Wednesday, 10 February 2016

किती सांगायचय मला

किती सांगायचय
किती सांगायचय मला , किती सांगायचय
कोरड्या जगात माझ्या,
भोवती चार भिंती
बोचरे नकार सारे
अाशा क्षणात विरती
बैचैन स्वप्नांची अन पाखरे हरून जाती
मनाच्या पाऱ्याला अावरु किती

किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला  , किती सांगायचय

मनाच्या पाऱ्याला असे स्वप्नांचे बहर
मनाच्या आभाळी अशी ओले ती लहर
मनाच्या या गावी असे दोघांचेच घर

किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला  , किती सांगायचय

        वरील गाणे स्पृहा जोशी यांनी "डबलसीट" या चित्रपटासाठी  लिहिलेले गाणे आहे . 

            अगदी चपखल बसते सिनेमात अन प्रत्यक्ष आयुष्यातही .  खरचं कितीतरी गोष्टी सांगायच्या असतात आपल्या जोडीदाराला . विचारांची आवर्तन मनात पिंगा घालत असतात . शरीर कामात मग्न पण मन  चंचल . ते थोडेच ऐकणार . ते  गिरक्या घेऊन जोडीदाराच्या डोळ्यात सामावण्यासाठी आसुसलेलं असत. धांदोळा घेतच असतं  . अव्यक्ततेचं थैमान असते ते .

      माणसं आहेत , नाती आहेत . नात्यांची गर्दी आहे . तरीही या गर्दीत आपला एक कोपरा असावा अस नेहमी वाटत . आपल्या  छोट्याश्या घरट्यातील ऊब किती सुखावह  असते . भोवतालच्या चार भिंतींनी अडकूनच जातो आपण एका कोशात , एकाच लयीत . ही एकसूरी लय आयुष्य कोरड करू लागते . सप्तसुरांच्या मैफिलीकडे मन ओढ घेऊ लागत .  परंतु सर्व आपल्या परिघात रममाण . बांधून ठेवलं आहे त्यांनी स्वतःला अन आपल्यालाही . हे बोचरे अव्यक्त नकारचं तर  अस्वस्थ करत आहेत . मनात इंद्रधनुष्यासारखे फुलणारे रंग, रया नसलेल्या फुलासारखे कोमेजून जातात .मन पाखरू होऊन त्या डोंगरावर घिरट्या मारू लागतं. पलीकडे माझ स्वप्न आहे , पण ते धूसर दिसतंय . सर्व समोर आहे पण स्वप्नांना मर्यादा आहेत म्हणून बेचैन होतंय मन आपल्याच कोशातून मुक्त व्हायला , हतबल होऊन  हरून जातंय .थकुन परततय  आपल्याच घरट्यात .

      सामान्यांच जग तस कोरडच , Happiness comes in small packets या त्यातल्या त्यात मनाला सुखावणाऱ्या कल्पनेत सुख मानायचं . छोट्या विश्वात सुखाचे दवबिंदू जमा करून , सागराएवढ् सुख मानायचं , त्यात मग्न होताना मग सुखा आड  येणाऱ्या अडथळयांनी  अस्वस्थ   व्हायला होत . समोर तो डोंगर दिसतोय तो पार केला कि आल माझ स्वप्नातलं गाव . तो चढच तर बोचऱ्या नकारासारखा माझ्यातील चेतना क्षीण करतोय . माझ्या मनात उठलेल्या आवेगाला कसे आवरायचे , तुला हे सर्व कसे सांगायचे उमजत नाही . मन पाऱ्यासारख हेलकावतय . त्याला माझ्या स्वप्नांचे अनेक पदर आहेत . कसे उलगडून दाखवायचे ते ? अनंत गुलाबी पाकळ्यांच्या कोंदणात आपल्याच विश्वात मग्न आहे ते मन . जे  तुला सामावून घेऊन , सारख त्या डोंगरा पल्याड घिरट्या घालतंय.  त्या माझ्या मनातील मी तुला दिसते  का रे  ? माझ्या मनातल प्रतिबिंब तुला खुणावतंय का रे ?तुम्हा पुरुषांना काही कळतच नाही.  आमच्या मनातला ओलावा , सूक्ष्म अावेग आणि स्वप्नाच्या लहरीसोबत मनात उसळणाऱ्या लाटा .   प्रत्येक गोष्ट सांगीतलीच पाहिजे का ? माझ्या मनातील दोघांचे घर तुला दिसते आहे का ? हे माझे तुझ्यासवे मनात रुजलेलं  स्वप्न आहे . अरे मग तुला कसे नाही जाणवत माझ्या सर्वांगात उसळून येणारे ते तुषार , ज्यात मी चिंब भिजली आहे .  अस कितीतरी सांगायचं तुला . माझ्यातून धबधब्याच्या आवेगाने मुक्त होईल इतक आहे ते .

                                                 
           

No comments:

Post a Comment