Wednesday, 21 March 2018

डार्क चॉकलेटस

               
                                     
                                                                           


               चॉकलेट्सच्या जगात मला मोहिनी घातली ती डार्क चॉकलेटसनी . याचा जिभेवर रेंगाळणारा कडू -गोड-तुरट-मातकट  स्वाद, रेशमी स्पर्श अन नॉस्टॅल्जिक अनुभव म्हणजे स्वर्गीय सुखाची प्रचिती. खाणारा मात्र दर्दी हवा . याचं चवीचं शास्त्र,  शास्त्रीय संगीतासारखंचं  जरा अवघड, नीरस वाटणारं  पण,  एकदा का याची चव लागली कि मग मध्यमातून,  षडजाकडे केव्हा ब्रम्हानंद टाळी लागेल सांगता येणार नाही .  शास्त्रीय संगीतासारखं हेही जरा खर्चिक असलं तरी दुर्मिळ गोष्टींचा आपण जसा  कणाकणाने आस्वाद घेतो  तसं याचं आहे .

            ही डार्क चॉकलेट्स भारतात आता तितकीशी दुर्मिळ राहिलेली नाहीत . कॅडबरी , नेस्टले यांनी केव्हाच इथे लोकांना चॉकलेट्सच्या भजनी लावलं आहे. परंतु , डार्क चॉकलेट्स मध्ये यांची जास्त उत्पादन नाहीत . कॅडबरीच ५० % डार्क चॉकलेट्स मधील रिच कोको , क्रॅनबेरी , रेसीन अँड नट तर नेस्टले चं कीटकॅट डार्क , ऐरो डार्क, आफ्टर ८ असे काही पर्याय आहेत. अमूलन अलीकडे ५५ %  कोको डार्क चॉकलेट आणलंय.  परंतु , प्युअर डार्क म्हणावं असं यातील एकही उत्पादन नाही . कोकोचा कडवट स्वाद तितकासा जाणवत नाही.  

               प्युअर डार्क चॉकलेट्सची  टक्केवारी  ५० % पुढे सुरु होते . हे प्रमाण कोको, कोको बटर यावर  अवलंबून असतं . ते ५५ % पासून अगदी ९९ % पर्यंत पोहचत . लिंडत अँड स्पृन्गली  (Lindt and Sprungli) या स्वीडिश कंपनीचे ६०%,७०%, ७८% , ८५ %, ८५% ,९०% ९९ % या प्रमाणात डार्क चॉकलेटसचे अनेक पर्याय उबलब्ध आहेत. त्यापैकी excellence मालिकेतील ९९ % डार्क  चॉकलेट अलीकडचं  चाखलं आणि त्याच्या प्रेमातच पडलो . कोकोच ९९% प्रमाण असलेला त्याचा सुरवातीचा कडवटपणा नंतर शास्त्रीय संगीतासारखी तलम , उच्च भावना निर्माण करतो. कोकोचा उग्र , मातकट स्वाद हळूहळू एका वेगळ्या शाही चवीत रूपांतरित होतो . जिव्हेवर एक अतिश्रीमंती जाणवते .

               लिंडत अँड स्पृन्गली  (Lindt and Sprungli)ही कंपनी १८४५ साली स्थापन झालेली खूप जुनी कंपनी आहे . जितकं  जुनं तितकं अप्रतिम याचा प्रत्यय हे चॉकलेट देतं . आता याला डार्क का म्हणतात ? हे याच कोकोचं प्रमाण वाचल्यावर लक्षात येतं . परंतु कोकोच्या मूळ उग्र , तीव्र स्वादात चॉकलेट  कडवटपणा मुळे  चाखणं कठीण आहे . मूळ स्वाद न हरवता त्यातील कडवटपणा कमी करण्यासाठी लिंडत अँड स्पृन्गली  (Lindt and Sprungli) या स्वीडिश कंपनीने conching  process वर खूप संशोधन करून आजची डार्क चॉकलेट्स बाजारात आणली आहेत . कोकोच्या प्रमाणानुसार  ६०%,७०%, ७८% , ८५ %, ८५% ,९०% ,९९% असे अनेक प्रकार आहेत त्यांची  चव चाखायची  आहे , त्याबद्दल नंतर लिहीनच .

          कोको हे कोकोच्या बियांपासून तयार होते . यासाठी उष्ण , दमट वातावरण उपयुक्त असते . कोकोची चव चाखलेला पहिला युरोपिअन म्हणजे जगाच्या सफरीवर निघालेला आणि वाट चुकलेला ख्रिस्तोफर कोलंबस . कोको पूर्वी त्याच स्वरूपात खाल्ले जायचे . स्वीडिश लोकांनी त्यात साखर आणि अन्य पदार्थ टाकून जे निर्माण केलं ते आजच  चॉकलेट .

      कोको हा स्वर्गीय पदार्थ घाना , मेक्सिको , ब्राझील  इत्यादी देशात विपुल प्रमाणात पिकतो . परंतु चॉकलेटच उत्पादन करणारे प्रमुख देश आहेत , स्वित्झर्लंड , बेल्जियम , अमेरिका इत्यादी . म्हणतात ना पिकतं तिथं  विकत नाही . कॅडबरी , नेस्टले या कंपन्या आपल्याला बऱ्यापैकी परिचयाच्या आहेत . परंतु , डार्क चॉकलेटसच्या जगात लिंडत अँड स्पृन्गली  (Lindt and Sprungli) या कंपनीचा दबदबा आहे . याची बहुतेक उत्पादन आता भारतात सहजतः उपलब्ध होतात . याच बरोबर बेल्जियमच्या , चोकॉलिक कंपनीचं ५४% डार्क ,गोडीवाच ७२ % डार्क असे अनेक पर्याय आहेत . याशिवाय झेविक ,  जस टृफ्स , मेसन अँड कंपनी अशा अनेक कंपन्या आहेत .

             भारतात ऑनलाईन माध्यमातून वरीलपैकी बहुतेक उत्पादन मिळतात . स्वित्झर्लंड , जर्मनी , यूके इत्यादी देश   चॉकलेटचा फडशा पाडण्यात आघाडीवर आहेत . हळूहळू भारतीयांनाही डार्क चॉकलेटची चव , कडवटपणातील माधुर्य उमजू लागलं आहे .  याच वाढतं प्रस्थ वाढण्याचं कारण म्हणजे  डार्क चॉक्लेटसचे  अँटिऑक्सिडेन्ट गुणांचे लाभ . ब्लड  प्रेशर संतुलित करणे , त्वचेची सुरक्षा यासाठी डार्क चॉकलेटस उपायकारक आहेत असे अनेक संशोधनात पुढे आलं  आहे . डार्क चॉकलेटस फायबर , लोह इत्यादींनी  युक्त आहेत .   रोजचे जेवण , फलाहार याला ते पर्याय ठरणार नसले तरी डार्क चॉकलेटसच्या कडवटपणातील माधुर्य हळूहळू मोहिनी टाकते , अन मग या डार्क जगाच्या चॉकलेटी दुनियेत  तुम्ही नकळत विहरू लागता .


No comments:

Post a Comment