Wednesday, 30 March 2016

ती फुलराणी


                   भाषा मैलामैलावर बदलली नसती तर एकसारखेपणामुळे  नीरस झाली असती.  भाषेच्या शुध्दतेचे मापदंड केवळ उच्चांरावर लागू केल्यास ते अन्यायकारक होईल.( डॉ.बाविस्कर यांच्यासारख्या तपस्वी डॉक्टरांचा  एक उत्तम प्रबंध तथाकथित शुध्द भाषेच्या आग्रहामुळे  त्यातील महत्वाची माहिती न पाहताच नाकारला गेला होता.वाचा -लेख बॅरीस्टरच कार्ट )भाषेच्या  उच्चारातून माणसाची प्रादेशिक ओळख कशी उलगडते  याचा  सुंदर प्रसंग सुरवातीला आहे.स्वर आणि व्यजंन याचे नाते यापूर्वी शाळेतही इतक्या सुंदरतेने स्पष्ट केलेले नव्हते. भाषा कुठल्याही शैलीत असो स्वर आणि व्यजंनाच्या मीलनाशिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही.बालकवीची "ती फुलराणी" ही कविता लहानपणीच्या आठवणीना उजाळा देत होती. नाटक पाहत असताना ती नव्याने कळली. तिच्यातला ताजेपणा आजही मनाला सुखावून जातो.



                                           हिरवे हिरवेगार गालिचे -हरित तृणाच्या मखमालीचे ,
                                         त्या सुंदर मखमालीवरती -फुलराणी ही खेळत होती . 
                                         गोड निळ्या वातावरणात -अव्याज मने होती डोलत 
                                         प्रणयचंचला त्या भ्रूलीला -अवगत नव्हत्या कुमारिकेला 


                उच्चारातून माणसाचे विविध स्तर कसे निश्चित होतात , ""आणि "च्या उच्चार    अट्टहासातून समोरच्याला कमी लेखण्याची वृत्ती ("न" हा दंत्य वर्ण आहे. तर "ण " हा मुर्धव्य वर्ण आहे)शुध्दतेच्या आग्रहातून  एक भयाण सामाजिक कंगोरा पुलंनी त्यांच्या विनोदी शैलीत चिमटे घेत उघड केला  आहेरांडीच्या हा शब्द नैसर्गिक असल्यासारखा काही ठिकाणी वापरला जातोअर्थ शब्दाला नसतो भावनेला असतोहाच शब्द दुसऱ्या ठिकाणी अशिष्ट ठरु शकतोनीती- अनीतीच्या  कल्पना हा आपआपल्या अनुभवाचा , संस्काराचा  अविष्कार असतो.


           अशोक जहागीरदार एक भाषातज्ञ. मंजुळा रस्त्यावर फुलं विकणारी फुलवाली . दोघांची भाषा, राहणीमान, संस्कृती वेगवेगळी. फुल विकत घेण्यापलीकडे त्यांचा संबंध येण्याची शक्यता जवळजवळ शून्य. श्रीमंत आणि गरीबी यामधील कल्पनारम्य जवळकीचे संबंध वेगवेगळया स्वप्नात्मक चित्रणातून चितारण्याचा वेळोवेळी   प्रयत्न झाला आहे. "फुलराणी" ची कथा थोडी वेगळी आहे. अशोक जहागीरदार आपल्या मित्राशी पैज लावतो की, तो फुलवालीला काही महिन्यात इंग्रजी, शुध्द बोलणंं शिकवेल. पैज तर  जिंकतो . त्याचा त्याला अभिमानही असतो . पुढं काय? एखाद ध्येय पूर्ण झाले की,  पुन्हा पोकळी निर्माण होते किंवा या ध्येयाच्या प्रवासात माणसांना अनाकलनीय असणाऱ्या भावना नकळत आपले परिणाम सोडू लागतात.

              
             बुध्दीमत्ता आणि भावना याचंं तसं नात नाही. प्रोफेसर बुध्दीमान आहे. भाषातज्ञ आहे. परंतु भावनातज्ञ नाही. भावनांची उकल करणे आणि आदर करणे त्याच्या क्षमतेबाहेरचे आहे. मंजुळा निघून गेल्यामुळे तो अस्वस्थ झाला आहे. परंतु भावनांचे वेगळे विश्लेषण त्याला करता येत नाही.तुमच्या मनातला एक कोपरा दुसऱ्याच्या मनातल एखाद प्रतल व्यापू शकत परंतु दुसऱ्याच्या मनातल्या  संपूर्ण अवकाशाशी  एकरुप पावण्याइतकी सहजता,समजूतदारपणा, संवेदनशीलता प्रत्येकात असेलच असे नाही .  


          खरंतर शिकणं ही दुहेरी क्रिया आहे. शिकवणारा आणि शिकणारा दोघांचं contribution महत्वाचं असतं.  प्रोफेसर सारं श्रेय स्वत:कडे घेतो.  मंजुळा रागावून निघून जाते.तिच्या जाण्यामुळे प्रोफेसरच्या आयुष्यात उलथापलथ होण्याचं कारण काय? मानवी भावनांचा कंगोरा सहजत: उकलत नाही. प्रोफेसरचा  अहंकारी, आक्रमक परंतु स्वच्छ स्वभाव आणि मंजुळाचा स्वभाव निष्पाप, गावंढळ ,सरळ .  भावनांच्या विविध रंगाच्या उधळणीतून माणसांच्या स्वभावाचे  विविध पदर हळूहळू  उलगडू लागतात.  

        
         प्रोफेसरचा अहंकारी स्वभाव, शिकवण्याचा गर्व आणि मंजुळा सोडून गेल्यानंतर सामान्य माणसाप्रमाणे हतबल झालेला प्रोफेसर, मंजुळाने प्रोफेसरला डिवचण्याकरिता प्रियकराचा केलेला उल्लेख , त्यामुळे प्रोफेसारांच्या मनात जागृत झालेला स्वाभविक मत्सर, मंजुळाची ओढ हे गुंतागुतीचे भावनावेग डॉ.गिरीश ओक यांनी ताकदीने साकार केले आहेत. मंजुळांच्या बाबांचे एका बाईशी  असलेले  संबंध  सभ्य समाजात अनैतिक ठरु शकतात .  त्याच्या नजरेतून ती जगण्याची एक गरज आहे पैसा आल्यामुळे , त्यांच्यात आलेले परिवर्तन धमाल आणते .  विसुभाऊचा संयत स्वभाव प्रोफेसरच्या आक्रमकपणाला मुरड घालून योग्य वळणावर न्यायचं काम करतं. 


             मंजुळाचा बिनधास्तपणा, निरागसता,प्रोफेसरच्या आक्रमक स्वभावामुळे व्यथित झालेली  फुलराणी या गुंतागुंतीच्या भावना हेमांगी कवी यांनी  इतक्या उत्कटपणे साकारल्या आहेत की, त्यात पूर्वी फुलराणीची भूमिका केलेल्या अभिनेत्रींचा विसर पडतो. आतापर्यंत भक्ती  बर्वे यांनी ही भूमिका सुंदरतेने रंगविल्याच म्हटल जात. ही  भूमिका काही पहायला मिळालेली नाही. एखाद्या भूमिकेत कलाकार किती एकरुप होऊ शकतो,न्याय देऊ शकतो याचा  व कलाकाराच्या  व्यक्तीमत्वाचा विचार होऊन  भूमिका निश्चित होत असते . एका रांगड्या बोलीतून तथाकथीत शुध्द बोलीत परिवर्तन करुन बोलणं हे वाटत तितक सोप नाही. हेमांगी कवी यांच्या  देहबोलीतून फुलराणीची भावनिक आंदोलने त्यातील चढ-उतारासह स्पष्टपणे अधोरेखित होतात. हेमांगी कवी शिवाय  त्या भूमिकेत अन्य कुणी चपखल बसलं  असत असं वाटत नाही.

            
            अभिनय,  सादरीकरण , दिग्दर्शन या सर्व  पातळ्यांवर  नाटकाने गुणवत्ता तसूभरही सोडलेली नाही . त्यातून पु.लं.चे संवाद म्हणजे अनोखी पर्वणी आहे. त्यांच्या संवादाला न्याय द्यायला तितक्याच ताकदीच्या कलावंतांची साथ मिळाली नसती तर पूर्ण प्रयोग फसला असता. प्रत्येकाने त्यांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आपला आत्मा ओतला आहे.  भक्ती बर्वे यांनी केलेली फुलराणीची‍ भूमिका पाहिलेली नाही.  यु -ट्युब वर एक छोटी क्लीप पहिली आहे .  भक्ती बर्वे यांनी केलेली भूमिका आणि नवीन कलावंताने केलेली भूमिका याची तुलना होणार . George Bernad Shaw  यांच्या Pygmalion या नाटकावर फुलराणी बेतलेलं आहे . त्यावर आधारित My  Fair Lady हा सिनेमाही फार गाजला होता . (या चित्रपटाला अनेक ऑस्कर अॅवार्ड मिळाले आहेत ). मग या इंग्लिश नाटकाशी आणि चित्रपटाशी तुलना होईल . राजेश देशपांडे यांनी  जूनं नाटक पाहिलं नसल्याच एका मुलाखतीत सांगितलं , नाहीतर तुलना करण्याचा मोह त्यांनाही झाला असता .   फुलराणीची निवड करताना त्यांनी फार सूक्ष्मपणे विचार केलेला दिसून येतो . या भूमिकेला आवश्यक असलेले अवखळपणा, निरागसपणा, बिनधास्तपणा , संवेदनशीलता हे सर्व पैलू हेमांगी कवी यांच्याकडे  अंगभूत(embedded ) आहेतच तसेच त्यांनी आपल्या उस्फूर्त अभिनयाने फुलराणी अधिक रंगतदार केली आहे. त्यामुळे आजही नाटक ताज वाटत.  ताजतवान करतं.खूप दिवसांनी इतक ताजतवानं करणार नाटक पहायला मिळाल . मी पुन्हा पाहणार आहे आणि तुम्ही ?





No comments:

Post a Comment