"व्यक्ती आणि वल्ली " या पुस्तकातील काळाचे संदर्भ्र आज लागू होतील काय ?हे सांगता येणार नाही. परंतु या पुस्तकातून समोर येणारी व्यक्तीचित्रे मात्र निश्चितच दुर्मिळ आहेत. सर्व प्रसंगांना कामी येणाऱ्या नारायणाची जागा आता इव्हेंट मॅनेजमेंट संस्थांनी घेतली आहे. परोपकार फक्त पुस्तकातच राहिला आहे. मदर टेरेसा, बाबा आमटे अशा महान दुर्मिळ व्यक्तीमत्वांना वगळल तर समाजात खरोखर परोपकार उरला आहे का ? हे अल्लाउदीनचा दिवा घेऊन शोधाव लागेल. प्रत्येक व्यक्तीमत्व दुसऱ्यापेक्षा भिन्न असत. सूक्ष्म निरीक्षणाच्या आधारे प्रत्येक व्यक्तीमत्वातील विसंगती म्हणण्यापेक्षा वेगळेपण पु.ल.देशपांडे यांनी आपल्या अभिजात प्रतिभेने मिश्किलपणे रंगवले आहे. आपण इतक्या सूक्ष्मपणे प्रत्येक व्यक्तीमत्वातील वेगळेपण पाहतोच असे नाही किंवा पु.ल.देशपांडे यांच्या सारखी वेगळी दृष्टी न लाभल्याने अशा व्यक्तीमत्वातील केवळ वैग्युण्य पाहतो किंवा सरळ सरळ कोणत्याही व्यक्तीमत्वापासून फारकत घेतो. पु.ल.देशपांडे यांच्या पुस्तकातील व्यक्तीमत्वे वल्ली असली तरी ती एका समान धाग्याने बांधलेली आहेत, तो धागा म्हणजे इतरांप्रती असलेल नैसर्गिक प्रेम. ज्याच्यापासून आपण स्वत:हूनच फारकत घेतली आहे आणि अशा छोटया छोटया गोष्टीपासून मिळणाऱ्या आनंदाला मुकलो आहोत.
पुलंच्या पुस्तकातील पात्रे सजीव होऊन नाटय रुपाने समोर येतात. त्यांना जिवंतपणे पाहणे हा एक वेगळाच अनुभव आहे. एक एक पात्र पुलंच्या सूत्रसंचालनातून समोर येत जात. पुलंची पुस्तके अनेकांनी अनेकवेळा वाचली असतील त्यामुळे या नाटकात काय असेल हे वेगळ सांगण्याची आवश्यकता नाही. रत्नाकर मतकरी यांनी केलेले नाटयरुपांतर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन यातून पुलंची पात्रे रसरशीतपणे समोर येतात, जणू पुस्तकातून आताच उठून उभी राहिल्यासारखी . या नाटकातील बबडूची भूमिका महेश मांजरेकर साकारतात. परंतु 26 जानेवारीच्या प्रयोगाला ते त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे थोडा भ्रमनिरास झाला . त्यांच्याऐवजी काम केलेल्या प्रविण तरडे या कलावंताने भूमिकेत रंगत आणली, त्यामुळे त्यांची उणीव जाणवली नाही.
पुल यांची भाबडी व्यक्तीचित्रे हास्य फुलवतात. अशी व्यक्तीचित्रे आता फक्त्ा पुस्तकातच वाचावयास मिळतील याची खंत वाटते.
No comments:
Post a Comment