“भाषा” म्हणजे केवळ शब्द नव्हे, भाषा म्हणजे भाव. हा भाव
शब्दात ओतला तर समोरच्याच्या हृदयापर्यंत पोहचता येतं, हे त्यांचेच बोल आहेत “बोलु
ऐसे बोल” या त्रिमुत्री प्रांगण कार्यक्रमातील.गद्यातही
नाद, ताल, लय असते हे या कार्यक्रमात पहिल्यांदा आम्हा सर्वांनीच अनुभवले. बोलायचं पण कसं, शब्दांना फुलवत.
अनघाताई यांच्या निवेदनात एक वाक्य अनेकदा
असतं “दु:खालाही चिमटीमध्ये धरता येतं आणि त्याचं फुलपाखरू करता येतं”. मी निवदेन
करताना त्या थोडा बदल केला “भाषेलाही चिमटीमध्ये धरता येतं, अन त्याचे फुलपाखरू
करता येते”. मी ठरवलं या दु:खाला बाजूलाच ठेवायचं कारण अनघाताईंच्या म्हणण्याप्रमाणे
दु:खाची तमा का बाळगावी, जे काही माझ्या वाट्याला येणार आहे ते श्रीकृष्णाच्या
स्पर्शाने पावन होणार आहे.
त्या दिवशी माझ्यात एवढी सकारात्मक ऊर्जा कोठून
आली होती याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही. तो ताईच्या सकारात्मक
ऊर्जेचा (Aura) चा परिणाम असावा नाहीतर मंचावर बोलण्याचा मला फारसा
सराव नाही. अनघाताईंचा स्वभाव प्रेमळ आणि लाघवी. तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलायला
सुरुवात केल्यानंतर चुंबकासारखे ओढले जाता. त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व, नव्याचा
अनुभव घेण्याचा उत्साह, पहिल्याच भेटीत छाप पाडणे हे सर्व मला वाटते त्यांच्या राशीचा प्रभाव
असावा.(Taurus) परंतु सर्व श्रेय राशीला दिल्यास त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा, आत्मशोधाचा
अवमान ठरेल.
“हे कुठले रंग अवकाशी अवतरले
ते तर माझ्या अंतरंगी वसले.....
काळसर्प रोज वाटेवरी........
निळस्पर्शाने पावन सारे........”
वरील
काव्यपंक्तीत व्यक्त होणारा सकारात्मक दृष्टीकोन अनघाताईंच्या जगण्यात दिसून येतो.
अनघाताई येणाऱ्या कोणत्याही क्षणाला
सहजतेने सामोऱ्या जातात कारण त्यांना पक्की खात्री आहे, सर्व श्रीकृष्णाच्या स्पर्शाने पावन होणार आहे. डॉ.
उदय निडगुडकरांबरोबरची ती मुलाखत मी पाहिली होती. शब्द न शब्द टिपला होता. अशीच
सकारात्मक ऊर्जा होती. हळूहळू जीवनाचा प्रवास त्या उलगडत होत्या. निसर्ग/देव जो
कोणी असेल तो, त्याने डेंग्यूच्या आजाराचं निमित्त करून या चैतन्यदायी मुलीच्या जीवनातील
प्रकाशाची वाट का अडवली? त्यातून सावरते न सावरते तर तिचा भक्कम
आधार....पितृछत्र का हिरावून घेतले? याची उत्तरे कदाचित सापडणार नाहीत.
