Thursday, 30 August 2018

मराठी : राजभाषा



        भाषावार प्रांत रचनेनुसार दिनांक 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून स्वतंत्र राज्याचा प्रशासनिक कारभार मराठी भाषेतून करण्याकरिता महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 अन्वये मराठी भाषा ही राजभाषा म्हणून अंमलात आली. यासाठी स्वतंत्र नियम तयार करण्यात आले असून, हे नियम महाराष्ट्र राजभाषा (वर्जित प्रयोजने) नियम, 1966 अन्वये कार्यान्वित करण्यात आले आहेत. प्रशासनामध्ये मराठीचा वापर करण्याचे धोरण सन 1964 पासून अंमलात आले असले तरी, त्याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे एकूणच मराठीच्या प्राचीनत्वाची, उज्वल संस्कृतीची मााहिती सर्वांना व्हावी, म्हणून हा लेख लिहिण्याचे योजिले आहे.
           
पार्श्वभूमी :-

        मराठी भाषा ही खूप प्राचीन असली तरी , त्याचा इतिहास अनेक जणाना अवगत नाही.  मराठीतील पहिला शिलालेख 2200 वर्षापूर्वी ब्राम्ही लिपीत आढळून येत असला तरी, मराठीतील पूर्ण वाक्य असलेला शिलालेख कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथे श्री. गोंमटेश्वराच्या मुर्तीखाली आढळतो. (इ.स. 983) ते वाक्य खालीलप्रमाणे आहे. 

                                          “श्री. चामुण्डराये करवियते

         मराठीचे प्राचीन स्वरुप महारठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंष मराठी असे कालप्रवाहात इतर भाषांप्रमाणे बदलत गेले आहे.  त्याचे अद्यावत स्वरुप म्हणजे आज बोलली जाणारी मराठी भाषा. कोकणी, मालवणी, वऱ्हाडी, सातारी बोली भाषेचा लहजा वेगळा असला तरी ती मराठीचीच सख्खी भावंडे आहेत.   शिलालेख, ताम्रपट इत्यादीच्या आधारे मराठी भाषेचा पट उलगडता येतो. अभिजात मराठी भाषा समितीने मराठीच्या कालानुरूपे बदलत जाणाऱ्या स्वरूपाबद्दल खालीलप्रमाणे आपले मत व्यक्त केले आहे.

                  सातवाहनकालीन महाराष्ट्री भाषा ही ज्ञानेश्वरकालीन मराठीचेच जुने रुप आहे.  शालिवाहनाच्या आरंभी लोक जी महाराष्ट्री बोलत तीच वाढत वाढत बाराव्या शतकात नागर मऱ्हाठी झाली.  हजार बाराशे वर्षे मराठी भाषा बनत बनत चालली होती.  ओघ एकच पण पूर्वी जिला महाराष्ट्री म्हणत तिलाच सुसंपन्न स्थितीत मऱ्हाठी म्हणू लागले. ल.रा.पांगारकर हे राजवाडे आणि इतर विद्वानांच्या मताचा संदर्भ घेऊन म्हणतात की तीनही भाषा (महाराष्ट्री, अपभ्रंश आणि मऱ्हाठी) भिन्न नसून काल आणि व्यवहार यांच्या योगाने पालटत जाणाऱ्या एकाच भाषेची ही तीन रुपे आहेत किंवा तीनही मिळून एकच भाषा आहे.


इतिहास :-

         आजच्या मराठीच्या स्वरूपाचा पाया अति प्राचीन इ. स. पू.2000 च्या कालावधीतील सातवाहन घराण्यात दिसून येतो. त्यानंतरच्या काळात संस्कृत किंवा कन्नड भाषेला राजाश्रय लाभल्याने मराठी भाषेचा विकास मंदावला त्यानंतर यादवांच्या काळात या भाषेला पुन्हा उभारी मिळाली.  दरम्यानच्या काळात मोगली आक्रमणाने पर्शियन भाषेचा प्रार्दुभाव वाढू लागला, अशा स्थितीत वारकरी संप्रदायाने किर्तन/अभंग स्वरूपाने मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे महत्वाचे काम केले.

