Thursday, 31 March 2016

मुहूर्त

              स्‍मशानातलं ते भूत निघालं धुक्याला चिरत, बोचऱ्या थंडीला न जुमानता. निघालं आपल्या भूतकाळाचं वर्तमान शोधायला . आज भुतांच्या चालीरितीनुसार अमावसेचा मुहूर्त होता. तो चुकला तर म्हणून निघालं सुसाट. माणसं मेल्यानंतरही आपल्या सवयीचे गुलाम रहतात,हे खरंं. हे भूतही मुहूर्ताच्या जंजाळात रुतलेलं होतं. काल त्याच्या मुलासाठी मुहूर्ताप्रमाणे पुजा झाली होती. तो पोहचला तेव्हा अग्नीकुंड थंड होऊन क्षीण झाले होते. पुजेमुळे निर्माण होणाऱ्या सुमंगल वातावरणाचा मात्र अभाव दिसत होता. वातावरणात एक भकासपणा भरुन राहिला होता. सर्वजण सफेद कपडयात लपेटलेले असुनही काळवंडलेले दिसत होते. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याचा लहान भाऊ आलेल्या मंडळींना दु:खद अंत:करणाने सांगत होता.
               " थोरल्याच्या अखेरच्या इच्छेप्रमाणे त्याच्या मुलासाठी अंगणात मुहूर्तानुसार विधी ठेवला होता. कुठून हवेची झुळुक आली अन अग्नीची चादर होऊन छोट्याला लपेटलं आपल्या काल -बाहुपाशात, मुहूर्ताच्या पवित्र वेळेला न जुमानता. पवित्र भावनाही रक्षण करु शकल्या नाहीत त्याच्या . आज जोराची हवा सुटणार हे हवामान शास्त्र सांगत होते. मी भावाच्या भावनेत आणि मुहूर्ताच्या फासात अडकलो. हा मुहूर्त साधून काय साधलं?
            भूत दु:खाने स्वत:शीच पुटपुटलं ,"मी आपल्याच अंधश्रध्देचा गुलाम राहिलो . भूत झाल्यावरही ! "

No comments:

Post a Comment