कृष्णविवराच्या या गर्तेत सामान्यांची जीवननौका दिशाहीन
झाली असती, परंतु तिच्या गुरूंनी मंत्र दिला, “बाहेर बरचं पाहिलस, आता आत डोकावून बघ .” ती ध्यानस्थ झाली. या अंधारातून तिला प्रकाशाची वाट सापडली आणि त्या वाटेवर
तिचा प्रवास सुरू आहे. हा प्रवास त्यांनी उलगडला आहे, काही दृकश्राव्य फितीत. तो
त्यांच्याच शब्दात पहाणे आणि ऐकणे हा एक आनंददायी अनुभव आहे. तुम्ही आयुष्यात
निराश झाला असाल आणि दिशा सापडत नसेल तर हे व्हिडीओ जरूर पहा. तुम्हाला एक नवी
दिशा नक्की सापडेल. ( त्यांचे कार्यक्षेत्र इतके अचंबित करणारे आहे की त्याची
स्वतंत्र माहिती खाली दिली आहे.)
*********************************************
नाव : अनघा प्रदीप मोडक,
जन्म तारीख : 17 मे
ठिकाण : विलेपार्ले
शिक्षण : 1) जनसंज्ञापन
व वृत्तपत्रविद्या यात पदव्युत्तर पदवी (पुणे विद्यापीठ)
2) मराठी साहित्य,
कला शाखा पदवी (मुंबई विद्यापीठ)
3) गायनाच्या तीन
परीक्षा उत्तीर्ण (गांधर्व महाविद्यालय)
4) नाट्यशास्त्र
पदविका (अस्मिता चित्र अकॅडमी)
5) छायाचित्रण
पदविका
भाषा ज्ञान : मराठी , हिंदी,
इंग्रजी, गुजराती
कार्यक्षेत्रे : 1) “माझा संघर्ष आणि
मी”या कार्यक्रमाची मुलाखातकार (एबीपी माझा)
2) रेडिओ जॉकी
(आकाशवाणी मुंबई केंद्राच्या 100.1 एफ.एम. गोल्ड वाहिनी)
3) निवेदिका,
श्राव्य मालिकांसाठी आवाज, अभिवाचन, सूत्रसंचालन
(आकाशवाणी अस्मिता वाहिनी)
4) अनेकविध
संस्थांसाठी त्यांच्या अपेक्षेनुसार संकल्पानांचे आरेखन, निर्मिती संहिता लेखन
5) शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक संस्थांसाठी
आवाज, कला व आवाजशास्त्र मार्गदर्शक
व्याख्याने : 1) गुणांकित सावरकर
(सावरकरांच्या चरित्राचा गुणात्मक आढावा)
2) पाऊस गप्पा
(पावसाचा विविध पात्रांशी संवाद)
3) बोलू ऐसे बोल (संवादाचे महत्व व
वैशिष्ट्ये)
4) ज्ञानियांचा विज्ञानु
(अध्यात्मातील विज्ञान)
5) जीना इसीका
नाम है (विविध क्षेत्रातील ध्यासांचा उलगडा)
इतर अनुभव : पुरस्कार विजेत्या
माहितीपटासाठी संहिता लेखन, पार्श्वनिवेदन, ज्ञानप्रबोधिनी छात्रप्रबोधन
मासिकाच्या सहसंपादिका, व्हॉईस ओव्हर इत्यादी
मुलाखतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर,
पं. सुरेश वाडकर, डॉ. सलील कुलकर्णी, वैशाली सामंत इत्यादी मान्यवरांच्या मुलाखती
निवेदक : सुरेश खरे, कमलेश
भडकमकर, प्रथमेश लघाटे, इत्यादी अनेक मान्यवर कलाकरांसोबत निवेदक
पुरस्कार : 1) जनगौरव पुरस्कार-2018
(जनसेवा समिती विलेपार्ले)
2) राज्यस्तरीय
कर्तृत्वान व्यावसायिक, गुणवत्ता, कलाक्षेत्र पुरस्कार-2018 (रोटरी क्लब, पुणे)
3) चेंजमेकर
पुरस्कार - 2016 (महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स)
4) व्हि. जी.
कानिटकर राज्यस्तरीय संहिता लेखन पुरस्कार
5) यंग अचिव्हर पुरस्कार
- 2016 (ऋतुजा फाऊंडेशन)
No comments:
Post a Comment