            भाषेचं नेमकं महत्व ज्ञात होण्यासाठी जाणता राजा असणे आवश्यक असते. असे उत्तम प्रशासक शिवाजी महाराजांच्या रूपात आपणास लाभले हे मराठीचे व महाराष्ट्राचे अहोभाग्यच होय. महाराजांची दूरदृष्टी /व्यावहारिक/सामाजिक समज अत्युच्च दर्जाची होती. त्यांनी स्थानिक भाषेचे महत्व वेळीच ओळखून प्रशासनात प्रभावी वापर केला. यादृष्टीने महत्वाचे पाऊल म्हणजे राज्य व्यवहार कोशाची निर्मिती.मराठी भाषेचा दबदबा भारतभर पसरला होता. इंग्रजांच्या आक्रमणानंतर भाषेची पीच्छेहाट सुरू झाली. मराठी भाषेच्या जतन, संवर्धनासाठी आपल्याला आवर्जून उपक्रम राबवावे लागत आहेत. कारण लोकांच्या मेंदूवर बसलेला इंग्रजी अजगराचा विळखा.

.        मराठीतला उपलब्ध असलेला गाथा सप्तशती हा सुमारे 2000 वर्षे जुना ग्रंथ आहे. 12 व्या शतकात जैन लेखकांनी प्रामुख्याने कथा, तत्वज्ञान, तर्कशास्त्र, अध्यात्म, जोतीष, भुगोल अशा विविध मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. 12 व्या शतकापासून 17 व्या शतकापर्यंत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामेदव, चोखामेळा, एकनाथ इत्यादीचे लेखन आढळून येते. त्यानंतर मोरोपंत, वामनपंडीत विष्णूशास्त्री चिपळूणकर, महात्मा फुले, आंबेडकर यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.  प्राचीन काळी मराठी भाषेत मुख्यत: पद्य स्वरुपात लिखाण झालेले आहे. गद्य स्वरुपातील मोठ्या प्रमाणावरील लिखाण 18 व्या शतकानंतर आढळून येते.

भाषेची स्थिती :-      

        जगामध्ये सुमारे 6000 भाषा अस्तित्वात आहेत. त्यातील 20 लाखाच्या वर बोलतात अशा भाषा 350 आहेत. मराठीचा क्रमांक जागतिक क्रमवारीत 15 वा आहे. भारतात हिंदी, बेंगॉली, तेलगु नंतर मराठी 4 थ्या क्रमांकावर आहे. मराठी गोवा प्रशासनाची सह-प्रशासनीक भाषा आहे. याशिवाय ती गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक इत्यादि प्रदेशातही काही प्रमाणात बोलली जाते. बडोदा विद्यापीठ, उस्मानीया विद्यापीठ, गोवा विद्यापीठ येथे मराठी भाषेचे स्वतंत्र विभाग आहे. मराठी भाषेला स्वतंत्र व्याकरण पुस्तक अस्तित्वात नव्हते.मराठीतले पहिले व्याकरण पुस्तक विल्यम कॅरी या ब्रिटिश विद्वानाने प्रसिद्ध केले तर कॅप्टन जर्व्हिसने मराठीत पहिल्यांदा गणित विषय पुस्तकाची निर्मिती केली.

शासनाचा सहभाग :-

         वरीलप्रमाणे परिस्थिती असली तरी अनेक प्रादेशिक भाषामध्ये इतर भाषांचे विशेषत: इंग्रजीचे प्राबल्य वाढत चालल्यामुळे स्थानिक भाषा लोप पावतील काय अशी भीती निर्माण झाली आहे. इतर भाषांचा  प्रादूर्भावही झपाट्याने वाढत चालला आहे. या परिस्थितीत मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी दि.  1 मे, 1992 रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. या शिवाय मराठीच्या संवर्धनासाठी मराठी साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषेच्या शब्दकोश समृद्धीसाठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांची स्थापना करण्यात आली आहे. इतर अनेक संस्था स्वयंस्फूर्तीने  त्यांच्यास्तरावर वेगवेगळया माध्यमातून मराठीच्या प्रसारासाठी काम करत आहेत.

         मराठीच्या प्रसारासाठी शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. मराठी भाषेचे प्राचीनत्व विचारात घेऊन मराठीला अभिजात दर्जा प्राप्त करुन घेण्यासाठी समिती नेमण्यात आली होती.  या समितीने भाषेची प्राचीनता, मौलिकता व सलगता, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रुप यात असलेले नाते विचारात घेऊन आपला अहवाल शासनास सादर केला होता.  सदर अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.  तसेच, मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील 25 वर्षाची स्थिती विचारात घेऊन सर्वकष मराठी भाषा धोरण तयार करण्याचे काम शासन स्तरावर सुरु आहे.  प्रशासनाच्या अंतर्गत असलेली विविध क्षेत्रीय कार्यालये विखुरलेली असल्यामुळे सर्व कार्यालयांना एकाच छत्राखाली सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने मुंबई येथे मराठी भाषा भवन निर्माण करण्याचा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला  आहे.

         मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिन इत्यादी माध्यमातूनही मराठीची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य जोमाने सुरु आहे. सर्व विषयातील शब्द मराठी भाषेत उपलब्ध असण्याच्या दृष्टीने विश्वकोश मंडळाच्या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 20 खंड प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर विश्वकोश भ्रमणध्वनी उपयोजकावरही उपलब्ध आहेत.
           भाषा संचालनालयांतर्गत अनेक राज्य कायद्यांचे मराठीकरण करण्यात आले आहे. शासन व्यवहारात व न्याय व्यवहारात मराठीचा वापर प्रभावीपणे होण्यासाठी अनेक परिभाषा कोश निर्माण करण्यात येत आहेत. असा कोश आता भ्रमणध्वनी उपयोजकावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. भाषा संचालनालयाने विविध विषयांचे जवळ-जवळ 29 परिभाषा कोश प्रसिद्ध केले आहेत. 10 परिभाषा कोशाचे काम हाती घेण्यात आलेले असून नवीन 30 परिभाषा कोश प्रस्तावित आहेत. राज्य मराठी विकास संस्था मराठीचा वापर अधिक गुणवत्तापूर्व होण्यासाठी चर्चासत्र, प्रकाशने या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनाचे काम पार पाडत आहे.  

         राज्य मराठी विकास संस्थेमार्फत इतर राज्यातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना मदत, महाराष्ट्राबाहेर काम करणाऱ्या संस्थांना मदत, पुस्तक प्रदर्शन, मोडी हस्तलिखितांचा अभ्यास, अमराठी भाषिकांसाठी उपक्रम, मराठी दुर्मिळ ग्रंथांचे संगणीकरण, संस्थेच्या प्रकरणात प्रकाशनाचे ई-पुस्तक स्वरुपात रुपांतर करणे असे महत्वाचे उपक्रम राबविण्यात येतात.  त्यातील पुस्तकांचे गाव : हा लोकसहभागातून साकारलेला आगळावेगळा नाविन्यपूर्ण प्रकल्प महाबळेश्वरजवळील भिल्लार या गावी कार्यान्वित करण्यात आला आहे.  भिलार गावात सार्वजनिक ठिकाणच्या 25 जागा निवडण्यात आल्या असून पर्यटकांना तेथे सहजपणे पुस्तके वाचता येतील अशी योजना आहे. 

       महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे मुख्यत: साहित्य, संस्कृती, इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान इ. विषयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्यासाठी चालना देण्याचे काम करण्यात येत आहे.  त्या अंतर्गत पुस्तक प्रकाशन उपक्रम, नवलेखकांना उत्तेजन, साहित्य संस्थांना अनुदान इ. उपक्रम राबविण्यात येतात.  साहित्य संस्कृती मंडळाने आतापर्यंत जवळजवळ 524 ग्रंथ प्रकाशित केले असून त्यापैकी 444 पुस्तकांचे संगणीकरणाचे काम सुरु आहे.

 मातृभाषेतून एखाद्या विषयाचे आकलन सहजता होते, हे सर्वसाधारण सत्य आहे.  आतापर्यंत विविध विषयांचा मातृभाषेत विचारच न झाल्यामुळे त्या त्या विषयातील शब्द आज उपलब्ध नाहीत.  संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान याचा विचार मराठीतून करावा लागेल.  लिखाण मराठीतून कराव लागेल.  इंग्रजी समृध्द ज्ञानभाषा होऊ शकली कारण जगातला असा कुठलाही विषय नाही ज्याचा इंग्रजीतून विचार झालेला नाही.  असे असताना चीन, जर्मन, जपान, फ्रान्स हे त्यांच्या भाषा ज्ञानभाषा म्हणून कसे विकसित करु शकले? त्यांना का नाही ज्ञानाच्या मर्यादा आल्या ? याचे कारण, मराठी भाषेतील अनेक विषयातील परिभाषा कोश उपलब्ध असले तरी, मराठीचा वावर सर्व क्षेत्रात होण्याइतके भाषेचे प्राबल्य नाही. याकरीता सर्व मराठी जणांनी मनापासून आपापले योगदान देणे आवश्यक आहे.

