Wednesday, 6 April 2016

लम्हा लम्हा

       




        "लम्हा लम्हा"...... कवयित्रीच्या  सूक्ष्म स्पंंदनांचा एक तरल , काहीसा अलिप्त असा अवकाशाचा अव्यक्त कोपरा आहे. घुसमटलेल्या भावनांचा जागर आहे. खोल रुतलेले  आवेग, क्षण शब्दांच्या माध्यमातून मुक्त होतात. ते क्षण मग तुम्हाला nostalgic करतात तुमच्या नकळत. छोट्या घटनांमधून भावनांचे विविध कंगोरे फेर धरु लागतात, तुमच्या मनाला ओढतचं भूतकाळात घेऊन जातात.

              दूरपर्यंत जाताना त्यांना भूतकाळाच्या विवरात अडकायच नाही. सर्व मागे सोडून पुढचा प्रवास करायचाय ."दूर एका चर्चमध्ये" या कवितेत त्या स्वतःच  अस्तित्व शोधतायतं.भर पावसात चिंबायच तर कशासाठी ? या जाणीवेने त्या व्यथित झाल्या आहेत . पावसातून निथळत येणारा प्रकाशही नकोसा झालाय. एकटच दूर जायच आहे.  किती दूर हेही ठाऊक नाही, इतक दिशाहीन झालय सर्व. "मी पाहिलयं" या‍ कवितेत थोडासा आशावाद डोकावतो. दऱ्या-खोऱ्यातील बासरीचे सूर त्यांना उमेद देतायतं."काल उत्तररात्री" या कवितेत एक भकासपणा, उदास सूर आहे. जगण्याचं चैतन्य हरपल्यासारखं , जग काळोखात हरवल आहे.

             हलकेच कानात काही सांगून चंद्राने कवयित्रीच्या मनात चैत्रपालवी पुन्हा फुलविली आहे. शब्दांच्या जंजळात मनाची घुसमट थांबणार कशी ? त्यासाठी निसर्गाला साद द्यायला हवी, त्याच्या  बाहुपाशात स्वतःला मुक्तपणे झोकून द्यायला हवं असं त्यांना वाटतं . वाळवंटातल्या रात्री , स्वप्न घुसमटली आहेत. किनाऱ्याच्या शोधात ‍ फिरतायतं आशेने.  रखरखत्या वाळवंटात स्वप्न मुठीतल्या वाळूसारखी सुटताना दिसतायतं, तेव्हा अंर्तनाद क्षीण होतोय.
किनाऱ्याकडे फिरून त्या माघारी येतायतं हतबल होऊन .


          कल्पनांच्या धाग्यातून, पुस्तकातील  वाळलेल्या फुलातून अर्ध्या-मुर्ध्या कवितेतून एकाकीपणाला सोबत मिळते. जीवनाचा वेगळा अर्थ उमगायला लागतो. "कुणास ठाऊक केव्हापासून" या कवितेत त्यांना प्रवासाची नेमकी दिशा सापडत नाही. पावसाच्या ओघळणाऱ्या पाण्यात त्यांना त्याचं एकाकीपण प्रखरतेने जाणवतयं. उघड्या डोळ्यांनी पाहण्याची हिंमतही होत नाही. "आठवणी".......एकाकीपणाला सोबत करतात. सख्य असतं जणू दोघांच, त्याचं   अस्तित्व काय आहे एकमेकाशिवाय?

         थकून गेलेल्या आयुष्यापासून त्यांना दूर जायच आहे. पारदर्शी निळ्या आकाशाखाली एकाकीपणाच्या अभिशापासून मुक्त व्हायच आहे. त्यासाठी आसवांच्या बदल्यात हसूही विकत घेण्याची तयारी आहे.इतका हताशपणा आलाय . कालची रात्र त्याच्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होती. तो फक्त आभास होता. रात्र मंद झाली होती. कणरुप घेऊन न सरण्यासाठी. त्या निखळत्या ताऱ्याला  मुठीत घट्ट धरुन ठेवलय आठवणीच्या स्वरुपात . त्या आठवणींनी  वेदना होत असतानाही, हातातून जे ओघळेल त्याला रक्त कसे म्हणावे, असा     प्रश्न  त्यांना पडला आहे . 

        
        सर्वच कविता सुंदर आहेत. भावनांचे सच्चे प्रतिसाद आहेत. ‍ सूक्ष्म आवेगांचे हुंकार आहेत. "मी" या कवितेत त्यांनी मनाची स्थिती नेमकेपणाने मांडली आहे. ते धुळीसारख कधी एकवटतयं  तर कधी विसकटतयं . आपल्या जीवनातील काही विशिष्ट लोकांबद्दल सांगताना थोडक्याच शब्दात नात्याचे धागे उलगडून दाखविले आहेत. नाती बदलतात परंतु  विशिष्ट लोकांना आपल्या जीवनातून वगळता येत नाही. "जरा दूर गेल्यावर" या कवितेत कुणीतरी जवळ येऊन दूर गेल्याची जाणीव, "कोण जाणे कधी" या कवितेतील एकटेपणाच्या प्रवासात त्या एकट्या नसल्याची होणारी जाणीव, जेव्हा खूप काही सांगायच असत तेव्हा काहीच सांगावस न वाटण  . . .हे सर्व  पडसाद , कवयित्रीच्या संवेदनशील मनाच्या खुणा आहेत. तिच्या मनाचे निरागस,   सत्य प्रतिबिंब आहे. "काढून टाका सगळया घंटा"  ही कविता माणसाच्या दांभिकपणाची प्रकर्षाने आठवण करुन देते. माणसातला माणूसपणा इतक्या सहजतेने उलगडलेला  मी आतापर्यंत पाहिलेला  नाही. ही कविता त्यांच्या सामाजिक भानाची ओळख करुन  देते.  


                सर्व कविता एका समान धाग्याने बांधलेल्या आहेत . त्याचे वेगवेगळे  पैलू दिसत असले तरी , खोल आर्त जाणीवेने कवयित्रीच्या प्रतलात त्या  एकरूप झालेल्या  आहेत  . प्रत्येक कविता मागच्या कवितेचं ओझं घेऊन येते . त्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी मग आवर्तनांची मालिका सुरु होते . कवयित्रीची अनुभूती शब्दांच्या झुल्यावर झुलू लागते . भावनांच्या कुंचल्यातून फुलू लागते . दिप्ति  नवल यांच्या कवितेत एकटपणंउदासपणंभकासपणा आहेमधूनच आशेचा थंडगार शिडकावा आहेछोटे छोटे क्षण आहेतपरंतु शब्दांची ताकद, कवितेमागचा पटल पारदर्शीपणे समोर ठेवते.कोणताही आडपडदा न ठेवताया भावना अजून काही काळ घुसमटत राहिल्या असत्या तर त्याचा उद्रेक झाला असता ,अस वाटतं . कवयित्रीच्या अनुभूतीच्या प्रवाहात आपणही सहप्रवासी होऊन जातो. .स्वत: कविता वाचून  आनंद घेणे वेगळा अनुभव आहे. सर्व कवितांचा अनुवाद आसावरी काकडे यांनी इतक्या प्रवाही, ओघवत्या शैलीत केला आहे की, नेमक्या मूळ कविता कोणत्या आहेत हे क्षणभर उमगत नाही. जरुर वाचा.  

2 comments:

  1. थोडक्यात फार छान लिहिले आहे..... ्

    ReplyDelete
  2. खूप छान आस्वादक परीक्षण !

    ReplyDelete