Monday, 30 March 2020

महाराज आज तुम्ही असते तर ....

       

     मनावर निराशेची जळमटं   जमायला लागली की, शिवचरित्र हाती घ्यावे ......सहयाद्रीच्या कडे -कपाऱ्यातून येणारे प्रतिध्वनी मनात, हृदयात ,नसानसात भिनवून घ्यावे .....  जाणता राजा...ज्याचं संपूर्ण चरित्र म्हणजे एक स्फूर्तीदायक पोवाडा .... जीवनाचे सार .... त्यांचे चरित्रामृत देहात रूजवून घ्यावे. शिवधर्माने पावन व्हावे . 

      प्रबोधनकार ठाकरे म्हणतात."श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला .पण प्रत्यक्ष आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवद्गीतेत आहे, हे सप्रमाण सिद्ध केले शिवाजीने .गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत. ते शिवाजीने फेडले . "     अर्जुन कर्तव्य बजावताना विचलित झाला होता. महाराज नेहमीच कर्तव्यतत्पर असतं . रयतेचं  हित हाच त्यांचा धर्म होता. "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन " हाच त्यांचा एकमेव मंत्र होता. म्हणजे कार्यरत रहा . कर्मयोगी व्हा . मला पुराणातल्या वांग्यात रस नाही.(उगाच नाही का म्हण प्रचलित आहे , पुराणातली वांगी पुराणात ठेवा )जेव्हा आयुष्याची दिशा मला शिवचरित्रात सापडते .  माझ्यासाठी शिवचरीत्र हा पवित्र ग्रंथ आहे. रयतेचं    हित  शिवधर्म आहे .

      महाराजांच्या इतिहासाचे अवलोकन केले की  एक गोष्ट ज्ञात होईल,ती अशी की ,त्यांची दृष्टी विज्ञानवादी होती. एक ना अनेक उदाहरणांतून हे स्पष्ट होईल.  त्यातले एक असे की , महाराज आपल्या बहुतांश मोहिमा अमावस्येच्या रात्री योजीत. तुम्ही आम्ही आजही असा दिवस जमेस घेण्याचा विचार करु शकत नाही . रात्रीच्या काळोखात शत्रूला हालचाली अवगत होत नाहीत हे एक महत्वाचे कारण होते. परंतु त्या काळात मुहूर्त वैगरे अशा संकल्पनांचे स्तोम माजले असताना, यातून महाराजांचा विज्ञानवादी दृष्टिकोन , तर्कशुद्ध निर्णयक्षमता ,    स्वकर्तृत्वावरील दृढ विश्वास  प्रतीत होतो. याऊलट आजच्या विज्ञानयुगात माझे अनेक सहकारी पत्रिका, भविष्य ,पंचांग यात गुरफटलले पाहून ते खरोखरच शिवचरित्राचे पालन करतात का?  त्यांची शिवभक्ती ,शिवाजी महाराज की जय ....अशा आरोळ्या ठोकण्यापुरती मर्यादित असते ? अशी शंका येते.

         सागरावर जाणे म्हणजे महापापम ...हा त्यावेळी लोकांच्या मनात मुठभर लोकांनी रुजविलेला विचार ...महाराजांनी आरमारच उभे केले...तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदाविल्या  नाहीत तर अज्ञानाच्या डबक्यात लोळत रहाल हेच सांगायचे होते त्यांना. 
           अजून एक उदाहरण , राजाराम महाराज जन्माच्या वेळी पालथे जन्माला आले. सगळे गंभीर . त्यावेळी मूल पालथे जन्माला येणे म्हणजे अपशकून मानला जाई .  महाराज दैववादी नव्हते.ते म्हणाले . " पुत्र पालथा जन्मला तो पातशाही पालथी घालील " केवढी ही आयुष्याची सकारात्मकता . हीच सकारात्मकता आज दुर्दवाने लोप पावत आहे . कारण शिवधर्माचे आचरण होताना दिसत नाही . 

