Thursday, 23 July 2015

समुद्र

         समुद्र नाटकाची कथा unfaithful या चित्रपटाशी साधर्म्य साधणारी वाटल्यामुळे हे नाटक पाहणे टाळत होतो. परंतु प्रत्यक्ष नाटक पाहताना ते वेगळ असल्याच जाणवलं. कथा छोटी , साधी असली तरी भावनांची गुंतागुंत मोठी आहे . चिन्मय मांडलेकर यांचे सुंदर सादरीकरण... स्पृहा जोशी यांचा सहज अभिनय ... त्यांच्यातले संवाद -प्रति संवाद शेवटपर्यंत खिळवून ठेवतात .
          भास्करला सत्य माहित आहे . सत्य माहित असताना ते व्यक्त करता येत नसेल तर जी घुसमट होते, ती घुसमट अन त्यानंतरचा भावनांचा उद्रेक , नाटकातील प्रकाशयोजना , नेपथ्य , सादरीकरण , कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय याने नाटकाला शेवटपर्यंत जोडले जातो .
      नंदिनी तशी साधी गृहिणी पण स्वतःची ठाम मत असलेली बुध्दीमान स्त्री . तिच्याकडून झालेली चुक…. एक नैसर्गिक घटना असल्यासारखी , पतीला पटवून देण्याचा तिचा प्रयत्न… दुसरी कोणतीही अभिनेत्री असती तर पचनी पडला नसता . परंतु स्पृहा जोशी यांच्या अभिनयातला सहजपणा , प्रामाणिकपणा ती घटना स्वीकारायला भाग पाडते .
        आपल्याकडे सर्व असल तरी, सर्व असतच अस नाही . काहीवेळा एक पोकळी राहून जाते . त्या पोकळीत जर एक हवीहवीशी लहर गुज करू लागली , तर नाही रोखता येत मनाला . साद -प्रतिसाद याचा खेळ सुरु होतो आणि जेव्हा तुमचा आत्मसन्मान दुखावला जातो , तेव्हा वस्तुस्थितीच परीक्षण सुरु होत. भास्कर आणि नंदिनी अशाच गर्तेत सापडले आहेत . त्यांच्यातल्या संवादाने कथा हळुवार उलगडत जाते . नाटकाचे समुद्र नाव अगदी योग्य वाटत कारण असे सत्य स्वीकारायला तुमच्याकडे खरोखरच समुद्रासारखे विशाल मन हवे.


No comments:

Post a Comment