Saturday, 31 March 2018

" आम्ही आयुष्यात काय achieve केलं ?"

              "Bucket list " चित्रपटाबाबाबत एक मेसेज व्हाट्स अँप वर फिरत होता. सुदैवाने कालच तो चित्रपट WB वर होता . मृत्यूची चाहूल लागलेल्या दोन  वृद्धांची "Bucket list " म्हणजे मृत्यूपूर्व  करावयाच्या कामांची यादी.  जगण्याच्या रहाटगाड्यात छोट्या छोट्या  इच्छा अपूर्ण राहतात ,  काही पैश्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे . सगळ्याच गोष्टीसाठी पैशाची गरज असते असे नाही . एखाद्याशी विसंवादामुळे होणारा तणाव केवळ बोलण्याने हलका होऊ शकतो . तुमचे हलके फुलके दोन शब्द एखाद्याच्या आयुष्यात नंदनवन  ठरू शकतात . आम्हा मित्रांची  व्हाट्सअँप वरील   या मेसेजनंतर  एका मुद्द्यावर चर्चा अधिकच गडद झाली ." आम्ही आयुष्यात काय  achieve केलं ?"

            खरतर आम्ही सगळेच याबाबत अस्वथ आहोत . " आम्ही आयुष्यात काय  achieve केलं ?" .सगळ्यांनाच जाणवतंय  आयुष्याची अनेक वर्ष सरल्यानंतर आम्ही होतो तिथेच आहे . म्हणजे आयुष्य थोडे  स्थिरस्थावर झालंय इतकंच . सगळ्यांसारखं हप्ते फेडून घर झालंय , मुलं , त्यांची लग्न वैगरे , वैगरे .हि  पटकथा थोड्या बहुत फरकाने सगळ्यांची सारखीच आहे . मग आम्ही वेगळं काय केलं ? प्रत्येकात काहींना काही टॅलेंट आहे परंतु wiki च्या पेज वर येण्याइतकीही ओळख नाही . किमान स्वतःला स्वतःबद्दल आनंद वाटेल इतपतहि स्वतःची ओळख नाही .   सुखाच्या सामाजिक व्याख्येप्रमाणे खरतर सगळे सुखी .  तरीही सगळेच अस्वस्थ आहेत .  मला वाटतंय त्यांच्यात जे सुप्त टॅलेंट आहे त्याला फुलवण्याचा त्यांनी कधी प्रयत्नच केलेला नाही .  हे करताना आपल्यात काही वेगळं आहे याची जाणीव फार  प्रकर्षाने मात्र झाली पाहिजे .  हे झालं नाही तर मात्र तुम्ही न्यूनगंडाने पछाडले जाल .  कुणी काही वेगळं करत नसतं , फक्त वेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर सादर करत असतं  .  उदाहरण द्यायचं झाली आपल्या अवतीभवतीच अनेक आहेत . कापडाची अनेक दुकान असूनही त्याच्या शेजारीच नवीन दुकान सुरु करणारा व्यापारी आपणात काहीतरी वेगळं आहे या आत्मविश्वासाने सुरु करत असतो .  नवीन चित्रपट आणणारा दिग्दर्शक , चित्रपटाचा विषय सारखाच असला तरी आत्मविश्वासाने सांगत असतो त्यांच्या चित्रपट वेगळा आहे . हा आत्मविश्वास त्यांना काहीतरी वेगळा करण्यास प्रवृत्त करतो . "सैराट" ची कथा आजवर आलेल्या अनेक चित्रपटात  होती . परंतु त्याचं वेगळपण सादरीकरणात होत आणि आपण काहीतरी वेगळं करतोय याबाबत दिग्दर्शकाच्या मनात असलेल्या आत्मविश्वासात .

