(गदिमा , बाबूजी ,भाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काही ठिकाणी कार्यक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहेत . अशा कार्यक्रमांना लोक आवर्जून येतात . त्याचबरोबर मराठी भाषा संवर्धनाचा प्रचार व्हावा या हेतूने ही संहिता तयार करण्यात आली आहे . आपणास काही कार्यक्रम आयोजित करताना रूपरेषा ठरविताना गोंधळ होतो . त्यासाठी हा एक नमुना समजावा . त्या त्या भागातील प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन निवेदन वाढवावे किंवा कमी करावे .
संहितेचा लाभ जरूर घ्या . लाभ घेतल्यास त्याचा निर्देश अभिप्रायात जरूर करावा एवढीच माफक अपेक्षा )
पुरुष
सुस्वागतम ... या कार्यक्रमास आपण सर्वांचे स्वागत आहे . मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपण एकत्रित जमलो आहोत . परंतु त्यापूर्वी मराठीच्या प्रवासाची , सद्यस्थितीची माहिती देणे आवश्यक वाटते .
भाषावार प्रांत रचनेनुसार दिनांक 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून स्वतंत्र राज्याचा प्रशासनिक कारभार मराठी भाषेतून करण्याकरिता महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 अन्वये मराठी भाषा ही राजभाषा म्हणून अंमलात आली.
मराठी भाषा ही खूप प्राचीन असली तरी , त्याचा इतिहास अनेक जणाना अवगत नाही.मराठीचे प्राचीन स्वरुप महारठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंष मराठी असे कालप्रवाहात इतर भाषांप्रमाणे बदलत गेले आहे. त्याचे अद्यावत स्वरुप म्हणजे आज बोलली जाणारी मराठी भाषा. कोकणी, मालवणी, वऱ्हाडी, सातारी अशा अनेक बोली भाषेचा लहजा वेगळा असला तरी ती मराठीचीच सख्खी भावंडे आहेत.
आजच्या मराठीच्या स्वरूपाचा पाया अति प्राचीन इ. स. पू.2000 च्या कालावधीतील सातवाहन घराण्यात दिसून येतो. दरम्यानच्या काळात मोगली आक्रमणाने पर्शियन भाषेचा प्रार्दुभाव वाढू लागला, अशा स्थितीत वारकरी संप्रदायाने किर्तन/अभंग स्वरूपाने मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे महत्वाचे काम केले.
भाषेचं नेमकं महत्व ज्ञात होण्यासाठी “जाणता राजा” असणे आवश्यक असते. असे उत्तम प्रशासक शिवाजी महाराजांच्या रूपात आपणास लाभले हे मराठीचे व महाराष्ट्राचे अहोभाग्यच होय. महाराजांची दूरदृष्टी /व्यावहारिक/सामाजिक समज अत्युच्च दर्जाची होती. त्यांनी स्थानिक भाषेचे महत्व वेळीच ओळखून प्रशासनात प्रभावी वापर केला. यादृष्टीने महत्वाचे पाऊल म्हणजे राज्य व्यवहार कोशाची निर्मिती.मराठी भाषेचा दबदबा भारतभर पसरला होता.
. जगामध्ये सुमारे 6000 भाषा अस्तित्वात आहेत. त्यातील 20 लाखाच्या वर बोलतात अशा भाषा 350 आहेत. मराठीचा क्रमांक जागतिक क्रमवारीत 15 वा आहे. भारतात हिंदी, बेंगॉली, तेलगु नंतर मराठी 4 थ्या क्रमांकावर आहे. मराठी गोवा प्रशासनाची सह-प्रशासनीक भाषा आहे. याशिवाय ती गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक इत्यादि प्रदेशातही काही प्रमाणात बोलली जाते. बडोदा विद्यापीठ, उस्मानीया विद्यापीठ, गोवा विद्यापीठ येथे मराठी भाषेचे स्वतंत्र विभाग आहेत .
शासनाकडून भाषा संचालनालयांतर्गत अनेक राज्य कायद्यांचे मराठीकरण करण्यात आले आहे. भाषा विकासासाठी विविध २९ परिभाषा माध्यमातून अनेक विषयातील परिभाषा कोश निर्माण करण्यात आले आहेत ब्रिटानिका एन्साय्क्लोपीडिया च्या धर्तीवर आतापर्यंत विश्वकोशाचे 20 खंड प्रसिद्ध करण्यात आले आहे. . या कामात शैक्षणिक संस्था , विद्यापीठे यांना सामील करण्यात आले असून यासाठी आतापर्यत विषयनिहाय ४३ ज्ञानमंडळे स्थापन करण्यात आली आहेत .अनेक दुर्मिळ ग्रंथ संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.भिलार येथील पुस्तकांचे गाव , रेल्वेतील फिरते वाचनालय अशा आगळ्यावेगळ्या संकल्पनांतून मराठी भाषेच्या विकासाचा प्रवास सुरु आहे .
