चिकनच्या अनेक रेसिपी प्रसिद्ध आहेत . त्यातल्या अगदी गावरान पद्धतीच्या भुजिंग आणि पोपटी यांची लज्जत काही न्यारीच . पोपटीला तर एक परंपराही लाभलेली आहे . भुजिंग चा जन्म खवैयांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी झाला आहे तर पोपटीला परंपरेचे कोंदण आहे . दोघांच्या प्रक्रिया वेगळ्या आहेत . एकात तेलाचा भरपूर वापर तर दुसरी तेलविहरीत . एक पटकन तयार होणारी, दुसरीला संयमाची जोड हवी .पोपटी करताना संयम नाही पाळला तर आपला पोपट नक्कीच होतो . दोघांमधील समान धागा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात दोघांची लज्जत वाढते , मैफिल रंगते आणि खुमासदार होते .
भुजिंग
भुजिंगच्या निर्मितीची कथा मजेशीर आहे . दारू पिणाऱ्यांना सोबत चटकदार खायला काय द्यावं द्यावं याच्या संशोधनातून चिकनवर भाजणे , तळणे या प्रक्रियेतून पोह्याच्या संमिश्र सोबतीने आगाशी , विरार येथे हा पदार्थ प्रथम निर्मिला गेला. चिकनला पोह्याची जोड काही आगळीवेळी आहे . प्रथम चिकन,बटाट्यांच्या फोडींना जिरा , हळद , धणे, मीठ लावून मॅरिनेट करायचे . लोखंडी सळईत चिकन , बटाटे याप्रमाणे गुंफायचे . कोळश्याच्या भट्टीवर खरपूस भाजायचे .
वरील भाजण्याची प्रक्रिया झाल्यावर कांदे ,वरील मॅरिनेटेड चिकन, बटाटे व खडे गरम मसाले , हिरवी मिरची , लसूण याचे जाडसर मिश्रण हंडीतील तेलात परतायचे . हंडीवर थाळी ठेवून १० ते १५ मिनीटानंतर त्यात पोहे परतायचे . काही जणांना पोहे आवडत नसल्यास नाही वापरले तरी चालतील .
भुजिंगला भाजण्यासाठी भट्टीची गरज लागत असली तरी हे काम दोन विटांवर खाली कोळसे जाळूनही करू शकता . घरी हे शक्य नसते त्यावेळी चिकन थेट गॅसवर भाजता येईल . कोळस्यावर भाजल्या जाणाऱ्या चिकनची नैसर्गिक चव त्याला लाभणार नसली तरी, जिभेचे चोचले थोड्या प्रमाणात नक्कीच शमले जातील . चिकनला कोणते मॅरीनेट वापरायचे याचा निर्णय सर्वस्वी तुमचा . अट एकच प्रथम चिकनला भाजणे मग त्याला तेलात परतणे . एकदा तोंडाला लागलं की , त्याचा फडशा पडला म्हणूनच समजा .
पोपटी
पोपटी हा पदार्थ रायगड परिसरात साधारण थंडी सरत आली की म्हणजे साधारणतः फेब्रुवारी महिन्या करण्यात येतो . याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रक्रियेत जराही तेल वापरत नाहीत . म्हणजे डाएट बद्दल जागृत असणाऱ्या लोकांना पर्वणीच . चिकनचे तुमच्या आवडीचे मॅरिनेशन , वालाच्या शेंगा , बटाटे, अंडी आणि भांबुर्डीचा पाला मातीच्या मडक्यात बंद करायचा .फक्त जाळावर चिकन शिजवायचे . चिकन जितकं जास्त वेळ मॅरीनेट केलेलं असेल तितकं लवकर शिजत . गप्पा मारत झोंबऱ्या थंडीत निसर्गाच्या सानिध्यात केलेली मेजवानी म्हणजे अवर्णनीय स्वर्गीय सुखाचा आनंद.
भांबुर्डीचा पाला नदीकिनाऱ्यावर विपुल मिळतो . मातीच्या मडक्यात प्रथम भांबुर्डीचा पाला , त्यावर मॅरीनेट केलेलं चिकन (१ किलो ), वालाच्या शेंगा (२ किलो ), अंडी(१२) , बटाटे (१/२ किलो ) असे थर रचायचे . वरून मीठ , ओवा भुरभुरायचा आणि मग वरून भांबुर्डीचा पाल्याने मडक्याचे तोंड व्यवस्थित बंद करून विटांवर मडक्याच्या तोंडाच्या दिशेने रचायचे . भवताली सुक्या गवताचा, सुकलेल्या फांद्यांचा जाळ करायचा . साधारणता चिकन एक तासात शिजते, अर्थात जाळाची धग किती आहे यावर ते अवलंबून आहे . मडके काढताना कपड्यात धरून व्यवस्थित काढावे . पाला वेगळा करून सर्व पदार्थ मोठेया परातीत किंवा केळीचे मोठे पान असल्यास त्यावर काढायचे आणि मग कधी चिकन तर कधी शेंगा हुडकून काढत गप्पांच्या मैफिलीत अन बोचऱ्या थंडीला शह देत त्याचा फडशा पाडायचा.
चिकन कबाब ,चिकन टिक्का , चिकन ६५ असे चिकनचे अनेक लज्जतदार अवतार असले तरी या मातीतल्या भुजिंग , पोपटीची मजा , सर त्याला नाही . निसर्गाच्या सानिध्यात आस्वाद घेत पोपटीची लज्जत काही आगळी वेगळीच , त्याला रंगणाऱ्या गप्पाची जोड असते . तर भुजिंगमध्ये स्वत्वात लीन होत जिव्हेला अन देहाला स्वर्गीय आनंद देण्याची अविरत गोडी आहे .
शाकाहारी मंडळींनी नाराज होण्याचं कारण नाही . प्रक्रिया वरीलप्रमाणेच आहे . चिकन , अंडी बाजूला काढायची त्याऐवजी सहज मॅरीनेट होणाऱ्या आणि लज्जत वाढवणाऱ्या शेंगा ,बटाटे , कंदमूळ (रताळे ,काटेकनगे इ . ) किंवा आपले आवडीचे पदार्थ वापरून शाकाहारी भुजिंग , पोपटी तयार करायची . हे दोन्ही पदार्थ गरम असतानाच चाखण्यात मजा आहे . नुकतेच हंडीतून काढलेले हे पदार्थ भौतिक , आत्मिक सुखाची प्रचिती एकाच वेळी देतात . पोपटी साधारण थंडीमध्ये खाण्याचा मेनू असला तरी हाडाचा खवैय्या थंडीसाठी थोडाच थांबणार आहे. याच देही, याच डोळा सुख चाखायचे असेल तर मग वाट कसली पाहता . घ्या भुजिंग , पोपटीचे नाव आणि लागा खवैय्येगिरीला .
No comments:
Post a Comment