आमच्या तरुणपणी खेळांत किंवा नाक्यावर मुलींना पाहण्यात आम्ही जीवन सार्थकी लावायचो . भरपूर खेळ , दंगा , मस्ती याने आयुष्यात कोणत्याही पोकळीला स्थान नव्हते . निराशा वैगरे असा काही प्रकार नव्हता . प्रेमात विफल झाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या मुलांचा एखादा किस्सा आम्ही ऐकला होता . हल्ली कुठल्या त्या माशाच्या खेळात मुलं आत्महत्या करताना ऐकू येत तेव्हा खेद होतो . आज पिढीच्या पिढी एका छोट्या idot बॉक्स मध्ये बंदिस्त झालीय . तरुण पिढी एकेमकांकडे डोळे लावून बसण्याच्या वयात त्या idot बॉक्स मध्ये डोळे गुंतवून बसलीय .आजच्या पिढीच्या हृदयातील धडधड रिंगटोनच्या आवाजाने होते . मातीतल्या खेळातली अन तरुणपणीच्या लैला -मजनूच्या निष्पाप किश्श्यांची मजा कोणत्या शब्दात वर्णन करावी हे कळत नाही, कारण हे अनुभवायचे क्षण आहेत . त्यातली मजा romantism आजची पिढी हरवत चालली आहे असं वाटतं . माझ्या एका मित्राचा एक किस्सा मुद्दाम सांगतो .
आमचा तो मित्र वेळेचा कधीच गुलाम नव्हता . परंतु तिच्या येण्याने तो घड्याळ घालायला शिकला . तिच्या आगमन -निर्गमनाचं वेळापत्रकच त्यानं पाठ केलं होतं . तिच्या येण्याने त्याच्या हृदयातील ठोके असे काय बेताल व्हायचे कि सांगता सोय नाही . आम्ही परममित्र मात्र प्रामाणिकपणे त्याच्या आधाराला असू . जणू काय आमचं परम कर्तव्य असल्यासारखं तिच्या येण्याची वर्दी देण्यासाठी डोळ्यात तेल घालून आम्ही जागता पहारा द्यायचो . आमचा तो मजनू रोड साईट मजनू नव्हता हुषार , मेहनती होता . त्यामुळे सर्व मित्र त्याच्यासाठी तत्पर असतं . रोज एकच कार्यक्रम . तिने यावे , मार्गस्थ व्हावे . साधा कटाक्षही नाही . परंतु मित्र फक्त दर्शनानेच हवेत . त्याला जमिनीवर आणण्यासाठी आम्हाला मग काही जहरी उपाय योजावे लागतं . त्यात आय -मायच्या शिव्यांचं मुक्त आदान -प्रदान व्हायचं. आमचा मित्र इतका निलाजरा की, तिच्या दर्शनाने पावन झालेला तो ,शिव्या प्रसाद म्हणून गोड मानून प्राशन करायचा . अध्यात्मिक भाव चेहऱ्यावर वागवत निर्विकारपणे असा काही आमच्याकडे पाहायचा की मग आम्हीच बिचाऱ्या मित्रासाठी मार्ग शोधायचो. तिच्या आगमनानंतर हाळी देण्याचं काम मात्र आम्ही प्रामाणिकपणे निभावत होतो. मित्राचं व्रत न थकता सुरूच होतं .
त्याच्या तपश्चर्येला फळ आलं . एके दिवशी तिने त्याच्याकडे पाहिलं असं वाटतं . काय तो गहजब . पार्टी झाली . पार्टी म्हणजे काय ? बियर एक वाटेकरी अनेक . आमचा ऊर अभिमानानं भरून आला . मग काय स्वारी दुसऱ्या दिवशी एक तास अगोदरच हजर . वेळ दुपारची तरी महाशय आंघोळ वैगरे करून, कुणाचातरी अत्तर मारून गुणगुणत हजर . अस्वस्थपणे येरझाऱ्या घालणं सुरु . तिच्या वाटेवर थोडं तपासून पुन्हा माघारी येणं सुरूच होत . वेळ सरत होता , काटा सरकत होता . धडधडीचं रूपांतर चिडचिडित सुरु झालं. , संध्याकाळचं मळभ मनावर साचू लागलं . तरी मजनू पार सूर्य बुडेपर्यंत तळ ठोकून बसला . आम्हाला साथ देणं भाग होत . आमच्या मित्राच्या जिंदगीचा सवाल होता . त्याला आम्ही डिवचायला सुरुवात केली . प्रेमात माणसं संयमी होतात तसा तो झाला होता . म्हणाला तिला काहीतरी प्रॉब्लेम असणारं . या प्रेमिकांचं हे मानसशात्र जबरदस्त असतं . भेटण्या अगोदरच माणसं समजून घ्यायला लागतात .