या मातेचे ऋण फेडण्यासाठी अनेकांनी हातभार लावला आहे . परंतु , एवढं पुरेसे नाही . प्रत्येकाने भाषेच्या विकासासाठी खारीचा वाटा उचलला पाहिजे .
स्त्री "ज्ञानदेवे रचिला पाया , तुका झालासे कळस " असे मराठीच्या प्रवासाचे यथार्थ वर्णन आहे हा वारसा पुढे नामदेव महाराज , संत चोखामेळा , संत एकनाथ यांनी जाणीवपूर्वक जपला . महाराजांनी फार्सी भाषेचे अतिक्रमण वेळीच थोपवून मराठी भाषेला आलेली अवकळा दूर केली . वारकरी पंथाचा मराठीच्या प्रसारात मोठा सहभाग आहे . स्थानिक कलाकारांनी पोवाडे , लावण्या , लोकगीते इत्यादींच्या माध्यमातून आपली भाषा ग्राम पातळीपर्यंत पोहचवली .
पुरुष
ग्राम पातळीपर्यंत प्रवास सुरु असताना , मराठीचे प्राचीन स्वरुप महारठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंष मराठी असे कालप्रवाहात इतर भाषांप्रमाणे बदलत गेले आहे. त्याचे अद्यावत स्वरुप म्हणजे आज बोलली जाणारी मराठी भाषा. कोकणी, मालवणी, वऱ्हाडी, सातारी अशा अनेक बोली भाषेचा लहजा वेगळा असला तरी ती मराठीचीच सख्खी भावंडे आहेत.मराठीला प्राचीन साहित्य संस्कृतीची मोठी परंपरा आहे .
स्त्री
मराठीला प्राचीन साहित्य संस्कृतीची परंपरा आहे हे खरं असलं तरी , ज्ञानभाषा होण्याकरिता एवढ चं साहित्य पुरे नाही , जगातील प्रत्येक विषय मातृभाषेत मांडता आला पाहिजे हे ओळखून विष्णूशास्त्र चिपळूणकर यांनी अनेक पाश्चत्य साहित्याचा मराठीत अनुवाद करून वैश्विक दालन सर्वांसाठी खुले केले . त्यांनतर ग . दि . माडगूळकर , पु .ल , देशपांडे , भालचंद्र नेमाडे , नामदेव ढसाळ यांनी निर्माण केलेल्या साहित्याने मराठीची एक वेगळीच छाप पाडली .
पुरुष
अमृताते पैजा जिंके अशी ही भाषा ज्ञानभाषा म्हणून समृद्ध होण्यासाठी अनेकांनी हातभार लावला आहे . जागतिक पातळीवरील विज्ञान , तंत्रज्ञान , व्यवस्थापन , अर्थशास्त्र या विषयांचे महत्व ओळखून जयंत नारळीकर , बाळ फोंडके , अच्युत गोडबोले यासारख्या साहित्यिकांनी विविध विषयात लिखाण करून मराठी भाषेची ज्ञानभाषेकडे वाटचाल सुरु केली आहे .
स्त्री
संत साहित्याच्या प्रेरणेतून , ज्ञाभाषेकडे सुरु झालेल्या वाटचालीचा अखंड प्रवास सुरु आहे . याशिवाय , मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिन इत्यादी माध्यमातून मराठीची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य जोमाने सुरु आहे. मराठीच्या संवर्धनासाठी मराठी साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषेच्या शब्दकोश समृद्धीसाठी विश्वकोश निर्मिती मंडळ तसेच इतर अनेक संस्था स्वयंस्फूर्तीने त्यांच्यास्तरावर वेगवेगळया माध्यमातून मराठीच्या संवर्धनासाठी काम करत आहेत.
पुरुष
मराठीच्या संवर्धनासाठी अनेकांनी हातभार लावला आहे. परंतु अण्णा , भाई , बाबूजी यांचे निरपेक्ष कार्य विसरून चालणार नाही. अण्णा म्हणजे , ग . दि . माडगूळकर . भाई म्हणजे , पु . ल . देशपांडे आणि बाबूजी म्हणजे , सुधीर फडके या दिग्गजांचे हे जन्मशताब्दी वर्ष . या कार्यक्रमाचे औचित्य साधून आपण एकत्र आलो आहोत . यांनी मुक्त हस्ताने आपल्या प्रतिभेची उधळण केली अन अण्णा , भाई , बाबूजी अशी विशेषणं रसिक जनांच्या हृदयातून आपसूकच पाझरली .
