एक होतं
गाव. सुंदर त्याचं नाव. नावाप्रमाणेच नदी वेलींनी लगडलेलं. दरी खोऱ्यांनी वेढलेलं. गाव तसं छोटं. बांबूची
छोटी छोटी घरं. अंगणाला फुलांची रांगोळी.
धबधबे, झरे होते गावची श्रीमंती.
जवळच्या जंगलातील पाखरांचं संगीत म्हणजे पर्वणी . गावकरी साधे. स्वप्न त्यांची छोटी, मनं मात्र मोठी. बैलगाडीतून फिरायचं . घुंगराच्या नादमय स्वरात
झिंगायचं. छोट्या छोट्या आनंदात डुंबायचं
असं होतं ते सुखी गाव.
कुणाची नजर लागली आणि आजूबाजूला शहरं
वसू लागली. सिमेंटच्या जंगलांनी पैसा खेळु
लागला. गावकऱ्यांना झाडापेक्षा पैसा मोठा
झाला. झालं नको तेच हिरव्या जंगलाच्या
छाताडावर सिमेंटच्या गगनचुंबी इमारती आकाशाला भिडू लागल्या. दूरदूरवरची हिरवळ लुप्त झाली. मोटारगाडीचे कर्णकर्कश आवाज वाढले त्यांनी
बैलगाड्यांच्या कर्णमधूर घुंगरांना गाडले.
आकाशाच्या नितळ पडद्यांना धुराने जाळले .
पाणी जिरवा, पाणी वाचवा, झाडं वाचवा चा
मंत्र हसण्यावरी गेला . पाणी आटू लागलं. आकाश, जमीन भकास झालं . ढग रुसून बसले. व्हायचं तेच झालं. चिंब पाण्यात भिजणाऱ्या लोकांच्या डोळ्यातील
पाणीच आटू लागलं. सगळं शुष्क झालं. एका हिरव्या गावाचं आता भयाण स्मशान झालं.
No comments:
Post a Comment