Tuesday, 28 July 2015

गोष्ट तशी गमतीची

        व्यापार , धंदा या गोष्टींपासून मराठी माणूस दूर राहत असल्यामुळे जेव्हा तरुण पिढीतला मुलगा याबद्दलचा निर्णय घेतो , तेव्हा साहजिकच परंपरागत मानसिकतेत अडकलेला  बाप अन प्रवाहाबरोबर जाणारा स्वतंत्र विचाराचा  मुलगा  यांचा भावनीक , वैचारिक संघर्ष सुरु होतो .  या विषयावर  आधारीत  "गोष्ट तशी गमतीची " ह्या नाटकाची कथा आहे .  
       नाटकाचा विषय तसा पाहिला तर गंभीर आहे . परंतु  नाटककर्त्याला व्यावसायिक भान ठेवाव लागत असल्यामुळे हलक्या फुलक्या गमतीतून विषयाला हात घालण्यात आला आहे . खर तर वैचारिक गोंधळाची  सुरवात दहावी  नंतरच सुरु होते . बाहेरच्या जगात नेमक काय चालल याची कल्पना नसल्यामुळे  किवा नोकरीपलीकडे मराठी कुटुंबात विचार होत नसल्यामुळे एका चाकोरीबध्द पध्दतीने जग बघायची आपल्याला सवय झालीय . या नाटकात मुलगा जेव्हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतो , तेथून दोन पिढ्यातल्या वैचारिक संघर्षाला सुरुवात होते . 
        याला मी generation gap म्हणणार नाही … मुळात स्वतःला काळाबरोबर विकसित न करण्याचा हा परिणाम असतो . गुजराती मुलाने धंद्या ऐवजी नोकरी करण्याचा निर्णय घेतला तर त्या कुटुंबात काय धमाल होईल असाही विचार मनात आला . मंगेश कदम -बाबा ,लीना भागवत -आई , शशांक केतकर -मुलगा असे  सशक्त कलावंत असल्या मुळे  सादरीकरण अधिक प्रभावी होते . 
        या नाटकातल्या गमती पाहण्यापेक्षा नाटकातला विचार आवडला . तो ज्या गमतीदार सादरीकरणातून समोर येतो त्या गंमतीत गुंतून न राहता यातून मराठी माणसाने काही वेगळा विचार करायला सुरुवात केली तर ते या नाटकाचे फलित असेल.  


No comments:

Post a Comment