Monday, 4 April 2016

"ऐसपैस गप्पा-दुर्गाबाईंशी"

                "मला जगण्याचं सुख वाटत बघ" दुर्गाबाई भागवत यांच "ऐसपैस गप्पा-दुर्गाबाईंशी" या पुस्तकातील  विधान वाचून मलाही लेखिका प्रतिमा रानडे यांच्याइतका विस्मय वाटला. जगण्याच्या अफाट अवकाशाने मनुष्य भयचकीत  होतो. अनेक गोष्टी करुनही निसर्गाच्या अफाटपणामुळे त्याला कायमच अपूर्णत्व जाणवत राहत. त्यामुळे या विधानाने उत्सुकता चाळवली . संवादातून दुर्गाबाईच्या व्यक्तिमत्वातील अव्यक्त कोपरे उलगडू लागतात . साधेपणातला  भव्य , सालस , सुसंस्कृत आकार दिसू लागतो . 

                   दुर्गाबाई भागवत यांचा जन्म सन  1910 मध्ये  कऱ्हाडे ब्राम्हण कुंटुंबात झाला. त्यांच्या भगिनी कमला सोहनी या भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ होतं. ज्या काळात शिक्षणाचा तसाही अभाव समाजात होता,  त्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे अत्यंत कर्मकठीण घटना होती. दुर्गाबाईच्या अाजोबांचा शिक्षीत मुलीशीच लग्न करण्याचा आग्रह होता. त्यामुळे दुर्गाबाईना शिक्षीत अशा आजीबाई लाभल्या.  आजीनेच त्यांच्यावर जगण्याचे, वाचनाचे,  दृष्टी व्यापक करण्याचे संस्कार केले.

           संस्कृत,पाली सह अनेक भाषामध्ये, विषयामध्ये प्राविण्य असलेल्या दुर्गाबाई जीवनाकडे नेहमी चिकित्सक नजरेने पाहतं. निसर्गातील सूक्ष्म बदल, विविधता टिपून त्याचे सुंदर रसग्रहण करण्याची निसर्गदत्त प्रतिभा त्यांच्यात उपजत होती. केवळ एखाद्या विद्वानाने  पुस्तकाचा अनुवाद केला आहे म्हणून त्यावर विसंबून राहण्याऱ्यांपैकी त्या नव्हत्या. स्वत: सखोल व विविध प्रतिप्रेष्यातून विषयाचा अभ्यास करुनच त्या आपली मतं ठामपणे नोंदवीत.

              हे पुस्तक मुलाखत स्वरुपात पाच भागात विभागलेल आहे- संस्कृतीच्या पाऊलखुणा, साहित्य चिंतन, बौध्दांचे योगदान, दुर्गाबाईचा लेखन प्रवास,  एक परमगंभीर सत्य. 

              "संस्कृती" हा शब्द संस्कृत या शब्दापासून निपजला असावा असं  मला सकृतदर्शनी वाटायचं. "संस्कृती" हा शब्द आपल्या प्राचीन साहित्यात आढळत नाही. संस्कार असा शब्द आहे त्यावरुन दुर्गाबाईनी,  संस्काराचं अभिसरण म्हणजे संस्कृती अशी  व्याख्या केली आहे. एका शब्दाच्या नेमक्या अर्थासाठी केवढं संशोधन? काय गरज आहे एवढ झोकून देण्याची? परिपूर्णतेचा ध्यास हेच त्यामागच गमकं असाव. अपूर्णतेच्या, अज्ञानाच्या डोहातून परिपूर्णतेच्या मार्गावर मार्गस्थ होण्यासाठी अधिक ज्ञान प्राप्त करुन अपरिपूर्णतेची जळमट झटकून टाकण्याशिवाय तरणोपाय नाही याच त्यांना अचूक भान  होतं.

