Sunday, 22 March 2020

नागझिरयाची प्रेमकथा


   

   
     पावश्या,सनबर्ड,तांबट अशी पक्षांची नावं कधी ऐकली आहेत का? सलीम अली,मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकांतून पक्ष्यांची चित्रं जरुर पाहिली होती. काही वाचलं होतं. प्रत्यक्ष पाहिल काहीचं नाही..चिमण्या,कावळे तेवढे...चिमण्याही येत नाही हल्ली अंगणात .कावळा श्राध्दाला आला तर येतो...तेवढचं...सिमेंटच्या जंगलात पाखरांचे आवाज हरवून बसली आहेत माणसं...कवितेतील "हिरवे हिरवे गार गालीचे "कवितेतच राहीले आहेत.आई, बाबा त्यांच्या फुलराणीला ते कुठून दाखवणार? निमग्न, निरव शांततेचा निसर्ग शहराच्या कोलाहलात कुठे गवसणार ? असे असंख्य प्रश्न," "नागझिरयाची प्रेमकथा " ही फिल्म पाहताना मनात येत होते.
     पाखरांच संगीत ....संगीतकार निसर्ग ...सगुणातून निर्गुणकडे नेणारा निसर्गाचा स्वनिर्मित षडज....षडजातून निषादाकडे नेणारी धीरगंभीर शांतता....फक्त नि...नि...सूर...स्वत्व , मानसिक कोलाहल शुन्य करुन,अंतर्मनाचा शोध घेण्यास भाग पाडणारी शांतता....या शांततेत पक्षांचा किलबीलाटही एकरुप होऊन जातो.हरणांच्या शिंगांच्या टकरीतून निर्माण होणारा ध्वनी निरव शांततेच्या पार्श्वभूमीवर कानाला सुखावतो. हा ध्वनीही नादमय भासतो .निसर्ग.... सर्व ध्वनी ...कोलाहल त्याच्या गर्भात सामावून त्याचा स्वनिर्मित ताल निर्माण करतो .

        पक्ष्यांचे ध्वनी कुठल्याही लिपीत व्यक्त करता येत नाहीत. किकांना मात्र त्यांची भाषा समजते .ते चक्क त्यांच्याशी त्यांच्या भाषेतून संवाद साधतात.किका म्हणजे किरण पुरंदरे...."सखा नागझि रा "चे लेखक. आम्ही सिमेंटच्या जंगलातील माणसं....माॅल,होटेल,सिनेमा ,पार्टी हे आमच्या जि वनाचे घटक.अन या घटकाभोवतीच फिरत असतं आयुष्य. एकरेषिय ... एखाद्या वेळेस निघतोही निसर्गा कडे ....मग पाहीला पाहीला म्हणून ओठाचे चंबू करुन आपलेच काढलेले फोटो. मोबाईल मध्ये बंदिस्त करुन परततोही ..निसर्गाचा पुर्ण आस्वाद न घेता.

    आपला परीघ विस्तारण्यासाठी आणि हे सर्व अनुभवण्यासाठी तुम्हाला जंगलातच जाव लागेल. त्यासाठी वेगळीच आसक्ती लागते.या आसक्तीमुळेच पुण्यातील एक जोडपं सर्व भौतिक सुखाचा त्याग करुन नागझिरयाच्या जंगलात स्थायिक झालं.जंगलाच्या प्रेमातच पडल.कारण हे सर्व स्वत: अनुभवण ही एक वेगळीच अनुभूती असते.निसर्गाच्या समीप राहू पाहनार्या आरतीने हा सुंदर निसर्ग टिपला आहे तितक्याच स्वमग्नतेने....तन्मयतेने..तिच निसर्गप्रेम तिच्या कवितांतून व्यक्त होतच असतं.... ते तितक्याच सहजतेने कॅमेरयातूनही चित्रीत होतं.

