Monday, 2 April 2018

अंतिम सत्य

                       The fear of death follows from the fear of life.
                        A man who lives fully is prepared to die  at any times ......Mark Twain

                       It is not death that a man should fear ,
                        but he should fear never beginning  to live ...     Marcus Aurelius

                       Life is illusion , Death is the ultimate truth .....Unknown

                   आताचा क्षण आणि मृत्यू याला सत्य म्हणता येईल . परंतु , अंतिम सत्य मृत्यूचं आहे याबाबत कुणाचाही विसंवाद नसावा . ही  मृत्यूची चाहूल , सत्यता जीवनाची अधिक वास्तववादी अनुभूती  देते . एखाद्याचं नसणं आणि मृत्यू यात फारसा फरक नाही . त्याचं अस्तित्व फक्त असण्याची जाणीव देते एवढंच . निद्रावस्था ही  नसण्याचीच अवस्था आहे परंतु ती अंतिम नाही किमान काही काळापर्यन्त , चिरकाल निद्रा घेण्याच्या काळापर्यन्त ! जगणं आणि मृत्यु या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं काही विचारवंतांनी नमूद केलंय .  जगण्याच्या अनंत , अमर्याद  विस्ताराने मनुष्य कायमच भयभीत राहिला आहे. भीतीच दुसरं कारण म्हणजे जगण्यातील अनिश्चितता आणि मृत्यूची निश्चितता .

                कुणाचा झोपेत मृत्यू , कुणाचा आनंदाच्या उच्च क्षणाला मृत्यू, कुणाचा काही किरकोळ कारणामुळे मृत्यू . कालच एका चौदा वर्षाचा  मुलगा  कबड्डी खेळता खेळता मृत्यूच्या पकडीनं त्याच्या स्वाधीन झाला . हे छोटे छोटे क्षण आयुष्याच्या क्षणभंगुरतेची तीव्रतेनं आठवण करून देतात  आणि मग सुरु होतो आयुष्याचे क्षण अधाशीपणे ओरबाडण्याचा उत्सव . जगणे जगण्याचा उत्सव . मनुष्य आशावादी आहे त्याचा भविष्यावर विश्वास आहे त्यामुळे तो कायम भविष्याचे नियोजन करत असतो . परंतु मृत्यू भविष्याची संधीच देत नाही . हेच कारण असावं माणसाच्या भीतीच , अस्वस्थतेचं . माणसाचा आशावादामुळे तो असा जगतो कि , कधी मरणारच नाही . त्याच्या भीतीमुळे तो असा मरतो की कधी जगलाच नाही .  

                अनेक दिगज्जांनी मृत्यूची चाहूल लागल्यावर जीवनाच्या क्षणभंगुरतेबाबत भाष्य केलं आहे . स्टिव्ह जॉब अंथरुणाला खिळला असताना त्याला जाणवलं ज्या वैभवाच्या तो आयुष्यभर पाठी लागला ते वैभव त्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकत नाही . अनेक यशस्वी माणसं मृत्यूच्या चाहुलीने हतबल झाली होती . स्टिफेन हॉकिन्स यांना तरुण वयातच मृत्यूची चाहूल लागली होती . मृत्यू अंतिम सत्य असल्यामुळे,  आताचा क्षण उत्स्फूर्तपणे जगणं आणि मृत्यूला काही काळ थोपवणंयाशिवाय दुसरा पर्याय नाही याची  जाणीव त्यांना झाली होती . त्यांनी लाभलेल्या क्षणाचं अक्षरशः अमूल्य अशा ज्ञानात रूपांतर केलं . प्रत्यकाने आता हे ठरवायचं आहे कि त्यांना लाभलेल्या क्षणांचं  काय करायचं ? जगणं त्याच्या चैतन्यासह जगायचं कि जगण्याच्या विवंचनेत जगणंच  क्लेशदायक करायचं .

          मृत्यूचं अंतिम सत्य माणसाला कायम भयभीत करतं  . या अंतिम सत्यावर जरी मात करण्यास मनुष्य यशस्वी झाला तरी जीवनाच्या  त्याचत्याचपणामुळे तो कंटाळून जाईल . कदाचित त्याची अवस्था ययाती सारखी होईल .मृत्यूचं नाही म्हटल्यावर अस्वस्थता, अनिश्चितता  नाही . मग जीवनाबद्दल आसक्ती कशी निर्माण होणार?या अंतिम सत्याची जाणीवच जीवनाला एका वेगळ्या परिप्रेष्यातून बघण्यास प्रवृत्त करते .  मृत्यूची जाणीव आणि जीवनाची आसक्ती माणसास त्याच्यापरीने आयुष्य जगण्यास प्रवृत्त करते . निसर्गाने जी मृत्यूची मांडणी केली आहे ती फार विचारपूर्वक केली असणार .

    "  हर्क्युलस "  या चित्रपटात एक योद्धा मृत्यूस कवटाळण्यास सतत आतुर असतो . तो क्षण निसटला की , तो म्हणतो , हि माझी वेळ नाही . मग तो पूर्ण त्वेषाने शत्रूवर तुटून पडतो कारण त्याच्यात निर्माण झालेला एक दृढ आत्मविश्वास  ... काळावर मात करणारा विश्वास . आयुष्य असंच असावं , अशा प्रसंगातून जे जातात  ते आयुष्यभर असेच तुटून पडतात जगण्यावर .आपआपल्या परीनं . कुणी पर्यटनाला निघतात , कुणी छंद जोपासायला घेतात, कुणी माणसांवर प्रेम करायला शिकतात .   मृत्यू हे अंतिम सत्य आहे म्हटल्यावर त्याचे गूढ अर्थ शोधण्यात वेळ घालवणे व्यर्थ आहे असं मला वाटतं . आहे तो क्षण सत्य आणि मृत्यू अंतिम सत्य आहे ,  याची पक्की खूणगाठ मनाशी बसल्यावर आहे त्या क्षणांवर आपण भरभरून प्रेम करू शकू  आणि अंतिम सत्याला काही काळ निश्चित हुलकावणी देत आपल्याला लाभलेल्या   क्षणांचं खरोखर "जगणं " शिकू शकू . मृत्यूचं भय कमी करण्यासाठी वर्तमान क्षण आसक्तीन जगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही .


No comments:

Post a Comment