                 "संस्कृती" ही एक व्यापक संज्ञा आहे.  चांगल्या, वाईट रिती-परंपरा आपल्या बरोबर ती पुढच्या पिढीत संक्रमीत  करत असते. भाषा, साहित्य, कला अशा अनेक विविध घटकांचा तो संगम असतो. किंबहुना असेही म्हणता येईल, समाजाच प्रतिबिंब म्हणजे संस्कृती.  विचाराच्या आदान प्रदानातुन ती अधिक प्रवाही, टोकदार होत असते. कुठल्याही गोष्टीला प्रवाहीपणा नसेल तर त्याला डबक्याच स्वरुप प्राप्त होईल. प्रवाहीपणा हे कुठल्याही संस्कृतीच्या जिवंतपणाच लक्षण आहे अस मला वाटत. बाई म्हणतात मुक्त विचार हाच संस्कृतीचा आधार आहे.   सृष्टीच्या चक्राचा तोल ढळण्याच अचूक कारण दुर्गाबाईंनी अनेक वर्षापूर्वी सांगितल आहे. निसर्गाशी तादाम्य पावण्याऐवजी त्याला ओरबाडण्यानं निसर्गाशी असलेल नात विरळ होत चाललय.

                इंडोनेशियाच्या संस्कृतीचा भाग झालेल "रामायण", लोकसाहित्यामध्ये सीतेला कृषी  देवता  म्हणून असलेले स्थान ,  अशा अनेक अनाभिज्ञ गोष्टींचा उलगडा होऊ लागतो.  व्यापकतेने रिती-परंपरा समजून घेण्याची आवश्यकता वाटू लागते.   मिथ्यकथांकडे एका वेगळया पैलूने कधी पाहिल नव्हतं. केवळ मनोरंजनापुरतं वाचन होत असतं. दुर्गाबाई समाजाची सांघिक जाणीव, संवेदना मिथ्यकथांतून प्रकट होत असतात  अस सांगतात.  हा विचार मनात आला नव्हता. मिथ्यकथा समाजाला कशा बांधून ठेवतात याच महत्व कळत .

          कृष्णाष्टमी हा दिवस आपण साजरा करतो. मणिपूरमध्ये राधाष्टमी साजरी होते. एकाच कथेचे वेगवेगळे स्वरुप पाहायला मिळतं. यातून समाजाच प्रतिबिंबच उमटत असतं. मिथ्यकथा समाजाला स्थिरता देतात, अस त्याचं म्हणण आहे. मिथ्य कथांचा वापर स्वार्थासाठी, महत्वांकांक्षेसाठी झाल्यास त्यांचे अनिष्ट परिणामही होऊ शकतात. जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी अधिक ज्ञान त्यातून सत्याच्या जवळ जाण्याचा मार्ग सापडतो.मिथ्यकथांचे संदर्भ स्थलानुसार बदलत असले तरी त्यात एक आश्चर्यकारक समान सूत्र आढळतं.‍हे समान सूत्र वैश्विकतेची भावना निर्माण करत.

          सावित्रीची कथा, वडपुजा, विठोबा-पदुबाईंची कथा, लक्ष्मीची कथा यातून एकाच रीती-परंपरेचे वेगवेगळे पदर उलगडू लागतात. बंगालमध्ये विधवा स्त्रियांदेखील सावित्रीच व्रत करण्याच स्वातंत्र्य, एखाद्या छोट्या रीतीचा आयाम अधिक व्यापक करत, त्याबरोबर आपली दृष्टी. अधिक ज्ञान मिळविण्याच्या लालसेतून जगण्याची आसक्ती, सुख   दुर्गाबाईंना मिळत असावं.  परमेश्वराच्या म्हणजे सत्याच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे अधिक ज्ञान , हा मार्ग त्यांनी सुचविला आहे. हे पुस्तक तुमचा अनुभव, ज्ञान, दृष्टीकोन अधिक समृध्द करतं यात शंकाच नाही.जरूर वाचा . 


2 comments:

  1. फारच छान लिहिले आहे तुम्ही. या पुस्तकाबद्दल बरंच ऐकलं आहे. पण पुस्तक वाचायचं राहून गेलं आहे. मिळवून वाचायला हवं...

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete