Monday, 27 July 2015

अच्युत गोडबोले

अच्चुत 
          अच्युत   गोडबोले यांच कोणतही पुस्तक मी डोळे बंद करुन घेतो कारण,  त्यात नसतात  कंटाळवाणी वर्णन, अलंकारीक  भाषा ,  शब्दजंजाळता… .विषयाला थेट हात घातलेला असतो अन् कुठेही पाल्हाळ न लावता रंजक रितीने माहिती सादर केलेली असते. प्रामाणिक आणि सरळ लेखन असल की, ते नीरस होत नाही. त्यांच्या ज्ञानलालसेला सीमा नाहीत. गणित, मानसशास्त्र कॉर्पोरेट जगत, साहित्य, विज्ञान,संगीत  . अनेक विषयांच लेखन ते करतात केव्हा आणि तेही इतक्‍या सुंदर रितीने याची मला कायम उत्सुकता असते.

        लहानपण सोलापूरसारख्या छोट्या गावात….   त्यानंतर आयआटी मुंबईचे केमिकल इंजिनीअर…  कॉम्‍प्युटर क्षेत्रात वावर…  सर्वोच्च  पदी असताना चक्क त्याचा त्याग करुन पूर्णपणे लिखाणाला वाहून घेणे या सर्व गोष्टी थक्क करणाऱ्या  आहेत.
        आज मराठीत काल्पनिक साहित्य, ललित लेखन स्वरुपाची पुस्तके भरपूर आहेत . विज्ञान, व्यवस्थापन, गणित इ. विषयावरील उपयुक्त पुस्तकांची संख्या खूप कमी आहे. सरांनी मराठीतून पुस्तक लिहिल्याचा जो निर्णय घेतला आणि ज्यामुळे जगातील अनभिज्ञ गोष्टींची आम्हाला माहीती मिळाली, त्याबद्दल  त्यांचे आभार मानतो. ते  स्वत:ला सर्जनशील लेखक समजत नाहीत हा त्यांचा विनय आहे. परंतु त्यांच्या पुस्तकांमुळे अनेक विषय समजायला लागले, संकल्पना पक्कया होऊ लागल्या, समोरील मार्ग स्पष्ट दिसू लागले.

      आयुष्यातल्या वेदनेचा बाऊ न करता आयुष्यालाच स्मितहास्याने भिडण्याची…  त्यालाच आपलसं  करण्याची त्यांची वृत्ती भावून जाते. जगाबद्दल असलेल्या कुतूहलातून ते विश्वाची गूढता सोप्या भाषेत उलगडून सांगतात. त्यांची  ज्ञानाची भूक अजूनही  अफाट आहे. गणिताच्या भाषेत सांगायच म्हणजे infinity आहे. विश्व, मानवी आयुष्य, संस्कृती,  भाषा, भावना, अस्तित्ववाद , देव ,विज्ञान ,भांडवलशाही, उत्क्रांती  इ. चा  मागोवा घेताना झालेल्या विचार मंथनातून माहीतीचा खजीना आपल्यासमोर खुला होतो . कोणतीही कंजुषी नाही. 

          विश्वाच्या अफाटतेमुळे , त्यात घडणाऱ्या सर्वच गोष्टींचे आकलन होत नाही. देवाचं अस्तित्व  आणि  विज्ञानाची वस्तुनिष्ठ भूमिका  याचा गोंधळ आपल्या मनात कायम असतो . यातून ,निसर्ग हा देव व मानवतावाद म्हणजे धर्म असे मानत त्यांनी  मार्ग काढला आहे . देव या संकल्पनेतील चांगलेपण स्वीकारायला हरकत नाही पण त्यातून जर समाजाचा समतोल ढळत असेल तर ….  त्यांच्या पुस्तकांच्या वाचनातून आपण जास्त वस्तुनिष्ठ विचार करायला लागतो . 

         आयुष्याला अर्थ प्राप्त होण्यासाठी विचार ,वाचन , मनन , चिंतन याची आवश्यकता प्रतिपादित करताना निराशेची जळमट   कशी दूर करायची याचा  मार्गही ते स्पष्ट करतात. "मुसाफिर " या त्यांच्या आत्मचिंतनातून त्याचं व्यक्तिमत्व तर कळेलच पण तुमच्या आयुष्यातील वेदना , निराशा ,समस्या या गर्तेतून बाहेर पडण्याचा तसेच आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचा सकारात्मक  दृष्टीकोनही  लाभेल. 

           स्वतःच्या छोट्याश्या प्रतिभेने फुशारून न जाण्याची , या अफाट दुनियेत आपण कणमात्र आहोत याची जाणिव त्यांच्या पुस्तकातील प्रतिभाशाली व्यक्तीत्वं  कायम देत आपले पाय जमिनीवर ठेवतात . त्याचबरोबर तुमच्यातल्या सुप्त गुणांना जागृत करून सकारात्मक मार्ग क्रमण्याची प्रेरणाही देतात.  




No comments:

Post a Comment