Tuesday, 27 October 2015

सुखाची व्याख्या

          
                 

 

  डॉ. अनघा लवळेकर यांचा "समाधानी आयुष्याचा चढता आलेख" हा लेख वाचला. आश्वासक मानसशास्त्रातून चढत्या आलेखाचे प्रवासी बनण्याकरिता सुंदर सोप्या टिप्स लेखाच्या शेवटी देण्यात आल्या आहेत.तरीही सुखाची नेमकी  व्याख्या काय ? आपल्या आयुष्यापासून ज्या अपेक्षा असतात , स्वप्ने असतात त्याची पूर्ती  झाली म्हणजे सुख प्राप्त झाले . हा टप्पा तर गाठला पुढे काय ? सुखाची व्याख्या करणार कशी ?ते तर अळवावरच्या   पाण्यासारख आहे . केव्हा घसरून पडेल याचा नेम नाही . जे शाश्वत नाही तरीही त्याचा मागे धावायच आहे कारण त्यातूनच मनाला उर्जितावस्था प्राप्त होते . त्याचा नेमका अर्थ म्हणूनच समजून घ्यायचा आहे . 

      सुखाचे मापदंड ठरविणे खरोखरच कठीण आहेत. काहीजणांना जीवनाच्या मूलभूत गरजांची भ्रांत नाही तर, दुसरीकडे 260 रुपयाचा  भार पेलू न शकणारे कुटूंब. मग फक्त भौतिक तुलनेने माझी सुखाची व्याख्या बदलायला हवी .  जीवनाच्या मुलभूत गरजा ही तर प्राथमिक गरज आहे. मग पुढे पुल म्हणतात तस , आयुष्य जगण्यासाठी पोटापाण्याचा व्यवसाय जरूर करावा . परंतु आयुष्य का जगाव हे जोपासलेली  कला, छंद शिकवेल 

         कितीही  सुख मिळाल तरी पोकळी राहतेच. ती पोकळी भावनिक आधाराने, कलेने किंवा इतर गोष्टींनी भरुन काढण्याचा प्रयत्न आपण करतच असतो. आपली कला सादर करताना कलावंत त्याच्या सुखाच्या परमोच्च बिंदूत असेल कदाचित पण नंतर काय? बाहेरच्या अस्थिर, असुरक्षित  वातावरणात परतायतच आहेच . त्यावेळी निर्माण होणारी पोकळी भरुन काढण्यासाठी अजून काही घटकांची गरज आहे. स्थैर्य आहे, सुख आहे तरी कायम पोकळी का? मग सुख म्हणजे नेमक काय ? 

     नोकरदार कलावंत, संत, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सूखाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. नोकरदार व्यक्तीने भौतिक सुखालाच अग्रक्रम दिलाय. म्हणजे एक चाकोरीबध्द आयुष्य, नोकरी , घर, संसार आणि थोड मनोरंजन यात तो सुख शोधतोय. खरा कलावंत आत्मिक सुखाच्या शोधात काही वेळा भौतिक गरजा पासून वंचित राहतोय. संतानी तर परमार्थ आणि आत्मिक  शोधातून निरिच्छ जीवनालाच सुख मानलय.मदर टेरेसा, बाबा आमटे यांचा मार्ग माणुसकीचा आहे. इतरांच्या सुखात ते आपल सुख शोधतायेत. त्यासाठी सतत कृतिशील आहेत. हा मार्ग मनाची पोकळी निर्माण व्हायला वावच देत नाही.
        डॉ. लवळेकर यांनी कृतिशीलता, कार्यक्षमता, सुनियोजितपणा, स्वनियंत्रण जगण्याच समाधान याबद्दल दिलेल्या टिप्स उपयुक्त आहेत. परंतु त्याअगोदर सुखाची व्याख्या निश्चित करायच शिव धनुष्य पेलायच आहे.आपल्याला मर्यादांची जाणिव होण आणि ते स्वीकारणे हे खरतर अवघड काम आहे. परंतु स्वत:च कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल. नाहीतर अपेक्षांच ओझ आपण स्वत:हून स्वत:वर लादून घेऊ व सुख शोधण्याच्या प्रयत्नात त्याखाली भरडले जाऊ.स्वत:वर विश्वास असेल तर संयम आवश्यक आहे. अमिताभचे जुने सिनेमे पाहिले. विश्वास नाही होत हाच तो आजचा सुपरस्टार . स्वत: वरचा दृढ विश्वास , संयम आणि या वयातही कृतिशील . सर्व परिमाणच बदललय यशाचे  सतत स्वत:शीच स्पर्धा 

