Saturday, 4 April 2020

दृष्टी

          आज एका पुस्तकाबाबत   चेहरापुस्तका  ( एफ बी )वरील एका निर्गुण फ्रेंडशी  मायाजालावर संवाद चालला होता . निर्गुण यासाठी की , अशा माध्यमावर आपण निर्गुण स्वरूपात संवाद साधत असतो.  त्यापैकी अनेकांना सगुण स्वरूपात  कधी  पाहिलेलेही  नसते.  मला वाटते याची आवश्यकताही नसावी.  सगुण  देह  एकमेका समोर आले  की  ,काहीवेळा भ्रमाचा भोपळा फुटायला  वेळ लागत नाही; याचा fb कारांनी मानसशास्त्रीयदृष्ट्या नक्कीच अभ्यास केला असणार .  सगुण देहधारी   दोन माणसं एकमेकासमोर आली की,  अपेक्षा, भावना, इच्छा ,आकांक्षा  यांचं एक असं जाळं निर्माण होतं की, एकवेळ संगणकाच्या मायाजालातून आपण बाहेर पडू शकू परंतु याच्या नाही .  त्यामुळे निर्गुण स्वरूपातचं  संवाद साधणं सोयीचं आहे.  आणि करोनामुळे  सद्यस्थितीत हाच एक  उत्तम उपाय आहे.  ज्या निसर्गाने ही उत्पत्ती केली आहे त्यात सोशल डिस्टसिंग का आवश्यक आहे,  हे भौतिक आणि मानसिक दृष्ट्याही पटायला लागतं. सिल्व्हेस्टर स्टॅलोनचा, सॅन्ड्रा बुलॉक   यांचा एक चित्रपट पाहिला होता. एका  प्रगत संस्कृतीबाबत  . ज्या संस्कृतीत कुठल्याही प्रकारचा स्पर्श करण्यास सक्त मनाई आहे . कारण स्पर्शामुळे विषाणु,किटाणु इत्यादींचा संसर्ग होऊ शकतो . त्यामुळे  प्रेमही तंत्रज्ञान वापरून करायचं . आज हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे सद्यस्थिती . करोनायण .  

      lockdown  मुळे झालंय काय? भरकटायला होतंय. अन्य वेळी आम्ही पती , पत्नी , बहीण ,भाऊ , मित्र , आई , बाबा यांच्याशी किती वरवरचं बोलत असतो . या lockdown मुळे मनाचा अगदी निचरा होईपर्यंत संवाद साधायला लागलो आहोत . हो ... आम्ही आता फक्त बोलत नाही...  . संवाद साधत आहोत . त्यामुळे पर्यावरणाबरोबर मनंही स्वच्छ व्हायला लागली आहेत . 

      थोडा भावुक झालो .  मूळ विषय राहीला बाजूला. विषय होता निर्गुण फ्रेंडचा आणि सुचविलेल्या पुस्तकाचा  . निर्गुण , सगुण असे शब्द वापरले की , जरा वजन येत लिखाणाला . बाकी कोणताही हेतू नाही .  तर ते पुस्तक होतं , मौनराग....  महेश एलकुंचवार यांचं  ते पुस्तक सद्यस्थितीत  मिळणं  शक्य नव्हतं , म्हणून बुकगंगा च्या संकेतस्थळावर  शोध सुरु केला . निदान  काही भाग वाचायला मिळावा म्हणून .  अशा संकेतस्थळावर एक बरं असतं ,पुस्तकाची ओळख व्हावी म्हणून एक दोन पानं फुकट वाचायला देतात.  या काळात बसल्याबसल्या अशी अनेक  पाने  वाचून काढली  आहेत.  याचा  अजून एक फायदा असा होतो की ,पुस्तक घ्यावं की नाही याचा निर्णय तात्काळ  घेता येतो . 

           तर विषय अंत्यविधीबाबत होता . मजकुर काही असा होता .. 
          "कचकच वाजणारी ताटी , क्वचित जोराचा हिसका बसला की हलणारे ते जड मस्तक ,अंगावर पांघरलेले जाडशुभ्र प्रेतवस्त्र , फुलांच्या प्रेतमाळा ह्यात कुठेही सौंदर्य नव्हते . गंभीरताही नव्हतीच . ख्रिश्चनांच्या ,मुसलमानांच्या प्रेतयात्रांना किती , एक वेगळे गंभीर सौंदर्य असते ...... ..इ . "

         मला मोठी गंमत वाटली . आज अवतीभवती ज्या वेदनामय घटना घडत आहेत, कानी पडत आहे ,  त्यामुळे  वाचनाला भरपूर  वेळ असूनही आस्वाद घेता येत नाहीये . वाचन मात्र होतंय . मी या ललित लेखनाकडे आता भाषेचं सौंदर्य म्हणून न पाहता , भौतिक, व्यावहारीक दृष्टीतून चाचपून पाहत  होतो . त्याचं दुसरं कारण मी अलीकडे वाचलेलं एक अन्य पुस्तक . त्यात अशी माहिती होती की जर्मनी येथे अंत्यसंस्काराची पद्धत परंपरेप्रमाणे , धर्माप्रमाणे दफनविधीची आहे . परंतु तेथे दफनविधीला जागा उबलब्ध होत नसल्यामुळे, परवडत नसल्यामुळे  बहुतांश लोक दहन करतात . म्हणजे लेखकाची दृष्टी काही असली तरी सामान्य  जनतेची  दृष्टी व्यावहारीक असते. तिला अलंकारीक सौंदर्य आणि परंपरा नेहमीच परवडतात असं नाही  आणि माझ्यासारख्या वाचकाची सौंदर्यदृष्टीही परीस्थितीनुरुप बदलत असते.

            

       

1 comment: