Monday, 6 January 2020

एक प्रवास....इंदोर













            प्रवास !तुमची दृष्टी अधिक व्यापक करतो,अस म्हणतात. परंतु एका चौकटीत काम करणाऱ्या नोकरदार माणसासाठी ,त्याच्या चौकटीबाहेरचं विश्व  नेहमीच आव्हानात्मक असते.याला कारण , त्याला कायम पडलेले दोन प्रश्न .एक म्हणजे उपयुक्तता आणि दुसरी वेळेची सबब. अनेक वेळेला तुम्हाला कामानिमित्त बाहेर जाण्याची संधी उपलब्ध होते .त्या संधीचं सोनं केलं तर! आम्हालाही कामानिमित्त नागपूरला जाण्याची संधी मिळाली .मग काय? माझ्या मित्राने एक योजना तयार केली.

       जाताना नाशिक ,औरंगाबाद काबीज करायचं आणि नागपूर मुक्कामी रवाना व्हायचं. नागपूरच्या मुक्कामात नागपूर न्याहाळायच.  तसं नागपूरला अनेकवेळा गेलोय. आजूबाजूला पाहण्यासारखी मर्यादित स्थळ आहेत .त्यातल जवळच म्हणजे रामटेक .खूप आवडत.परतीचा प्रवास नागपूर ते मुंबई साधारण 850 किलोमीटर होता.त्याऐवजी आम्ही इंदोर मार्गे मुंबईला आलो तर काही किलोमीटर वाढणार होते .परंतु एक नवीन स्थळ पहायला मिळणार होत. झाली योजना तयार. नागपूर नंतर इंदोरला दोन दिवस राहायचं.आजूबाजूची स्थळ पाहायची. तेथून उज्जैन फक्त 56 किलोमीटर आहे. ते पाहून पुन्हा इंदोर मार्गे मुंबईला रवाना व्हायचे .

     माझा मित्र रायडर ग्रुपचा सदस्य आहे त्याला बुलेट वरून भारत भ्रमणाचा दांडगा अनुभव आहे .त्याने एक परफेक्ट प्लान दिला. अजून एक मित्र होता .आम्ही तिघे निघालो.मुंबईची हद्द सोडली आणि एक वेगळाच उत्साह अंगात भिनला .प्रावासिक समाधी लागली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे बाय-बाय करत पाठी जात होती. कसारा घाट  लागला. वळणावळणातून माझा मित्र सफाईदारपणे गाडी चालवत होता. ड्रायव्हिंगचा आनद म्हणजे काय ?  त्याच्या चेहऱ्यावरुन निथळत होता.  खूप आनंद घेत होतो आम्ही.बाजूला दुसरा मित्र वारंवार निद्रादेवीच्या आहारी जात होता. निद्रादेवीने त्याला हळुवार  आपल्या बाहुपाशात घेतले होते. मी साहेबा सारखा मागे बसलो होतो .लहान मुलासारखा पाठीमागे जाणारे रस्ते ,माणसे ,झाडे न्याहाळत होतो.

       पोटोबा म्हणू लागले तुम्ही मजा करताय पण आमचं काय राव? परंतु ,त्यासाठी कुठेही उतरून खाण्यासाठी पोटावर अन्याय करण ,असं होणार नाही. नाशिकच्या मिसळ नगरीत आमचा प्रवेश झाला होता. मिसळ नगरीत मिसळचा पाहुण न घेणे आमच्या पोटोबाला आवडले नसते.  गुगल शोध सुरू झाला. नाशिक हायवे पासुन 11 किलोमीटर अंतरावर 'साधना मिसळ 'हे नाव निश्चित झाले.त्या  आवारात प्रवेश झाला. तिथल्या सजावटीने मन वेधून घेतले.साध्या खाटा,खुर्च्या, नेहमीच्या वापरातील वस्तू   वापरुन केलेली बसण्याची व्यवस्था तसेच  कल्पक प्रवेशद्वार.  बैलगाडी .हत्ती , उंटही लक्ष वेधून घेत होते. एका  मोठ्या हत्ती ची मुर्ती प्रवेशद्वाराजवळ सगळ्यांचे स्वागत करत होती.छोट्या खेडेगावातच आल्याचा भास होत होता .

       मिसळीचा सुगंध नासीकेला आव्हान देऊ लागला . पोटोबा उड्या मारू लागले .सोबत पाव किंवा भाकरीचा पर्याय होता .आम्ही भाकरीचा पर्याय दिला. जिव्हा वळवळू लागली. जास्त प्रतीक्षा करावी लागली नाही.  गरमागरम मिसळ आमच्या समोर येऊन पेश झाली. आम्ही नजरेने न्याहाळत, नसिकेने सुवास घेतला. आमच्यासारख्या खवय्यांना केवळ  रंग आणि सुगंध यावरून कुठल्याही पदार्थाच्या चवीचा अंदाज येतो . मिसळीच्या गुणवत्तेबाबत नजरेनेच तिघांचे  एकमत झाले. आधी फोटोसेशन झाले .लगेच मुद्दाम मित्रांना फोटो पाठवून दिले .त्यांच्या रिप्लाय पाहून आम्हाला आसुरी आनंद होतो.  त्यानंतर बस एकच लक्ष मिसळ आणि मिसळ.पुरेपूर आस्वाद घेतला .नावाला एक कणही उरला नव्हता.मग मस्त वाफाळलेला काळा चहा घेतला. आधी करायचे ओम नमः शिवाय आता केले . 

      पोटमहाराज खुष होते....नवीन निर्माण उर्जेने मग आरामात परिसर न्याहाळू लागलो . नजर एका फलकावर स्थिरावली.चूलीवरचे आइस्क्रीम .हा काय प्रकार आहे ?उत्सुकता चाळावली.चहानंतर आईस्क्रीम खायच नाही ,असले काही निकष आम्हा खवय्यांना लागू होत नाहीत.आईस्क्रीमने जिव्हेला थंडगार स्पर्श केला . अप्रतिम....एकच शब्द .... सांगता पान खाऊन केली. फोटोसेशन केले आणि मग आम्ही ठरलेल्या योजनेप्रमाणे औरंगाबादच्या रस्त्याला लागलो मिसळचं पोटवीक समाधान मनात लेऊनच. पुण्याचा सरळ रस्ता सोडून केवळ मिसळ साठी आम्ही नाशिकचा मार्ग धरला होता.आता नाशिकमार्गे औरंगाबादच्या दिशेने  वाटचाल सुरु झाली.


                             औरंगाबाद

       पुढचा प्रवास सुरु झाला. नाशिक येवला मार्गाला लागलो. येवला नाशिक पासून साधारण 80 किलोमीटर वर  आहे. रस्त्याच्या दुतर्फा पैठणीची दुकाने झरझर  मागे जाऊ लागली. प्रसिद्ध कापसे पैठणी इत्यादी .पैठणीचे अनेक प्रकार आहेत. मुख्य दोन .हातमागावरची  व छापील .छापील पैठणी तशी हजार पासून मिळू शकते. परंतु जास्त मागणी आहे ती हातमागावरच्या पैठणीना. पाच हजारापासून काही लाखापर्यंत किंमत जाते. रस्ता चांगला असल्यामुळे  आमचा रायडर काही थांबायला तयार नव्हता . सुसाट निघाला होता.

       येवला मागे गेल, आम्ही औरंगाबाद च्या रस्त्याला लागलो. येवल्यापासून औरंगाबाद साधारण 115 किलोमीटर आहे. औरंगाबादला काय पाहायचं याची यादी आधीच केली होती .अजिंठा लेणी ,वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला , घृश्नेश्वर मंदिर, पानचक्की अशी योजना होती. तुम्ही वेरूळ चा पर्याय निवडला की दौलताबाद चा किल्ला ,घृश्नेश्वर मंदिर, वेरूळच्या लेण्या बीबीचा मकबरा आणि पाणचक्की ही स्थळ पाहू शकता. वेरूळ लेणी औरंगाबाद पासून साधारण एकतीस किलोमीटरवर आहेत. घृश्नेश्वर मंदीर तेथूनच जवळ एक किलोमीटरवर आहे .त्यामुळे पहिल्या दिवशी ही सर्व स्थळ पाहण्याचा विचार केला होता. दौलताबाद तसं 16 किलोमीटर आहे पण हा किल्ला खूप  उंचावर आहे. त्यानंतर अन्य स्थळ म्हणजे पैठण 56 किलोमीटर आहे लोणार 170 किलोमीटर आहे.अजिंठ्याच्या लेण्या शहरापासून  एकशे दोन किलो मीटर अंतरावर आहे. जर तुम्ही औरंगाबादला निघाला असाल तर तुम्हाला काही किलोमीटर जास्त प्रवास पडेल. आमच्याकडे  तितका वेळ नसल्यामुळे अजिंठ्याच्या लेण्या काही पाहिल्या नाही.
      वेरूळ शहर  900 शतकापूर्वी राष्ट्रकूट वंशाच्या राजधानीचे स्थळ होते. त्यापूर्वी हा भाग वाकाटक लोकांच्या नियंत्रणाखाली होता .हे लोक अजिंठा कला शैलीच्या लोकांचे वंशज होते .लेण्याचे कोरीव काम वरून खालच्या दिशेने करण्यात आले आहे .त्यावेळच्या समाजाचे साधारण जीवन दर्शन या लेण्यातून घडते.त्यांचा पेहराव ,दागिने ,चालीरीती याचा काहीसा अंदाज कोरीव शिल्पावरून येतो. घृश्नेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे .दहाव्या शतकामध्ये राष्ट्रकूट वंशाचे राजा कृष्ण देवराय यांनी यांची स्थापना केली. लाल रंगाची रेती, दगड आणि प्लास्टर याने याची निर्मिती करण्यात आलेली आहे .पूजेच्या ठिकाणी शिवलिंग आहे. आतला भाग काहीसा अंधारलेला आहे. मंदिरात उघड्या देही दर्शन घेण्याची प्रथा आहे. पुरुष कमरेवरचे कपडे काढून तेथेच बाजुला टागून ठेवत असल्यामुळे प्रसन्न वाटत नाही. इतक अर्वाचीन मंदिर असूनही त्याची निगा नीट राखली गेलेली नाही .मंदिराचा परिसर दुकान ,टपर्‍या यांनी वेढलेला आहे .मंदिराच्या आत मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही तिथे बाहेर मोबाईल ठेवण्याचे पाच रुपये घेतात .आतला भाग अंधारलेला असल्यामुळे प्रसन्नता जाणवत नाही .यामुळे आम्ही तिथून लगेच बाहेर निघालो. त्यानंतर रस्त्यात एक मंदिर लागते.ज्यास लक्ष विनायक मंदिर म्हणतात. येथे गणपतीची एक विशाल मूर्ती आहे .

