Tuesday, 29 September 2015

समुद्रमंथन

              “समुद्र” हे नाटक आवडले ते  उत्तम सादरीकरण, दोन बुध्दीमान कलाकारांच्या अभिनयामुळे. नाटक पाहत असताना सादरीकरण, नेपथ्य, संगीत, अभिनय या पलीकडे प्रेक्षक काही पाहत असतात. नाटक फार्स, कॉमेडीच्या अंगाने जात असेल तर फार विचार करावा नाही लागत.  नाटकात अंतर्मुख करणार element असाव अस नेहमी वाटत, कारण सिनेमा , नाटक ही माध्यम माणसांना माणूस म्हणून विचार करायला प्रवृत्त करणारी सशक्त माध्यम आहेत .  त्याचा सकारात्मक उपयोग करता आला तर . 
            नंदिनी मैत्रीत जे नैसर्गिक नात शोधतेय त्यात तिला काही वावग वाटत नाही, हा विचार व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून स्वीकारण भाग पडेल कदाचित.  परंतु तिला जे सहज वाटत, त्याचे अन्य परिणाम ही समाजात संभवतात. विवाह संस्थेचा उदय होण्यापूर्वी कोणतीही बंधन नव्हती . अगदी सहजपणे रक्ताच्या नात्यानात्यातही ते स्वीकारल गेल होत. यातुन स्वैराचार,  त्यातुन अराजकता कशी माजली अन या अराजकतेवर उपाय म्हणून विवाहसंस्थेचा विकास होऊन समाजाला एका स्थिर पातळीवर आणण्याचा प्रयत्न कसा केला गेला याबाबतचे वर्णन राजवाडे यांच्या “भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास” या पुस्तकात आहे.
          म्हणजे नंदिनीला जे वाटत ते तितक सहज नाही. या  सहजपणातून  भीषण दुष्परिणाम , सामाजिक असमतोल संभवतो . मला या नाटकामागचा नेमका उददे्श जाणून घ्यायचा होता. केवळ एक घटना म्हणुन पाहायचं अन् खोल आंतरिक समजुतीन कस स्वीकारायच?
        नंदिनीच्या आयुष्यात जे घडत ते समाजात घडतच नाही अशातला भाग नाही. परंतु त्यातुन नात्यांचे बर्म्युडा ट्रगल सारखे त्रिकोण तयार होऊन नाती अक्षरक्ष: ढवळून निघतात.  सगळच काही सहजपणे स्वीकारल जात नाही. सिनेमा, नाटक एका सुखद शेवटापर्यंत आपल्याला आणून सोडतात ,  प्रत्यक्ष आयुष्यात मात्र तेथून पुढे नात्यांची कसोटी सुरु होते.  आपल मन, विचार, प्रेम, नात कितीही प्रामाणिक असल तरीही . 
      का नंदिनी भास्कर पासुन वेगळ होऊन गणेशशी संसार मांडत? म्हणजे विवाह संस्थेचाही मान राखला गेला असता. पुन्हा नंदिनीच व्यक्तीस्वातंत्र्य अबाधित आहे अस गृहीत धरुया. नंदिनीच्या म्हणण्या प्रमाणे आपल्या मनात नेहमी काहीतरी चालु असत,  न सांगताच समजाव दुसऱ्याला.  हो नक्कीच सुरु असत. हे कुणीतरी समजून घेण कायम वाटत असत . माणसाच्या मनाचा तळ अजून कुणाला सापडलेला नाही. परंतु या मनाच्या तरंगातून शारिरिक पातळी पर्यंत नात जोडल जात तेव्हा नक्कीच नात्याचे बदल तितके सहज राहत नाहीत. म्हणजे भास्करलाही ते जाणवतयं. नंदिनी तितकी सहज, नैसर्गिक नाही. नंदिनीला ते नात इतक सहज वाटत तर मग तिच्या नात्यातला नैसर्गिकपणा का लोप पावलाय?  समाजात यातूनच तर वादाला सुरुवात होते. संस्कार म्हणा किंवा इगो अशा बदलामुळे मन स्थिर राहत नाही. एक बोच लागुन राहते मनात.  कायदयाने आपला जोडीदार कोण असावा याच पूर्ण स्वातंत्र्य दिलय आपल्याला.  नंदिनीला ही ते स्वातंत्र्य होत.
      गणेशच्या त्या वाक्याने ती दुखावली जाते. अशा नात्यात अशी वाक्ये सहजपणे स्वीकारली जातात. नंदिनी इतकी संवेदनशील दाखवली आहे की,  त्या वाक्याने ती पटकन दुखावली जाऊन नात संपवून टाकतेपरंतु, भास्कर जेव्हा तिला सत्य जाणुन घेण्याच्या दृष्टीने टोचत असतो. अक्षरक्ष: हीन पातळीवर विचारतो. किती वेळा ?आपल्या घरी ? त्याच्या घरी ? दुपारच्या वेळी ?  त्यावेळी ती का नाही दुखावली जात? का नाही संपवून टाकत नात? का तिच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाला, विचार स्वातंत्र्याला जपण्याचा प्रयत्न करत ती? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत.  
