स्व:ताच निघाला .   
               एका छोट्या विश्वातून आज तो वेगळ्या वातावरणात प्रवेश करत होता . सगळ कस चकचकीत . अस पाहण्याची सवय नसल्यामुळे  बावरला होता . वेगळ्या वातावरणात उगाचच एक न्यूनगंड येतो त्याप्रमाणे .  स्टारच्या  पीएने त्याला संगणक दाखविला , त्याचा प्रॉब्लेम  सांगितला . प्रॉब्लेम फार काही मोठा नव्हता . काहीतरी करतो आहे अस दाखविण्यासाठी म्हणून तो उगाचच  वेळ व्यय करत  होता . सर्व ओके  झाल . पीएने त्याची फी विचारली . त्याने ३००० झाले म्हणून सांगितले . पीए घासाघीस करू लागला . इतक्यात तो कलावंत नेमका उगवला . त्याने त्यांचे संभाषण ऐकले होते. त्याने पीएला सांगितले , " बार्गैन नही . हमारा काम हुआ है  तो फीस दे दिजीये . चाय -नाश्ते  के लिये पुछा कि नही " 
              संजय तो किस्सा त्याच्या मित्राला सांगत होता , " अरे फार मोठा प्रोब्लेम नव्हता . १० रुपयाचा ही पार्ट नव्हता . या स्टार लोकांना काही कळत नाही . "
               त्याच्या मित्राने शांतपणे ऐकल . तो हसला क्षणभर थांबून म्हणाला , "  त्याला कशाला कळायला हव  . ते नाही गुंतून राहत अशा छोट्या गोष्टीत .  तुला १० च्या ऐवजी ३००० रुपये मिळाल्याचे समाधान आहे . ते खोट समाधान आहे  कारण   जास्त पैसे घेतले याची बोचही मनात असणारच तुझ्या . आपण छोट्या गोष्टीत किती अडकून राहतो नाही .त्यामुळे मोठ्या गोष्टींचा,  निखळ आनंदाचा विचार करतच  नाही .त्यांच लक्ष आकाशाकडे असते . ते त्यात पूर्णपणे एकरूप झालेले असतात म्हणून ते स्टार असतात . "

Wednesday, 28 October 2015

तेराव

                         गावाकडच विश्व . सुंदर मोकळ . पाखराच्या किलबिलीटासह येणारी पहाट  अन दिवेलागणीला  उमटणारे भजनाचे लयबद्ध सूर याने वातावरण भारलेले असते . मोकळा श्वास घ्यायला मोकळे आकाश आणि जमीन भरपूर मात्र प्रश्न रूढी -परंपरेचा आला कि श्वास गुदमरून जातो . अनावश्यक कर्मकांड, वास्तवता याचा तर्कबद्ध विचार करायलाही कुणी तयार नसत . 

                 श्यामच्या वडिलांचं नुकतच निधन झाल होत . त्याला त्यानंतरची कर्मकांड  न करता गावाच्या शाळेसाठी काही करायचं होत .तुमच्या असल्या त्तर्कनिष्ठ विचारांना काही किंमत नसते . त्या शाळेच्या उभारणीत त्याच्या वडिलांचा मोठा हातभार होता . कमी शिकलेले पण मुल शिकावी अस त्यांना खूप वाटे . . गेलेल्या माणसांची आठवण काढणे चांगला विचार आहे . त्यांच्या आठवणीच्या निमित्ताने एखाद विधायक कार्य झाल तर कुणाला नको आहे . 

            श्याम त्याच्या नातेवाईकांना सांगण्याचा प्रयत्न करत होता . ऐकणार कोण ? रूढीचे बोळे कानात होते . त्याने स्पष्ट सांगितले तुम्हाला जे करायचं ते करा  . त्याला अपेक्षित होते उत्तर . ठीक आहे आम्ही करू , निदान तू ये कार्यक्रमाला . त्यांना प्रथा सोडायच्या  नव्हत्या. श्यामला सर्वांना उपयुक्त पाऊले टाकायची होती . विधी झाल्यानंतर आपले म्हणणे मांडायची प्रथा असते . श्याम उभा राहिला . 

                 "  माझा बाप कमी शिकलेला . मुलांनी शिकावं हीच त्याची आवड . तो असताना त्याची आवड जोपासायला कुणी मदत केली नाही . विरोधाच झाला . आज सगळे चांगल बोललात . तुमचे कर्तव्य पार पाडलेत . शिक्षणातून विकास हाच त्यांचा उद्देश होता . परंतु तुमची कर्मकांड विकासाच्या आड येऊ नयेत म्हणून तेव्हढ्यापुरत त्यांनी ते स्वीकारलं होत . मरण्याअगोदर त्यांनी सांगितलं होत . हे काही करू नको . मुलांसाठी काही कर . जे गेले ते गेले . जे आहेत त्यांच्याकडे लक्ष दे . त्यांना आठवायचे असेल तर चांगल्या कामातून आठव .  आपले चांगलेपण माणसे  हयात असताना कामी का येत नाही ? त्यासाठी तेराव्याची वाट का पहावी लागते ? हे कळत नाही . या शाळेची पुढची जबाबदारी माझी ." 