     आम्हाला पानचक्की ची फार उत्सुकता होती. मी त्याच्याबद्दल ऐकलेल्या गोष्टी वरुन वेगळ चित्र मनात होत .परंतु प्रत्यक्ष पाहिल तेव्हा असं काही आढळत नाही. साधारण बांधकाम होत. त्याची माहिती मिळाली ती अशी की  येथे जमिनीच्या खालून एक जलमार्ग गेला आहे . शहरापासून आठ किलोमीटर उत्तरेकडे पहाडात तो निघतो. 1640 मध्ये  त्याच्या नालीचे बांधकाम सुरू झाले होते आणि साधारण 1744 पर्यंत बांधकाम पूर्ण झाले. पूर्ण बांधकाम मातीचे आहे. दोन स्तंभ नैसर्गिक पंपाचे काम करतात. जेणेकरून आठ किलोमीटर मार्गात पाणी वेगाने पुढे जाऊ नये. सायफन पद्धतीने  पाणी धबधब्याच्या स्वरूपात खालच्या मोठ्या हौदात पडते. त्याची खोली बारा फूट आहे .येथे आजूबाजूचा परिसर तितकासा रमणीय नाही .

     तेथून जवळच  बीबीचा मकबरा आहे. ताजमहल ची छोटी प्रतिकृतीच  .या महालात औरंगजेबाने त्याची पत्नी राबिया दुर्रानी साठी कबर बांधली आहे .( मकबरा 1679 मध्ये शहजादा आजम शहा याने आईच्या स्मरणार्थ बनविल आहे)ती इराणमधील राजाची मुलगी  होती. औरंगजेबाने या बांधकामासाठी मोजकीच रक्कम मंजूर केली होती. त्यामुळे त्याची जी प्रतिकृती तयार झाली आहे ती ताजमहाल ची केविलवाणी प्रतिकृती वाटते.आम्ही गेलो तेव्हा समोरच्या हौदात कारंजे, पाणी वगैरे काही दिसत नव्हते. सर्व भाग तसा शुष्क वाटत होता. अनेक गोष्टी करणे शक्य असताना अशा ठिकाणांची परिसर सुंदर,रमणीय का करण्यात येत नाही हे अनाकलनीय आहे. येथे आजूबाजूच्या परिसरात तुम्ही एक चांगली बाग तयार करू शकता. वाचनालयात करू शकता अशाप्रकारे लोकांच आकर्षण वाढू शकतो.
    औरंगाबादच स्थनिक खाद्य वैशिटय शोधताना मात्र निराशगानिराशा झाली. शहरात जवळ जवळ 52 प्रवेशद्वार आहेत.काही अजून चांगल्या स्थितीत आहेत. शहरात मोगली शासकांच्या  खुणा जागोजागी आढळतात. हिंदी चा प्रभाव जास्त आढळतो. स्थनिक लोकांशी संपर्क कमी आल्यामुळे स्थानीक संस्कृती पहाता आली नाही. इतिहासात हे महत्वाचे ठिकाण होते. त्यामूळे इतिहासाच्या अनेक खुणा हे शहर जपत आहे. औरंगाबादच्या लेणीच बघायला कित्येक दिवस लागू शकतात .नाईलाजाने आम्ही पुढच्या मार्गाला लागलो.