स्त्री
रसिक जनांच्या हृदयातून नुसतीच पाझरली नाहीत .तर , नात्याची एक अनवट नाळ त्यांच्याशी कायमची जोडली गेली . हे मराठी मातीत रुजलेलं घट्ट नातं आहे . या नात्या मागे आहे , या त्रयींची अखंड साधना ! मराठीच्या "म" तून सुरु झालेला त्यांचा प्रवास या मातीतच मिसळून गेला. मराठीचा सुगंध सर्वदूर पसरविण्याचे अमोल कार्य या मराठीच्या साधकांनी अविरतपणे केले . तुकारामांच्या शब्दांनी जणू ते झपाटले होते .
आम्हा घरी धनशब्दाची च रत्ने
शब्दाची च शस्त्रे यत्न करू
पुरुष
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन
शब्दे वाटू धन जनलोका
स्त्री
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव
शब्दे चि गौरव पूजा करू .....
पुरुष
तुकारामांचे हे शब्द त्यांनी अक्षरशः मनावर घेतले . या त्रयींना आदरांजली म्हणून कविता वाचन /अभिवाचन/ गाण्यांचा कार्यक्रम यातून त्यांच्या आठवणी जपण्याचा हा प्रयत्न आहे.एक छोटी सुरुवात आपण कवितावाचन आणि अभिवाचन या माध्यमातून करत आहोत . कार्यक्रमाची सुरुवात गदिमांच्या कवितांनी होईल .
स्त्री
१) कविता -तुझी कंकणे , गदिमा
काळ होता क्रांतीचा . ब्रिटिशांविरोधातील असंतोषाचा . इतर तरुणांसारखेच गदिमांचे तरुण रक्त सळसळत होते . परंतु गरिबीने त्यांच्या वाट्या रोखल्या होत्या . अशातच ९ ऑगस्ट , १९४२ चा तो दिवस उजाडला . गांधीजींच्या भाषणानंतर अनेक नेत्यांना अटक झाली होती . झेंडावंदन कोण करणार . अशावेळी "वंदे मातरम "चा जयघोष करत अरुणा असफअली नावाची ती दुर्गा गर्दीत शिरली अन २ , ३ मिनिटाचे भाषण करून जमावात अदृश्य झाली . या दुर्गेच्या पराक्रमाने गदिमा भारावून गेले , त्यांच्या रक्तातून सळसळत जी कविता बाहेर पडली ती म्हणजे , "तुझी कंकणे " . गदिमांची " तुझी कंकणे " ही कविता सादर करतायत . .......
२) अभिवाचन .. जगाच्या पाठीवर , सुधीर फडके
गदिमा परिस्थीतीशी झुंजत होते . बाबूजींची अवस्था काय वेगळी नव्हती. उपजीविका आणि कला यांचा ताळमेळ कसा घालायचा यांचा प्रश्न दोघांनाही पडला होता . पु . ल . देशपांडे यांनी कला आणि उपजीविका याचा ताळमेळ कसा घालावा याचं सुंदर मार्गदर्शन केलं आहे .ते म्हणतात
"आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो . उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाच शिक्षण जरूर घ्या . पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा , पण एवढ्यावरच थांबू नका . साहित्य ,चित्र , संगीत , नाट्य , शिल्प , खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा . पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल . "
"आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो . उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाच शिक्षण जरूर घ्या . पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा , पण एवढ्यावरच थांबू नका . साहित्य ,चित्र , संगीत , नाट्य , शिल्प , खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा . पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल . "
बाबूजी म्हणजे सुधीर फडके याचं बालपण अत्यंत कष्टत गेले . परंतु त्यांनी कलेची कास काही सोडली नाही . जगण्याची धडपड सुरु असताना त्यांचं नाव कस बदललं , नावात काय असतं ?त्यांचं खरं नाव काय ? याची रंजक कथा बाबूजींनी त्यांच्या " जगाच्या पाठीवर "या आत्मचरित्रात सांगितली आहे ,त्यांच्या "नन्ना " नी केलेलं बारसं या कथेचे अभिवाचन अभिवाचन करतायेत ...
स्त्री
3) गदिमा कविता -शिशिरागम ...