         स्वत:शी चढाओढ करण्याऐवजी इतरांशी करण्यात आपण किती काळ व्यर्थ करतोय. इर्षा ,  मत्सर या अवगुणांना वाव देऊन आत्मिक सुख, विकास याकडे आपणच  दुर्लक्ष करतोय . सुखाच्या कल्पना सारख्या बदलतायत. इतरांना जे सुख वाटतय म्हणजे भौत्तिक गरजा, ते टाेचतय .   काय हवय ? सत्ता , भावनेचा आधार, स्थिरता, पैसा ? काहीच उमजत नाही. कायम पोकळी. संताचा निरिच्छ मार्ग मान्य नाही. कृतीशीलतेसाठी संयम नाही.  मर्यादांचा आढावा घेण्यास फुरसत नाही किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष .  मग कस उमजणार सुख. कस स्थिरत्व प्राप्त होणार. तुम्हालाच शोधायचय.

                समजा सुखाच्या ज्या  कल्पना आहे. चांगली नोकरी, त्रिसूत्री पाळणारी सुंदर बायको, मोठ्ठ घर, गाडी सर्व काही पंचवीशीच्या आतच मिळाल.  काही ऋण नाही. काही नाही.  आता पुढे काय. सुख बोचतेय. या भौतिक गरजा आहेत. मानसिक, बौध्दिक गरजांच काय? त्याची आवश्यकता नाही? उरलेली 75 वर्षे जगू शकाल तुम्हाला मिळालेल्या सुखाच्या शिदोरीवर.  जगण म्हणजे केवळ भौतिक क्रिया नाहीत. जगत आहोतच. आपण आपल्या मर्यादा निश्चित केल्यात. उत्तम आहे. परिवर्तन करण्याइतकी  इतकी सर्जन शीलता, संयम   नसेल तर  या पध्दतीने जगण्याशिवाय पर्याय नाही. सर्वात महत्वाच म्हणजे त्यात तुम्हाला समाधान असेल तर या  सुखाच्या कल्पनेला  आक्षेप असण्याच  कारण नाही.

              मनाच शास्त्र इतक विचित्र आहे की अस्थैर्यातून जितके विकार उद्भवतात तितके स्थैर्यातूनही उद्भवू शकतात. आयुष्यात उद्दिष्टच उरल नाही तर? बाकी सर्व आहे . पुन्हा सुखाची व्याख्या डळमळायला  लागणार.  . या जगाचा परिघ अनंत आहे. प्रत्येकाचा स्वतंत्रपणे अभ्यास करायचा म्हटल तरी आयुष्य अपुरे पडेल. किती माहित आहे आपल्याला याबद्दल ? कधी लक्ष दिल आहे त्याकडे? तुमच्या सर्जनशीलतेला  निसर्गाने  इतका वाव दिला आहे की, फक्त तुमच्या कृतीशीलतेचीच गरज आहे.मग उद्दिष्ट , पोकळी उरणारच नाही . सुखाचा विचार करण्या इतकाही . 

           स्टिव जॉबला आयुष्यभर भौतिक गोष्टी अधिक सुंदर करण्याचा ध्यास होता . तो तेच जगला. भौतिक सुखाच्या निर्मितीतून  मनाचा तरल आनंद .  म्हणजे भौतिक गोष्टीतून सुख मिळू शकत नाही असे नाही. निर्मितीचा आनंद असतो . एक निर्मिती झाली की, अधिक सर्जनशिलतेचा ध्यास. कुठलीही क्षेत्र घ्या .  परिवर्तनाला भरपूर  वाव आहे. त्यातून निर्मिती. निर्मितीतून आनंद . निरंतर कृतिशीलतेतून सुख मिळू शकत. या प्रवासात सुखाची व्याख्या बदलत राहील .मार्ग, ध्येय  वेगवेगळे असू शकतात .  मात्र कृतिशीलतेचा प्रवाह , नवनिर्मितीचा ध्यास याच्या सातत्यपूर्ण  प्रवासात सुखाची माप घेण्याचीही सवड उरणार नाही, इतकी  सुखाच्या पलीकडली अवस्था प्राप्त झालेली असेल.  

1 comment:

  1. खूप छान!वाचून सुख मिळालं!

    ReplyDelete