Tuesday, 14 March 2017

कोडमंत्र

                   



             कोडमंत्र  लष्करी कोर्ट मार्शलवर आधारित थरारक नाट्य आहे.  "युध्दस्य  कथा रम्य" वाटत  असल्या तरी प्रत्यक्ष लष्करी जीवन फार खडतर असते.  शत्रूपक्षाच्या डावपेचाला निर्भिडपणे सामोर जाण्यासाठी कठोर प्रशिक्षण दिले जाते.  कुणीही जवान दुबळा राहू नये म्हणून काहीवेळा अतिरेकी प्रशिक्षणातून त्याला कणखर बनवण्याचा प्रयत्न केला जातो.  असे केले जात असताना काहीवेळा मानवीय भावनांचा विचार केला जात नाही.   लष्करी कामकाज अत्यंत गोपनीय असल्याने अशा गोष्टी सहजा बाहेरही येत नाही.   A few good men   हे नाटक ॲरोन सॉरकींन  यांनी प्रथमत: इंग्लिश रंगभूमीवर आणल होत.  त्याच्या बहिणीने अमेरीक न लष्करी न्यायालयात असताना सांगितलेल्या कोर्ट मार्शलच्या घटनेवर आधारित हे नाटक आहे.    या नाटकावर आधारित त्याच नावाचा एक हॉलवूडपटही येऊन गेला त्यात टॉम क्रूज, डेमि मूर  सारखे दिग्गज कलावंत होते.  या चित्रपटाने बराच गल्ला जमवला होता.  (संदर्भ -विकीपीडीया) गुजराती रंगभूमीवर आलेल्या या नाटकातून कोडमंत्रचे रूपांतर   भारतीय जीवनशैलीत करण्यात आले आहे . 

            शिस्त, कर्तव्य, संवेदनशीलता, अतिरेकीपणा या पैलूभोवती फिरणारे हे नाटक आहे.  लष्कर म्हटल म्हणजे शिस्त व कर्तव्ये याला सर्वोच्च प्राधान्य दिल जात.  कर्तव्य कठोर कर्नल निंबाळकर हे कडक शिस्तीचे व देशप्रेमाने भारलेले अधिकारी असतात.  भारतीय सीमेचे रक्षण करताना दुर्बळ जवांनामुळे त्याचा परिणाम इतर सैनिकांवर होऊ नये म्हणून विशेष खडतर प्रशिक्षण देत असतात.  मराठा रेजिमेंटमधील एक जवान रवि शेलार याला हे झेपेनासे   झाल्याने तो वरीष्ठांकडे बदलीची मागणी करतो.  निंबाळकरांना असे दुर्बळ जवान मान्य नसल्याने ते सतत वेगळया  सक्त प्रशिक्षणाच्या सूचना कमांडर शशिकांत जाधव यांना देतात.  लेफ्टनंट थत्ते यांना हे मान्य नसते.  निंबाळकरांच्या आदेशानुसार रविवर कोडमंत्रचा प्रयोग विक्रम मार्फत करण्यात येतो.  त्यात रविचा मृत्यू होतो.  विक्रम हा रविचा भाऊच असतो.  त्याच्यावर खटला भरला जातो. 

          लष्करी कायदयातील तज्ञ अहिल्या देशमुख ही  केस घेतात.  विक्रमने गुन्हा कबूल केलेला असल्यामुळे अहिल्याच्या दृष्टीने मोठे आवाहन असते.  त्यात एक महत्वाचा  साक्षीदार लेफ्टनंट थत्ते आत्महत्या करतात.  या सर्व घटनांमुळे अहिल्याला प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणणे अवघड होत.  अशावेळी एक क्ल्यू त्यांना मिळतो आणि वकीली डावपेच सुरु होतात.  वादप्रतिवादातून घटनेची वस्तुस्थिती उलगडू लागते.  शेवट अनपेक्षित असा होतो.  जवळजवळ चाळीस एक कलावंत असलेले भव्य, वेगवान, वेगळे असे हे नाटक सामान्य मानवी जीवन व लष्करी जीवन यांच्यातील भावविश्व स्पष्ट करताना एका संवेदनशील मानवी  पैलूची अपेक्षा करत .  लष्करात असा पैलू परवडेल काय ?  कोडमंत्र  म्हणजे काय ? या सर्वांची उकल वकिली डावपेचातून   करत नाटक एका वेगळ्या उंचीवर जात .    हे नाटक रंगभूमीवर सादर करणे खरोखरच मोठ आव्हान होत.  परंतु हे आव्हान सक्षमरित्या पेलण्यात सर्व  कलावंत  यशस्वी झाले आहेत.  प्रत्येकाने झोकून काम केलं आहे . बऱ्याच दिवसांनी एक आगळंवेगळं नाटक बघितल्याचं समाधान मिळतं . 
                          













No comments:

Post a Comment