"मला काहीच प्रॉब्लेम नाही " या सिनेमाचे नकारात्मक समीक्षण वाचूनही मी सिनेमाला जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे मात्र मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही. याउलट आजच्या तरुण पिढीच्या गोंधळलेल्या मानसिकतेवर अचूक भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने एक वेगळा अनुभव दिला . आयुष्याचे वेगवेगळे कंगोरे तपासून पाहण्याअगोदरच स्थिरस्थावर झालेली आजची पिढी , सुखाची नेमकी परिभाषा न उमगल्यामुळे गोधळून जाते . सुखाची परिभाषा समजणे तशी अवघडच . वाचन , चिंतन, संवाद याच्या अभावामुळे स्वतःला नेमकं काय हवंय याचा थांगच लागत नाही . आजूबाजूला दिसणार चकचकीत आयुष्य मग खुणावू लागत . चकचकीत वेष्टनात गुंडाळलेल्या चाकोरीबद्ध जगण परिपूर्ण वाटायला लागतं . मन , भावना , संवाद यांना ही पिढी पारखी झाली आहे . आपल्याकडचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे समोरच्याला गृहीत धरणे . वास्तविक प्रत्येकाचे स्वतःचे असे एक आयुष्य असते , स्वतःचा असा एक परीघ असतो हे मान्य नसल्यामुळे दोन पिढ्यांचे संघर्ष सुरु होतात .संक्रमणावस्थेतून जाताना निर्माण होणारा गोंधळ , बदल पटकन टिपता न आल्यामुळे होणारे संघर्ष अटळ असतात . दोन्ही पिढ्यातील सहजता हरवत जाते . हा विषय प्रत्येक पिढीचा आहे . एक पिढी नवीन बदलाला सामोरी जातेय तर दुसरी पिढी बऱ्यापैकी सरसावली आहे . दोन्ही पिढीतील संवादाच्या अभावामुळे अनेक पेचप्रसंग निर्माण होतात. दिग्दर्शकाने हा बदल सूक्ष्मपणे टिपला आहे . जगण्याचं सूत्रच जणू त्याने उलगडून दाखवलं आहे .
अजय आणि केतकी या जोडप्याची ही कहाणी , वैदर्भीय आणि कोकणी पार्श्वभूमीच्या रिती -रिवाजाच्या विसंवादातून उलगडत जाते. अजय संयत शांत स्वभावाचा तर केतकी स्पष्टवक्ती , थोडीशी फटकळ काहीशी dominating स्वभावाची . अजयची समस्या म्हणजे त्याला कशालाही नाही म्हणता येत नाही , पटकन निर्णय घेता येत नाहीत . घरच्यांचं देण्या -घेण्यावरून फिस्कटल्यामुळे केतकी लिव्ह -इन - रिलेशन मध्ये राहण्याच्या निर्णयापर्यंत येते . तिथेही समस्या मग लग्नं करायचच आहे एक दिवस तर कोर्ट -मॅरेज करण्याचा निर्णय ती घेते .इथेही निर्णय तिचं घेते . इथून पुढे आजच्या पिढीच्या समस्यांची सुरुवात होते.
