Monday, 20 November 2017

पती गेले ग काठेवाडी

                   


          हर्बेरियमची संकल्पना , नवीन पिढीला आपल्या गतवैभवाचं आकलन व्हावं म्हणून सुनील बर्वे यांनी आणली . हर्बेरियमच्या पहिल्या पर्वात या अगोदर पाच नाटक(सूर्याची पिल्ले , लहानपण देगा देवा , आंधळं दळतंय , हमीदाबाईची कोठडी , झोपी गेलेला जागा झाला ) प्रदर्शित झाली आहेत . . दुसऱ्या पर्वातील "पती गेले ग काठेवाडी" हे पाहिलं नाटक आहे . याचे  वैशिट्य म्हणजे ते व्यंकटेश माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले नाटक आहे . हर्बेरियमच्या माध्यमातून जुन्या अभिजात नाटकांची  नव्या पिढीला ओळख व्हावी   म्हणून आजच्या पिढीसमोर त्याचे नव्या स्वरूपात सादरीकरण करण्याचा एक  स्तुत्य प्रयत्न यातून करण्यात येत आहे .
                
             अनेक यशस्वी नाटकांचा गाभा  पती , पत्नी , संशय हि त्रिसूत्री आहे . या सूत्रावर आधारित  बहुरंगी नाटके वेगवेगळ्या सादरीकरणातून प्रदर्शित झाली आहेत .पुरुषी मानसिकता , स्त्रीला ग्राह्य धरण्याची वृत्ती या अर्वाचीन गुणसूत्राचा वापर करून विनोदी , गंभीर अनेक नाटके आजवर प्रदर्शित झाली आहेत . आजच्या वेगवान कार्यशैलीचा काळात तीन अंकी नाटक सादर करणे धाडसाचेच म्हणावे लागेल . अर्थात त्या निमित्ताने व्यंकटेश माडगूळकरांसारख्या प्रतिभावंत साहित्यकाची ओळख होणे हे अहोभाग्य आहे . तरुण पिढी साहित्य वाचत नाही , नाटक पाहत नाही हा आक्षेप , या नाटकाला  तरुण वर्गाच्या   असलेल्या उत्स्फूर्त उपस्थितीने खोटा ठरतो . 

          नाटकाचा संदर्भ पेशवेकालीन आहे . पेशव्यांच्या राज्यातील एक सरदार राज्याचा महसूल वसूल करण्यासाठी काठेवाडाला जाणार असतात . विवाहित पुरुषाची परदेशवारी आणि मागे उरणारा संशय या एकमेकास पूरक घटकांभोवती नाटकाची कथा प्रभावीपणे गुंफण्यात आली  आहे . नायक  जाताना नायिकेला तीन अटी  घालतो .नायिकेने त्याच्यासाठी आरसे महाल बनवावा पण त्यासाठी खर्च उपलब्ध होणार  नाही , त्यास  दुसरी पत्नी आणावी , तो परदेशी असताना तिने अपत्यसुख द्यावे .

                 नायकाची दुसरी व तिसरी अट विचित्र असली असली तरी दुसऱ्या अटीत   पुरुषी लालसा  ठळकपणे जाणवते . तिसऱ्या अटीत सुप्तपणे तो नायिकेला  तिचे पावित्र्य राखण्याचे आवाहन करत असतो  . पुरुष त्याला जे हवं ते चतुराईने प्राप्त  करतो  अन नको त्याला थेट  विरोध न करता विचित्र अटीत जखडून टाकतो कारण त्याला  उदार मनाची आभासी छापही  पाडायची  असते . परंतु, नायिका केवळ सुंदर  नसून चतुर  आहे .   नायकाचा सुप्तहेतू  न ओळखण्याइतकी ती  दूधखुळी नसते . ती त्याला प्रतिआव्हान करत   त्याच्या जिरेटोपात एक गजरा गुंफते व हमी देते की  , तिचे  पावित्र्य जोपर्यंत अबाधित आहे तोपर्यंत त्या  गजऱ्याचा सुवास दरवळत राहील . तिच्या पातिव्रात्य धर्माचा   थोडा जरी भंग झाला तर गजऱ्याचा सुवास कोमेजेल .

            दुसरीकडे , काठेवाडाचा राजा गजऱ्याच्या   अखंडित सुवासाने संभ्रमित आहे . तो केवळ गजरा  नसून त्या सरदाराचे नैतिक बळ आहे , हे तो ओळखून असतो . सरदाराचे नैतिक खच्चीकरण करण्यासाठी  नायिकेला परपुरुषाच्या मोहाला बळी पाडणे आवश्यक असते . या कामगिरीसाठी   तो आपल्या एका उमद्या व्यक्तिमत्वाच्या दिवाणाला  पाठवतो.