            बहुजन समाज दैववादी व्हावा किंवा कुठल्यातरी निरर्थक कल्पनेत गुंतून राहावा अशी समाजातील विद्वान लोकांची योजना असते. किंबहुना कुठलाही देश, राज्य मूठभर तर्कशास्त्र निपुण विद्वान मंडळीच नियोजित करत असतात. सामान्य माणसाची बुद्धी भावनेवर विसंबून असल्यामुळे दैव, कर्मकांड असल्या भावनांना थोपटणाऱ्या  आमिषांना तो लगेच बळी पडतो. बहुजन समाज दैववादी झाला की काय होते तो कर्मकांडात गुंततो ,वारीत गुंततो ,नामस्मरणात गुंततो. त्यावेळी मूठभर विद्वान माणसं फक्त ज्ञानाची कास धरत असतात. शेवटी होतं काय?  सामान्य माणूस या लोकांवर , नशिबावर खापर फोडून मोकळा होतो.याबाबत डॉ. ज. रा. शिंदे म्हणतात," सांस्कृतीक दृष्टया श्रेष्ठ असलेल्या अल्पसंख्यांकाचीच सत्ता स्माजावर चालत असते.किंबूहुना ती चालत राहणे स्वाभाविकच आहे.जगाचा इतिहास तसा आहे."मग एकच पर्याय उरतो नव्या जगात नुसते साक्षीदार  व्हा . नाहीतर  सामील व्हा. ज्ञानाची कास धरा . महाराज हेच तर सांगू पाहत होते. 

         राज्यकारभाराची भाषा ....एक गुंतागुंत मनात निर्माण होते. वैश्विक स्तरावर इंग्रजीच प्राबल्य ...काय करायच? हट्टाने तोडकं मोडकं इंग्रजी झाडता. अनेक अहवाल म्हणतात ....कुठल्याही गोष्टीचं आकलन होण्यासाठी शिक्षण मातृभाषेत झाल पाहिजे. मातृभाषाच अंगात मुरवली नाही, तर अन्य भाषेवर प्रभुत्व कस प्राप्त होणार? इथेही माझ्या राजांची दूरदृष्टी पहा. त्यावेळी राज्यकारभाराची भाषा फारशी  होती. रयतेची मराठी. जर आपला राज्यकारभार आपल्या भाषेत नसेल तर तो रयतेला आपला कसा वाटेल? आजही इंग्रजी झाडणारा वकील आपल्या बाजूने बोलतो की विरुद्ध बाजूने असा प्रश्न सामान्य रयतेला पडत असेल.राजांनी रयतेसाठी प्राकृतात म्हणजे मराठीत राज्यकारभार सुरु केला. याचा अर्थ राजांना अन्य भाषा अमान्य होत्या असे नाही. का वाटणार नाही रयतेस ते आपले राज्य .केवढा सूक्ष्म विचार.आज काळानुसार इंग्रजीचा अभ्यासही कारावयासचं हवा.जमतील तितक्या भाषा....ज्ञान ...यात कोणताही संदेह नाही.महाराजांची  त्या काळातही ज्ञानाची साधने मोजकी असताना अंगिकारलेली दृष्टी विज्ञानवादी , तर्कशुद्ध होती . आज तर सर्व साधने तुम्हास उपलब्ध आहेत .  

        महाराजांनी शेतकऱ्यांसाठी  महसूलाची नवीन पद्धत आणली . दुष्काळ असेल तर सारा नाही उलट मदत मिळेल  ...हे वतनदारी व्यवस्थेने  पिचलेल्या जनतेला नवीन होते. त्यांच्या आयुष्याला ही एक वेगळी सकारात्मक दिशा होती . मग   माणसं  का नाही जीव लावणार .?शिवा न्हावी,बाजीप्रभू,मदारी...मेह्तर...किती नाव घ्यावीत.महाराज धर्मनिष्ठ होते.धर्मद्वेष्टा   नव्हते.ते श्रद्धाळू होते.अंधश्रद्धाळू नव्हते.कुणाजवळही दैवी देणगी ,सामर्थ्य नसते .परिश्रम,कर्तव्य याच्या जोरावर ध्येय गाठता येतं याची त्यांना जाणिव पूर्ण होती.हे त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून सिद्ध केले . ते प्रवचनकार नव्हते, कर्मयोगी होते . असुरक्षितता जाणवायला लागली की समाजगट एखाद्या प्रभावी विचारधारेत सामील होतो. त्या वेळी समाजाला सामाजिक सुरक्षा नव्हती. ज्यावर विश्वास ठेवायचा तो नेता ही तितकाच मातब्बर ,आपला वाटायला हवा. त्यांच कार्य आपल वाटायला हवं.तस रयतेला वाटत होत यातच समर्पणाच्या प्रेरणा प्रतीत होतात. 