Monday, 26 October 2015

प्रेमाने पोट भरत नाही

          सुकन्या एक गोड मुलगी . काही व्यक्तींबद्दल नेहमीच एक गुड फील वाटत तशी . हसतमुख , खळखळणारी . दु:ख  म्हणजे काय हा प्रश्न दु:खाला पडावा इतक सुख नेहमीच तिच्या चेहऱ्यात सामावलेले . वयाच्या त्या बेसावध वाटेवर ती प्रेमात पडली . नंतर भेटण नाही झाल .

              बऱ्याच काळानंतर सुकन्यासारखी एक मुलगी समोरून येताना दिसत होती . म्हणजे दिसत होती तिच्यासारखी पण चेहऱ्यावरचा सुखाचा ओलावा दिसत नव्हता . कोरडा चेहरा . ओळखीचा तरी अनोळखी . तिनेच हाक मारली . अरे सुकन्याच होती ती . खूप भरून आले . जवळच्या उपहारगृहात गेलो . निवांत बोलाव म्हणून . काय बोलावे ? कशी सुरवात करावी ? याचे आडाखे मनात बांधू लागलो . ती व्यक्त होण्याची  जणु वाट पाहत होती . कोसळली धबधब्यासारखी . 

                 " तुम्ही सगळे सांगत होता ते बरोबर होत . शिक्षण , करिअर याकडे आधी लक्ष द्यायला हव होत. काळाच्या ओघात उलगडणार प्रेम अनुभवेपर्यन्त संयम ठेवायला हवा होता . समुद्रकिनाऱ्यावरच्या चार भेटींनी माणसाची आणि आयुष्याची व्याप्ती नाही लक्षात येत . सगळे चांगल्या भावनेने समजावत होते. कळलच नाही . त्याचा पझेशिव  स्वभाव आवडायचा त्यावेळी .  प्रेमाचा कैफ होता . तो कैफ उतरला या वळांनी . मनावर खोल जखमा झाल्यात त्या वेगळ्या . बंधनात अडकायला मीच अधीर झाले होते , काहीच विचार न करता . माझ स्वतंत्र अस्तित्वच विरलय .  जगण्यासाठी शिक्षण , करिअर लागतच .  प्रेमाच्या धुंदीत  आयुष्याला आवश्यक गोष्टींकडे   दुर्लक्ष झाल . अशा वळणावर काय करायचं मग . प्रेमाने पोट  भरत नाही .इतर गरजाही असतातच ." 
       

Friday, 23 October 2015

भय

         रात्रीचे बारा वाजून गेलेले . नेहमीसारखे दिवे गेलेले.  चाळ रात्रीच्या काळोखात बुडालेली.  रातकिडयांच संगीत काळोखच्या मृतप्राय प्रवृतीला जिवंतपणा  देत असल तरी एक विचित्र सूर वातावरणात निर्माण झालेला. थंडीन रात्रही गोठलेली होती .  अशा वातावरणात कोण बाहेर पडणार. 
           राजला  आज  डयुटीवरुन यायला उशीर झाला  होता.  आपल्याच धुंदीत होता तो . कधी एकदा घरी जाऊन पलंगावर पडतो अस झाल होत त्याला . तसा धष्टपुष्ट गडी.  काळोख असला तरी सवयीन जिन्यावरुन पाऊल टाकत होता.
          अचानक त्याने समोर पाहील.  उदबत्तीसारखा मिणमिणता प्रकाश, दोन  लाल ठिपके .  स्वत:भोवतीच एका लयीत वर्तुळाकार वलये  काढत होते . अन त्यामागे एक अस्पष्ट आकृती असल्यासारख  जाणवत होत . बाकी खोल अंधार .  अनपेक्षित होत त्याला ते .  राज “कोण आहे” म्हणून विचारणार तोच हसण्याचा एक भेसूर आवाज रात्रीच्या शांततेला चिरत गेला.  राज किंचाळला “कोण आहे” तो आवाज अधिक भेसूर झाला. आवाजाची तीव्रता वाढली . जणु त्याला खिजवण्यासाठी आवाज वाढत होता .  अशा थंडीतही राजच्या चेहऱ्यावरुन घाम निथळू लागला. कोसळलाच तो . त्याच्या आवाजाने  बाजूच्या घरातली माणस धावत आली . तो काय  बरळत होता,  काही समजत नव्हत . सर्वानी त्याला घरी नेल,  पलंगावर झोपवल.  त्याच बरळण  कमी झाल नव्हत.  दरदरुन ताप आला होता त्याला.  कुणाला काहीच उमजेना काय झाल म्हणून.  राजही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हता.  भूतबाधा तर नाही ना ?काहींनी  शंका व्यक्त केली. अशा घटनांत भूत वैगरे संकल्पना लगेच फेर धरु लागतात . बरळणे,  भीती याचा  मनोवैज्ञानिक  दृष्टीतून विचार  न होता,  त्याला पारंपारीक भूताखेताच्या विचारातून तपासण्यात येत असल्यामुळे लगेच त्याला भूताने झपाटल अस निदान केल गेल .
              सकाळ झाली आता राज बराच निवळला होता.  बरळण  कमी झाल होत.  त्याने उलगडा केला “मी एक पांढरी बाई पाहिली रात्री !उदबत्या घेऊन असलेली !लगेच गायब झाली”.    कुणाला काहीच कळेना.  सगळे शांत.  इतक्यात गोटयाने उलगडा केला .  “अहो ती आपली शेजारची काळे काकू असणार! नेहमी रात्री उभी असते अशी ती!  उदबत्या घेऊन! वेडी आहे ती”
               