     निसर्गाच नितळ स्वरुप साध्या मोबाईल /कॅमेर्यातही सुंदर येत.याचं कारण त्याला शहराच्या प्रदुषणाची न झालेली लागण. विषाणू संसर्ग वैगरे शहरी चोचले आहेत.निसर्ग आपल्या मस्तीत मस्त असतो.निसर्गाला सजवाव लागत नाही.तो नव्या नवरीसारखा विविध अलंकार लेऊन नेहमीच नटलेला असतो.फक्त क्लोजप ,झूम साठी तुम्हाला महागडया सामग्रीची अवश्यकता भासेल. आणि केवळ हे सर्व असल म्हणजे तुमच्या फ्रेम मधून तुम्ही निसर्ग समोरच्याच्या मनावर ठसवू शकता असही नाही.त्याकरता वेगळ्या परिप्रेष्यातून निसर्गाकडे पहाव लागत .वेगळी दृष्टी लागते.हे सर्व आरतीकडे आहे. ती तिच्या फ्रेम्समधून एक कहाणी निर्माण करते. सुरवातीला निसर्गातील स्तब्धता, मग पक्षांची भाषा, पाणथळीची जागा अशा चौकटीतून निसर्ग हळुवार उलगडत जाते. संयतपणे ..

     पाखरांचे आवाज ऐकायचे तर झाडे लावायला हवी.शहरात झाडांची अडचण होते . निसर्गाच्या प्रेमात आकंठ बुडालेले किका...त्यांची पत्नी...किती उत्साहाने भारल्यासारखे वाटतायेत....लहान मुलांच्या संगतीने टवटवीत...जागतिक वन दिनाच्या निमीत्ताने ही फिल्म तुमच्या भेटीला आलीय. जंगलात जाता ंनाही आल तर निदान फिल्म मधून निसर्ग अनुभवा ...या फिल्म मधून तुम्हाला किका,जंगल याची जास्त माहिती मिळेल.

      झाड माणसासारखी वाटली तर त्यांच्याशी बोला...त्यांना जपा बाळासारख....वन दिनाच्या निमीत्ताने एवढच सांगेन...
माझ्या कवितेतील काही ओळी...

बाळ झोपत तसं रात्री झाड झोपतं ,
असं एक वेडी म्हातारी म्हणायची...

असं कुठे असतं का राव ,एक शहरी सुज्ञ
माणसासारखीच पानाफुलांना जपायची.....
तुम्हाला एक गुपित सांगतो..
tree gives oxygen ,
म्हणजे झाडे प्राणवायू देतात..
म्हातारीला झाड म्हणजे बाळ हेच ठावुक...
पण तुम्हाला इंग्लिशच पटकन कळत म्हणून थोडं झाडलं..

आता ती म्हातारी राहिली नाही...
आणि तिला बाळासारखी वाटणारी झाड सूध्दा..
बघा तुम्हाला पटलं तर..
झाडसुध्दा माणूस वाटलं तर..

नाही वाटलं तर काही नाही ..
त्या झाडाच काही म्हणण नाही ..
ते उगवेल तुम्ही पेरल तर..
ते मरेल तुम्ही तोडल तर  ..

आणि कशाला हवी सावली..
तुम्ही शाणी माणस चार बुकं शिकलेली ..
म्हणाल एसी आहे की...
म्हणाल विकास आहे की...
येडीच आहे हो म्हातारी..
मग ठिक ठरलं तर ...
द्या टाकून  ते  म्हातारीचं येडेपण .,
निदान 
झाड  म्हणजे प्राणवायू हे पटत नाही...
श्वास अवरोधीत होत नाहीत तोपर्यंत थोडं थांबू आणि पाहू...
खरोखरचं बाळ रडले तर...खरोखरचं श्वास उरले तर...



संदर्भ.
1) नागझिरयाची प्रेमकथा आरती कुलकर्णी यांची फिल्म
https://www.youtube.com/watch?v=KbZPDTA79Vc&t=4s








No comments:

Post a Comment