"तीन पायांची शर्यत " हे नाटक "बिझनेस ऑफ मर्डर " या नाटकाचं रूपांतर . नाटक पाहिल्यानंतर "बिझनेस ऑफ मर्डर " हे नाव जास्त समर्पक वाटतं . अलीकडे कुटुंबप्रधान त्रिकोणी नाटकाच्या चौकटीतून बाहेर पडून मराठी नाटकं रहस्यप्रधान नाटकाकडे वळू लागली आहेत . त्याला प्रतिसादही बऱ्यापैकी मिळतोय . सहज घडणाऱ्या घटनांनी नाटक सुरु होत . हळूहळू त्यातली गुंतागुंत वाढत प्रत्येक पात्राचे एकमेकांशी असलेले धागेदोरे उलगडू लागले आहेत असं वाटताना परत गुंतागुंत सुरु होते . अनेक वळण घेत , मुख्य म्हणजे उद्देश शेवटपर्यंत लक्षात येत नसल्यामुळे उत्कंठा कायम राहते . शेवट एका अनपेक्षित उलगड्याने होतो .
नाटकाची सुरुवात मिट्ट काळोखात होते . एक गृहस्थ आपल्या बायकोला त्यांनी दारू सोडल्याचं सांगत असतात . मुलाला भेटण्याची इचछा व्यक्त करतात . रंगमंचावर आक्रोश ,किंकाळ्या ऐकू येतात . राजेंद्र एक मध्यमवर्गीय गृहस्थ . आपल्या मुलाच्या कृत्यामुळे हतबल झालेला . तो मुलाला मादक द्रव्यांच्या रॅकेटमधून बाहेर काढण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याची मदत घेतो. त्यांनी पोलीसी खाक्याने त्यांना समजवावं म्हणून त्यांची मदत मागतो . ते त्याला मदतीचं आश्वासन देऊन निघून जातात. त्यानंतर शलाका देसाई ही रहस्य कादंबऱ्या लिहिणारी लेखिका राजेंद्रच्या विनंतीवरून त्याच्या आजारी पत्नीला भेटायला येते . परंतु राजेद्र शेवटपर्यंत त्यांची भेट न घडवता तिला बोलण्यात गुंगवून ठेवतो . शलाकाला काहीतरी काळ -बेर असल्याचा संशय येऊ लागतो . ती तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते परंतु तो तिला जाऊन देत नाही . इतक्यात पोलीस अधिकाऱ्याचा प्रवेश होतो . इथून नाटक वेगळंच वळण घेत . काय असतो प्रत्येक पात्राच्या अस्तित्वाचा उद्देश ? ते का त्या घरात येतात ? त्यांना नियोजनपूर्वक तेथे बोलाविलेलेले असते का ?
संवाद -प्रतिसंवाद यातून नाटक उलगडता उलगडता पुन्हा अनपेक्षित घटनांच्या फेऱ्यात अडकत . त्यातून मानवी स्वभावाचे सुप्त पैलूही उघड होतात . पोलीस अधिकारी , शलाका यांचा स्वार्थ , त्यांचे खरे गुण उघड करतं . एका स्वार्थी उद्देशाने एकमेकांशी जोडलेल्या नात्यांचा या घटनांनी पर्दाफाश होतो . राजेंद्र याचा या सर्वांशी काय संबंध याचे आडाखे बांधताना प्रेक्षक शेवटपर्यंत नाटकात गुंतून राहतो . घटनांना पूरक प्रकाशयोजना , संगीत याने रहस्य अगदी गडद होत जातं . धुक्यासारखं . एक अनपेक्षित धक्का देऊन नाटकाचा शेवट होतो . काय हे अनपेक्षित वळण ? यासाठी तुम्हाला नाटक पहावं लागेल .
No comments:
Post a Comment