दुसऱ्या दिवशीही महाशय वेळेत हजर . भूरभूर पाऊस बरसत होता . वातावरण धुंद होते. वातावरण कसेही असो आमचा मजनू हल्ली बेधुंद असायचा . तुटकी छत्री सावरत वाटेकडे डोळे लावून बसला होता . पावसाच्या थेंबातून एक परिचयाची आकृती आकार घेऊ लागली . याचा जीव टांगणीला . हो तिचं होती . छत्री आणि पुस्तक सांभाळत आपल्याच नादात हळुवार पावलं टाकत निघाली होती . तिच्या चालण्याची लय त्याला बेचैन करत होती . काय करावे उमजत नव्हते . हळूहळू ती जवळ येऊ लागली . त्याच हृदय आता उसळ्या घेऊ लागलं . विचारांचा ताबा डोळ्याने घेतला होता. त्याच्या कोणत्याही हालचालीवर नियंत्रण नव्हतं. ती खुद्कन हसली . छान ,निष्पाप . इथे घात झाला . त्याच आपल्या हालचालींवरच नियंत्रण हरवूं लागलं . कारण नसताना त्यानं आपली छत्री गर्रकन फिरवली . ती तिच्या छत्रीला धडकली . तिच्या छत्रीचा दांडा मोडला आणि वाऱ्याचा झोतानं ती भिजू लागली . ती रडवेली झाली . रागात म्हणाली ,"Idiot , i am going to tell my mom. अन रागात झपाझप पावलं टाकत निघून गेली . तरी आमचा मित्र खुश कारण ती बोलली तर सही . त्याच इंग्लिशचं ज्ञान अगाध. आमच्यातला एक त्यातल्या त्यात ज्ञानी इंग्लिश माध्यमाच्या मुलाने त्याचा अर्थ सांगितला तेव्हा तो असा पसार झाला की काही विचारू नका . आम्हाला वाटलं प्रकरण संपलं . पण हे सद्गृहस्थ हार मानायला तयार नव्हते . रॅपिडेक्स इंग्लिश स्पिकिंगचं पुस्तकच घेऊन आले चक्क आणि मग आयुष्यात केला नसेल असा अभ्यास सुरु झाला .
साधारण संभाषणाला जेवढी वाक्य जरुरी असतात तेवढी त्यानं पाठ केली . आठवडाभर महाशयांनी वाट पाहण्याचा कार्यक्रम बंद ठेवला होता. तिची आई काही आली नव्हती . त्याचा आत्मविश्वास थोडासा वाढला . . दरम्यान तिने त्याच्याबद्दल एका मित्राला विचारलं होतं . मग नेहमीसारखे आपल्या कर्तव्यावर चिटकू मजनू हजर झाले. ती नेहमीच्या वेळेवर आली . हा वाचलेली वाक्य घोळवत होता . तिने विचारलं ., "How are you ". हा म्हणाला , "Good Morning " . वेळ दुपारची. असो तिला समजले , तिने हिंदीत विचारले , कैसे है आप ? . तो म्हणाला "Good Good ". तो काय हार मानायला तयार नव्हता . इंग्लिश येत नाही हे दर्शविणे त्याला अवमानकारक वाटतं होत . मग सिलसिला सुरु झाला , इंग्लिश स्पिकिंगचं पुस्तक व प्रेमाचा . एका एका वाक्यांनी त्याची प्रेमकथा बहरत होती . मग ती त्याच्या आयुष्यात आली का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ? प्रेम नुसतं इंग्लिश पाठ करून होत नाही . त्याला व्यवहाराची एक दुसरी बाजू असते . हा तर सुशिक्षित बेकार होता . व्यवहारी बाजूत तोकडा पडत होता . तिचं यथावकाश सुस्थापित मुलाशी लग्न झालं . यानं काय गमवाल ? तसं म्हटलं तर काहीच नाही . व्यवहार शिकला अन बरोबर इंग्लिश .
No comments:
Post a Comment