आजच्या पिढीच्या तरुणांची सुखाची व्याख्या म्हणजे चकचकीत फ्लॅट , गाडी , आठवड्याअखेर हॉटेलमध्ये जाणे अशी सर्वसाधारण असते . खरतर हे चाकोरीबद्ध आयुष्य बहुतांश लोकांचं आहे . चकचकीत भिंतींनी डोळे सुखावतात मनाचे काय ? संवादाचे काय ? हे सुख विकत घेताना जो वेळ द्यावा लागतो आहे त्यातून एकमेकांकरिता वेळचं उरत नसल्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ लागतो . अजय त्याचे मन कधीही उघड करत नाही . केतकीला कधीही नाराज करत नाही . तिला यांत्रिकवत वाटतं . तिला हवंय उत्स्फूर्तपणे , वाहवत नेणारं काहीतरी.... पण तिलाही उमगत नाही नेमकं काय ? तिची अवस्था अशी झालीय ,
धागे गुंतले अंतरीचे अंतरी
काय मज हवे कळेना
काय तुझं द्यावे उमजेना
स्वरांनी भारले अंगण इवले
सूर का हरवले कळेना
शोधूनही गाभा सापडेना
कळावी माझ्या अंतरीची
कळावी माझ्या अंतरीची
मी न सांगता व्यथा
तुज कसे सांगू कळेना
तुज कसे सांगू कळेना
मनाचे मनाशी खेळ सारे
मन मनास सावरेना
तू व्हावे मन माझे
तू व्हावे मन माझे
नाते तरल सोपे उलगडेना
एक सुखी त्रिकोणी कुटुंब आहे . कधीतरी बदल म्हणून मित्रांच्या पार्ट्या आहेत . दिग्दर्शकाने या पार्टीचा प्रसंग इतक्या सूचकपणे चित्रित केला आहे कि संथ , चाकोरीबद्ध आयुष्याच्या छटा मनाला थेट भिडतात . त्यातला यांत्रिकपणा मनाला सुन्न करतो . तसं वर वर परिपूर्ण वाटणारं आयुष्य आतून संथ लयीत येणाऱ्या वादळाला साद घालतंय . हे वादळ घोघावतंय तिच्या मनात . आयुष्याची सर्व सुख प्राप्त झाल्यावर जो रितेपणा येतो आयुष्यात तो माणसांची मानसिक स्थिती फार विचित्र करतो . असंच काहीसं रितेपण तिच्या आयुष्यात आलंय . अशावेळी तिला अजयबरोबर संवादाची फार गरज वाटतेय परंतु त्याच्या अबोल स्वभावामुळे आतली खळबळ आतच साचून राहिलीय . तिला दोंघांशिवाय तिसरं कुणी नकोय अशावेळी अजयच्या घरची माणस त्यांना अवेळी भेटायला येतात . मनाच्या साचलेपणाला मुक्त करण्याचा तिचा हाही मार्ग बंद होतो . यातून ते कसे मार्ग काढतात ? हा अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष घ्यावा लागेल .
चित्रपटातील छोटे -छोटे प्रसंग दिग्दर्शकाने खुमासदार चित्रित केले आहेत . एक प्रसंग असा आहे . अजयच्या ग्रहशांतीसाठी घरच्यांनी पूजा करायचं ठरवलेलं असतं . केतकी म्हणते त्याला शांतीची काय गरज आहे , तो शांतच आहे . दुसऱ्या प्रसंगात ती धार्मिक विधी टाळण्यासाठी चक्क तिला पाळी आल्याचं सांगते . मोठ्यांच्या अध्यात्मिक भावना दुखवू न देता वेगळाच मार्ग चोखाळत ती आपली स्वतंत्र वृत्ती वेळोवेळी दाखवून देते . दोघांच्या खाजगी क्षणांच्या वेळी अजयच्या हाती असलेला मोबाईल आजच्या पिढीच्या जगण्यातील तुटकपणा , विसंवाद स्पष्ट्पणे दाखवून देतो . कोणत्याही प्रसंगात आततायीपणा नाही . जे सांगायचं आहे ते थोडक्या शब्दात आणि नेमकेपणे सूचित केलं आहे . दिग्दर्शकाने जे प्रसंग उभे केले आहेत , त्यातून नेमका अर्थ उलगडत जातो . साधी सोपी गोष्ट वाटताना संवादाच्या अभावामुळे ती कशी गुंतागुंतीची वळण घेऊ लागते हे प्रसंग दिग्दर्शकाने कुठेही अतिशयोक्तपूर्ण मेलोड्रामा निर्माण न करता छोट्या छोट्या प्रसंगातून ठाशीवपणे चित्रित केले आहेत . दोन पिढीतील संघर्ष भडक न करता , कोण चूक कोण बरोबर याचं विश्लेषण न करता त्यातून काय समस्या निर्माण होऊ शकतात हे अत्यंत संयमितपणे दाखविले आहे .या चित्रपटाला गोव्याची सुंदर पार्श्वभूमी आहे . गोव्याचं सौंदर्य आणि कोंकणी धून मन मोहवते . कॅमेऱ्याने गोव्याचे सौंदर्य अचूक टिपले आहे .