ज्ञानभाषा होण्यासाठी फक्त अलंकारीक साहित्य पुरेसे नाही. केवळ काही मोजक्या लेखकांच्या अलंकारीक भाषेतील   पुस्तकांमुळे आपल्या भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त होऊ शकणार नाही . जगातल्या जवळ जवळ सर्वच विषयांचा विचार व लिखाण करावे लागते.  आपल्या पुर्वजांकडे ज्ञानाचे भंडार होते.  परंतु ते लिखीत स्वरुपात जतन न केल्याने आपले फार मोठे नुकसान झाले आहे.  आर्यभट्ट यांनी पृथ्वीचा आकार इत्यादीबाबत विचार केला होता.  परंतु लिखीत ज्ञान जतन न केल्याने पुढच्या पिढीला याबद्दल माहिती नव्हती. 

  उत्तरदायीत्व  
    
            पुर्वीच्या लिखाणाकडे पाहिले असता अध्यात्म तथा ललित लेखन विपूल प्रमाणात आढळते.  विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन शास्त्र, मानसशास्त्र असे अनेक जागतिक स्तरावर हाताळल्या जाणाऱ्या विषयावर मराठीत फार कमी लिखाण झाले आहे.  अलिकडे निरंजन घाटे, फडके, अच्युत गोडबोले इ. लेखकांनी प्रचलित विषयापेक्षा अन्य विषयातून लिखाण करायला सुरवात केली आहे.  कोणतीही भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी जगात ज्ञात असणाऱ्या सर्व विषयात त्याचे लिखाण व वापर आवश्यक असतो.  वरील लेखकांनी विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन इत्यादी विषय मराठीतून उत्कृष्ट प्रकारे मांडता येऊ शकतात, हे दाखवले आहे. दाक्षिणात्य प्रांतात भाषेबद्दल जेवढी जागरूकता आहे तेवढी आपल्याकडे दिसून येत नाही. दाक्षिणात्य सिनेमांना होणारी त्या त्या भाषीक समुदायाची गर्दी हे एक उदाहरण पुरेशे आहे. त्यामानाने  मोजके अपवाद वगळता आपल्याकडे मराठी सिनेमाबाबत प्रेक्षक उदासीन आढळतात. 
             .सामान्य लोकांच्या दृष्टीने त्यांचा रोजगार हा जीवनाशी निगडित महत्वाचा मुद्दा असतो .पुलंनी म्हटलेच आहे .
           "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो . उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाच शिक्षण जरूर घ्या . पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा , पण एवढ्यावरच थांबू नका . साहित्य ,चित्र , संगीत , नाट्य , शिल्प , खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा . पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल . "
                त्यावर आमचं  म्हणणं आहे :        

                     कोठून जोपासू 
                पुलंची कलावंदना  
                   रिकाम्या पोटा 
               शब्द जंजाळ झाले.  


                जर हा रोजगार त्यांच्या मातृभाषेमुळे उपलब्ध झाला तर निश्चितच त्यांचा आपल्या भाषेप्रती दृष्टीकोन बदलण्यास सहाय्य्यभूत होईल . प्रत्येकजण आपल्या भाषेप्रती उत्तरदायित्व नक्कीच निभावेल त्यासाठी पुरेश्या वातावरण निर्मितीची गरज आहे. संमेलनं , काही उद्बोधनाचे  कार्यक्रम थोड्या -फार प्रमाणात परिणाम  साध्य करण्यास सहायभूत ठरू शकतील .परंतु , ती परिणामकता आतून निर्माण होण्यासाठी  प्रत्येकाने स्वतः सजग असणे आवश्यक आहे  किंवा वरीलप्रमाणे उपाययोजनेची नितांत आवश्यकता आहे . 

      कोणतीही भाषा ज्ञानभाषा असल्याशिवाय ती समृध्द होऊ शकणार नाही. ती  समृद्ध होण्यासाठी अगदी झपाटून काम करण्याची गरज आहे . येथे सुरेश भट्ट यांच्या कवितेतील एक वाक्य उध्दृत करतो -
            खातो मी साय मराठीच्या दुधावरची, आम्ही कोणाचा उंबरा झिजवू कशाला

           सुरेश भट्ट यांचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी तसेच कुणाचाही उंबरा झिजवण्याची वेळ येवू नये यासाठी प्रत्येकाने मराठीच्या विकासात खारीचा वाटा उचलला पाहिजे.





1 comment:

  1. माहितीपूर्ण लेख..... उत्तरदायित्व प्रोत्साहन देणारे आहे. प्रत्येकाने जोपासायलाच हवे

    ReplyDelete