Wednesday, 30 March 2016

"श्री बाई समर्थ"

             
  

           "श्री बाई समर्थ" या नाटकात दर्शविलेली सामाजिक स्थिती,  प्रत्येक घरात दिसणारं प्रातिनिधीक स्वरुप आहे. स्त्री-पुरुष समानता या कागदावर किंवा नाटकात पाहायच्या रंजक गोष्टी आहेत. याला कारण पुरुषी मानसिकतेतून वर्षानुवर्षे तयार झालेली एक समाजव्यवस्था.  महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महान व्यक्तीमत्वांनी स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाचा पाया घातला नसता तर आज स्त्रीला आपल्या स्वत्व:ची जाणीवही झाली नसती. परिस्थिती फारशी बदललेली नाही. स्त्री शिक्षित झाल्यामुळे तिला स्वातंत्र्य मिळण्याऐवजी तिच्या जबाबदारातीत उलट वाढच झाली आहे. तिचं नोकरी करणं हा आधुनिकतेचा टप्पा नसून घराला‍ आर्थिक आधार आहे,त्यामागे  एक स्वार्थी विचार आहे. नाटक, चित्रपट, साहित्य यातून पुरुषाचं "बिचारपणं" आणि त्याच्या गरजांचा पाढा याचं  चित्र कायम  रंगवल गेलय, त्यामुळे कायम स्त्रीला दुय्यम भूमिका प्राप्त झाली . 

                पितांबर मोरे कुटुंबप्रमुखमधुवती मोरे गृहीणीपिंटया हा मुलगा असं त्रिकोणी सुखी कुटुंब. मध्यमवर्गीय घरात दिसणारं एकाने विस्कटायच अन् दुसऱ्यान आवरायचं हे चित्र समोर येत.अर्थात आवरायचे भोग गृहिणीच्या वाट्याला येतातनेहमीप्रमाणे गृहिणीला गृहित धरलं असल्यामुळे तिच्याकडून घरातील सर्व कामांची अपेक्षा केली जातेया अपेक्षांच्या ओझ्याखाली गृहिणीच्या इच्छा दबलेल्या आहेत "श्री बाई समर्थ" या नाटकातील स्त्री  तिच्या दुय्यमपणाने व्यथित झाली आहे. तिच्या माफक अपेक्षाही पूर्ण होत नाहीत  म्हणून ती दु:खी आहे, तरीही  सुहास्य वदनाने व कर्तव्य भावनेने ती काम करत आहे. तिच्या एका नातेवाईकाला पैशाची गरज असते. परंतु व्यवहारी नवरा तिला नकार देतो. तेव्हा ती बंडाचे निशाण  उभारते. तिने काम केलेल्या दिवसांचा पगार ती मागते. सुरवातीला नवरा  गंमत समजून तिला उडवाउडवीची उत्तरे देतो .  नंतर तिला तो रक्कम द्यायला तयार होतो  व एक चेक देतो. परंतु तो चेक bounce होतो , त्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागते. त्याच्यातला अहंकार जागा होतो व तो घटस्फोटासाठी अर्ज करतो. दोघं आपआपली बाजू मांडत असतात. दोघांच्या विसंवादात पिंटया गोंधळला आहे . नेमकी कुणाची बाजू घ्यावी . प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं की , सर्वात जास्त कुतरओढ मुलांची होते . या फेज मध्ये  त्यांच्यात मानसिक आंदोलने सुरु होतात . या chaos मधून मार्ग काढण्यासाठी ते तटस्थतेचा मार्ग स्वीकारतात . त्याला दोघेही हवे असतात . 

                
           समीर चौघुले यांनी पत्रकार, पोलिस, न्यायाधीश अशा वेगवेगळया भूमिकेत धमाल आणली आहे. न्यायाधीशाच्या भूमिकेत ते तुम्हाला लोटपोट हसायला लावतात. त्यांच्या नैसर्गिक विनोदातून अफलातून हास्यनिर्मिती सहजत: व कोणतीही ओढाताण न करता होते. सासूच्या छोट्याश्या भूमिकेने वेगळीच रंगत आणली आहे. सासूचे मुलगा घरी आल्यावर उत्तेजित होऊन  वेगाने पळापळ करणे, मुलाला तुरुंगात जाव लागल्यामुळे सुनेला चिठ्ठीत शिव्या लिहून ठेवणे, सुनेची बाजू कळल्यानंतर ‍ तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे असे भूमिकेचे वेगवेगळे रंग कथेला रंगत आणतात. जेलमधून घरी आल्यानंतर पितांबर मोरेचा बाह्या वर सरकवलेल्या अर्विभावात झालेला प्रवेश हसू आणतो.

         नाटकाचा विषय गंभाीर असला तरी विडंबनात्मक शैलीत सत्य सांगताना विनोद भडक झालेला नाही. आपल्या समाजात खऱ्या अर्थाने समानतेची भावना येण्यासाठी अजून काही कालावधी जावा लागेल त्यासाठी मानसिकता बदलण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. तोपर्यंत अशा स्वरुपाची नाटकं वेगवेगळया सादरीकरणातून समोर येत राहतील.  शेवट काय होतो ते तुम्ही जरूर पहा?

No comments:

Post a Comment