       आम्हाला जो प्रश्न सतावतोय , " आम्ही आयुष्यात काय  achieve केलं ?" तो तिथेच घुटमळतोय कारण प्रत्येकात काही वेगळं आहे हे स्वीकारायला कुणीही तयार नाही . ते वेगळं काय याचाही शोध त्यांना घेता येत नाही आणि जे जाणवतंय  त्यासह पुढे वाटचाल करण्याची   इच्छा  एका  सुरक्षित जीवनपद्धतीचा रेट्यापुढे क्षीण झालीय . संघर्ष जो  मनात येतो  तो काही क्षणापुरता,  त्याची धग बनून तो धुमसत  राहत नाही . आयुष्याचं साचलेपण दुर्दैवाने अधिक मोहित करतंय .  काहीतरी वेगळं करण्याची , ओळख  निर्माण करण्याची इच्छा असूनही .

      आयुष्याचा गर्भित अर्थ समजून घेणं म्हणजे आपलेच जगण्याचे मार्ग कुंठित करण्यासारखं आहे .  . काहींनी न उमजून ,   त्यापासून दूर जाऊन विरक्तीचं घेतली . आयुष्याचे अर्थ उकलत  न बसता ,  मनानं घेतलेल्या ध्यासासोबत  वाहत जाणं  ज्यांना जमलं आहे त्यांनीच आयुष्यात काहीतरी achieve केल्याची अनेक उदाहरणे आहेत . आम्हाला  वाटू लागलाय आयुष्याचे हे प्रवाहीपण जाणून त्या बरोबर वाहत जाणे हेच आयुष्य जगण्याचं सूत्र आहे , काहीतरी achieve करण्याचा मार्ग आहे .  आपलं "असणं"  हे अपूर्णतेच लक्षण आहे कारण  ते निर्णायक नाही  असं आपल्याला वाटत  . हेच कारण आहे आपण सतत अस्वस्थ असतो . परिपूर्णतेच्या ध्यासापोटी . आपली एक ओळख निर्माण करण्यासाठी ज्याला आपण काही achieve करणं म्हणतो परंतु त्यासाठी जी सुरुवात करावी लागते ती करण्यास आपण तयार नसतो . आपल्या समोर जो  असतो तो मोठा कॅनवास असतो . त्याच्या भव्यतेनेच आपण थिजून जातो . रंगाचे काही शिंतोडेच ते तयार करतात हे आपण विसरतो.

          डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी सुंदर शब्दात याचं विवेचन केले आहे . जे आपल्या कंट्रोल मध्ये आहे ते प्रथम करा . एखादा कॅनवास तयार करायला सुरुवात म्हणून प्रथम रंगाच्या काही शिंतोड्यांनी सुरुवात करणे हि  तर आपल्या कंट्रोल मधील गोष्ट आहे . आम्हा सर्वांना जाणवलं ती सुरुवातच तर आम्ही करत नाही आहोत , जे कंट्रोल मध्ये आहे त्याची सुद्धा.  आपल्याला मृत्यूची चाहूल लागली तर आपण नेटाने काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न अधाशीपणानं  नक्कीच करू . हे अधाशीपण जगण्यात रुजवणं फार गरजेचं आहे . जगण्याशी विरक्त होऊन तटस्थपणे पाहणे त्यामानाने सोपं असावं म्हणून  अनेकांनी हीच जगण्याची पद्धती अंगिकारली असावी.  परंतु , जे अस्वस्थ आहेत  आपली ओळख निर्माण करण्यासाठी  त्यांना मात्र त्यांच्या कंट्रोल मध्ये असलेल्या छोट्या गोष्टींनी , आयुष्य म्हणजे काहीतरी गूढ , अगम्य आहे  याचा फारसा विचार न करता  काहीतरी achieve करण्यासाठी आयुष्यातील प्रवाहीपणचं तारू शकेल . मग स्वतःला आनंदी करण्याचे मार्ग शोधा नाहींतर दुसऱ्याला आनंदी करण्याचा . एक मार्ग नाही रुचला तर  दुसरा निवडा पण थांबू नका . आयुष्याच्या प्रवाहीपणातच achievement चा राजमार्ग आहे असं आम्हा सर्वांना आता  वाटू लागलय . पुन्हा गीतेतील ते सुंदर वाक्य आठवतं त्यातच जीवनाचं सार आहे याबद्दल शंका नाही .
                                           "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन  " 

2 comments:

  1. खूप छान... movie पाहिला नाही.. पण आता नक्की पाहणार

    ReplyDelete