फक्त नावातल्या बदलाने बाबूजींचा वर्तमान काळ बदलला . फक्त
नावातल्या बदलाने बाबूजींचा वर्तमान काळ बदलला . तसा काळ
कुणासाठी थांबत नाही .दुःखानंतर सुख येत ..... सुखानंतर दुःख ...... परंतु
नंतर सुख असतंच .... परंतु येणाऱ्या दुःखालाच मनुष्य कवटाळून बसतो. तो विसरून जातो प्रवाहातच
उद्याची आशा आकार घेत असते . शिशिरागम उद्याचा
आशावाद आपल्या ओघवत्या
शैलीत आपणासमोर सादर करत आहेत
पुरुष
४) अभिवाचन
पुलंचं साहित्य माहित नाही असा मनुष्य महाराष्ट्रात विरळाच असावा . त्यांची प्रवासवर्णनं , व्यक्तिमत्व चित्रणावरील अनेक पुस्तक वाचकांनी वाचली असतील . पुलंना वेगळ्या परिप्रेष्यातून पाहता यावे म्हणून आगळंवेगळी पत्रं अभिवाचनासाठी निवडली आहेत . पुलं आजारी असताना लता दीदींनी पुल यांना एक पत्र लिहिलं होत . पुलंनी त्यांना दिलेल्या उत्तरातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे न उलगडलेले कप्पे अलगद उलगडले जातात . इथेही त्यांचा मिश्किल स्वभाव जागृत असतो . पत्राचं वाचन करतायेत ......
स्त्री
५) गदिमा कविता - रजेचे कारण
पुलंचा मिश्कीलपणा त्यांच्या पत्रातूनही डोकावतो. गदिमांच्या कवितेतूनही आपल्याला असाच मिश्किलपणा दिसून येतो. या कवितेतील नर्मविनोदी शैली मनाला चटकाही लावून जाते. या कवितेतील मुलाने रजा घेतली आहे. त्यात काय एवढं? सगळेच घेतात. या रजेंचं कारण ऐकून तुम्ही चक्रावून जाल ? तर अशा या रजेंचं कारण काय सांगतायत.
पुरुष
६) पुलंच्या लग्नाची आठवण त्यांच्या मेहुण्यांकडून
सांस्कृतिक वारसा कसोशीने जपणारे पुल तितकेच पुरोगामी विचाराचे होते . लग्नसंस्कारावर त्यांचा विश्वास असला तरी मुहूर्त , मंगळवेळ असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता . आजकाल लाखो रुपये सहजता खर्च केले जातात . भाई म्हणजे पुल आणि माई म्हणजे त्यांच्या पत्नी . ह्या दाम्पत्याने एक कोटीपेक्षा जास्त रक्कम समाजकार्याला देणगी म्हणून दिली . परंतु आपल्या लग्न सोहळ्याचा खर्च फक्त आठ आणे इतकाच केला होता . हि आठवण सांगितली आहे माईंचे भाऊ सर्वोत्तम ठाकूर यांनी. सादर करतायेत ....
स्त्री
६) कविता - पु . ल . देशपांडे .
रवींद्रनाथ टागोरांच्या "छेलेबोला " ह्या आत्मकथनाचं "पौरवय' हे भाषांतर पुलंनी केलं आहे . त्यांच्या "बालक" नावाच्या कवितेतील पुढील ओळी पुलंच्या आत लपलेल्या एका अवखळ मुलाला चपखल लागू होतात .
जेव्हा वय होत कोवळं , शरीर हलकं फुल
होतं पाखरासारखं ,फक्त नव्हते पंख
पुलंचं मन पाखरासारखं होतं , कायम निरागस बालकासारखं होतं . पुलंची प्रवासवर्णन , विनोदी लेख अनेकांनी वाचली आहेत . नाटक, सिनेमे पाहिले आहेत . त्यांचं संगीत , भाषण ऐकली आहेत . परंतु त्यांनी काही कवितांचं लेखनही केलं आहे , हे फार कमी लोकांना ठाऊक आहे . अर्थातच या कविता त्यांच्या इतर लिखाणासारख्या मिश्किल , नर्मविनोदी आहेत . त्यातून त्यांच्यातला अवखळ बालक कायम खोड्या करायला तयार असतो . त्यांनी या कवितांना नावही दिल्या काही (च्या काही ) कविता . पुल यांच्या " चौपाटीवर " या कवितेच वाचन करतायेत . ...
पुरुष
८) गदिमांनी केवळ देशभक्तीपर , चित्रपट गीत लिहिली असं नाही . ते लहानग्याना विसरले नाहीत . त्यांच्यासाठी त्यांनी नाच रे मोरा , एका तळ्यात होती , गोरी गोरी पान अशी एकाहून एक सरस बालगीत लिहिली आपल्या रडणाऱ्या ताईला रडू नको असं सांगणाऱ्या भावाची ही कविता . आपल्या गोड गळ्याने सादर करतायेत .