                          नागपूर

         औरंगाबादला  आम्ही स्थानिक वैशिष्टपूर्ण खाद्यपदार्थ  हुंगत  होतो. जस नागपूरचं सावजी, नाशिकची मिसळ. परंतु येथे निराशा झाली .असं असलं तरी नागपूरला निघताना औरंगाबाद येथे भरपेट नाष्टा करून मार्गस्थ व्हा कारण पुढचा मार्ग साडेचारशे किलोमीटर आहे. रस्त्याच्या बाजुला अभावानेच हॉटेल किंवा नाष्ट्याची दुकाने दिसतात.असली तरी दर्जा साधारण आहे.

         रस्तेअत्यंत वाईटआहेत .खड्डेयक्त .शुष्कपणा ,संथपणा, तटस्थता  वातावरणात भरुन राहिला आहे. अमरावती रोडला लागल्यावर थोडं बरं वाटत आणि मग अमरावतीचे बदललेलं स्वरूप पहात  केव्हा नागपूरला पोहोचलो हे कळलेच नाही . नागपूरला बऱ्याच वर्षाने आलो  होतो .आता खूप बदल जाणवत होता. अनेक नवीन इमारती उभ्या राहिल्या होत्या. चकचकीत हॉटेल्स दिसत होती .मोठे रस्ते , ब्रिज यांनी नागपूरची नाविन्यपुर्ण गुंफण आकार घेत होती .मेट्रोचा बांधकाम चालू असल्यामूळे खड्डे , धुळ यांनी परिसर व्यापून गेला होता. बरंच काही बदललेलं होतं .

     नागपूर तसं 300 वर्षापूर्वीच शहर .गोंड राजा बख्त बुलंद शहा याने सतराशे सतराव्या शतकात नाग नदीच्या काठावर या शहराची स्थापना केली .त्यानंतर 1742  मध्ये रघुजीराव भोसले नागपूरच्या गादीवर आले.नागपूर भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण आहे.शून्य मैलाचा दगड येथे आहे.भारताचा केंद्रबिंदू.
      नागपूरच उच्चतम तापमान 45 डिग्री पर्यंत जात.तर कमीत कमी  तापमान कधीकधी 10 डिग्री च्या खाली जात. नागपूर मध्ये ठळकपणे पाहण्यासारखी  ठिकाण  म्हणजे दीक्षाभूमी जे शहरात आहे , कोराडी देवी चे मंदिर नागपूर पासून 14 किलोमीटर अंतरावर आहे .पेच 75 किलोमीटर अंतरावर आहे. माझे सर्वात आवडते ठिकाण म्हणजे रामटेक ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. रामटेकचे मंदिर खुप सुंदर आहे .परंतु येथे माकडांची विशेष काळजी घ्यावी लागते. तुमच्या हातात जे दिसेल ते ओढून नेतात.  नवीन झालेले स्वामीनारायण मंदिर ही पाहण्यासारखे आहे .या मंदिरात अनेक भाषेतील धार्मिक पुस्तके आहेत मात्र मराठीतील नाहित.राज्याच्या उपराजधानीत असुनही.येथेही हिंदीची ओढ जास्त दिसली.

        औरंगाबादने  खाण्याच्या बाबतीत निराशा केली होती .परंतु नागपूरला सावजी जेवण ,पोहे रस्सा, आलुबोंडा असे वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळतात. सावजी चा आस्वाद मी पूर्वी घेतला आहे खूप तिखट जाळ  असल्यामुळे त्याच्यापासून चार हात लांबच राहतो.पूर्ण थाळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर हलदीराम आहे. थाळी विविध व्यंजनानी भरलेली असते. तुम्हाला पुरेशी भूक लागली असल्याशिवाय थाळी मागवणे धाडसाचे ठरेल. दुसरे म्हणजे दिक्षा भुमी जवळील 'विष्नूजी की रसोइ ' येथे ग्रामीण पार्श्वभूमीवर केलेली सजावट, गरमगरम वेगवेगळे पदार्थ मन आणि जिव्हा आकर्षून घेतात. ही दोन्ही खाद्यगृह तशी महागडी आहेत. तुम्हाला त्यातल्यात्यात चांगल्या दर्जाचे खाद्यगृह हवे असेल.तर गायत्री भोजनालय आहे. पूर्वी साधी खानावळ असलेली ही जागा आता बरीच विकसित झाली आहे .

