Tuesday, 26 April 2016

सोबतीने चालताना


                                                                  सोबतीने चालताना 
                                                                  क्षण वेचत जायचं
                                                                 ओंजळीतल चांदणं
                                                                 एकमेकांना द्यायचं
             
             या   गीताच्या पार्श्वभूमीवर नाटक सुरु होतं. या गीताच्या ओळीतच नाटकाची रुपरेखा स्पष्ट होते. सोबतीने चालताना एकमेकांना समजून घेऊन पुढचा प्रवास करण्याची आवश्यकता गीतातून ध्वनीत होते.नाटकांतल्या पात्रांत काही विसंवाद  असणार त्यातून पुढचं नाट्य उभ राहणार हेही स्पष्ट होतंं. नाटकाच्या रंगमंचाला पेलणारा अन् बहुतांश प्रेक्षकांची पसंती असणारा आवडता मेलोड्रामा म्हणजे पती-पत्नी हे बेसिक कथासूत्र असलेले हे नाट्य. या कथासूत्रात बदलत्या परिस्थितीनुसार उपकथानक जोडल की, एक भावपूर्ण कथा तयार होते. आफ्टर लगीन , डोन्ट वरी बी हप्पी, अ फ़ेअर डील , त्या तिघांची गोष्ट  अशा नाटकांचा मूळ गाभा पती-पत्नीच नातं हाच आहे. डॉ.आनंद कुलकर्णी यांच्यासारखे अनुभवी मानोसपचारतज्ञ व लेखक भावनीक नात्यांची गुंफण  डॉक्टरांच्या सराईपणे करतात. ही पात्र जिवंत करण्याच , त्यांना आपल्याशी relate करण्याच काम कुमार  सोहनी  यांच्यासारखे NSD च्या भट्टीतून बाहेर पडलेले दिग्दर्शक सहजतेने करतात. मला अद्याप न समजलेले कोड हे आहे की, पती-पत्नी हा बेसिक ढाचा असलेली नाटक प्रेक्षक इतक्या आवडीने का पाहतात? दोन व्यक्ती म्हटल्या म्हणजे वेगळेपण अधोरेखित होतच.  ते नसेल तर जास्त समस्या निर्माण होतील अस वाटतं. परंतु हे वेगळेपण टोकाच असेल तरीही समस्या निर्माण होऊ शकते. सोबतीने चालताना हा समांतर प्रवास नाही. एकमेकांत मिसळून, समजून, उकलून करण्याचा प्रवास आहे.

             अनुराधा, ललित, अप्पा ( अनुराधाचे वडिल ), तन्मय अशी चार पात्रं या नाटकात आहेत. अनुराधा-ललित यांच्यामध्ये विसंवाद असल्यामुळे व टोकाला गेल्यामुळे अनुराधा अप्पाकडे राहायला आली आहे. त्यांचा मुलगा तन्मय हॉस्टेलमध्ये शिकत आहे. प्रत्येक बापाला वाटत तस अप्पांनाही त्यांच्या मुलीन एकत्र रहाव अस वाटत . ते तटस्थपणे दोघांच्या स्वभावाचा विचार करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायंत. त्यांच्या नात्यातला  विसंवाद अनुराधाची सासूविषयी असलेली मनातील अढी, ललितचा बायकोविषयी मनात निर्माण झालेला संशय यामुळे आहे  अस प्रथमत: वाटत .  त्याचे इतर पैलू हळूहळू उलगडत जातात. एकमेकांना गुदमरुन टाकणारं प्रेम अशा नात्यातल्या  विसंवादाच मूळ  कारण आहे . दुसर म्हणजे आपण नेहमी आपल्या परिप्रेष्यातून दुसऱ्याला पाहत असल्यामुळे दुसऱ्याच्या मताचा, मनाचा आदर करणे विसरतो . यातून मग भावनात्मक संघर्षाला सुरवात होते. हा संघर्ष टाळण्याचे अप्पांचे प्रयत्न फोल ठरतायतं निदान तन्मय सुटीत घरी आल्यावर त्यांनी एकत्र रहाव , किमान तसं नाटक करावं असंं त्यांना वाटतं. ललित, अनुराधा तयार होतात. तरीही त्यांच्यात अधूनमधून वाद होतच असतात. छोटया तन्मयला जाणवतं,  आई-बाबा एकत्र नाहीत. पती-पत्नी यांच्यातल्या विसंवादाचा परिणाम त्यांच्या मुलावर होऊ शकतो याचा प्रौढ पालकांनी विचार करणे आवश्यक आहे. पालकं बालकासारखे वागू लागल्यामुळे तन्मय अकाली प्रौढ झाला आहे. त्यामागे आई-बाबांना एकत्र आणण्याची तडफड आहे.

            पती-पत्नीच्या विसंवादामुळे मुलांवर होणारे भावनिक परिणाम. हे या कथासुत्राच सार आहे. पती-पत्नीच्या विसंवादाची हजारो कारण असू शकतात. सासू हे तर प्रातिनिधीक कारण आहे. पुरुषाचा संशयी स्वभाव हे विसंवादाच दुसर कारण.  बदलत्या काळाबरोबर पती-पत्नी मधील विरळ होत चाललेला संवाद, हे सुध्दा महत्वाच कारण आहे. सासू ,संशय ही समाजाला सहजत: अपिल करणारी विसंवादाची कारणे असल्यामुळे नाटकात पेरली असावीत असे वाटते . त्या व्यक्तीरेखा रंगविण्यात कलाकारांनी कसर सोडलेली नाही. संपूर्ण नाटकात दोघांमधला विसंवाद पूर्णपणे मिटणार नाही असचं वाटत राहत . कारण दोघांची असलेली दुराग्राही मत.  स्वत:चा विचार करताना तन्मयचा त्यांना विसर पडलेला दिसून येतो. त्याच्या बद्दलच प्रेम, जिव्हाळा उत्कटतेने जाणवत नाही. ते जरी एकत्र आले असले तरी एकत्र राहतील अस वाटत नाही. त्यांच्या नात्यात एक संदिग्धता कायम जाणवत राहते. अगदी ते शेवटी एकत्र आल्यावरही.ही भावनीक आंदोलनं व्यक्तीरेखेत  उतरवण  कसोटीच काम होतं. 
        आप्पाची यातली भूमिका तटस्थ असली तरी बाप, सासरा, आजोबा या नात्यांत  ती गुंतलेली आहे. त्यातले सूक्ष्म कंगोरे उलगडून दाखविणे अत्यंत अवघड होतं अनंत वेलणकर यांनी बापाची अगतिकता , आजोबांची काळजी , सासऱ्याची तटस्थता  यातून मनाची आवर्तने ,संयम  , घुसमट, उत्कटतेने सादर केली आहे. तन्मयची भूमिका केलेल्या बालकलाकाराने कमाल केली आहे . त्याचा रंगमंचावरचा वावर सहज , नैसर्गिक आहे . 

             भावनीक गुंतागुंत असली तरी त्याची वळणे उमजू शकतात. मात्र अशा नात्यातून मुलांवर काय गंभीर परिणाम होऊ शकतात, याची तीव्रता जाणवत नसल्यामुळे हा भावनात्मक पदर निसटत  असला तरी पती-पत्नीच्या संवादाची आवश्यकता प्रतिपादीत करण्यात नाटक बऱ्याच अंशी यशस्वी झालं आहे .

No comments:

Post a Comment