Wednesday, 8 November 2017

Welcome Jindagi

           





                 आयुष्य एकसुरी असते . तुमचे , माझे . सहसा त्यात बदल नसतो . मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याचा विचार केला तर कुणाच्याही आयुष्यात विशेष बदल नसतो . दोन वेळ जेवणे, नोकरीला जाणे , मुलांची लग्न लावून देणे , त्यांच्या नातवंडांचा राखणदार बनणे  अन आयुष्याच्या संध्याकाळी पोराबाळांच्या सावलीची अभिलाषा बाळगणे . अपेक्षांचा भंग व्हायला लागला की , नैसर्गिक स्वभावाचे  उदासीत , एकटेपणात , विक्षिप्तपणात रूपांतर होणे . यातून अकाली वृद्धत्व येते . जे आपणच ओढवून घेतलेले असते .  जुन्याला इतके कवटाळून बसतो कि नव्याची भीतीच वाटायला लागते .

           या नाटकात दोन म्हातारे आहेत . एक बाप एक मुलगा . बाप चिरतरुण तर मुलगा चिंतीत म्हातारा .    आयुष्यात स्वतःच जमा केलेल्या उदासीमुळे तो  बापापेक्षाही वृद्ध दिसतो .  बापाला  असं वाटतं की त्याच्या मुलाच्या   रसहिन आयुष्याचा प्रभाव त्याच्यावर पडून तो जगातील सर्वात वयोवृद्ध असल्याच्या मान पटकावू शकणार नाही . यासाठी तो त्याच्या आयुष्यावर  नकारात्मक  प्रभाव टाकणाऱ्या सर्व गोष्टींना निरस्त करण्याचा निर्णय घेतो . यात सर्वात प्राथम्यक्रमावर असतो त्याचा मुलगा .  बाप त्याला वृद्धाश्रमात टाकण्याची धमकी देतो .

           प्रथम मुलाला वाटत बाप थट्टा करतोय . परंतु वडील त्यांच्या  निर्णयावर ठाम   असतात .    मुलगा बापाच्या निग्रहाने हादरतो . तो कित्येक वर्षात  घरा बाहेर पडलेला नाही . किंबुहना  बाहेरच्या  जगाची एक अनामिक भिती   त्याच्या मनात घर करून राहिली आहे . बाबा त्याला  घराच्या बाहेर जायचं नसेल तर त्यांच्या काही अटींच पालन करावं लागेल असं सांगतात .  मुलगा लगेच मान्य करतो . घराच्या बाहेर पडण्यापेक्षा त्याला हे सोपं वाटत.

           नाटकात दोन व्यक्तींची व्यक्तिमत्व  छोट्या गोष्टीतून प्रभावीपणे दाखविण्यात आली आहेत . उदा. मुलाचा औषधाने भरलेला फ्रिज तर बापाचा चॉकलेट ने भरलेला फ्रिज. एकाच्या स्वभावातील उदासपणा तर दुसऱ्याच्या स्वभावातील ताजेपणा ठसठशीतपणे जाणवतो . या  दोन म्हाताऱ्यांच्या आयुष्यात आलेली एक तरुण मुलगी या सर्व घटनांची / अटींची साक्षीदार आहे .  पहिली अट असते , मुलाने त्याच्या दिवंगत पत्नीला प्रेम पत्र लिहिणे . वडील अश्या छोट्या छोट्या अटींतून त्याला पूर्वीच्या सहज , नैसर्गिक स्वभावाची ओळख करून देत असतात . आयुष्याला एका वेगळ्या परिप्रेष्यातून पाहायला भाग पाडत असतात . त्याच बरोबर अमेरिकेतील त्याच्या स्वार्थी मुलापासून  जुनी कवटाळलेली नाती  निरस्त करण्याची शेवटची  अट  ते  घालतात . हि अट मुलगा पाळतो का ? नाटकाचा शेवट काय होतो हे अनुभवण्यासाठी नाटक जरूर पहा .

             नाटकात भरत जाधव (मुलगा ), डॉ . गिरीश ओक (बाप )यांसारखे अनुभवी कलाकार आहेत . दोन म्हाताऱ्यांमधील समतोल साधण्याचे काम शिवानी रांगोळे या  नवीन तरुण मुलीनं सहज अभिनयाने फुलवलं आहे . पूर्ण नाटकभर एकच नेपथ्य असलं तरी ते कथानकाला आवश्यक आहे . प्रकाशयोजना   नाटकातील प्रसंग जिवंत  व वास्तवदर्शी करण्यात प्रभावी ठरली आहे .  अर्थात त्याला या अनुभवी कलाकारांच्या अभिनयाची जोड आहेच . राजन ताम्हाणे यांचे दिग्दर्शन प्रत्येक छोट्या प्रसंगाचा तपशील प्रभावीपणे टिपत . जिथे संवाद नाहीत तेथे देहबोलीतून प्रसंग उठावदार होतात . यातील एक प्रसंग भरत जाधव (मुलगा ) त्याच्या बापाला पाया पडत आहे असा आहे . त्या प्रसंगात वर पासून खाली बापाचा आधार घेत पाया पडण्याचा प्रसंगात धमाल आली  आहे . हे नाटक सर्वच पिढ्यांसाठी आहे . जीवनातील ज्या गोष्टी आपल्याला अनावश्यक बांधून ठेवतात त्यांना वेळीच निरस्त करण्याची किंवा समतोल साधण्याची आवश्यकता का आहे हे या नाटकात प्रतिपादित होत . हे नाटक आयुष्याच्या एकसूरीपणातून मुक्तता देण्यास नक्कीच मदत करेल . आवर्जून पाहावं असं सुंदर नाटक . 

No comments:

Post a Comment