Wednesday, 21 October 2015

विश्वास

                मौर्यला कुठल स्टेशन आठवत नव्हत  . दुपारची भकास वेळ . खरतर भकासपणा हा सापेक्ष असतो. हा भकासपणा म्हणजे दुपारच्या शांतवेळी बसलेल्या जोडप्यांना हवाहवासा वाटणारा निवांतपणा . मौर्य एका कामाच्या गडबडीत होता,  त्या  विचारात मग्न होता . त्याची विचाराची तंद्री एका व्यक्तीच्या धक्क्याने भग्न झाली . वस्तुस्थितीची  ओळख न करून घेता,  प्रसंगाला सामोर जाण्याचा ,  मुंबईकरांच्या अंगात भिनलेला उद्दामपणा उफाळून बाहेर आला.   समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यावरील काळा चष्मा  आणि हातातली काठी पाहून तो निवळला .

           ती व्यक्ती अंध असल्याच त्याच्या लक्षात आल.   ती व्यक्ती "sorry  " म्हणाली . मौर्य खजील झाला . तो तिथून निघणार इतक्यात  "जरा  बाहेर  सोडता का प्लीज. "  असा विनंतीवजा आवाज आला . अंध , अपंग व्यक्तींबद्दल एक उपजत कणव मनात असते . मौर्य घाईत होता . पण कधी कधी आपण एखाद्या कृतीमुळे खजील झालो की , समोरून येणारी विनंती नकळत बाध्य होऊन जाते . तसच झाल होत त्याच काहीस . काम महत्वाचे होते . पण त्याच्यावरील संस्कार त्याला ती कृती करणे त्यावेळी भाग पडत होते . त्याने त्याचा हात धरला . हळुहळू दोघेही स्टेशनच्या बाहेरच्या दिशेने बाहेर पडू लागले . ती अंध व्यक्ती टापटीप होती . चेहरा प्रसन्न होता . काळा चष्मा नसता  , तर तो अंध आहे हे समजुनही आले नसते.   मौर्यला क्षणभर भरून आले . का देव अस करत असावा ? का भेदभाव करतो .? त्याचबरोबर आपल्या पेक्षाही अभागी माणस आहेत , हे त्या अंध व्यक्तीला पाहून त्याच्या लक्षात आल. एखाद्याची उणीव आपल दुख : कमी का करते माहित नाही .

        दोघे स्टेशनच्या बाहेर आले . मौर्य "निघतो" म्हणाला . इतक्यात त्या अंध व्यक्तीने त्याचा हात गच्च पकडला . "शंभर रुपये आहेत का  "  आवाजात विनंती होती  परंतु  हातावरील पकड जरब  दर्शवित होती . आजूबाजूला कोणी नव्हत . तो गांगरलाच . थोडा सावरल्यावर म्हणाला " मी विद्यार्थी आहे . माझ्याकडे फक्त वीस रुपये आहेत " . ती व्यक्ती म्हणाली , "मग ते दे".

      "मग मी कसा जावू. मला हवे आहेत ते . " हातावरील पकड सोडविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत पातळ आवाजात  मौर्य म्हणाला . " मला नाही माहित.  दे ते " त्या अंध व्यक्तीचा सूर आता बदलला होता .मौर्य रडकुंडीला आला होता . तो कसोशीने त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागला . इतक्यात त्याला दोन , पोलिस दिसले . तो हाका मारू लागला . ती अंध व्यक्ती क्षणात जणू अंतर्धान पावली . खरतर ते पोलिस खूप दूर होते .  मौर्यने सुटकेचा नि:श्वास सोडला .

       त्याला "राम तेरी गंगा मैली " या चित्रपटातील गंगाला फसवणाऱ्या अंधाच्या अनुषंगाने तिचा  संवाद आठवला . " अंधेपन कि आड मे  अगर लोगोको फसावोगे तो जरुरतमंद लोगोपे से भी दुनिया का विश्वास उठ जायेगा "  . असा काहीसा होता संवाद .