या दिग्गजांच्या आठवणी जागवत ही भावरम्य संध्याकाळ अशीच सुरु राहील . त्यांच्या काही अधिक आठवणी जपणार आहोत गाण्यांमधून . पुढील कार्यक्रमाची सूत्रे हाती घेण्याची विनंती मी ..... यांना करतो .
या दिग्गजांच्या आठवणी जागवत ही भावरम्य संध्याकाळ अशीच सुरु राहील . त्यांच्या काही अधिक आठवणी जपणार आहोत गाण्यांमधून . पुढील कार्यक्रमाची सूत्रे हाती घेण्याची विनंती मी ..... यांना करतो .
अण्णा , भाई , बाबूजी म्हणजे महाराष्ट्राचे ब्रह्मा , विष्णू महेश . साहित्य , संगीत , चित्रपट यांचं अवघ विश्वच व्यापून टाकलं त्यांनी त्यांनी आपली कला केवळ लोकांच्या मनावर बिंबवली नाही तर , हृदयात रुजवले . गदिमांची तलम शब्द गुंफण आणि बाबूजींच्या स्वरांचं कोंदण यातून उपजलेल्या धीरगंभीर षडजाने समस्त मराठीजनांना अक्षरशः संमोहित केले . इथल्या मातीचा सुगंध स्वरातून कायम दरवळत राहिला .
भाईंच्या स्वभावातला मिश्कीलपणा त्यांच्या लिखाणात खोडकर मुलगा होऊन कायम उतरला. वाचकांना हळुवार चिमटे घेत त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य जिवंत ठेवण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले . त्यांच्या अचाट निरीक्षण शक्तीने अचंबित व्हायला होते . असे म्हणतात ते "म्हैस ' या कथेचे जेव्हा अभिवाचन करायचे तेव्हा जिवंत चित्र समोर उभे राहायचे . लेखनाबरोबरच संगीताचा कां आणि जाण याची त्यांना असल्यामुळे त्यांच्याकडून अनेक गाण्यांची निर्मिती झाली .
बाबूजींच्या स्वरांना गदिमांच्या शब्दांची साथ लाभली . त्यातून भावगीत , भक्तीगीत , ओव्या , गीतरामायण अलगद उलगडत गेले . कवीच्या शब्दांचा नेमका भावार्थ रसिकांच्या मनात उतरवणे तसे अवघड काम . परंतु , बाबूजींनी गदिमांच्या शब्दांवर आपल्या स्वरांची जादू पेरून त्यातून केवळ नेमका अर्थ उलगडून दाखविला नाही , तर त्या शब्दापलीकडच्या अनाहत जगात रसिकांना अलगद नेऊन ठेवले . बाबूजींना स्वरांचं सामर्थ्याचे नेमके आकलन झाले होते. स्वतः गदिमा त्यांच्या बद्दल म्हणतात , पाखरू पंख घेऊन जन्माला येते , तसे फडके गाणे घेऊनच जन्माला आले आहेत .
गदिमांचे शब्द , त्याला बाबूजी , भाई यांच्या संगीताचा साज चढला की , मग या मातीतल्या गीतांची उधळण व्हायची . कधी नाच रे मोरा सारखे बालगीत तर कधी , तरुण पिढीचे संगीत तर कधी भक्ती रसात न्हाऊन विठ्ठलाला आळवणी करणारे भक्तीगीत ..... एकापेक्षा एक सरस गीतांच्या जलधारा रसिकांना मग आनंदाने चिंब करतात .
आपण या दिगज्जांची माहिती पुढे घेणारच आहोत . या कर्यक्रमात गदिमांनी लिहिलेली सर्व गाणी आवर्जून घेण्यात आली आहेत. बहुतांश गाणी भक्तिरसातील आहेत . आपणही या आनंदरसात चिंब व्हायला उत्सुक झाला असाल .
गदिमांनी १६-१७ व्या वर्षीच चित्रपट सृष्टीत प्रवेश केला . २००० पेक्षा अधिक गीते लिहिली . देशभक्तीचं वारं लहानवयातच त्यांच्या अंगात भिनलं होतं . घरच्या परिस्थितीमुळे त्यांचे हात बांधले गेले होते तरी , देशासाठी काहीतरी करण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते . परंतु , जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी त्यांच्या शब्दातून आपली प्रखर देशनिष्ठा व्यक्त केली . वेदमंत्र अन वंदेमातरम यापैकी वंदेमातरमचं वंद्य असल्याचे त्यांनी सांगितले . कार्यक्रमाची सुरुवात वेद मंत्राहून आम्हा ... या सुंदर गाण्याने होतेय .
