Thursday, 20 August 2015

मनाचे प्रशिक्षण


      आयुष्यातील एका टप्प्यावर क्षणिक स्थैर्यता असताना भूतकाळात डोकावल तर प्रश्न पडतात.....आज काय साध्य झाल ? मी नेमका कोण आहे?  काय ओळख माझी?   अनेकांना हे प्रश्न पडतात. अध्यात्माच्या किंवा अन्य मार्गाने मनाच्या गुंता सोडवायचा प्रयत्न होतो .  हा गुंता खरच सुटतो का?  परमार्थाच्या डोहात मनाचा थांग लागतो का?  स्थेेेर्य प्राप्त होत का?  संतवचन अलंकारिक भाषेने  भारलेली  आहेत.  त्यातील आशयाचे  सामान्यजनांना खरोखरच आकलन होते का? अध्यात्म  हा आत्मशुद्धीचा मार्ग आहे . अध्यात्म काय फक्त आत्ममग्न होऊन स्वानंद मिळवण्याचा मार्ग आहे? आत्ममग्न होताना बह्याजागाताशी पूर्णत : फारकत घ्यायची . प्रामाण्यवादाच्या कसोटीवर तपासल असता पुन्हा मन अस्थिरतेच्या डोहात  गंटागळया खाऊ लागत.

        जग मिथ्या म्हणाव तर वर्तमानाची अनूभूती होतेय.  भूतकाळाचे पडघम मनावर वाजतायेत.  ते  स्व :च्या  अस्तित्वाची जाणीव पदोपदी करुन देतायेत. नेमक करायचं काय ?  जग मिथ्या  मानून मग जीवनाची जबाबदारी झटकायची.  ही जबाबदारीच तर देतेय आत्मभान.  सामान्याचं,   असामान्यत्व त्यांनी घेतलेल्या जीवनाच्या जबाबदारीतून स्पष्ट होत असताना,शब्दजंजाळमय कर्महीन डोहात दिशाहीन फिरत राहायच? जीवनरुपी नौकेत विहार करताना मनावर असंख्य प्रहार सोसून मनाला कणखर करणाऱ्या ,जीवनाला मार्गदर्शक ठरलेल्या  व्यक्तीमत्वाचा शोध घ्यायचाय . जीवनाला ध्येय मानून त्यालाच भिडणाऱ्या या धुरंधरांच्या संघर्षातून मनाला बळ मिळत. 
             
     साहित्य  अलंकारिक समावेशनाने  समृध्द होत असल, जीवनाचा आशय त्यातून दृष्यीत  होत असला तरी प्रत्यक्ष जीवन म्हणजे व्याकरण चालविणे नाही. त्याला कर्माची आणि वस्तुनिष्ठतेची जोड लागतेच. आईनस्टाइन यांनी  जस सांगितले आहे,तस   मनाला प्रशिक्षण देणे महत्वाचे आहे.विज्ञानाच्या काही प्रयोगातून माणूस आपल्या आभासी प्रतिमेवर प्रहार झाला तरी कळवळतो, हे निदर्शनास आलय . मग प्रत्यक्ष प्रहार झाल्यावर त्याची काय स्थिती होईल.  कस बाहेर यायच या स्थितीतून मनाला संभाव्य विषम घटनापासून आधार दयायला प्रशिक्षण दयाव लागत. ही निरंतर प्रक्रिया आहे.  अनेक विचार ....त्याचे चिंतन… चिंतनातून मार्ग. 


    अनेक प्रतिभावंत माणसाकडे बघताना उगाचच असूया वाटते. परंतु  with great power , comes great responsibility म्हणजे नुसता मार्ग स्पष्ट होऊन उपयोग नाही.  जबाबदारी स्वीकारायची तयारी हवी. एखादया नाटयगृहातील डोअर कीपर रोजच रंगमंचावरील  अविष्कार बघत असतो .  अगदी जवळून त्यांला  ही कला अनुभवता, पाहता येते.  मग त्यातून का नाही एखादा कलाकार जन्माला येत.  कदाचित वेगळ उदिष्ट किंवा जबाबदारी न स्वीकारण्याची तयारी.  अनेकांना अशा संधी वेगवेगळया मार्गाने निसर्ग उपलब्ध करुन देत असतो.  कदाचित आपल ते उदिष्ट ही असत.  मग जबाबदारीचा प्रश्न आला की पुन्हा संथगती सुरु होते. 

    कधी निसर्गाचा  राग येतो एकाला बौध्दीकरित्या समृध्द बनवलय......तर दुसऱ्याला त्याच्या विचाराचे आकलनही न होण्याइतके दुर्बल. एकाने  सापेक्षतावादाने  दोन घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदललाय तर दुसऱ्याकडे हा दृष्टीकोन समजण्या इतकीही क्षमता नाही. प्रत्येकात त्याच स्वत:च एक बलस्थान निसर्गाने दिलेल असत.  त्याचाच तर शोध सुरु आहे.  किती काळ गेला याला महत्व नाही.  ( ज्या क्षणाला हे सामर्थ्य जाणवत  त्या क्षणाला आयुष्याचा खरा प्रवास सुरु होतो)  भौतिक सुखाच्या संर्घषात स्वत्वाचा शोध घ्यायला वेळ लागतो खरा. अब्राहम लिंकन यांच उदाहरण तर सुंदर आहे.  राजकारणात कितीतरी वेळा हा मनुष्य अपयशी ठरला.  उददीष्ट निश्चित होत आणि जबाबदारी ‍स्वीकारण्यास  तर कायम उत्सुक . त्यामुळे ध्येय गाठलच . 
     