     नागपूरच सर्वात  प्रसिद्ध काय ? ती म्हणजे ...संत्रा बर्फी .तीही हल्दीराम ची.  मावा संत्रा बर्फी पेक्षा हल्दीराम ची द्रोणात मिळणारी संत्रा बर्फी खूप प्रसिद्ध आहे .मला वाटतं लोक सर्वात जास्त गोष्ट नागपूर वरुन नेत असतील तर ती म्हणजे संत्रा बर्फी. तशी आता बरीच  नवीन हॉटेलस सुरु झाली आहेत.त्यातील mtdc चे ऑरेंज होटेल ही छान आहे.

      तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर मध्यप्रदेशातील भेडाघाट, पंचमढी,पेच ही साधारण अडीचशे किलोमीटर अंतरावरील ठिकाण तुम्ही पाहू शकता. ही सर्व ठिकाणं यापूर्वी अनेक वेळा पाहिली असल्यामुळे नागपूरचे काम आटपून  आता आम्ही पुढच्या योजनेची तयारी करत होतो. आमची पुढची योजना भन्नाट  होती. नागपूर ते मुंबई हा प्रवास साधारण साडेआठशे किलोमीटरचा आहे. मग आम्ही ठरवलं पुढे  साडेचारशे किलोमीटर इंदोर ला जाऊन तेथून मुंबईला यायचं. त्याने काही किलोमीटर वाढणार होते. परंतु एक नवीन स्थळ पाहण्याचा आनंद मिळणार होता.


                               इंदोर

        आम्ही बेतूल मार्गे इंदोरला निघालो . रस्ता एकदम मखखन होता .त्यामुळे गाडी वाऱ्याशी स्पर्धा करू लागली.  महाराष्ट्रातील रस्त्यांची तुलना होऊ लागली. नागपूरची हद्द सोडली आणि मध्य प्रदेश सुरू झाला.  सीमा  बदलल्यामुळे नेमका काय बदल होतो हे कित्येक किलोमीटर पुढे  गेल्याशिवाय कळत नाही. सगळं सारखं वाटतं . शेवटी सीमा मानवानेच निर्माण केलेली आहे. रस्ता जसा सरसर मागे जाऊ लागला तसे पोटोबा  धडधड उड्या मारू लागले. आता इथेही आम्ही एक चूक केली होती. नागपुरात नाष्टा न करण्याची. या रस्त्यावर आजूबाजूला विशेष अशी काही हॉटेल्स ,धाबे दिसत नव्हते. जवळजवळ 160  किलोमीटर  पुढे आल्यावर  मला एक फलक दिसला .बालाजीपुरम मंदिर. मनात विचार आला मंदिर आहे म्हणजे आजूबाजूला चांगलं खाण्याचे ठिकाणही असेल.  मनात विचार येईपर्यंत माझा रायडर मित्र सुसाट पुढे निघाला होता. सुदैवाने पुढे एक मंदिराकडे जाणारा रस्ता होता .आम्ही त्या रस्त्याने मग बालाजीपुरम च्या मार्गाला लागलो. हायवेपासून एक दीड किलोमीटर आत मंदिर आहे . मंदिर पाहताच मन प्रसन्न झाले. त्याचबरोबर आजूबाजूच्या खाद्यपदार्थांचा सुगंध नाकात शिरला. त्यावरून ओळखलं की येथे काहीतरी खास खायला मिळणार .आधी पोटोबा मग विठोबा . मसाला डोसा ,समोसे.....चव काही वेगळीच होती.हिंगाचा हलकासा गंध जिभेवर रेंगाळत होता. सपाटून भूक लागल्यामुळे नाष्टा सपाटून केला. काळा चहा झाल्यानंतर मग आम्ही तृप्त मनाने मंदिराच्या आवारात प्रवेश केला. अप्रतिम परिसर होता .कमालीची स्वच्छता. प्रसाधनगृह अगदी घरच्या सारखी स्वच्छ होती. पूर्ण परिसर पाहताच मन खूप प्रसन्न झाले. फोटोसेशन झाले .मंदिराच्या आवारात चित्रकूट वसवलेले आहे .परंतु ते पाहण्यास बराच वेळ गेला असता त्यामुळे मंदिराचा परिसर पाहून तृप्त मनाने आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.

            बालाजीपुरम वरून मग पुढचा प्रवास सुरू झाला .प्रसन्न मनाने पुढे निघालो .काही किलोमीटर पुढे गेल्यावर सरळ रस्ता मागे पडून नागमोडी वळणाचे जंगल लागले .रस्त्याचे काम चालू होते. इथे आमच्या प्रवासाचा वेग मंदावला. हे जंगल पार करून आम्ही काही किलोमीटर नंतर नर्मदेच्या काठावर पोहोचलो. नर्मदेच्या उदरातून  डोकावणार एक मंदिर दिसू लागल .  ओंकारेश्वर एक प्राचीन मंदिर आहे . परंतु स्वच्छतेचा अभाव होता.

       ओंकारेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. नर्मदा नदीच्या तीरावर हे मंदिर वसलेले आहे. या नदीला रेवा असेही म्हणतात . नर्मदा नदी म्हणजे मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याची  जीवनवाहिनी आहे. हा सर्व भाग मध्यप्रदेश खांडवा जिल्ह्यात येतो .बालाजीपुरम पासून साधारण अंतर अडीशे किलोमीटर होतं. ओमकारेश्वर म्हणजे ओम चा निर्माता ,विधाता ज्याने ओम साकार केला आहे. मंदिर छोट्या बेटावर वसलेले आहे.या बेटाचा आकार ओम सारखा आहे असे म्हणतात. दुसरे जवळचे मंदिर म्हणजे अमरेश्वर मंदिर.

         स्वच्छतेच्या अभावामुळे या प्राचीन मंदिरांचा आनंद  उपभोगता येत नाही .कधीकधी माणसाच्या श्रद्धांची मजा वाटते .त्यांची इतकी श्रद्धा असते देवावर परंतु स्वच्छतेशी त्यांचं काय वावडं असतं हे काही कळत कळत नाही. असो नर्मदेच्या काठावरुन निघालो इंदौरेला मार्गस्थ होण्यासाठी.इंदौर तेथून 100 कि मी आहे.प्रवास सुरु झाला.

          आमचा रायडर गुगलच्या प्रमाणकानुसार मस्त मस्तीत गाडी हाकत होता.  इंदोर जवळ येताच गुगल महाशयांनी एक वळणाचा रस्ता दाखवला. आमचे रायडर लगेच आज्ञा प्रमाण मानून  घुसले. आतला रस्ता अरुंद होता .मुख्य रस्ता सोडून आम्ही आडमार्गाला लागलो होतो. कसेबसे इंदोरच्या मुख्य रस्त्याला  हळूहळू  आलो.

       इंदोर च्या हद्दीत प्रवेश केला .कमालीची स्वच्छता. रुंद रस्ते. आखीवरेखीवपणा नजरेत भरत होता. इंदोर चा भाग माळवा प्रांतात येतो .समुद्रसपाटीपासून साधारण अठराशे फूट उंचीवर हे शहर आहे .भोपाळ दोनशे किलोमीटर अंतरावर तर उज्जैन 55 किलोमीटर अंतरावर आहे. इंदोर हे शहर सोळाव्या शतकापासून व्यापारी केंद्र म्हणून उदयास आले .सतराव्या शतकात हा भाग मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. इंदोरला स्वच्छ शहराचा मान सतत तीन वर्षे मिळाला आहे .अठराव्या शतकात ब्रिटिश अंमल सुरू झाला. होळकरांनी नियोजनबद्धरीत्या या शहराचा विकास केला. त्याच्या खुणा जागोजागी आढळतात .

       आम्ही मुख्य शहरात प्रवेश केला .आमच्या हॉटेल जवळ आलो. होटेल तशी रेल्वेमार्ग तथा एअरपोर्ट पासून जवळच आहेत .fab  मालिकेतील हॉटेल बुक केले होते. तुम्हाला ऑनलाईनवर fab,ohiyo या विविध प्रकारातील हॉटेल उपलब्ध असतात.मध्यम रेंज करता fab ची होटेल  चांगली आहेत. हॉटेलचे सोपस्कार उरकून थेट गादीवर अंग टाकले.

        सात वाजले असावेत आणि आम्हाला नऊ वाजता खाऊगल्लीत जायचे होते .त्यासाठी आमची पूर्वतयारी सुरू होती .खाऊ गल्लीत जायचे असल्यामुळे सकाळपासून जास्त काही न खाण्याची दक्षता आम्ही आधीच घेतली होती .ही खाऊ गल्ली एका सराफा बाजारात आहे. तेथे सर्वत्र ज्वेलर्स ची दुकाने आहेत. ही दुकाने रात्री नऊ वाजता बंद होतात आणि त्याच्या बाहेर मग विविध खाद्यपदार्थांची रेलचेल सुरू होते .एक प्रकारची जत्राच असते .आम्ही या गल्लीच्या बाहेरून दोन वेळा गेलो. गल्लीच्या बाहेर शांतता होती .आत एखादी खाऊ गल्ली असेल याचा अंदाजही बाहेरून येत नव्हता .एक-दोघांना विचारल्यावर मग आत शिरलो. बाहेर नीरव शांतता आत उत्सवाचे वातावरण. गर्दी एवढी की, माणसे एकमेकाला खेटून जात होती.