वंदेमातरम या चित्रपटातील गीत असून . याला संगीत दिलंय सुधीर फडके यांनी . (मूळ गायक सुधीर फडके )
२) अशी पाखरे येती
जेष्ठ संगीतकार श्री . यशवंत देव यांचे यांचे नुकतेच निधन झाले . संगीताच्या मैफिलीतील एक महत्वाचा तारा हरपला आहे . आज आपण गदिमा , बाबूजी , भाई जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रम सादर करत असलो असलो तरी या जेष्ठ संगीतकाराचे विस्मरण करून चालणार नाही . त्यांना श्रद्धांजली म्हणून "अशी पाखरे येती " हे गीत सादर होईल .
"अशी पाखरे येती अन स्मृती ठेवुनी जाती . " किती चपखल आहे , हे गीत या सर्व दिग्गजासाठी . या सर्वांनीच आपल्या मनात खोलवर स्मृती जाग्या ठेवल्या आहेत . यशवंत देव यांनी संगीत दिलेलं हे गीत आपल्या समोर सादर करतायेत .
३) इंद्रायणी काठी
पुलंच्या आठवणी सांगायच्या तर एक अख्खा दिवस पुरणार नाही . पुल साहित्यिक म्हणून सर्वांना परिचित आहेत . परंतु ते एक उत्तम शिक्षक सुद्धा होते . एकदा एका मुलाला त्यांनी भूप रागातील गाणं गायला सांगितले . तो म्हणाला , "गाणं येत नाही . भूप राग येतो ." सा रे ग प ध सा आरोह आहे . यावर त्यांनी न रागावता कसं शिकवावं याचा वस्तुपाठच घालून दिला . त्यांनी सांगितलं , " पहिली दोन वर्ष मुलांना फक्त गाणं म्हणायला , सुरात राहायला शिकवावं. परीक्षा घेऊ नये . हळूहळू रागातला फरक सांगावा . मुलाच्या गाण्याची परीक्षा घ्यावी . शास्त्रीय ज्ञानाची नाही . गाण्याच्या कार्यक्रमाला न्यावं , भाग घ्यायला लावायचा ."
असो स्पर्धेच्या युगात आपण भाईंचा बहुमूल्य सल्ला विचारात घेतला तरी खूप होईल . निदान आपण त्यांनी संगीत दिलेल " इंद्रायणी काठी " हे गाणं ऐकुया .
राग -भीमपलास
मूळ गायक - भीमसेन जोशी
४) स्वये श्री राम प्रभू ऐकती
गीत रामायण हा एकाच कवीने रचलेला , एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला आणि आकाशवाणीवर जवळ जवळ वर्षभर चाललेला एकमेव कार्यक्रम असावा . आकाशवाणी केंद्र १९५३ साली नव्याने सुरु झाले . तेव्हा त्या केंद्राचे एक कार्यक्रम नियोजक श्री सीताराम लाड यांनी गदिमांना आकाशवाणीसाठी त्यांनी काहीतरी करावे म्हणून गळ घातली . अन मग गदिमा यांच्या सिद्धहस्त लेखणीतून "गीतरामायण " जन्माला आले . रामायणातील मूळ २८००० श्लोकातील कथा त्यांनी एकूण ५६ गाण्यात बांधली .
या गाण्यांना बाबूजींचा परीसस्पर्श लागला . त्यांनी एकूण ४२ रागांवर आधारित संगीत रचना केली . बाबूजी केवळ तबला , पेटी , व्हायोलिन एवढीच साथ घेऊन प्रयोग सादर करत . १ एप्रिल , १९५५ ला ऑल इंडिया रेडिओवर पहिल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले .
५) " कौसल्येचा राम बाई "
गदिमा आणि पुल यांची मैत्री सर्वश्रुतच आहे . बाबा आमटे यांना "आनंदमेळ्यासाठी" एक गीत लिहून हवे होते . त्यांच्या वतीने पुलंनी मैत्रीच्या विश्वासावर होकार सुद्धा दिला व गदिमांना गीत लिहून देण्याची प्रेमळ गळ घातली . तेव्हा त्यांची प्रकृती ठीक नव्हती . तरीसुद्धा मैत्रीसाठी जागून एक गीत लिहिलं . हे त्यांच्या लेखणीतून उतरलेलं शेवटचं गीत .
दोघांनी एकत्र अनेक गीतं केली होती . आपल्याला पुलं यांचा विनोदी चेहरा साहित्यातून कायम समोर येतो . खरं , तर त्यांना गायकचं व्हायचं होतं . त्यांच्या या धीरगंभीर दुसऱ्या बाजूतून अन त्यांनी संगीत दिलेलं गीत म्हणजे " कौसल्येचा राम बाई "
मूळ गायिका -माणिक वर्मा
राग -यमन
चित्रपट -देव पावला
६) घननीळा बरसला
गदिमांच्या "ळ " ची कथा अनेकांना ठाऊक असेल . "ळ" हे अक्षर तसे फार कमी वेळा वापरले जाते . त्याचा वापर करून गाणं तयार करण तस अवघड काम . गदिमांनी इतर अक्षरांसारखेच "ळ" ला सहजतः वश करून , रसिकांना घननिळ्याच्या हिंदोळ्यावर अक्षरशः झुलवले . सहजसोपी वाटणारी रचना, त्यातून व्यक्त झालेली तिची घालमेल बाबूजींच्या स्वरातून ओघळते . सांजवेळेची तिची संवेदना , व्याकुळता बाबूजींच्या संगीतातून सादर करताहेत .
७) बाई मी विकत घेतला श्याम
देवाच्या समीप जाण्यासाठी न मूर्तीची गरज आहे ना पैशाची . तो सृष्टीचा निर्माता ठायी ठायी आहे . जगात तो विविध भावातून ओळखला जातो . असा हा शाम तिने कोणतीही भौतिक गोष्ट न करता आपलासा केला आहे .. हे गीत आपल्या समोर सादर करत आहेत
संगीत -सुधीर फडके
चित्रपट -जगच्या पाठीवर
स्वर - अशा भोसले , सुधीर फडके
राग - पहाडी , माईंड
८) विठ्ठला तू वेडा कुंभार
विश्वाच्या निर्मितीवेळेसच एक वेगळेपण ईश्वराने कोणताही दुजाभाव न करता प्रत्येकात पेरले आहे . तो न थकता मातीला आकार देण्याचे कार्य अविरत करतोय . त्याच्या प्रत्येक कृतीमागे एक कार्यकारणभाव आहे .प्रत्येकजण वेगळा आहे . पण तो का वेगळा आहे , कुणाला लोणी तर कुणाला अंगार का मिळतो हे त्या जगनियंत्या शिवाय कुणीही सांगू शकत नाही .हा प्रश्न गदिमांनाही पडला आहे . त्यांनी तो भाव छंदोमयी रचनेतून व्यक्त केला आहे . त्याला संगीताचा सुंदर साज चढविला आहे . बाबूजींनी .
९) एक धागा सुखाचा
सुधीर फडके यांचे एक गुरु श्री . ठाणेकर स्वतः संगीत शिकलेले नव्हते . परंतु पेटी उत्तम वाजवत . त्यांना वेड फक्त तीन गोष्टीच भजी , बीडी अन पेटी . भजी तर इतके प्रिय की , त्यांनी सांगितलं ," मेल्यावर माझं प्रेत तिरडीवर ठेवाल तेव्हा , खाली भजी अंथरा , फुलांऐवजी भजी उधळा , अग्नी द्यायच्या आधी तोंडात भजी कोंबा "
बाबूजींना तेव्हा पैशाची फार होती . तेव्हा या गुरुजींनी त्यांना पहिल्या कमाईचा आनंद मिळवून दिला . मजा म्हणजे बाबूजी त्यांना स्वतः गाणी बसवून देत . शंभर दुःखाच्या धाग्यतून सुखाच्या एका धाग्याचा प्रथम मार्ग त्यांच्या या गुरुजींनी दाखविला . गदिमांनी लिहिलेलं अन बाबूजींनी संगीत दिलेलं एक अप्रतिम गीत "एक धागा सुखाचा ' सादर करतायेत ..
१०) नाच रे मोरा
गदिमांनी भक्तीरस , शृंगाररस , भावगीत अशी अनेक प्रकारातील गाणी लिहिली . परंतु ते आपल्या बच्चेमंडळींना विसरले नाहीत . त्यांनी त्यांच्यासाठी गोरी गोरी पान , एका तळ्यात होती अशी एकापेक्षा एक सुंदर गाणी लिहिली . त्यातील नाच रे मोरा या गीताची पार्श्वभूमी गमतीदार आहे . एकदा मस्ती करता करता पुलंनी गदिमांना सांगितले , त्यांना " नाच गं घुमा , कशी मी नाचू " च्या धर्तीवर बालगीत हवे आहे . त्यांनी काही मिनिटातच जे गीत लिहून दिले ते म्हणजे "नाच रे मोरा "
११) कानडा राजा पंढरीचा
गदिमा लहानपणापासूनच फार संवेदनशील होते . या कथेतून आपल्याला त्यांच्या प्रेमळ ,लोभस स्वभावाचा परिचय होईल . कथा अशी आहे ज्या शाळेत ते शिकत होते त्या शाळेची शिस्त फार करडी होती . रोज स्वच्छ अंघोळ करून शाळेत यावं लागे . एकदा एक मुलगा शाळेत आंघोळ करून न आल्यामुळे शिक्षकांनी त्याला चोपले . गदिमांनी त्याला आंघोळ न करण्याचे कारण विचारले . त्याने सांगितल, पाणीच मिळत नाही तर कशी करणार अंघोळ . पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीवर ओतल्या जाणाऱ्या दह्यादुधाच्या घागरी त्यांनी पहिल्या होत्या . या विषमतेने ते दुखी झाले . त्यांनी जी कविता रचिली त्यातलं कडवं .