स्पृहा मॅडमनी ज्या सखोलतेने केतकी साकारली आहे त्याला तोड नाही .केतकीच्या मनातील कोंडमारा सहजसुंदर मुद्राभिनयातून मनाला भिडतो . वरवर साधी वाटणारी ही भूमिका तशी अवघड आहे . त्यांच्या कवितांतून ओथंबणारी संवेदनशीलता त्यांच्या भूमिकांतून सहजपणे व्यक्त होते . किंबहुना या प्रगल्भतेमुळे ही गुणी अभिनेत्री अशा संवेदनशील भूमिकांना न्याय देऊ शकते . गश्मीर महाजनी यांनी अजयची संयत भूमिका जिवंत केली आहे . गश्मीर व स्पृहा यांची अभिनयाची केमिस्ट्री छान जुळली आहे . कपल म्हणून ते फार विश्वसनीय आणि सहज वाटतात . विदर्भ आणि गोव्याच्या भाषेतील गोडवा कानाला सुखावतो . प्रत्येक कलाकाराने त्याचं काम चोख बजावलं आहे . गोव्याची ती सुंदर घर भविष्यात दिसतील किवा नाही , पर्यटनाच्या , जागतिकिकरणाच्या नावाखाली हे नैसर्गिक सौंदर्य लोप पावणार आहे याची खंतही चित्रपटातून व्यक्त होते . जुन्या पिढीतील संथपणा , नव्या पिढीचा वेग त्यातून निर्माण होणार कोंडमारा , जीवनाला सामोरे जाताना निर्माण होणारी द्विधा अवस्था , त्यातून उद्भवणारे प्रसंग चित्रित करताना योग्य समतोल साधण्यात आला आहे. प्रकाशयोजना इतकी सुंदर आहे की चित्रपटाचे वेगवेगळे मूडस मनाला आतून स्पर्श करतात . अजय आणि केतकी इतकं समजूतदार कपल असताना त्यांच्यात विसंवाद घडतातच का , हा प्रश्न सुरवातीला जाणवतो . त्यामागचा सुप्त अर्थ उकलणे खरोखरंच आव्हान होतं . आपल्यातील नेमका विसंवाद कधी कधी स्वतःला सहजतः लक्षात येत नाही परंतु दिग्दर्शकाने भावना नेमक्या टिपल्या नाहीत तर प्रभावीपणे चितारल्या आहेत .
चित्रपट पाहताना एक नकळत स्वतःशी एक संवाद सुरु होतो . दोघेही मनाने चांगले ? मग असं का होतं ? काहीवेळा समोरची दोन्ही माणसे अगदी परफेक्ट असतात . तरीही सूर जुळत नाहीत . का होत असं ? विसंवाद कि अजून काही कारण ? का सुख बोचतंय ? काहीच कळत नाही .सोचा था घर बना कर बैठूगा सुकून से पर घर की जरूरतों ने मुसाफिर बना डाला , या गुलजार यांच्या ओळी सिनेमा पाहताना आठवतात . प्रत्येक जोडप्यात असा बॅडपॅच , दुरावा कधी ना कधी येतो . त्यात दोघांची कुटुंब दुरावलेली . दुसरा कोणताही मानसिक आधार नाही . केतकी एकूणच आयुष्यात आलेल्या पोंकळीमुळे अस्वस्थ झालीय , चिडचिडी झालीय . ती घटस्फोटाच्या निर्णयाप्रत येण्याइतकी उद्विग्न का होते ? वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या का होतात ? संवाद नसल्यामुळे ? मग यातून मार्ग काय ? या सर्व प्रश्नांची उत्तर अन तुमच्या प्रश्नांची उत्तरही चित्रपटात सापडतील . तरुणांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा अन जुन्या पिढयांनीही . कदाचित तरुणांचा यांत्रिक आणि बुजुर्गांचा रीती -रिवाज , लादण्याचा गोंधळ कमी होऊ शकेल . तरुणांना सुखाची नेमकी गुरुकिल्ली नक्कीच सापडेल . हा चित्रपट जरूर पहा .
No comments:
Post a Comment