Saturday, 1 August 2015

नाटकाचे प्रेक्षक

                     नाटक पाहण्यासाठी तीन प्रकारची माणसे  येतात . नाटकाचा   आनंद लुटण्यासाठी आलेले , आपणास नाटकाची किती  आवड आहे व आपण किती अभिरुचीसंपन्न आहोत हे दाखवण्यासाठी आलेले, वेळ घालवण्यासाठी आलेले व  फुकटे . 

           यातील पहिला प्रकार,  पूर्णपणे रंगमंचाच्या अवकाशात तादान्म्य पावलेला असतो. इतरांच्या  दृष्टीने एक कामातून गेलेला जो माणूस असतो तो हा . 

         दुसरा प्रकार , आम्ही  किती नाटकवेडे आहोत हे एखाद्यास सारखे सांगत असतात , तसेच ते "अभिरुचीसंपन्न" असल्यामुळे सभागृहात इतर प्रेक्षकांना त्रास होऊ नये म्हणून कुजबुजत्या आवाजात सौजन्य राखून मोबाइलवर अविरत माहिती देण्याचे कार्य ठराविक अंतराच्या कालावधीनंतर करत असतात.  

         तिसरा प्रकार,  फार चुळबुळ करत असतो. आज नाटकगृहात तरुण प्रेक्षकांची फार वानवा असते .सर्वात त्रासदायक म्हणजे फुकटे . मामा वरेरकरांपासून यांच्यावर अद्याप उपाय शोधत आलेला नाही.  यांची मान डावीकडून उजवीकडे आणि उलट , एक  विशिष्ट झटका देत ठराविक काळाने त्रिभुवन संचार करत असते . हे कोणत्याही वेळेला येऊ शकतात . हे अपरिहार्य आणि ईमानी  प्रेक्षक असतात .

     नाटकाला येणारा प्रेक्षक सर्वसाधारणत: "सुशिक्षित " , "अभिरुचीसंपन्न" असतो . असे असतानाही,  नाटक सुरु होण्यापूर्वी शांतता राखा , मोबाईल बंद करा असे आवाहन प्रत्येक प्रयोगादरम्यान  करावे लागतेच  . त्यातून काही विनोदाचे प्रसंग ही निर्माण होतात . "प्रपोझल" या नाटकादरम्यान,  नाटकाचा नायक खूप कळकळीने शांतता राखण्याचे आवाहन करत असताना  त्याच्याकडून अनवाधानाने , " आपले मोबाइल व लहान मुले बंद करून बॅगेत ठेवावेत" असे वाक्य उच्चारले गेले . प्रेक्षक या विधानावर हसले व नायकाची कळकळ बॅगेत  ठेवून  विसावले. काही वेळाच्या अंतराने चिकनी चमेली ,कोंबडी पळाली  अशा रिंगटोनबरोबरच काही अध्यात्मिक रिंगटोनही, नायकाची कळकळ बॅगेत   ठेवून   नाटकाला प्ले बॅक संगीत देण्याचा प्रयत्न निष्पाप बुद्धीने करू लागल्या . नायक काय करणार?  नाटक सुरु असताना तिथून उडी तर मारू शकत नाही . . .  

              दुसरा प्रसंग  "समुद्र" नाटकादरम्यानचा आठवतो आहे . एक आजी बाई , त्यांची मुलगी बाजूला बसल्या होत्या . इतरांना त्रास होऊ नये या उदात्त भावनेने मुखबंद भावमुद्रेत वेफरचे चर्वण चालले होते .  तरुण वर्ग जवळ जवळ नव्हताच . डोळ्यात काहीतरी गेल्यामुळे डोळ्यातून पाणी येत होते . आजीबाई नाटक बघायच सोडून माझच निरीक्षण करू लागल्या , तेही कानाजवळ वेफर ची  "सौम्य" कुरकुर  करत . खूप अवघडल्यासारख झालं… आता ही आजी खांद्यावर डोक घेऊन थोपटतेय की  काय अशी भीती वाटू लागली . मी एक नाराजीचा कटाक्ष फेकला परंतु परिपक्व आजीवर त्याचा काही परिणाम झाला नाही . 

         नाटक सुरु होण्यापूर्वी , मध्यंतरात कलाकारांना भेटू नये अशी विनंती केलेली असते . त्या विनंतीचा "मान"  राखत काही प्रेक्षक "आपल्यासाठी नाही ते , आपण भेटू शकतो" असे म्हणत भेटणे हे परम कर्तव्य असल्यासारखी पूर्तता करतातच . कलावंतांचा हा व्यवसाय आहे . काम आहे . ते  नाटकाच्या पुढच्या भागाच्या तयारीत व्यग्र असतील, त्यांच्या कामात व्यत्यय  नको हे किमान भान का राखल जात नाही? 

        नाटकादारम्यान   असे आनंदाचा भंग करणारे प्रसंग घडत असतात आणि नाटकाचा आनंद लुटायला आलेला प्रेक्षक खट्टू होतो . याबाबत अधिक विस्ताराने लिहून काही साध्य होणार नाही . काही चमत्कार घडेल अशी आशा करूया .   सुज्ञास अजून काय सांगावे … 
             

1 comment: