विक्रम
गोखलेंसारख्या दिग्गज कलावंताला जवळून पाहण्याचा अन् ऐकण्याचा योग अलीकडेच आला.
अभिनयावरच त्यांच भाष्य कानात प्राण आणून ऐकत होतो. त्यांची सर्वात पहिली सूचना- पाय दुमडून बसू
नका. हाताची घडी घालू नका दोन्ही हात
ढोपराजवळ ठेवा आणि शांत मुद्रेत बसा. डोळे
थोडावेळ बंद करुन मध्यभागी ज्योत दिसते का हे पाहण्याचा प्रयत्न करा. काही लोकांनी अशी ज्योत दिसल्याचे
सांगितले. त्यावर ते मिश्किलपणे हसले,
म्हणाले अद्यापर्यंत हे कुणालाही शक्य झालेले नाही. त्याकरीता उच्च दर्जाची एकाग्रता आवश्यक
आहे. हेतू एवढाच होता की सर्वांनी एखादे कार्य
सुरु करण्यापूर्वी लक्ष आत्मकेंद्रीत करणे गरजेचे आहे. सूचना किती सोप्या होत्या अगोदर कधी असं
गांभीर्याने केलचं नव्हतं. या साऱ्या
सूचनांचा परिणाम म्हणजे सहजता, एकाग्रता न कळत साधली गेली. त्या अवलीयाच्या छोट्या छोट्या सूचनांचा अर्थ
उलगडू लागला गुंतलेले धागे सैलसर होऊ लागले. वाटा स्पष्ट दिसू लागल्या.
पहिला
महत्वाचा मूलमंत्र म्हणजे साहित्याचा खोलवर अभ्यास करणे. केवळ संहिता वाचन पुरेस नसतं त्यातले सुप्त
अर्थ समजून घेण्यासाठी, ती अधिक समृध्द करण्यासाठी चौफेर वाचन हवंच. ते
अभिनेत्यालाही लागू पडतं. वाचन, मनन,
चिंतनाने एखाद्या भूमिकेची खोली, तळ गवसतो.
सुप्त आणि सूक्ष्म उलगडू लागतात.
या बाबत श्रीराम लागूंनी “वाचिक अभिनय” या पुस्तकात सांगितलेला किस्सा सामान्य अभिनेता आणि कसलेला
अभिनेता यांच्यातील भेद स्पष्ट करतो. तो
किस्सा असा आहे की, मुलाच्या घरी अपमानीत होऊन “नटसम्राट” मधील अप्पा आगगाडीने मुलीच्या गावी पोचलेत. प्रसंग रेल्वे स्टेशन वरचा आहे. अप्पा आणि त्यांची पत्नी कावेरी यांच्यात खालील
प्रमाणे संवाद होतो.
अप्पा - गेली. (विव्हळ होऊन)
कावेरी - कुठली गाडी होती?
गेलीचा अर्थ या प्रसंगातील रेल्वे स्टेशनची पार्श्वभूमी लक्षात घेता गाडी असाच
सर्वसाधारणपणे झाला असता. त्यानुरुप
प्रसंगात कुठलीही नाट्यमयता किंवा भाव प्रकट झाले नसते. परिणामत: प्रसंग तितका उत्कट झाला नसता. डॉक्टरांना जो अर्थ उमगला त्याप्रमाणे,
प्रत्येक डब्यात त्यांना त्यांची लाडकी नात ठमी दिसण्याचा भास अधिक होता. कारण काळजावर धोंडा ठेवून ते तिला मागे सोडून
आले होते. त्यामुळे गेली या शब्दातून
अगतिकता, विव्हळता दिसणे महत्वाचे होते.
कावेरीच्या दृष्टीने तो एक डब्बा होता.
परंतु अप्पांच्या नजरेत प्रत्येक डब्यात ठमी असण्याचा भास होता. भावावस्था, एकाच प्रसंगातील आशय कावेरी व अप्पा
यांच्या पातळीवर भिन्न करत होते.