   जीवनाच्या अनेक पैलूंकडे पाहताना ते शांत नदीच्या पात्रावर पावसाच्या सरीने निर्माण  तरंगा सारखे वाटत.  तरंगातील प्रत्येक बिंदू महत्वाचा आहे.  परंतु अधीर,अस्थिर मनाच्या प्रवेगामुळे  ते तरंग आत्यंतिक वेगाने प्रवाहबध्द झाल्यासारखे वाटतात. आयुष्यात नेमक तसच होत.  इंद्रधनुष्याच्या कमानीतील कोणता रंग माझा याचे आकलन न झाल्याने भौतिकरित्या जरी समृध्दता असली  तरी चंचल मनाचे काय ? त्याचे केवळ भौतिक सुखाने समाधान होते काय ? 
    
    काय सुखावतेय मनाला.  साहित्य, कला, अभिनय, विज्ञान, तंत्रज्ञान का नुसता परमार्थ.  जीवनातील अनेक घटकापैकी नेमका कशातून आनंद मिळतोय याची मनाची खात्री झाली की,  किमान पुढील मार्ग क्रमण्याची प्रेरणा तरी मिळेल. ज्याची  अनुभूती होतेय त्याला मिथ्या मानून कर्तव्यविन्मुख कस व्हायच . ज्या घटकातून आनंद मिळतो त्याची अनुभूती स्वर्गीय सुखापेक्षा वेगळी असते काय?  ज्यातून आनंद मिळतोय,मनावरच  ओझ हलक झाल्यासारख वाटतय, त्या  घटकांशी एकरुप होऊन  त्या मार्गावरील  वारकरी झाल्यासारख .मनाला आनंद देणाऱ्या घटकाच्या शोधात पूर्णत: समरस झालेली  भक्ती आध्यात्मिक रुपापेक्षा वेगळी आहे काय? 


    या मार्गावर चोखंदळ व्हावच लागेल.  अध्यात्म / विज्ञान यातून नेमक्या मार्गावर मार्गस्थ् व्हावच लागेल.  अध्यात्म विज्ञान यांचा परस्पर विचार करताना त्याला कोणत्या मर्यादेपर्यंत सिमीत  करायच याच  आईनस्टाइन , विवेकानंद यांच्या सारख्या ज्ञानी व्यक्तीमत्वाना पूर्णपणे आकलन असत.  आपल्या सारख्या सामान्यजनाच काय?  कसा मार्ग शोधायचा जो माझ्या मनाच्या आनंदाशी निगडीत असेल.  जो  आनंद देईल पण विध्वंसक नसेल.  

    एक तर आपण  असतो किंवा नसतो. असण म्हणजे जबाबदारी.   नसण म्हणजे उदिष्टापासून पळवाट . असण आणि नसण यातील दरी मिटली की, जीवन सूरु होईल. निरंतर कर्माशिवाय फलनिष्पती नाही.  हा काळ मग अवकाशा एवढाही असेल किंवा अगदी थोडा.  तुम्हाला इतक कार्यमग्न , आत्ममग्न व्हाव लागेल की, काळ-अवकाश यात सीमारेषाच राहणार नाही.  जे  फलित   येईल त्याने मन विचलित  नको .  यशाने अंहकार आणि अपयशाने नैराश्य नको .  कार्यपूर्तीच्या आनंदात न्हाऊन निघालो तरी गात्रात   शिथिलता नको .  हे विश्व अफाट आहे ते आपण कणमात्र असल्याची कायम जाणीव करुन देईलच.    

   आधुनिक शास्त्रातील व्यवस्थापनशास्त्राचा मनाच्या व्यवस्थापनासाठी आधार घ्यावाच लागेल.  मनाला शिस्त, नियोजन, प्रेरणा,  दिशा याची शिस्त लावावीच लागेल . अध्यात्म सामान्य पामरांच्या आकलना पलीकडे आहे.  त्याला कर्म कळते. जे कळत नाही त्याला माणस दिव्यत्व बहाल करुन मोकळे होतात. मनाला  प्रशिक्षण देताना दु:ख, नैराश्य, वेदना  मिथ्या  ठरू देत.  झोकून द्यायची   आणि उद्दीष्ट , जबाबदारी स्वीकारायची शक्ती  मनाला मिळूदे. 

     त्या मनाशी कधी बोलायच ?  जीवनाच्या रहाटगाडयात एका कोनाडयात फेकले गेले होते.  मनाला आज  त्याच्याशी संवाद झाल्यामुळे अंतरिक उर्मीची,सत्वाची निदान जाणीव तर झालीय.  हा प्रवास, वाद-संवाद चालूच राहील.  पण मनाला स्वत:पासून अलग केल्यामुळे जीवनात जे    दुबळेपण आले होते,त्याला तरी खंड पडेल . 

                        मना  नको होऊ दुर्बळ
                       जीवन नाही शब्दभांडार सकळ 
                       मनाचे चिंतन तेचि  बळ
                       कर्म  कर्म कर्म करील सबळ

   वरील विवेचनाचे सत्त्व गीतेतील खालील केवळ एका  ओळीतून स्पष्ट होत .  
              “कर्मण्येवाधिकारस्ते  मा फलेषु  कदाचन” 
             
            

  

  
  

   

1 comment:

  1. Wow... Loved the article. Action Action Action is the bottom line.

    ReplyDelete