Monday, 9 January 2017

एक शून्य तीन

             



           सुमित राघवन हा कलाकार "साराभाई व्हर्सेस साराभाई" या मालिकेपासून माझा अत्यंत आवडता कलाकार झाला आहे. अंगविक्षेप न करता केवळ भावमुद्रेच्या आधारे ,  नैसर्गिक विनोद कसा साधावा याचं सुमित  म्हणजे उत्तम उदाहरण आहे . त्यानंतर "बडी दूर से आये है " या मालिकेत त्याच्यासारखा हरहुन्नरी कलाकार वाया जात असल्याचं पाहून मन खट्टू झालं . नंतर त्याच्या वाचलेल्या मुलाखतीवरून कळलं , काहीवेळा कलावंतांना आर्थिक किंवा इतर कारणास्तव   तडजोडी कराव्या लागतात . असो हा कलावंत त्याच्या नैसर्गिक अभिनयामुळे कायम लक्षात राहतो . बऱ्याच दिवसानंतर नाटकी अभिनय टाळून नैसर्गिक अभिनय नाटकात प्रत्यक्ष पाहण्याची संधी सुमित च्या नैसर्गिक अभिनयामुळे पहायला मिळाली .

                 १०३ हे नाटक रहस्य , थरार या सदरात मोडते. सुमित या   नाटकात शोध -पत्रकाराची भूमिका करत आहे. हि कहाणी आहे केळकर नावाच्या धनाढ्य कुटुंबीयांची . तीन भावांच्या कुटुंबात सर्वात मोठे बंधू   परमानंद यांची कन्या हर्षदा ही रहस्यमयरित्या गायब झालेली आहे. परमानंद यांचा मृत्यू त्याअगोदरच नदीत बुडून झालेला असतो .ह्या  केसचा अभ्यास करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यांना  पुरावे मिळत नाहीत . हर्षदाचा भाऊ मंदार कारभार सांभाळत आहे . दुसरे बंधू पूर्णानंद यांची कन्या अनिता पटत नसल्यामुळे कलकत्याला निघून गेली आहे . सर्वात लहान बंधू सदानंद यांना अपत्य नाही . हर्षदा त्यांची फार लाडकी असते . हर्षदा त्यांना दरवर्षी वाढदिवसाला फ्रेम भेट द्यायची . तिच्या गायब झाल्यानंतरही त्या फ्रेम मिळत असतात . एका वर्षी त्यांना त्या फ्रेम मिळत नाही त्यामुळे ते अस्वस्थ होतात . त्यांचा अंदाज असतो , हर्षदाचे बरेवाईट करणाऱ्या व्यक्तीला फ्रेमची  गोष्ट माहित असावी,घरातील व्यक्तीचे हे काम असावे . याचा तपास ते सुमितकडे सोपवतात . कथा तशी फार गुंतागुंतीची आहे . कथेचे रहस्यमय वातावरण कायम राखण्यासाठी मंद प्रकाशाचा वारंवार वापर केलेला दिसून येतो . या कथेला जोडूनच नेहाचे उपकथानक आहे . नेहा हि दूरच्या काकाच्या अत्याचाराला बळी  पडलेली , अत्यंत कुशाग्र ब्यद्धीची मुलगी आहे . सुमित तिच्या मदतीने केस उलगडण्याचा प्रयत्न करतो.

             मनुस्मृतील विचारातून पुरुषी मानसिकतेने पछाडलेल्या पुरुषांचे भयानक चेहरे लेखकाने कौशल्याने उघड केले आहेत . ही पुरुषी मानसिकता एका मागोमाग एक स्त्रियांच्या खुनाची शृंखला का सुरु करते हे पाहताना अंगावर काटा उभा राहतो . संवादात अनेक पात्रांचा उल्लेख असल्यामुळे ते काळजीपूर्वक ऐकले तर कथेचा गुंता उलगडण्यास मदत होते. कथा कशी उलगडत जाते , रहस्य कसे उघड होते , हर्षदाने  डायरीत लिहिलेले क्रमांक , एक शून्य तीन  चा नेमका अर्थ काय , हर्षदाचे नेमके काय होते , हे प्रत्यक्ष पाहणे रंजक ठरेल .



               

No comments:

Post a Comment