Showing posts with label माहिती अधिकार. Show all posts
Showing posts with label माहिती अधिकार. Show all posts

Wednesday, 28 March 2018

Right to Information

                 
                                                          माहिती अधिकार 

               माहिती अधिकार कायद्याचा स्वीकार करणारा पहिला देश म्हणजे स्वीडन . त्यानंतर हळूहळू इतर देशात  कायद्याचे  मूळ धरू लागले .स्वीडनने १७६६ मध्येच या कायद्याचा स्वीकार केला होता . त्यामानाने अमेरिकेसारख्या प्रगल्भ देशात हा कायदा लागू होण्यास १९६६ साल उजाडले .  इटलीत हा अधिकार उपभोगण्याकरिता legal interest  असणे आवश्यक असते . तर अन्य काही देशात जुजबी अटी आहेत . त्यामानाने भारतातील हा कायदा अधिक प्रगल्भ वाटतो .व्यापक जनहित हा त्याचा गाभा आहे .

          नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या स्वातंत्र्यातून त्या त्या प्रशासनाची चांगलीच व्यावहारिक आणि इतर अडचण होणार असल्यामुळे या कायद्याचा प्रसार व्हायला काहीसा वेळ लागला . लोकशाहीच्या पारदर्शक आणि प्रगल्भ वाटचालीसाठी नागरिकांच्या माहिती मिळिविण्याच्या स्वातंत्र्याला मूलभूत अधिकार मानले गेले आहे  . या अधिकारामुळे प्रशासनावर एक अदृश्य नैतीक अंकुश आपोआपच लादला गेला आहे . होणारे निर्णय जनतेस खुले होत असल्यामुळे प्रशासनात प्रत्येक निर्णय प्रचलित तरतुदींच्या कसोटीवर तपासाला जाण्याचे उत्तरदायित्व या कायद्याने निर्माण केले आहे .

            पारदर्शकता हा माहिती अधिकार कायद्याचा मूळ गाभा आहे  . संविधानाच्या कलम -१९ च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातच माहितीचा  अधिकार अंतर्भूत असल्याचे व मूलभूत अधिकारात त्याचा समावेश होत असल्याचे न्यायालयाने विविध निवाड्यात स्पष्ट केले होते  . असे असले तरी आपल्या देशात  गुप्ततेच्या  जंजाळातून सुटका होऊन प्रत्यक्ष केंद्रीय कायदा अंमलात येण्यास २००५ साल उजाडले . त्याअगोदर ११९७ मध्ये  माहिती अधिकार कायद्याचा स्वीकार करणारी  राज्ये म्हणजे तामिळनाडू व गोवा . महाराष्ट्र राज्याने २००२ मध्ये या कायद्याचा स्वीकार केला . या कायद्यामुळे फक्त  प्रशासनावरील उत्तरदायित्व वाढले नसून ते पारदर्शक सेवा देण्यास बांधील झाले आहे . उत्तरदायित्वामुळे कार्यक्षमता वाढीस चालना मिळतेच परंतु , प्रशासन गतिमान होण्याच्या दृष्टीने  एक ऊर्जा निर्माण होते . त्याचा दुसरा सकारात्मक परिणाम असा कि ,  नियोजनबद्ध , कालबद्ध कार्यक्रमाची आवश्यकता निर्माण होऊन त्या दृष्टीने आपसूकच वाटचाल सुरु होते . 

            माहिती अधिकार कायदा या देशात तुलनेने नवा असल्यामुळे,  तसेच पुरेश्या  प्रशिक्षणाअभावी अनेकदा असंबद्ध माहिती मागितली जाते . गतिमान प्रशासनाची गती मंदावण्यास हे घटक कारणीभूत ठरत असल्यामुळे या कायद्यातील खालील काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे . माहिती अधिकार कायद्याची व्याप्ती , बंधने , मर्यादा समजण्याच्या दृष्टीने त्याची व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे .

              व्याख्या - 'माहिती अधिकार " याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्याच्या नियंत्रणात असलेली माहिती "

              वरील व्याख्या विचारात घेता याचा अर्थ थोडक्यात असा आहे की , जी सार्वजनिक प्राधिकरणाकडे उपलब्ध आहे ती माहिती . परंतु , अनेकवेळा आकडेवारी ,तक्ते, प्रश्नार्थक स्वरूपातील माहिती  इत्यादी माहिती मागितली जाते . ती दस्तऐवज किंवा इतर स्वरूपात उपलब्ध असल्यास वरील व्याख्येप्रमाणे देता येईल . परंतु , जी मुळातच संस्करीत नाही , अशी माहिती गोळा करून देणे अपेक्षित नाही .
 
                शासनाच्या अनेक योजनांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असताना मागितली जाते . अर्जकर्त्यास नेमकी कोणती माहिती अपेक्षित आहे , याची स्पष्टता असल्यास वरीलप्रमाणे कालापव्यय करणारे प्रसंग उद्भवणार नाहीत .

                कायद्यातील कलम- ४ नुसार सार्वजनिक प्राधिकरणाला त्यातील अनेक मुद्द्यांवर माहिती प्रकशित करणे आवश्यक असते . ही माहिती प्रकशित करण्याचे काम अनेक सार्वजनिक प्राधिकरणाकडे सुरु आहे . एकदा ही माहिती अद्यावत झाली की अर्जकर्त्याचे काम तुलनेने सोपे होईल . या माहितीत सार्वजनिक प्राधिकरणाची रचना ,कार्यपद्धती ,मानके  इत्यादी माहिती अंतर्भूत आहे . ज्यायोगे अर्जकर्त्यास नेमकी माहिती मागणे सुलभ होईल .

             माहिती न मिळाल्यास अपील इत्यादी बाबी या अनुषंगिक बाबी आहेत . परंतु , माहिती अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमकी  माहिती म्हणजे काय ? हे समजणे आवश्यक आहे . 'माहिती " याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील  साहित्य असा आहे  .. माहिती प्रकट करणे हा नियम आहे , कारण लोकांना पारदर्शीपणे माहिती उपलब्ध करून देणे हा या कायद्याचा मूळ हेतू आहे ,  ती नाकारणे हा अपवाद . तर ते अपवाद कोणते याची माहिती कलम -८ मध्ये देण्यात आली आहे . हे अपवाद मोजकेच आहेत.  त्यात देशाची , राज्याची सुरक्षा या संबंधित माहिती सर्वात महत्वाची आहे . परंतु , माहिती देणे हा सर्वसाधारण नियम कसा आहे हे खालील कालमाअंतर्गत स्पष्ट करण्यात आले आहे .

               "जी माहिती संसदेला किंवा राज्य विधीमंडळाला देण्यास नकार देता येणार नाही ती माहिती कोणत्याही व्यक्तीला देण्यासही नकार देता येणार नाही "

              कलम-११ नुसार त्रयस्थ पक्षाची माहिती प्रकट कारण्याबाबाबत काही बंधन घालण्यात आली आहेत . कारण त्रयस्थ पक्षाच्या हिताचा विचार यात करण्यात आला आहे.त्यानुसार अशी माहिती प्रकट करण्यापूर्वी त्रयस्थ पक्षाचे म्हणणे विचारात घेणे आवश्यक असते . परंतु , व्यापक  जनहित जर वैयक्तिक क्षतीपेक्षा मोठे असेल तर ते विचारात घेऊन आवश्यक निर्णय घेता येतो .


            अनेकवेळा माहिती मागताना अर्जदार प्रचंड मोठ्या प्रमाणावरील व वेगवेगळ्या आस्थापनाशी संबंधित असलेली माहिती एकाच अर्जात मागतात . माहिती मागणे हा त्यांचा अधिकार असला तरी माहितीशी संबंधित मुद्दे सुस्पष्ट असले तर व्यावहारिक दृष्ट्या अशी माहिती पटकन देणे शक्य होते .  एखाद्या योजनेच्या निर्णयाची कागदपत्रे मागणे हा  माहिती अधिकारात योग्य अर्ज आहे . परंतु त्यासंदर्भात प्रश्नार्थक माहिती विचारणे अप्रस्तुत ठरते . योजनेच्या निर्णयाची कागदपत्रे उपलब्ध झाल्यानंतर जर अनियमितता झाली असल्याचे आढळून आले तर अर्जकर्ता ते सप्रमाण सिद्ध करू शकतो.
         वैयक्तिक माहिती मागणे या कायद्यानुसार अनुज्ञेय नाही , कोणतीही माहिती व्यापक जनहिताशी कशी निगडित आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे . माहिती अधिकार कायद्याचा होत असलेला गैरवापर काही घटनांमधून अधोरेखित झाला आहे . उदा. एका प्रकरणात ग्राहकांच्या कर्ज तडजोडीची माहिती मागविण्यात आली होती. अशी माहिती विश्वासाने दिलेली असल्यामुळे त्रयस्थ पक्षाला देता येणार नाही . माहिती अधिकाराचा काही प्रकरणात गैरवापर होत असला तरी त्याच्या मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष करता येणार नाही .

            सार्वजनिक प्राधिकरणाला त्याच्याकडे उपलब्ध असलेली माहिती देणे आवश्यक आहे . यासाठी प्राधिकरणाकडे अशा सर्व माहितीची नोंद असल्यास प्राधिकरणाचे काम सुलभ होईल . प्राधिकरणाच्या  दृष्टीने त्याची दैनंदिन कामे सांभाळून या सर्व बाबी करणे जिकिरीचे असले तरी ते करण्याशिवाय पर्याय नाही . काही अर्जदार शासनाकडे असलेल्या सर्व योजनांची माहिती मागतात,  नेमकी कोणती माहिती अपेक्षित आहे हे स्पष्ट करत नाहीत .  अशावेळी अर्जदारास शासनाच्या अनेक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे  व त्यास माहिती अधिकाऱ्याकडून नेमकी कोणती माहिती अपेक्षित आहे हे सांगता येईल . म्हणजे तुमची भूमिका सकारात्मक ठरेल . जी माहिती आपल्या नियंत्रणात आहे ती पारदर्शकतेच्या दृष्टीने देणे हाच तर कायद्याचा मूळ उद्देश आहे .  माहिती प्राप्त न झाल्यास अपिल वैगरे या अनुषंगिक बाबी आहेत . अपिलीय अधिकाऱ्यास दंड करण्याचे अधिकार नाहीत ते अधिकार माहिती आयोगास देण्यात आले आहेत . या व  वरील   सर्वसाधारण बाबींची माहिती असल्यास प्रशासन व अर्जदार यांच्या दरम्यान अनावश्यक कटू प्रसंग उद्भवणार नाहीत .