दगडाच्या देवा
दह्यादुधाच्या घागरी
अस्पृश्याच्या घरी
पाणी नाही ...
तुरा कडी तोडे
कृष्णाचा शृंगार
अस्पृश्याचा पोर
नंगा हिंडे ...
देवाला नैवेद्य
पक्वान्न संभार ....
या कवितेच्या वेदनेतूनच त्यांना अभिप्रेत असलेल्या "कानड्याची " प्रतिमा आकाराला अली असावी . त्यांना प्रश्न पडला असावा , जो स्वतःच निराकार , निर्गुण आहे त्याला माणसाच्या रंगाचं , कर्माचं , जातीचं काय कौतुक असणार ?
जातीभेदापलीकडला निर्गुण ईश्वर ते , हा नाम्याची खीर चाखतो , चोखोबांची गुरे राखतो या साध्यासोप्या ओळीतून उलगडून दाखवितात . अश्या या कानड्याचा अभंग आपल्यासमोर सादर करता आहेत ......
(गदिमा , बाबूजी ,भाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काही ठिकाणी कार्यक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहेत . त्याचबरोबर मराठी भाषा संवर्धनाचा प्रचार व्हावा या हेतूने ही संहिता तयार करण्यात आली आहे . आपण काही कार्यक्रम आयोजित करताना रूपरेषा ठरविताना गोंधळ होतो . त्यासाठी हा एक नमुना समजावा . त्या त्या भागातील प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन निवेदन वाढवावे किंवा कमी करावे .
संहितेचा लाभ जरूर घ्या . लाभ घेतल्यास त्याचा निर्देश अभिप्रायात जरूर करावा एवढीच माफक अपेक्षा )
**************************
आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्याने आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत . भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने मराठीच्या प्रचार /प्रसार यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतच असते . तस मराठीत विपुल साहित्य निर्माण झालं आहे . तंत्रज्ञान / विज्ञान या क्षेत्रातही अनेक प्रयोग सुरु आहे . या क्षेत्रातही मराठी भाषा प्रगतीपथावर आहे .
परंतु लोकांना याबद्दल जास्त माहिती नाही . याच एक कारण म्हणजे ,
या माध्यमात आपण मातृभाषेतून व्यक्त होऊ शकू का ? अशी सर्वसामान्यांना भेडसावणारी शंका .
१) संगणक , भ्रमणध्वनी अशी साधने वापरताना मराठीचा वापर सुलभपणे करता येईल का ? २) संकेतस्थळ निर्माण करता येईल का ?
३)मराठीतील उपयुक्त संकेतस्थळ कोणती ?
असे प्रश्न तुम्हाला पडले असतील . मराठी भाषा तंत्रज्ञानात मागे राहू नये यासाठीच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
"मराठी भाषा आणि तंत्रज्ञान " असा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे . या विषयातील तज्ञ यांना यासाठी आज आवर्जून आमंत्रित करण्यात आले आहे .
अनेक संकेतस्थळाचे काम ते हाताळतात . या क्षेत्रात त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे . ....... हे एका प्रचंड ऊर्जेने भरलेल व्यक्तिमत्व आहे . त्यांनी सूत्र हाती घेतली की ,माहितीचा महापूर व्हावू लागतो . आपलं शंका निरसन व्याख्यान झाल्यावर जरूर करावे . मी ....... यांना कार्यक्रमाची सूत्रे हाती घेण्याची विनंती करतो .
(गदिमा , बाबूजी ,भाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काही ठिकाणी कार्यक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहेत . त्याचबरोबर मराठी भाषा संवर्धनाचा प्रचार व्हावा या हेतूने ही संहिता तयार करण्यात आली आहे . आपण काही कार्यक्रम आयोजित करताना रूपरेषा ठरविताना गोंधळ होतो . त्यासाठी हा एक नमुना समजावा . त्या त्या भागातील प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन निवेदन वाढवावे किंवा कमी करावे .
संहितेचा लाभ जरूर घ्या . लाभ घेतल्यास त्याचा निर्देश अभिप्रायात जरूर करावा एवढीच माफक अपेक्षा )
No comments:
Post a Comment