Monday, 6 February 2017

वाडा चिरेबंदी



       “वाडा चिरेबंदी एकत्रित कुटुंब पध्दतीच्या ढासळत्या मुल्यांची वास्तवता चितारणारं प्रतिनिधीक स्वरुप आहे.   नाटकातील काळ 35 वर्ष जुना.  कॅनव्हास बदललाय इतकचं .सरंजामशाही वाडयाची संस्कृती केव्हाच लयास गेली आहे.  परंतु मानवी स्वभावातील सरंजामशाही वृत्ती अजून कायम आहे.  एकत्रित कुंटुंबव्यवस्था मूळापासून हादरली आहे.  पूर्वी मुंबईच्या छोट्या भिंतीतही एकत्रित कुटुंब पध्दती मायेच्या धाग्यांनी  तग धरुन होती.  काळाबरोबर त्याच्या   फटक्याने    नाईलाजाने एकत्रित कुटुंबपध्दतीचे बुरुज ढासळायला लागले आहेत. 

            एकेकाळी जमीनदार असलेल्या देशपांडे कुटुंबीयांची  ही कहाणी आहे.  गतवैभव लयाला गेललं तरी मनोवृत्ती   ताठ . घरातले कर्ते पुरुष तात्यांच निधन झालेल.  मोठा मुलगा भास्कर, त्याची बहिण, एक परावलंबी लहान भाऊ, आई, आजी असे सर्व गावाला राहत असतात.  नोकरीनिमित्त मुंबईला असलेला सुधीर पत्नीसह गावी येतो.  तोरण आणि मरण या दोनच  प्रसंगी माणसं भेटतात या सूचक संवादातून सूधीर बऱ्याच काळानंतर गावी आल्याच कळतं.  गावच्या पध्दतीनुसार तात्यांच तेराव करायच असतं.  रितीरिवाजाप्रमाणे त्याला मोठा खर्च येणार असतो.  हा खर्च कुणी आणि कसा करायचा यावरुन संवाद, विसंवाद घडू  लागतात.  माणूस मेल्यावर त्याच्या इच्छांचा जास्त सन्मान केला जातो किंवा सामाजिक दबावापोटी, खोट्या प्रतिष्ठेपायी  कर्जबाजारी असतानाही भास्करला हे रितीरिवाज पार पाडायचे  आहेत .  त्यासाठी वाड्याच्या मागचा भाग ते गहाण टाकतात .  त्यांच्याकडे एकमेव  आशा असते , वडिलोपार्जीत सोनं.  भास्करचा मुलगा पराग वाईट संगतीमुळे व्यसनाधीन झालाय.  शिक्षण  न घेऊ दिल्यामुळे अविवाहित प्रभामध्ये  एक कटुता आलीय.  वडिलोपार्जित सोन्यातून तिला शिक्षण घेता येईल या शेवटच्या आशेवर ती  आहे. तर लहानभाऊ  त्याला एखादं दुकान सुरु करता येईल या आशेवर आहे . आजी सुख, दु:ख जाणिवा या सर्वाच्या पलिकडे भ्रमिष्ट अवस्थेत जगत आहे.  

         अशा परिस्थितीत त्यांची मुलगी रंजना तिला शिकवणी लावलेल्या मास्तराबरोबर,  सिनेमाच्या वेडापायी सोन घेऊन मुंबईला पळून जाते.  मास्तर सोन घेऊन पळून जातो.  तिचा काका सुधीर तिला मुंबईला परत घेऊन येतो. सोन्याबरोबर सगळ्यांच्या आशा ,इच्छा , आकांशा मातीमोल होतात .बदलत्या पिरस्थितीत माणसांची बदलणारी मुल्य सावल्यांसारखी गडद होतात.  माणसाचा स्वार्थ,   त्या मागची अगतिकता वरवर भासणार तुटकपणं तरी आतून असलेला मायेचा ओलावा व्यक्त, अव्यक्त भावनांतून प्रकट होतो.   पार्श्वभूमीवर खोदण्याचा आवाज येतोय.  पराग वाड्याच्या भिंतीना धरुन ढासळते चिरे वाचवण्याचा जणू केविलवाणा प्रयत्न करतोय या पार्श्वभूमीवर शेवट होतो .  सर्वांना अंतर्मुख करून , डोळ्यातून झिरपणाऱ्या भावना व्यक्त करून .  
            

            

No comments:

Post a Comment