Saturday, 30 January 2016

मराठीतील अनुस्वार एक गोंधळ


                अलीकडील मराठी पुस्तके वाचत असताना त्यात जागोजागी पेरलेले अनुस्वांर पाहून गोंधळ वाढू लागला आहे. उदा. त्यान उभ केल. या वाक्यात अन्यथा मी अनुस्वार देण्याचा विचारही केला नसता कारण या वाक्यातून मला पुरेसा अर्थ स्पष्ट होतो. पुस्तकातील वाक्यात प्रत्येक शब्दावर अनुस्वार होता म्हणजे वरील वाक्य अस होत - त्यानं उभं केलं
           आता या शब्दांवर अनुस्वार का हवा, याचा मला प्रश्न पडला. आतापर्यंत केवळ सवयीने अनुस्वार देत असल्यामुळे विशेष समस्या जाणवली नाही. कुतूहल म्हणून व्याकरणाच पुस्तक उघडल. त्याअगोदर सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे व्याकरणाच्या सुलभतेबाबत. व्याकरण सुलभ असेल तर त्याची गोडी सर्व स्तरात वाढेल
          भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या विद्वान लेखकांनी ऱ्हस्व-दीर्घ बाबत काही बदल सुचवले होते. त्यावरही बरीच टीका झाली. मी तितका विद्वान नसलो तरी व्याकरणाच्या समस्या अन्य सामान्य माणसांप्रमाणे मलाही जाणवत आहेत. व्याकरण सुलभ का नसाव? ते परिवर्तनशील आहे, त्यामुळे काळाबरोबर त्यात बदल केले नाहीत तर ते क्लिष्ट होईल.
          अजून एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मराठीचे व्याकरणाचे स्वतंत्र असे पुस्तक नव्हते. पहिल्यांदा जे पुस्तक लिहिण्यात आले ते एका ब्रिटीश माणसाने लिहिले आहे. त्याचे नाव विल्यम् कॅरी.
                   तर विषय होता अनुस्वाराबाबत. मो.रा.वाळंबे व अन्य मराठी व्याकरणाच्या पुस्तकात याबाबत दिलेला नियम सर्वसाधारण खालीलप्रमाणे आहे.
                खालील शब्दांवर अनुस्वार देणे आवश्यक आहे.
               १)स्पष्टोच्चारित अनुनासिकांवर
                २) अनेकवचनी नाम, सर्वनाम यांच्या सामान्यरुपावर. . 

                काही अनुस्वारांचा उच्चार स्पष्टपणे होतो. उदा.कांदा, जांभा इ.अशा शब्दांबाबत विशेष समस्या जाणवत नाही. परंतु अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट असेल तर मात्र संशोधन कार्य सुरु करावे लागते. उदा.घरांमध्ये या शब्दातील घर हे सामान्य नाम आहे. त्यामुळे त्याचे अनेकवचन होताना त्यावर वरील नियमाप्रमाणे अनुस्वार आला आहे

              सामान्यनाम असल्यास वरील नियम सहजरित्या वापरता येतो. या व्यतिरिक्त अन्य शब्दांवर अनुस्वार आल्यास गोंधळ वाढतो. पूर्वी काही शब्दांवर परंपरा म्हणून अनुस्वार देण्यात येत होते. उदा.लांकूड, केंस. तर पूर्वीच्या नियमानुसार नपुसकलिंगी नामाचे शेवटचे अक्षर इ,,ए असेल तर अनुस्वार देण्याबाबत नियम होता. उदा.केळीं,घरें इ. तसेच अन्यही काही नियम होते, त्यानुसार अनुस्वार देण्यात येत होता. यातील क्लिष्टता लक्षात घेऊन हे नियम बदलण्यात येऊन वरीलप्रमाणे सुटसुटीत नियम करण्यात आला आहे.

      वरील नियमातील प्रथम अनुनासिके आपण पाहू या.
ङ्, ञ्, ण्, न्, म् हे वर्ण प्रकारातील स्पर्श या वर्गवारीतील आहेत.

       उच्चार अनुनासिकेतून होतोय याचे आकलन सहजरित्या होणे तसे अवघडच आहे. आपण सामान्यत: सरावाने लिहित असल्यामुळे याकडे दुर्लक्ष करतो परंतु व्याकरणाचा प्रश्न उपस्थित झाल्यावर त्याकडे लक्ष दयाव लागत. पुस्तकातील अनुस्वाराचे निरिक्षण करत असता , वरील नियमानुसार ते आवश्यक आहेत का किंवा अनुस्वार नसले तर वाक्याच्या अर्थात काही फरक पडणार आहे का? हे तपासणे आवश्यक वाटते. अन्यथा अनुस्वारांच्या नियमात गुरफटून भाषेची भीती अनाठायी वाढत जाते. 

      व्याकरणाच्या क्लिष्ट नियमांत भाषेची वाढ खुंटू नये याच कळकळीने प्रस्तुत लेख लिहिला आहे. वाक्याचा अर्थ बदलणार नाही एवढे वाजवी व आवश्यक नियम असावेत. मराठी भाषेचा सर्वांगीण व सर्वदूर विकास होण्यासाठी व्याकरणाची सुलभता अत्यावश्यक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. मराठी व्याकरणाचा इतिहास तपासला असता कालानुसार असे बदल घडतच आहेत व ते अत्यावश्यक आहेत. 








1 comment:

  1. छान तर्कशुद्ध विवेचन... सहमत

    ReplyDelete