प्रेम म्हणजे फक्त शारीरीक आसक्ती असते का ? पुरुषांत एक ययाती कायम वसलेला असतो का ? निर्मळ प्रेमाची व्याख्या काय ? तिच्याशिवाय इतक अलिप्त , एकट का वाटत होत? अस्वस्थता नेमकी कसली होती ? या सर्व प्रश्नांनी तो गोंधळाला होता . स्वतःशीच चाललेल्या संवादात गुरफटला होता . ती निघून गेल्यावर , तिच्याशिवाय मात्र एक अपूर्णतेची जाणीव सतत बोचत होती . एक भयाण पोकळी अंतर्मनात साचून राहिली होती . त्याचा नेमका अर्थ उकलत नव्हता . त्याच्या मनात विचारांची आवर्तन भिरभिरत होती . समुद्र आणि क्षितीज एकरूप भासतात . ते एक कुठे एक आहेत . मिलनाचा एक भास आहे . फुलांशी खेळणारा भ्रमर , आता होता निघाला भ्रमणाला . फुलं तरीही आपल्याच आनंदात रममाण आहेत . दोघंही आपल्या परिघात रमले आहेत . एकमेकावर भार न होता . सोबतीने मिळालेल्या क्षणाचे दवबिंदू समरसून प्राशन करतायतंं, कोणताही संभ्रम मनात न आणता . जगतायतं आजचा क्षण जो शाश्वत आहे . निसर्गाकडे कधी मायेने पाहिलच नाही ,त्याला आपुलकीने कधी गोंजारलं नाही . त्याच्या सादाला प्रतिसाद कधी दिला नाही . हे निसर्गाचं सहज स्वरूप कधी त्याच्यात उतरलं नाही . न सांगता , डोळ्यांनी अनेकदा तिने मन उघड केलं होतं. निसर्गाच चैतन्य , प्रेम , साद भरभरून त्यात होतं. शब्दांच्या बुडबुड्यासवे त्याचे मन हवेत तरंगत असे . जमिनीवर घट्ट उभं राहून या निसर्गाला कधी कवटाळले नाही . ही जाणीव त्याच्यात खोल रुजली नाही . आता या जाणीवांच्या जगात जगण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता .
No comments:
Post a Comment