          कलावंत एखादी भूमिका निवडताना नेमक काय पाहतात याची कल्पना नाही. केवळ त्या व्यक्तीरेखेचा विचार केला जातो किंवा एक व्यापक समाजमनाचा ही विचार केला जातो? किंवा केवळ व्यावसायिकतेचा विचार केला जातो याचीही कल्पना नाही? परंतु बुध्दीमान कलावंत असा विषय निवडतात तेव्हा खरच अनेक प्रश्न पडतात. का हा विषय निवडला गेला असेल ?केवळ भावनांचे आंदोलन शब्दांच्या कुंचल्यातून तरलपणे साकारले आहे  म्हणून? खोल आंतरिक भावनांचे पदर शब्दांलकारातून उलगडून दाखविण्यात आले आहेत म्हणून? 
        नात्यातील भावनांचा निरपेक्षपणे विचार करुन मांडण  सोप असत पण प्रत्यक्ष समाजात जगताना ते फार सोप नसत.  व्यक्ती स्वातंत्र्य या एका निकषावर सर्व स्वीकारार्ह आहे. परंतु समाज व्यक्ती स्वातंत्र्य जपण्याइतका प्रगल्भ आहे का? भास्कर ते स्वीकारतो.  समाजात अनेक वेळा अशी नाती माहीत असतात/ नसतात.  मग नात्याला ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा कडेलोट होतो.
        जगात चांगल/वाईट अस काही नसत सगळ सापेक्ष असत. आपल वागण हे रासायनिक प्रक्रियेचा एक भाग आहे. म्हणजे आपल्या क्रियांवर आपल नियंत्रण नसत.  मग सगळच सुरळीत.  परंतु प्रत्यक्ष अस होत नाही. मानवी मनाचे कंगोरे इतके सहज असते तर त्यांना मर्यादा आखुन दयाव्या लागल्या नसत्या. या सर्वाच भान राखुन नेहमीच कलाकृती सादर केली जाते अस नाही.
       गणेशसारखे पुरुष आपला दृष्टीकोन पटकन जाणवू देत नाहीतस्त्री मनाच्या दृष्टीकोनाचा आदर करत आहेत असे वरवर भासवत असले तरी बहुतांश वेळा त्यांच्यातल्या ययायीची गरज असते. नंदिनीला जे सहज वाटत,  ते अशा सावजाच्या  शोधात फिरणाऱ्या पुरुषातल्या  ययातींना  संधी वाटू शकते अशा वेळी निरपेक्षनिष्पापनितळ दृष्टीकोनाची माणस सापडणार कुठ.  काळच ठरवितो सर्व काही म्हणून नंदिनीसारख नात्यातील शोध घेण धाडसाच ठरेल.
        मग , आत्यंतिक प्रेमान अशी नाती जपली जातात काय?   प्रगल्भ समाजात अस काही सहजतेने स्वीकारल जात असही नाही. नाहीतर unfaithful सारखे चित्रपट निर्माण झालेच नसते. अशा नात्याबरोबर मत्सर, व्देष, तिरस्कार, असुरक्षितता, अविश्वास या मानवाच्या उपजत भावनाही आपसुक बाहेर येतात. आपल काहीतरी हिरावल गेलय या भावनेतून पुढील संघर्ष अटळ असतात.  या त्रिकोणात ना पुढे जाता येत ना मागे.  त्यातच फिराव लागत.  दिशा हरवून.  खोल आंतरिक विचारान एकमेकांना स्वीकारण हा अपरिहार्य मार्ग आहे. परंतु हा पर्यायही तेव्हाच खुला असतो जेव्हा त्रिकोणातील एक बाजू दूर होते . पण घाव उरतातच मनात खोलवर.
      परस्पर  नात्यापलिकडे वेगळ असत मनात. नात्यात काही कारणाने पोकळी निर्माण झाली अन् त्या पोकळीत आंतरिक सादाला  प्रतिसाद देणारी लहर गुज करु लागली की, साद प्रतिसादाचे खेळ सुरु होतात. परंतु अशी घटना टोकाच्या व्यक्तीमत्वामुळे, स्वभावातली असहजतेमुळे होण्याची शक्यता जास्त असते. नंदिनीच्या जीवनात स्थिरता  आहे. मानसिक  पातळीवर ती असामाधानी वाटते.  भास्करचा जो प्रांत आहे व नंदिनीची आवड बौध्दीक प्रगल्भता, व्यापकता, विचारांची खोली यात अंतर आहे. समाजात अशी जोडपी भरपूर आहेत.  मग समव्यावसायिक  असले तर विचारांची नाळ पटकन जुळते असही नाही. दोघांचा व्यवसाय काहीही असो जोडीदाराबद्दल वाटणार प्रेम, जिव्हाळा, आदर, विश्वास, सहजता यातूनच नात्याची एकरुपता निर्माण होते. ते तर भास्कर मध्ये आहे. मग नंदिनी अस काय शोधण्याचा प्रयत्न करतेय. नाटकात असा फार मोठा संघर्ष नाही. ज्यामुळे नंदिनीची भूमिका समजून घेता यावी.  याकरिता अत्यंत व्यापक दृष्टीकोन ठेऊन नंदिनीच्या व्यक्तीमत्वाचा विचार केला तर एवढच म्हणता व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून तिचे विचार पटवून घ्यावे लागतील.