        विविध खाद्यपदार्थांचे सुगंध नाकात शिरत होते.  त्यांचे रंग डोळ्याला खुणावत होते . आम्ही सैरभैर झालो होतो.  सुरुवात कुठून करायची. पाणीपुरी ने ,रगडा पॅटीस ने ,पोह्या ने ?कशाने ?कशाने ?काही सुचत नव्हतं.  भूक कडाडून लागली होती . काठी ला वर्तुळाकार लपेटलेल्या लाल चुटूक बटाट्यांच्या तळलेल्या चकत्यांचा फडशा आम्ही प्रथम पाडला.मग  प्रसिध्द जोशी दही वडा हुडकत निघालो .तो काही अंतरावर होता. युट्युब वर त्याचे कसब पाहिले होते. दहीवडे हवेत उडवत होता आणि चिमटीतून मसाले हळुवार दही वाड्यावर परत होता. आम्ही मनोसक्त दही वडे खाल्ले.मग पाणीपुरी ,बुट्टे का कीस अशा विविध  पदार्थांचा आस्वाद घेत हळूहळू पुढे सरकत होतो. नवीन काही पहायला मिळते का म्हणून बघत होतो .आम्हाला फ्रुट शॉट हा  प्रकर नजरेस आला .त्याचे रंग लक्ष वेधून घेत होते . अफलातून होता हा प्रकार .फळाचा रस वाटत होता.ज्यूस पेक्षा वेगळा प्रकार आहे .फळांचा गडद रस म्हणता येईल. जणू फळच पितोय अस वाटत होत. आम्ही जांभूळं,पेरू असे दोन चार प्रकारचे फूट शॉट घेतले .आधी म्हटल्याप्रमाणे ज्यूस , थंड नंतर चहा  पिऊ नये , अस आम्हा खवय्यांना काही बंधन नसल्यामुळे चहाचा शोध सुरु केला .शेवटी शोधला आम्ही काळा चहा. काळा चहा घेतला आणि मग आम्ही तृप्त मनाने परत हॉटेलला परतलो दुसऱ्या दिवसाचे नियोजन करायचं होतं त्यासाठी.

        दुसऱ्या दिवसाच्या योजनेवर  गहन चिंतन सुरु झाले.  प्रथम इंदोर शहर पहावं की उज्जैनला जावे, असा थोडा गोंधळ होता. उज्जैन  55 किलोमीटर अंतरावर आहे आणि रस्ताही खूप चांगला आहे .आम्हाला जी स्थळ पाहायची होती, त्यातील मुख्य म्हणजे महाकालेश्वर मंदिर आणि दुसरे म्हणजे कालभैरव मंदिर .सांदिपनी मुनीचा आश्रम ,इस्कॉन अशी सर्व स्थळे जवळ जवळच आहेत. त्यामुळे, ती पाहून मग दुपारी इंदोरला येण्याचे निस्चित झाले.त्यानंर इंदोर मधील राजवाडा पॅलेस,  कपड्याचे मार्केट वगैरे पाहण्याचे ठरले

          उज्जैन हे मंदिराचे मंदिराचे शहर आहे. दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. हा भाग सुद्धा माळवा प्रांतात येतो. शिप्रा नदीच्या काठावर हे छोटे शहर वसलेले आहे. शहराचा इतिहास खूप जुना आहे. बाराव्या शतकात दिल्लीच्या सुलतानाने या शहराचा विध्वंस केला होता.  सतराव्या शतकात राजपूत राजा जयसिंग याने येथे जंतरमंतर बांधले आहे .अठराव्या शतकात हा भाग मराठा सरदार शिंदे यांच्या अधिपत्याखाली आला .शिंदे घराण्याने या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. तिसर्‍या पानिपत युद्धानंतर मराठी साम्राज्य उत्तरेट काहीकाळ दुबळे झाले होते. महादजी शिंदे यांनी महाकालेश्वराला कौल मागितला होता. हळूहळू उत्तरेत मराठी साम्राज्य स्थिर होऊ लागले त्याची परतफेड म्हणून या मंदिराचा महादजी शिंदे यांनी जीर्णोद्धार केला.महाकालेश्वर मंदिर दक्षिण मुखी आहे मग दक्षिण दिशा अशुभ का मानली जाते हा प्रश्न मला पडतो.

       आम्ही उज्जैन ला निघालो. उज्जैन शहरात शिरण्याआधी एक सुंदर कमान तुमचं स्वागत करते. रस्ता चांगला असल्यामुळे तासा-दीड तासातच आम्ही पोहचलो. प्रथम नवीनच बांधलेल्या iskon मंदिराकडे वळलो.त्याची रचना ईतर iskon मन्दिरप्रमाणे पांढरया शुभ्र दगडात पर्यंतच आहे.काही खरेदी करुन मग महाकालेश्वर मंदिराकडे निघालो. येथे जाणे म्हणजे जंतर-मंतर सारखेच आहे.  कुठून आत जायच पटकन समजत नाही .वरच्या भागात पार्किंगची सोय आहे .परंतु तिथे जायचं कसे याची माहिती कुणीही नीट देत नव्हते. शेवटी आम्ही गाडी लांब पार्क करुन आवारात शिरलो.परंतु गोंधळ होता.  मोबाईल आत न्यायला परवानगी नव्हती. शेवटी लांबूनच दर्शन घेऊन आम्ही निघालो.

