Friday, 10 March 2017

Life is beautiful

               




              "Life is beautiful "   जगणं जगायला शिकवणारा अप्रतिम इटालियन सिनेमा . हि कथा आहे त्याग ,प्रेम ,जगण्याच्या कलेची, अतूट नातेसंबंधांची , एका पित्याने कुटुंबासाठी केलेल्या त्यागाची . कधी कधी जगणं सुंदर भासविण्यासाठी ते आहे त्या पेक्षा वेगळ्या स्वरूपात समोरच्याला दाखवावे लागते , नाहीतर जगण्याचे असह्य घाव मनावर कायमचे व्रण सोडतात . जगणं शेवटी काय असतं ? आपण जे पाहतो तेच ,त्याचंच प्रतिबिंब . जे आपल्या मनावर उमटतं ते चित्र ? मग ते सुंदर चित्र म्हणून का उमटू नये ?

             दुसऱ्या  महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आहे . नायक जर्मनांच्या हाती लागतो . त्याची रवानगी छळवणूक केंद्रात होते.पती -पत्नीला केवळ सांकेतिक संदेशांच्या आधारे एकमेकांच्या अस्तित्वाची जाणिव होत असते .  आपल्या मुलाच्या कोमल मनावर  ओरखडे उमटू नयेत म्हणून तो जर्मनांच्या छळवणूक   केंद्रातील घटनांना एक खेळ असल्याचे त्याला भासवतो . या खेळात तो जितक्या वेळा दुसऱ्याच्या नजरेस पडणार नाही तितक्या वेळा त्याला गुण मिळणार असतात .  शेवटी मुलाला तो एका खोक्यात लपायला सांगतो व सर्व बाहेर पडेपर्यंत बाहेर न  येण्याच्या सूचना देतो . सैनिक नायकाला नेत असताना,  अगदी मरणाच्या दारात  असतानाही मुलाला तो हा खेळचं सुरु असल्याचे सांगतो . मुलाला जराही जाणीव करून न देता हसत -हसत तो मृत्यूला समोर जातो .

             पती -पत्नीचे प्रेम , मुलाच्या कोमल भावनांना जपण्याची धडपड , जगण्याला परिस्थितीनुसार वेगळ्या परिप्रेष्यातून  पाहत सुंदर बनविण्याची तळमळ, सूक्ष्म भावनांची जपणूक करत हा सिनेमा नात्यांची तरल गुंफण हळुवारपणे उलगडतो . सिनेमातले सुंदर वातावरण , भावनांची निरागसता , नात्याचे अतूट बंध जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यास प्रवृत्त करतात .  जगणं हवंहवंसं , सुंदर वाटायला लागतं . . 

No comments:

Post a Comment