Wednesday, 21 October 2015

विश्वास

                मौर्यला कुठल स्टेशन आठवत नव्हत  . दुपारची भकास वेळ . खरतर भकासपणा हा सापेक्ष असतो. हा भकासपणा म्हणजे दुपारच्या शांतवेळी बसलेल्या जोडप्यांना हवाहवासा वाटणारा निवांतपणा . मौर्य एका कामाच्या गडबडीत होता,  त्या  विचारात मग्न होता . त्याची विचाराची तंद्री एका व्यक्तीच्या धक्क्याने भग्न झाली . वस्तुस्थितीची  ओळख न करून घेता,  प्रसंगाला सामोर जाण्याचा ,  मुंबईकरांच्या अंगात भिनलेला उद्दामपणा उफाळून बाहेर आला.   समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यावरील काळा चष्मा  आणि हातातली काठी पाहून तो निवळला .

           ती व्यक्ती अंध असल्याच त्याच्या लक्षात आल.   ती व्यक्ती "sorry  " म्हणाली . मौर्य खजील झाला . तो तिथून निघणार इतक्यात  "जरा  बाहेर  सोडता का प्लीज. "  असा विनंतीवजा आवाज आला . अंध , अपंग व्यक्तींबद्दल एक उपजत कणव मनात असते . मौर्य घाईत होता . पण कधी कधी आपण एखाद्या कृतीमुळे खजील झालो की , समोरून येणारी विनंती नकळत बाध्य होऊन जाते . तसच झाल होत त्याच काहीस . काम महत्वाचे होते . पण त्याच्यावरील संस्कार त्याला ती कृती करणे त्यावेळी भाग पडत होते . त्याने त्याचा हात धरला . हळुहळू दोघेही स्टेशनच्या बाहेरच्या दिशेने बाहेर पडू लागले . ती अंध व्यक्ती टापटीप होती . चेहरा प्रसन्न होता . काळा चष्मा नसता  , तर तो अंध आहे हे समजुनही आले नसते.   मौर्यला क्षणभर भरून आले . का देव अस करत असावा ? का भेदभाव करतो .? त्याचबरोबर आपल्या पेक्षाही अभागी माणस आहेत , हे त्या अंध व्यक्तीला पाहून त्याच्या लक्षात आल. एखाद्याची उणीव आपल दुख : कमी का करते माहित नाही .

        दोघे स्टेशनच्या बाहेर आले . मौर्य "निघतो" म्हणाला . इतक्यात त्या अंध व्यक्तीने त्याचा हात गच्च पकडला . "शंभर रुपये आहेत का  "  आवाजात विनंती होती  परंतु  हातावरील पकड जरब  दर्शवित होती . आजूबाजूला कोणी नव्हत . तो गांगरलाच . थोडा सावरल्यावर म्हणाला " मी विद्यार्थी आहे . माझ्याकडे फक्त वीस रुपये आहेत " . ती व्यक्ती म्हणाली , "मग ते दे".

      "मग मी कसा जावू. मला हवे आहेत ते . " हातावरील पकड सोडविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत पातळ आवाजात  मौर्य म्हणाला . " मला नाही माहित.  दे ते " त्या अंध व्यक्तीचा सूर आता बदलला होता .मौर्य रडकुंडीला आला होता . तो कसोशीने त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागला . इतक्यात त्याला दोन , पोलिस दिसले . तो हाका मारू लागला . ती अंध व्यक्ती क्षणात जणू अंतर्धान पावली . खरतर ते पोलिस खूप दूर होते .  मौर्यने सुटकेचा नि:श्वास सोडला .

       त्याला "राम तेरी गंगा मैली " या चित्रपटातील गंगाला फसवणाऱ्या अंधाच्या अनुषंगाने तिचा  संवाद आठवला . " अंधेपन कि आड मे  अगर लोगोको फसावोगे तो जरुरतमंद लोगोपे से भी दुनिया का विश्वास उठ जायेगा "  . असा काहीसा होता संवाद . 

No comments:

Post a Comment