Monday, 22 February 2016

मातृभाषा

                जगात सार्वधिक बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेत मराठीची क्रवारी 15वी आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे. परंतु  आपली भाषा ज्ञानभाषा आहे काय? डॉ.प्रकाश परब यांच्या "ज्ञानभाषा होण्यासाठी" या लेखाने मी स्वत:शीच मराठी भाषेतून विविध विषयावर निर्माण झालेल्या लिखाणाचा आढावा घेऊ लागलो. फार काही गवसल नाही आपल बुध्दीनिष्ठीत ज्ञान   पुराण, संतसाहित्य, ललितलेखनाच्या पलीकडे जात नाही. या साहित्याच्या शाखा आहेत व मूठभर बुध्दीजीवी वर्ग वेगवेगळया स्वरुपात ते सादर करत आहे.

            ज्ञानभाषा  होण्यासाठी  फक्त अलंकारीक साहित्य पुरेसे नाही. जगातल्या जवळ जवळ सर्वच विषयांचा विचार व लिखाण करावे लागते. आपल्या पुर्वजांकडे ज्ञानाचे भंडार होते. परंतु ते लिखीत स्वरुपात जतन न केल्याने आपले फार मोठे नुकसान झाले आहे. आर्यभटृ यांनी पूथ्वीचा आकार इत्यादीबाबत विचार केला होता. परंतु लिखीत ज्ञान जतन न केल्याने पुढच्या पिढीला याबद्दल माहिती नव्हती.

              मातृभाषेतून एखादया विषयाचे आकलन सहजता होते, हे सर्वसाधारण सत्य आहे. आतापर्यंत विविध विषयांचा मातृभाषेत विचारच न झाल्यामुळे त्या त्या विषयातील शब्द आज उपलब्ध नाहीत.संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान याचा विचार मराठीतून करावा लागेल. लिखाण मराठीतून कराव लागेल. इंग्रजी समृध्द ज्ञानभाषा होऊ शकली कारण जगातला असा कुठलाही विषय नाही ज्याचा इंग्रजीतून विचार झालेला नाही. असे असताना चीन, जर्मन, जपान, फ्रान्स हे त्यांच्या भाषा ज्ञानभाषा म्हणून कसे विकसित करु शकले? त्यांना का नाही ज्ञानाच्या मर्यादा आल्या?

       आज एखाद सॉफ्टवेअर जपानी भाषेत विकसित होऊ शकत मग मराठीत का नाही? वैद्यकशास्त्र, न्यायशास्त्र, बांधकाम शास्त्र, अवकाश शास्त्र असे कितीतरी विषय आहेत‍.  जेे हे विषय व  मराठी जाणतात ते किमान मराठीत सादर तर करु शकतात. सुरवात तर करु शकतात. ज्ञानभाषा म्हणून एखादी भाषा  समृध्द होण्याकरीता केवळ अलंकारिक साहित्य समृध्द असण पुरेस नाही. तुम्हाला अक्षरक्ष: ज्ञानमंडाराच्या असंख्य लाटांवर स्वार व्हाव लागत.

         अलीकडे अच्युत गोडबोले सारख्या लेखकांनी विज्ञान, तंत्रज्ञान, कॉमर्स इ. विषयांचा मराठी भाषेतून परिचय करुन दिला तेव्हा जाणवल अनेक विषय मराठीतून मांडता येऊ शकतात.लक्षात घेतल पाहिजे, आज भारतातील कोणतीही प्रमुख भाषा ज्ञानभाषा नाही केवळ संवादाच्या भाषा आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिमा रे यांनीही इंग्रजीपेक्षा मातृभाषेत लिखाण करण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही भाषा ज्ञानभाषा असल्याशिवाय अधिक समृध्द होऊ शकणार नाही. आज आपण इंग्रजी, हिंदी-मराठी अशी पध्दती  स्वीकारली आहे. यात ज्ञानभाषा इंग्रजी आहे. इतर भाषेत जर मूलभूत संशोधन झाल असेल तर ते आत्मसात करुन मराठी भाषेत रुपांतरीत करण्यास काय हरकत आहेमातृभाषेत संकल्पना मांडल्यानंतर त्या आत्मसात करुन आपल्या भाषेतून विचार करणे सोपे जाते. भाषा ही  विचाराचे माध्यम आहे. ज्या भाषेत आपल्याला सहजता वाटते त्या भाषेत विचार विकसीत करने तुलनेने सुलभ होते.

          भाषा विकसित करताना व्याकरणाचा अतिरेकी हट्टाहास सोडावा लागेल. विज्ञान, वैदयक शास्त्र इ. अनेक विषयातील सोपे शब्द उपलब्ध होइपर्यंत इंग्रजीच्या शब्दांचा वापर करता येईल. आपण आपल्या भाषेतून मुलभूत संशोधनाचा विचारच केला नसल्यामुळे शब्ददारिद्र्य आले आहे. परंतु त्याचा बाऊ न करता वरील पर्यायाने काम करता येईल.जगात सर्वात अवघड समजला जाणारा सापेक्षतोचा सिध्दांत, अवघड गणितशास्त्र, अवकाश शास्त्र सुलभ मराठीत वाचता आले तर? कदाचित यातून मातृभाषेतून विचाराला चालना मिळून उद्याचे अाइन्स्टाईन निपजू शकतील.

         विधी व न्याय विषयाच उदाहरण घ्या. वकील इंग्रजी भाषेत काही युक्तीवाद करत असतो. सामान्य माणसाला हे सुध्दा कळू शकत नाही तो नेमका काय युक्तीवाद करतोय? कारण सर्व काही इंग्रजीत चालल आहे. न्याय केवळ करुन चालत नाही. न्याय झाला आहे हे स्पष्ट होण आवश्यक आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत या विषयात ज्या केवळ इंग्रजीतूनच कळू शकतील आणि मातृभाषेतून नाही?

         गणित, विज्ञान हा विषय माध्यमिक/उच्च माध्यमिक स्तरापर्यंत मराठीतून उपलब्ध आहे. परंतु उच्च शिक्षणाच काय? मूलभूत संशोधनाच काय? मराठीतून वाचल्यावर काय औषध देता येणार नाही? ऑपरेशन्स करता येणार नाही? वैद्यक शास्त्रावरील किती पुस्तक मराठी भाषेत उपलब्ध आहेत. असे अनेक विषय आहेत. थोडक्यात मला अस सांगायच आहे जगात जेवढे म्हणून विषय आहेत ते मातृभाषेत हवेत व त्याचा विचार मातृभाषेतून झाला पाहिजे. जोपर्यंत मातृभाषा ज्ञानभाषा म्हणून समृध्द करण्यास आपण पुढाकार घेणार नाही तोपर्यंत आपल्याच भाषेबद्दल असलेला न्यूनगंड गळून पडणार नाही.

No comments:

Post a Comment