डॉक्टरांना हे कसं जमलं? त्यांच्याच शब्दात - व्यासंग करायचा तो चौफेर वाचन, मनन, चिंतन याचा करायचा. म्हणजे बुध्दी, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि
मुख्य म्हणजे धागेदोरे पिंजून काढणारी विश्लेषण शक्ती यांचा वापर बुध्द्या आणि
सातत्याने करायचा.
Even master has to learn हे खरच आहे. स्वत:ला कायम शिष्य
मानायचं. सतत शिकत रहायचं हे गोखले सरांनी
आवर्जून सांगितले.
गोखले सरांना शिवराळ दिग्दर्शक/शिक्षक
यांचा फार तिरस्कार वाटतो.
विद्यार्थ्यांना गुरुने शिवीगाळ करणे त्यांना मान्य नाही. सर्वसाधारण अनुभव असा आहे की, एखाद्याला एखादी
गोष्ट नीट समजत नसेल तर दुसऱ्याला सांगताना त्याचे विश्लेषण करता येत नाही. होतं
काय त्यामुळे आगपाखड करणं सुरु होतं.
अल्बर्ट आइनस्टाईन यांच याबाबत एक सुंदर भाष्य आहे.
If you can’t explain
it. Simply, you don’t understand it
well enough.
हे समजण्यासाठी चौफेर वाचन, निरंतर शिक्षण फार महत्वाचे आहे.
शब्दांचा योग्य वापर करणं का आवश्यक
आहे, त्यामुळे विधानाचे अर्थ कसे बदलू शकतात हे सांगताना त्यांनी तिथलाच एक प्रसंग
निरीक्षणातून टिपला. काही वेळा भयंकर हा
शब्द अलंकार म्हणून अयोग्य ठिकाणी वापरला जातो.
म्हणायच असतं खुप चांगल असं परंतु त्याला पर्यायी शब्द भयंकर असा
वापरल्यावर त्याचे अर्थ बदलतात हे त्यांनी मार्मिकपणे सांगितले. आपण फक्त बघत असतो, सरांसारखी व्यासंगी माणसं
सतत निरीक्षण करत असतात, विश्लेषण करत असतात योग्य पर्याय शोधत असतात.
अभिनयाबाबत सांगताना ते म्हणाले,
भूमिकेत शिरणं वगैरे असं काही नसतं.
प्रेक्षकांना नैसर्गिक, विश्वासार्ह वाटेल असा त्या भूमिकेचा आभास निर्माण
करायचा असतो, हे त्यांनी स्पष्ट केल. भूमिका संपली की त्यातून बाहेर पडायचं - स्विच
ऑफ. भूमिका सुरु झाली स्विच ऑन. रंगमंचावर eye contact कसा महत्वाचा आहे त्यामुळे पुढील
प्रसंगाची कडी कशी उलगडत जाते हे त्यांनी
स्पष्ट केलं. मला आठवतय लहानपणी
प्रेक्षकांकडे पाठ करायची नाही, संवाद मोठ्याने बोलायचे असं सांगितलं जायचं. काही वेळा मग विचित्र अवस्था व्हायची. आतासं कुठे कळू लागलय आवाज केवळ कंठातून निघता
कामा नये तो डोक्यातून निघायला हवा. नुसती
पाठांतर केलेली वाक्य प्रभावहीन वाटतात.
त्यात सहजपणा, भावना, चढउतार याचे अलंकार चढवले तरच ते संवाद प्रेक्षकांवर
गारुड करतात.
सरांनी जितकं सांगितलं त्यातलं जितक उमजलं तितकच लिहीलं. महासागरातील काहीच बिंदू वेचता आले. त्याचा तुम्हाला उपयोग व्हावा म्हणून हा
उपक्रम.
No comments:
Post a Comment