          तेथू न जवळच कालभैरव मंदिर आहे .मंदिर तसे छोटेसेच आहे .मराठी स्थापत्य कलेचा त्यावर प्रभाव दिसतो. येथे एक प्रथा विचित्र आहे. येथे कालभैरवाला प्रसाद म्हणून दारू देण्यात येते .मी काही दारू घेतली नाही. खूप गर्दी होती. नीट दर्शन घेता आले नाही. कसाबसा बाहेर निघालो. कालभैरवाच्या बाजूला एक गणेशाची सुंदरशी मूर्ती आहे आणि बाहेर एक दत्ताचे मंदिर आहे

          तेथून  बाहेर पडून आम्ही मग सांदीपनी मुनींच्या आश्रमात प्रवेश केला. छोटासाच परिसर आहे .परंतु  शांतता ,साधेपणा मनाला भावतो. येथे जवळच चिंतामण गणेश  मंदिर आहे .चिंतामण गणेश मंदिर फार पुरातन मंदिर आहे आणि तेथे गणपतीची एक मोठी मूर्ती आहे .ही मूर्ती स्वयंभू असल्याचे म्हटले जाते.मंदिरांचे दर्शन घेऊन मग आम्ही दुपारच्या वेळेस इंदोरच्या दिशेने निघालो.

     इंदोर ज्यासाठी  प्रसिद्ध आहे त्या म्हणजे खादाडी ,गारमेंट्स, ज्वेलरी आणि मंदिरे,राजवाडा. भटक्या लोकांना हवा तो पर्याय उपलब्ध आहे. इंदोर मध्ये प्रथम बघायचं काय तर......पहिलं नाव येतं होळकरांचा राजवाडा.....शहराच्या मध्यवर्ती  भागातच आहे. आजूबाजूला मुख्यतः  कपड्यांची  आणि विविध दुकान वसलेली आहेत.राजवाडा जुना असला तरी उत्तम स्थितीत ठेवण्यात आलेला आहे. राजवाड्याच्या पहिल्या मळ्यावर जुनी भांडी शस्त्रे वगैरे पहावयास मिळतात. हा राजवाडा मराठी वास्तुकलेचा प्रभाव असलेला वाटतो .खरंतर अशा वास्तूंच्या आजूबाजूला काही एकरातील जागा शासनाने ताब्यात घेऊन ती विकसित केली पाहिजे. असे न केल्यामुळे अशा अनेक प्राचीन ठिकाणी या जागांना छोट्या छोट्या दुकानांनी वेढले आहे. अशा जागा विस्कळीतपणात भर घालतात. येथील कापड बाजार माहेश्वरी आणि चंदेरी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे  आम्ही येथे जवळजवळ दोन तास पायी रपेट केली. प्रत्यक्ष संस्कृती बघण्यात वेगळीच मजा असते.लोक पट्टीचे खवय्ये . खाण्यात नाहीतर खरेदीत गुंतलेले . महिलावर्गही मोकळेपणाने फिरत होता.वातवरण कायम उत्साहाने भारलेले असते.

       राजवाड्यापासून गणेश मंदिर जवळच आहे.1934 मध्ये अस्तित्वात आलेला यशवंत क्लब हा  14 एकरात पसरलेला आहे.आता तो सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे . अशी  अनेक छोटी-मोठी स्थळे आजूबाजूला आहेत . सगळच पहाण शक्य नव्हत. रात्री 56 दुकान या ठिकाणी जायचे होते. 56 भोग म्हणतात तसे येते विविध खाद्यपदार्थाची रेलचेल आहे .जॉनी हॉट डॉग ,चाट,पोहा जिलेबी असं बरंच काही .इंदोरी लोक पक्के खवय्ये आहेत. रात्री आम्ही 56 दुकानी भरपूर खादाडी केली. तृप्त मनाने रात्रीचे इंदोर पाहिले ..दुसऱ्या दिवशी मुंबईला निघायचे होते .परतीच्या रस्त्यावर मांडू आहे .किल्ल्यांचे शहर. करता आले असते परंतु तिथला रस्ता तितकासा काही चांगला नव्हता तसेच वेळ कमी असल्यामुळे मग आम्ही नाईलाजाने मुंबईच्या मार्गाला लागलो.हृदयात आणि जिभेवर गोड आठवणी रेंगाळत ठेऊन.

No comments:

Post a Comment