Tuesday, 12 April 2016

ढोलताशे



                 श्रध्दा, परंपरा आणि तत्व दोन्ही टोकाची असतील तर त्यातून मध्यममार्ग निघणं कठिण आहे. एक विचित्र संघर्ष उभा राहतो. आपल्या संतानी याचा विचार फार पूर्वी करुन ठेवला आहे. संत विचारात परम श्रध्दा आणि वस्तुनिष्ठ विचार अशा परपस्परविरोधी संकल्पनांची गुंफण आहे. श्रध्दा म्हटलं म्हणजे सत्य तपासून पाहण्याचा विचार आपोआपच खुंटतो. वस्तुनिष्ठ विचार तार्किक पातळीवर कठोरपणे तपासले जातात. संतसाहित्य वाचताना पूर्वी गोंधळ व्हायचा. मग लक्षात आलं, समाजमनावरील परंपरेचा, श्रध्देचा, रुढीचा पगडा विचाराच्या एका प्रहारान नाही दूर करता येतं. त्याला विचारांच  तर्कशुध्द बीज हळूहळू रुजवावं लागत. ज्यांना हे विचार झेपत नाहीत त्यांच्यासाठी श्रध्देचा सरळ सोपा मार्गही उपलब्ध आहे.

         चांगल्या विचारांच संचित म्हणजे धर्म असेल तर तो एकच हवा त्याच विभाजन का? "संभव-असंभव" या पुस्तकांत निरंजन घाटे यांनी , धर्मावर टीका करणारी पुस्तक खपतात. त्याचवेळी धर्माचा विचार पुढे नेण्यासाठी नवीन पंथ, संत उद्यास येत असतात, हा विचित्र विरोधाभास उलगडून दाखिवला आहे . त्याचवेळी .  कार्ल मार्क्स यांनी म्हटल्याप्रमाणे धर्म ही अपूची गोळी आहे. विज्ञाननिष्ठ विचारांनी सत्य तपासता येऊ लागल असलं तरी परंपरांचा पगडा तसूभरही कमी झालेला नाही. परंपरा ही मानवाची सामाजिक गरज आहे. सामाजिक असुरक्षितता , उदात्त हेतू यातून  परंपरेचा जन्म होतो. टिळकांनी समाजाला एकत्र बांधण्यासाठी गणपती उत्सवाची परंपरा सुरु केली. परंपरेमागचा हेतू उदात्त होता. परंतु परंपरा कालौघात वेगळं स्वरुप धारण करतात.बदललेल्या स्वरुपाने सांघिक भावनेला गोंगाटाच स्वरुप प्राप्त झालं. अानंददायी संगीताची जागा कर्कश वाद्यांनी घेतली. सुंदर नृत्यविष्कार हिडीस नाचगाण्यात परावर्तित झाले. नायक या बदलाने व्यथित झाला आहे
        
        लोकं तर्क खुंटीला टांगून असं आततायी प्रदर्शन का करतायतं हे त्याला उमजत नाही. लोकांवर परंपराचा पगडा इतका घट्ट का होत जातो? याचं समाज शास्त्रीय संशोधन सुरु आहे. त्याबाबत वेगवेगळे निष्कर्ष येत आहे. परंतु अजूनही समाजावरील परंपरेच गारुड दूर करण्यात तर्कनिष्ठ विचारांना यश आलेल नाही. नायकाला हे सत्य ठाऊक आहे. म्हणून तो स्वत:पूरता मिरवणूक न पाहण्याचा व त्याच्या घराच्या गॅलरीतून इतरांना पाहू न देण्याचा निर्णय घेतो. अशावेळी त्याची एक वृध्द काकू  मुलगासून यांच्यासह गावाहून पुण्यातील गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी त्याच्या घरी धडकले. श्रध्दा व तत्वनिष्ठता यांचा संघर्ष सुरु होतो. काकूला  गॅलरीतून मिरवणूक पहायची असते, नायक त्याला ठाम नकार देतो. तो चक्क गॅलरीला कुलुप लावतो. घरातील सर्वजण विविध प्रकारे त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु तो कोणत्याही दबावाला बळी पडत नाही. हे पाहून त्यांची काकू आक्रस्तळेपणा करुन  शेवटचा उपाय अंमलात आणते. नाइलाजाने नायकाला काकूचा हट्ट पूर्ण करावा लागतो.

          नाटकाचा शेवट सूचक आहे. सर्वजण गणपती मिरवणूकीचा आनंद घेत आहे. परंपरा साजरी करतायतं. त्या गदरोळात बाळ रडतयं. जणू समाजाचं प्रतिनिधीत्व करतयं. त्रास होतोय परंतु रडण्यापलीकडे काही करता येत नाही. बुध्दीच्या पट्टया समाजानं  घट्ट आवळून घेतल्या आहेत. तेथे सर्वकंष विचाराला थारा नाही. विचारांची एककल्ली बैठक तयार झालेली आहे. बाळाच्या डोक्यावरील पट्टी नायक काढतो. बाळ रडायचं थांबत.परंपरांच्या विरुध्द थेट लढण्याच धाडस नायकात नाही. समाजाने स्वत:हून डोक्याला घट्ट आवळलेल्या परंपरांच्या पट्टीतून सुटका करुन घेण्यासाठी केवळ ज्ञान, तर्कशुध्दता , वस्तुनिष्ठ ,लोकपयोगी विचार ही पट्टी सैल करु शकतात,   हे नायकाला माहित आहे तोपर्यंत वाट पाहण्याशिवाय तरणोपाय नाही.

         दुर्गाबाईंनी परंपरा ,रुढी याबद्दल सुंदर विवेचन दिले आहे. वरवरचा थर बदलतो. पण मूळ तेच राहत. कालौघातात परंपरेत बदल होत असतात.  समाजाने चौकस बुध्दीने कोणता थर समाजपयोगी आहे हे तपासलं पाहिजे,  त्यातील अनिष्ट गोष्टी टाकून दिल्या पाहिजेत. सती जाणे, केशवपन अशा प्रथा अनुचित , अतार्कीक  आहेत हे पटल्यामुळे समाजाने टाकून दिल्या . सर्वच परंपरा केवळ धार्मिक आहेत. म्हणून दूर सारण्याची आवश्यकता नाही. धर्म समाजाला नैतिक अधिष्ठान देतो, सांघिक जाणीव निर्माण करुन देतो हे विसरता कामा नये. चांगल्या परंपरेत काही अनुचित प्रवृत्ती डोक वर काढत असतात, त्याच भान  समाजाला झालं की, चांगल्या  उद्देशाकडे परंपरा वळू लागतात. ज्या परंपरेतून समाजात एक  सांघिक भावना वृघ्दीगत होत असेल अशा परंपरांचा समाज प्रबोधनासाठी कसा उपयोग करता येईल त्याचा विचार झाला पाहिजे. नायकाने कोलाहल टाळण्यासाठी घराची व्दारे बंद केली आहेत. मनाची व्दारे मोकळी झाली तर परंपरेच्या माध्यमातून व्यापक, सृजनशील, उदात्त समाजाची घडण करता येईल. हा मार्ग जास्त आशादायी आहे.     


No comments:

Post a Comment