Showing posts with label तीन पायांची शर्यत marathi natak. Show all posts
Showing posts with label तीन पायांची शर्यत marathi natak. Show all posts

Tuesday, 14 March 2017

तीन पायांची शर्यत

               


                  "तीन पायांची शर्यत "  हे नाटक "बिझनेस ऑफ मर्डर " या नाटकाचं रूपांतर .  नाटक पाहिल्यानंतर "बिझनेस ऑफ मर्डर " हे  नाव जास्त समर्पक वाटतं . अलीकडे कुटुंबप्रधान त्रिकोणी नाटकाच्या चौकटीतून बाहेर पडून मराठी नाटकं रहस्यप्रधान नाटकाकडे वळू लागली आहेत . त्याला प्रतिसादही बऱ्यापैकी मिळतोय . सहज घडणाऱ्या घटनांनी नाटक सुरु होत . हळूहळू त्यातली गुंतागुंत वाढत प्रत्येक पात्राचे एकमेकांशी असलेले धागेदोरे उलगडू लागले आहेत असं वाटताना परत गुंतागुंत सुरु होते . अनेक वळण घेत , मुख्य म्हणजे उद्देश शेवटपर्यंत लक्षात येत नसल्यामुळे  उत्कंठा कायम राहते . शेवट एका अनपेक्षित उलगड्याने  होतो .

               नाटकाची सुरुवात मिट्ट  काळोखात होते . एक गृहस्थ आपल्या बायकोला त्यांनी दारू सोडल्याचं सांगत असतात . मुलाला भेटण्याची इचछा व्यक्त करतात . रंगमंचावर  आक्रोश ,किंकाळ्या ऐकू येतात . राजेंद्र एक मध्यमवर्गीय गृहस्थ . आपल्या मुलाच्या कृत्यामुळे हतबल झालेला . तो मुलाला मादक द्रव्यांच्या रॅकेटमधून बाहेर काढण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याची मदत घेतो. त्यांनी पोलीसी खाक्याने त्यांना समजवावं म्हणून त्यांची मदत मागतो . ते त्याला मदतीचं आश्वासन देऊन निघून जातात. त्यानंतर शलाका देसाई ही रहस्य कादंबऱ्या लिहिणारी लेखिका राजेंद्रच्या विनंतीवरून त्याच्या आजारी पत्नीला भेटायला येते .  परंतु राजेद्र  शेवटपर्यंत त्यांची भेट न घडवता तिला बोलण्यात गुंगवून ठेवतो . शलाकाला काहीतरी काळ -बेर असल्याचा संशय येऊ लागतो . ती तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते परंतु तो तिला जाऊन देत नाही .   इतक्यात पोलीस अधिकाऱ्याचा प्रवेश होतो . इथून नाटक वेगळंच वळण घेत . काय असतो प्रत्येक पात्राच्या अस्तित्वाचा उद्देश ? ते का त्या घरात येतात ? त्यांना नियोजनपूर्वक तेथे बोलाविलेलेले असते का ?

             संवाद -प्रतिसंवाद यातून नाटक उलगडता उलगडता पुन्हा अनपेक्षित घटनांच्या फेऱ्यात अडकत . त्यातून मानवी स्वभावाचे  सुप्त पैलूही  उघड होतात .   पोलीस अधिकारी , शलाका यांचा स्वार्थ ,  त्यांचे खरे गुण उघड करतं  . एका स्वार्थी उद्देशाने एकमेकांशी जोडलेल्या नात्यांचा  या घटनांनी पर्दाफाश होतो . राजेंद्र  याचा या सर्वांशी काय संबंध याचे आडाखे बांधताना प्रेक्षक शेवटपर्यंत नाटकात गुंतून राहतो .   घटनांना पूरक प्रकाशयोजना , संगीत याने रहस्य अगदी गडद होत जातं . धुक्यासारखं .  एक अनपेक्षित धक्का देऊन नाटकाचा शेवट होतो . काय हे अनपेक्षित वळण ? यासाठी तुम्हाला नाटक पहावं लागेल .