Tuesday, 25 August 2015

त्या तिघांची गोष्ट




                     "त्या तिघांची गोष्ट " पुन्हा त्रिकोण . हे त्रिकोण सर्वसामान्यांना गणितात जेव्हढे त्रास देतात , तेव्हढेच  प्रत्यक्ष आयुष्यात देतात . मग तो प्रेम त्रिकोण असो वा अन्य त्रिकोण . आजच्या   नाटकांना या  त्रिकोणाच खूप आकर्षण असल्याच दिसून येत. अन प्रेक्षकांनाही .  विभक्त आई-वडील आणि त्यांची मुले हा कौटुंबिक त्रिकोण असा  विषय एका वेगळ्या  मनोविश्लेषणात्मक  मांडणीतून  प्रेक्षकांसमोर येतो . यात आई , वडील , मुलगी या तिघांच्या मनोभूमिका , त्याचे परस्परावर होणारे परिणाम , त्यातून होणारी गुंतागुंत  याची उकल करण्याचा प्रयत्न आहे . 

            दीनानाथ आपल्या महत्त्वाकांक्षेपोटी ,   कुटुंबाची गरज गौण ठरवून वेगळा झालेला   स्वार्थी,  मतलबी माणूस आहे अस पत्नीला वाटत . तसच चित्र ती मुलीच्या डोक्यात निर्माण करतेय . माध्यमातून अवगत झालेली पित्याची चांगली प्रतिमा आणि आईने रंगवलेली मतलबी प्रतिमा    यातून मुलीच्या  मनाचा  गोंधळ होतोय . एक दिवस वडील भेटायला येतात . तिला आपली बाजू सांगतात . मुलगी पुन्हा दोलायमान . आई ते त्यांच्या  व्युह्ररचनेचा  भाग असल्याच सांगते . असुरक्षितता , त्यातून निर्माण झालेले गैरसमज , संशय मुळे तिची अशी वागणूक झाल्याच पतीला वाटत  . त्याप्रमाणे तो मुलीसमोर आपली भूमिका मांडतोय . 

        पत्नीने त्याच्या विरुद्ध सांगितलेली  प्रत्येक घटना  दीनानाथ मुलीसमोर मान्य करतो . परंतु त्यातील  दुसऱ्या  बाजूचे सडेतोड  तर्क बुद्धीने विश्लेषण करतो . पत्नीला त्याच्या या विलक्षण तर्कबूद्धीची , आपली बाजू पटवून देण्याच्या हातोटीचीच भीती वाटत असते.  यातून  तो मुलीला आपल्यापासून हिरावून घेईल अशी भीती तिच्या मनात निर्माण झालीय .  त्याच्या बोलण्यात , कृतीत , भेटण्यात नेहमी एक हेतू असतो अस तिला कायम वाटत . 

       मुलीची त्याला एवढी ओढ असते तर तो भेटत का नाही . याच कारण पत्नीची  असुरक्षितता,  त्यातून मुलीबद्दल निर्माण झालेला तिचा  possessiveness  अस उत्तर तो देतो . दोन्ही पालक सुजाण  आहेत,  मग  ते का अस  वागतात . फक्त स्वार्थापोटी. आपल्या मुलीच्या आयुष्यावर परिणाम होईल याचा विचार त्यांच्या मनाला  नाही शिवत . मनुष्य प्राणी निसर्गत: स्वार्थी असला तरी  आपल्या स्वार्थापोटी कुटुंबाच्या  सुखाला तिलांजली देतो  हे नाट्य भय चकित करणार वाटत .मुलीच्या रूपाने त्यांच्या दीर्घकालीन दुराव्यातून एक समेटाची आशा निर्माण झालेली असली तरी तोपर्यंत पुलाखालून बराच पाणी वाहून गेलेलं असत . परिस्थितीच्या रेट्यातून दोघांच्याही निग्रही भूमिका तयार झालेल्या आहेत .  मुलीच बालपण  त्यांच्या भूमिकेमुळे मायेला , त्यांच्या एकत्रित सहवासाला मुकल आहे . 

     मुल जन्माला येताना आई-वडिलांना त्यांची  NOC घेण्याची सोय निसर्गाने केलेली नाही . मुल तुमच्या इच्छेने जगात येतात . मग जबाबदारी तुमचीच . आपल ध्येय साध्य  करताना स्वार्थ, इच्छा , जबाबदारी याचा योग्य ताळमेळ साधावा लगतो. हे नाही साधल तर त्यातून नात्याची गुंतागुंत निर्माण होते . मुलीने दोन्ही बाजू जाणून घेतल्या आहेत . कुठल्याही एका बाजूला झुकत माप न देता पुढे काय करायचं हे ठरविण्याचा निर्णय ती स्वत: घेणार आहे . 



No comments:

Post a Comment