         नाटकाचे सूत्रसंचालन  "सूत्रधार " व "शाहीर  " करतात . शास्त्रीय संगीत , लोकसंगीत, काठेवाडी संगीत  याचा खुबीने नाटकात वापर करण्यात आला आहे . सिद्धेश जाधव या हरहुन्नरी कलाकाराने  पोवाडा , काठेवाडी संगीताच्या  बाजाचा लहेजा अचूकपणे साधला आहे . एका मातीतील संगीतातून दुसऱ्या मातीतील संगीतात प्रवेश करणे , एका आत्म्यातून दुसऱ्या आत्म्यात प्रवेश करण्याइतके अवघड आहे. कारण भिन्न उच्चारांचा  आब  सांभाळणे तशी कर्मकठीण गोष्ट परंतु या कलाकाराच्या दोन्ही भाषांतील उच्चारावरील  प्रभावी नियंत्रणामुळे  संगीतातील मूळ गाभ्याला जराही ठेच पोहचत नाही .  तर म्हसकर याच शास्त्रीय गायन या  गायिकीला  सुंदर कोंदण आहे . त्याचा मृदू आवाज एक संयत  भाव निर्माण करतो . त्याची गायनातील  परिपक्वता अचंबित करणारी आहे .

       कलाकारांच्या अचूक निवडीला दाद द्यावी लागेल . रंगेल सरदार , काठेवाडाचा गोलमटोल राजा , त्याचा भारदस्त दिवाण, सुंदर व चतुर राणी , तिची सुंदर दासी .  एकूणच नाटकातील  व्यक्तिमत्वाच्या गाभ्यात शिरून खोलपणे केलेल्या विचारांचा परिपाक , सूक्ष्म निरीक्षण निवडीमागे असल्यामुळे सर्व कलाकार कुठेही कृत्रिम वाटत नाहीत . हे सर्वच कलाकार प्रथितयश व व्यावसायिक असल्यामुळे अजून काय सांगावे . निखिल  रत्नपारखींचा राजा तुम्हाला हसवून लोटपोट करतो  .किंबुहना त्याचे व्यक्तिमत्व खोडकर , मिश्किल  असल्यमुळे तो या भूमिकेत चपखल बसतो . एका प्रसंगात तो सरदार येणार व आपले बिंग फुटेल या भीतीने  खुर्चीमागे लपून बसतो . तितक्यात सरदार येतो ,  लपलेल्या काठेवाडच्या राजाला हे माहित नसल्यामुळे तो त्यालाही लपायला सांगतो . हा प्रसंग तुमची  हसवून,  हसवून   मुरकुंडी वळवेल  याची खात्री देतो . या प्रसंगातील सादरीकरणाची कल्पकता काबिले तारीफ आहे . असे अनेक खुमासदार प्रसंग नाटकात आहेत जे तुम्हाला आतून हसवतात . माडगूळकरांच्या अभिजात साहित्याचा परिसस्पर्श तुमचा अनुभव समृद्ध करते .

            आपले पावित्र्य जपण्यासाठी नायिका  दासीला परपुरुषाकडे का समर्पित करते ? तिची ही भूमिका   स्वार्थी वाटत असली  तरी माडगूळकरांना यातून , सत्ता आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे तर सुचवायचे नसेल ना ? नायिका शेवटी पुरुषी मानसिकतेची चिरफाड करत असताना तिला तो तिला पारंपरिक पावित्र्याच्या कल्पनेतून लटके समर्थन देण्याचा प्रयत्न करतो . नायक एका क्षणी मोहाच्या आहारी जातो .  इथे नायिका त्याची कानउघाडणी करेल असे वाटते . इतिहासकालीन संदर्भ व स्त्रीला असलेली मर्यादित मोकळीक लक्षात घेता एकदम आधुनिक विचारांचा पुरस्कार न करता ,लेखक नायिकेला  आहे त्या परिस्थितीला स्वीकारण्यास भाग पाडतो  .तरी तिच्या मनातील घुसमट स्पष्ट होते . आपल्या मनातील घुसमट व्यक्त करण्यासाठी ,  एक प्रश्न विचारण्याची तिला मुभा मिळते .तो प्रश्न कोणता ? दिवाण त्याच्या कार्यात  यशस्वी  होतो का ? नायिका अटी पूर्ण करते का ? अश्या  अनेक प्रश्नांच्या उत्तराची उत्सुकता तुम्हाला लागली असेल  तर त्याच्या उत्तरासाठी नाटक  प्रत्यक्ष रंगमंचावर पाहण्याची दुर्मिळ संधी ,नाटकाचे मोजकेच प्रयोग होणार असल्यामुळे असल्यामुळे   वाया घालवू  नका ,अन्यथा माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या अभिजात कलाकृतीच्या आस्वादाला मुकल्याची चुटपुट लागून राहील .


                 
                
         
                 
             

No comments:

Post a Comment