        राजे केवळ दैववादी असते. तर उभ राहील  असत का रयतेच राज्य . त्यासाठी धर्म ,जाती ,वंशा पलीकडे जाऊन समानतेच्या धाग्यात सर्वांना गुंफावं  लागतं.दृष्टी व्यापक करावी लागते. रयतेचा विश्वास संपादन करावा लागतो. हे सर्व माझ्या राजांनी कुठली घटना,प्रसंग,उदाहरण समोर नसताना रयते प्रती असलेल्या आंतरीक प्रेमातून केलं. मग तुम्ही का जातिभेदाच्या बेड्यात अडकता. माझा तुम्हाला पुन्हा प्रश्न आहे .तुम्ही शिवचरित्र ह्रदयात रुजवलं  का? वाचणं आणि रूजवणं दोन भिन्न बाबी आहेत.महाराजांची समाधी शोधून शिवजयंती सुरु करणाऱ्या, पोवाड्यातून स्फूर्ती देणाऱ्या  महात्मा जोतीराव फुले यांचा मी ऋणी आहे.  समानतेचे हक्क मिळवून देणाऱ्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा मी ऋणी आहे . 

       आज हे का आठवावं . आजच्या आधुनिक युगातही कर्मवादापेक्षा दैववादाचं वाढलेलं स्तोम पाहून महाराजही दुःखी झाले असते . महाराज आज तुम्ही आज असते तर तुमच्या करड्या शिस्तीने , तर्कशुद्ध , विज्ञानवादी भूमिकेतून आजच्या आपत्तीवर उपाय योजिला असता . महाराजांचा इतिहास आम्ही तुम्हासी काय सांगावा.....तो तर तुमच्या नसानसातून वाहतो आहे.महाराजांच्या हाकेला ओ देणारे मावळे तुम्हीच आहात. या भूमीत जन्मला तो या भुमीचा...त्यासी महाराजांनी आपले केले. मग ते मावळे का नाही आपल्या राजांवर जीव ओवाळणार .आज जी आपत्ती कोसळली आहे,अशा आपत्तीत महाराजांनी आपला खजिना रिकामा केला असता. मावळ्यांनी धन,दौलत सहज महाराजांना  अर्पण केली असती. परंतु महाराज म्हटले असते ,तुम्ही तुमच्यातला फक्त काही भाग द्या, कष्टमय जीवन जगणाऱ्या  तुमच्या बांधवांसाठी . तुम्ही हे नक्कीच कराल . याची महाराजांना खात्री आहे कारण, तुम्ही महाराजांचे सच्चे मावळे आहात.  तुम्ही  धर्म ,जाती . भेद याच्या पलीकडे जाऊन कार्य कराल . सतत ज्ञानाची कास धराल . ज्ञानाच्या कक्षा रुंदावाल . आजच्या आपत्तीचे महाराजांनी आखून दिलेल्या शिस्तीत पालन कराल . शिवधर्माचे पालन कराल . याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही . ज्यांनी जमेल त्यांनी दान द्यावं . ज्यांना जमेल त्यांनी सेवा द्यावी  . 

     विवेकानंद म्हणतात, उठा कामाला लागा,हे जीवन आणखी किती दिवस टिकणार आहे.जन्माला आलाच आहात तर काही मह्त्कार्य करुन जा ; नाहीतर तुमच्यात आणि वृक्ष- पाषाणात फरक तो काय? हे सांगण्याच्या कितीतरी शतके आधी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी मह्त्कार्य इतिहासाच्या पानावर कोरून ठेवले आहे.आज तोच इतिहास महाराजांचे मावळे आपल्या औदार्यातून नव्याने उभा करतील . शिवधर्माचा ... माझ्या शिवबाचा .


No comments:

Post a Comment