      आपला समाज कोकरासारखा आहे. मोठया व्यक्तीमत्वाच्या कृतीमागे तो डोळे झाकून जातो. फार कमी चित्रपटात मी पाहील आहे की नायक सभ्यतेच्या मर्यादा पाळून वागतो आहे? आपण आज समाजात त्याच प्रतिबिंब पाहतो तेव्हा अस्वस्थ होतो. समुद्र या नाटकात नंदिनीचे विचार, दृष्टीकोन याचा तिचे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणुन आदर करावा लागेल.  नंदिनीने विचारातली सहजपणाच्या बाजूचा  दुसरा पदर, त्याची दाहकता कुठेही उलगडलेला नाही. वेळेची मर्यादा असावी कदाचित.  हे ही तितकच खरं इतर कोणतेही कलावंत त्या व्यक्तीरेखा इतक्या विश्वसनीय, जिवंत करु शकले नसते.
        नंदिनीला जे सहज वाटत त्यातुन काय उद्भवू शकत? नाटकातल्या नंदिनीला गणेशमुळे पुढचे विषम भोग आले नाहीत म्हणून प्रत्यक्ष जीवनात ते येणारच नाहीत अस नाही. अशा त्रिकोणांमुळे सिनेमा, नाटक यात कॉमेडी, ट्रॅजेडी, सुखांतिका, मेलोड्रामा निर्माण करता येत असले तरी प्रत्यक्ष जीवनात फार उलथापालथ होऊ शकते.
    समुद्र मधला गणेश तसा नसता म्हणजे ते वाक्य त्याने कधी उच्चारलच नसत तर, त्याचा दृष्टीकोन तिला समजला नसता तर...........प्रत्यक्ष जीवनात फार ढवळून निघाला असत सर्व कारण,  हे त्रिकोण फार गुंतागुंतीच  होतात . त्याची समीकरण सोडवण अवघड होत  . 
        प्रेक्षकांना सुखापेक्षा संघर्षाच भारी आकर्षण असत.  नंदिनीच्या जीवनात गणेश नसता तर कोण नाटक पहायला आल असत. जोपर्यंत अशी परिस्थिती निर्माण होत नाही. त्यातून नाटय निर्माण होत नाही तोपर्यंत नंदिनीचे विचार, दृष्टीकोनात कुणाला रस आहे.
   अशा प्रकारची नाटक आल्यावर सरसकट घटना घडायला लागतील अशातलाही भाग नाही.  घटना घडतायत त्याचे परिणाम वेगवेगळे आहेत . समाजात पुरुषाच्या बाजूने अशी घटना घडली तर ती स्वीकारायला भाग पाडल जात. स्त्रीच्या बाजूने मात्र वेगळा दृष्टीकोन जोपासला जातो. घटना कुणाच्याही बाजूने घडो नात्याची घडी विस्कटली जातेच. एखादयाला नात्यात अपेक्षित सुख गवसल नाही तर , त्या सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचे मापदंड मग सारखेच असायला हवेत अशा नात्यातून निर्माण होणारी जबाबदारी, संघर्ष स्वीकारायचीही तयारी हवी. आयुष्य काही पानांच्या कादंबरीसारख नसत. ते वाहत असत. चुका, आकर्षण, नाती मतभेद सर्व बरोबर घेऊन ते नेमक कुठ सोडणार आहे. हे कुणालाच माहीत नसत अशा त्रिकोणात तर ते केवळ अनाकलनीय असत.
   आवडत कुणी.  खूप सहज वाटत एखादया बरोबर.  आपल्या मनाच प्रतिबिंब जणू त्या व्यक्तीतून परावर्तीत होत.  नेहमीच आश्वस्त ,  मोकळ वाटत.  समुद्र, अवकाश एकरुप वाटत.  शब्द, स्पर्श यात भेद राहत नाही. भावना प्रामाणिक असतात. निष्पाप असतात. नंदिनीच्या विचारांना या रुपकातून समजून घेता येईल. रूपककथा, स्वप्नकथा कादंबरीत मोहक वाटतात.  गुंगून जातो माणूस.  प्रत्यक्ष जीवनात पार हादरतो . विचार आणि आचार याची संगतीच लागण मुश्कील होत.  भावना प्रामाणिक असल्या तरी कधी समाज तर कधी प्रतारणा याच व्दंव्दं मनात सुरू होत.  स्वत:चच मन बोचायला लागत. commitment आणि duty याचा कस लागतो. संयमाचा बांध फुटू लागतो. नंदिनीची त्या बेसावध क्षणाची चूक मानता येईल फार तर . तिचा दृष्टीकोन योग्य कि अयोग्य याबाबत ,  शेवटी प्रगल्भ प्रेक्षकांनीच ठरवायचं आहे काय स्वीकारायच आहे ते . 






No comments:

Post a Comment