कोरड्या हाता कवेत घ्यावे
आभाळास नाही माया
अश्रूही निबर त्याचे इतके
न ओघळती दिलासा द्याया
काय त्याचा रुसवा असा
का जीवघेणा अबोला
कसणाऱ्या हातांनाही
का त्याचा दुरावा
जमिनीेस भेगा अगणित
थंड कोरडेपणाने तुझ्या
मनात खोल जखमा
विरल्या आशा माझ्या
भंगली स्वप्ने माझी
भकास निष्ठुर आकाशात
कसा फुलावा फुलोरा
माझ्या छोट्याश्या अंगणात
अश्रूही न उरले
शिंपण्यास बियाणे
तूच माय तूच बाप
तरी का फटकारणे
विठ्ठलास काय घेणे
मलाच माझे मरणे
कोरड्या एकल्या जमिनीत
माझेच व्हावे बियाणे
No comments:
Post a Comment